नवीन लेखन...

।। श्री समर्थ रामदास स्वामींचे चरित्र ||

 

संत आंदाचे स्थळ । संत सुखचि केवळ ।
नाना संतोषाचे मुळ । ते हे संत ।।

समर्थांनी दासबोधामध्ये संतांचे वर्णन खूपच सुंदर केले आहे. संत म्हणजे जे काम, क्रोध, मोह, लोभ, मत्सर, दंभ ह्या षडरिपूतून आणि अहं, अहंकार, अहंता ह्यातून अतीत झालेले असतात त्यांना संत म्हणतात आपण महाराष्ट्रातील जनता भाग्यवान आहोत की महाराष्ट्राला संतांची मांदिआळीच लाभली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी हे प्रमुख पाच संत आहेत. त्यातील समर्थ रामदास स्वामी चे चरित्र पाहुया.

समर्थ रामदास स्वामींचा जन्म इ. स. १६०८ या वर्षी चैत्र नवमीला म्हणजेच रामनवमीला रामजन्माच्या वेळीच मराठवाड्यातील जांब या गवी झाला. हा योगायोग नव्हता. हे होणारच होते. ठोसरांच्या २२ पिढ्या श्रीरामाची आणि सूर्याची उपासना करीत होते. त्यामुळेच सुपिक जमीन त्यातील शुद्व बीज आणि त्यातून निर्माण होणारी रसाळ अतिशय गोड फळ येणारच होती. त्याप्रमाणे राणूबाई आणि सूर्याजीपंत ह्यांना श्रेष्ठ म्हणजे गंगाधर आणि नारायण अशी दोन गोजिरवाणी मुले झाली.

समर्थांच्या आयुष्याचे ४ टप्पे आपल्याला पाहायला मिळतात. पहिला टप्पा (१६०८ ते १६२०) जन्म ते गृहत्याग. दुसरा टप्पा म्हणजे समर्थांनी केलेली साधना, तपश्चर्या (१६२० ते १६३२) ह्या काळात नित्यनेमाने पुरश्चरण, अभ्यास, मनन, चिंतन तिसरा टप्पा (१६३२ ते १६४४) समर्थांनी तिर्थाटन, तिर्थाटनात संपूर्ण देशाचे अवलोकन केले. आणि चौथा टप्पा (१६४४ ते १६८२) समाप्रबोधन, सज्जनगडावर मूर्तीस्थापना आणि अखेर समाधी.

पहिला टप्पा हा त्यांचा लहानपणचा समर्थांचे पाळण्यातील नाव नारायण सूर्याजी ठोसर. नारायण हा लहानपणापासूनच अतिशय धाडसी, बलवान आणि शरीराने आणि मनाने सामर्थ्यशील होता. अतिशय चाणाक्ष, बुद्धीमान आणि स्वभावाने गोड होता. त्यांचा आवडता खेळ म्हणजे उंच झाडावर चढायचे आणि तेथून खालच्या डोहात सुर मारायचा. एकदा असाच जोरात सूर मारला आणि एका खडकावर आपटून डोक्यावर एक आवाळू आले ते आयुष्यभर राहिले. एकदा ते ८ वर्षाचे असताना नारायणाची आई त्याला त्याच्या खोडकरपणावद्दल रागावली. नारायणानेही ते मनावर घेतले आणि अडगळीच्या खोलीत जऊन बैठक मारून ध्यान केले. आईने विचारले तू काय करतोस इते? तेव्हा ८ वर्षाचा नारायण म्हणाला “आई चिंता करीतो विश्वाची.” अवघे आठ वर्षाचे वय पण तेव्हापासून नारायण शांत, स्थिर झाला नामस्मरण करू लागला. त्याला जणू काही रामाचा ध्यासच लागला. रामरायाच्या दर्शनाची ओढच लागली. वयाच्या १२ व्या वर्षी नारायण घरातून पळाला आणि रामरायाच्या दर्शनाच्या ओढीने नाशिकला काळ्या राम मंदिरात रामासमोर जाऊन उभा राहिला.

येथून आयुष्याचा दुसरा टप्पा सुरु झाला. तपश्चर्या, साधना (१६२९ ते १६३२) समर्थ घरातून पळून नाशिकला काळ्या राममंदिरात आले आणि त्यांनी रामरायाला साकडे घातले “रामचंद्रा तुझा वियोग। ऐसा बाप्पा नकोरे प्रसंग । तुज कारणे सर्वसंग। त्यक्त केला ।। अशी कळकळीची प्रार्थना करून ते टाकळी येथे गोदावरी आणि नंदिनी ह्या नद्यांच्या संगमावर आले आणि त्यांनी पुढील बारा वर्षे मोठी कठोर साधना केली, तपश्चर्या केली. साधनकाळात त्यांचा नित्यनेम म्हणजे रोज पहाटे चार वाजता ते नियमाने उठत, श्रीरामाची मानसपूजा करीत. नंतर शौचमुखमार्जन, स्नान, संध्या आणि सूर्यनमस्कार आटपेपर्यंत सूर्योदय होई. सूर्योदयापासून दुपारी १२ वाजेपर्यंत संगमस्थानी कमरे इतक्या पाण्यात उभे राहून ते गायत्रीमंत्राचा आणि श्रीरामाचा श्रीराम जयराम जयजयराम जप करीत. नदीमधील मासे त्यांच्या पायाना चावत असत. शिवाय रोज सतत सहा, सहा तास पाण्यात उभे राहिल्यामुळे कमरेखालचे अंग पांढरे दिसे. बारा वाजल्यानंतर पंचवटीस जाऊन ते मधुकरी मागून आणीत. श्रीरामाला नैवेद्य दाखवून सुमारे एक दिडवाजता ते भोजन करीत. भोजनोत्तर थोडी विश्रांती घेत. नंतर ग्रंथाचे वाचन करीत. दुपारी पुराण-श्रवणासाठी पंचवटीला जात. संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर ते टाकळीस परत येत असत. रात्री रामाचे भजन करीत असत. आपल सुखदु:ख रामाला निवेदन करीत असत. रात्री रामाचे भजन करीत असत. आपले सुखदु:ख रामाला निवेदन करीत आणि त्याचे नाम घेत झोपी जात. तपश्चर्येच्या दैनंदिन कार्यक्रमात एक दिवस देखिल खंड पडला नाही. वर्षानुवर्षे (१२ वर्षे) चिकाटीने व मनापसून केलेल्या साधनेचे फळ त्यांना मिळाले. रामाचे दर्शन, रामाचा साक्षात्कार आत्मसमाधान, आत्मशांती मिळाली. तिसरा टप्पा तीर्थाटन (१६३२ ते १६४४) टाकळीतील बारा वर्षाची तपश्चर्या पूर्ण झाली तेव्हा समर्थांना आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान प्राप्त झाले होते. पुढील १२ वर्षे समर्थंनी पायी देशाटन, तीर्थाटन केले. त्यांची निरिक्षणशक्ती अफाट होती आणि आकलनशक्ती जबरदस्त होती. त्याकाळी देशावर ५ शाह्या राज्य करीत होत्या. (कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही व बरिदशाही) सबंध देशात अनाचार, अनागोंदी, अत्याचार होत होता. पुरुषार्थ लोप पावला होता. देशाची स्थिती अगदी बिकट झाली होती. देशात माजलेला अनाचार त्यांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिला. त्यांना देशाचे विदारक दर्शन घडले. त्याचे वर्णन त्यांच्या अस्मानी सुलतानी आणि परचक्र निरुपण ह्या काव्यामधून आढळते. तीर्थाटणात ते जेव्हा उत्तरेत होते तेव्हा त्यांना शिखांचे सहावे गरु “गरुहरगोविंदसिंग” भेटले त्यांच्या हातात २ तलवारी होत्या समर्थानी त्यांना विचारले, आपण विरक्त, योगी आपल्याजवळ ह्या दोन तलवारी कशासाठी? तेव्हा ते म्हणाले. “बळाच्या आभावानेच आपण पराधिन झालो आहेत आणि शेकडो मैलावरून आलेले यवन तलवारीच्या जोरावर आपल्यावर राज्य करीत आहेत. माझ्या ज्या दोन तलवारी आहेत त्यातील एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी आणि दुसरी तलवार स्त्रीयांच्या शीलाचे रक्षण करण्यासाठी आहे. हरगोविंदसिहांचे हे विचार क्रांतिकारक होते. समर्थांच्या चित्तावर त्याचा खोल परिणाम झाला. समर्थांच्या चित्तात विचारांची क्रांती सुरु झाली. आता काहीही झाले तरी हा देश सामर्थ्यशील बनवायचाच असा निश्चय करुन मनाशी काही सकारात्मक खुणगाठ बांधतच समर्थ
तीर्थाटण पूर्ण करुन महाराष्ट्रात आले. चौथा टप्पा (१६४४ ते १६८२) समर्थांचे कार्य आणि समाधी.

केवळ लोकोपकारासाठीच आयुष्य वेचायचे. लोकसंग्रह करण्यास पुष्कळ वाव मिळावा तसेच पुष्कळ लोकांचे पुष्कळ कल्याण करता यावे या दृष्टीने त्यांनी कृष्णातीरी शहाजी राजांच्या जहागिरीत चाफळ येथे आपला नवीन संप्रदाय स्थापन केला. त्याचे नाव “स्वरुप संप्रदाय” आपली दैवते प्रबोधनासाठी बदलली. त्यावेळी विठ्ठल हाच सर्वांचे लाडके दैवत. पण तो शांत समर्थांना क्रांती घडवायची होती म्हणून समर्थांनी बलवान, एकवाणी, एकवचनी, एकपत्नी, आदर्श, मर्यादा पुरुषोत्तम, कोदंडधारी असा श्रीराम. बलवान, शक्ती, युक्ती, बुद्धी, पराक्रम, भक्ती ह्याने युक्त असा बलभीम मारुतीराया. शक्ती, बुद्धीयुक्त, महामाया जगंदबामाता ही तीन दैवते पक्की केली. समर्थ ज्या गावात जायचे त्या गावात मारुतीचे मंदिर स्थापन केले. मंदिर बांधताना मंदिराचा अर्धाभाग व्यायामाकरीता आखडा बनवलेला असयचा.

मठ आणि महंत पद्वती हे समार्थांच्या संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे. समर्थांना महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रा बाहेरही अध्यात्मविद्येची व विचार जागृतीची क्रेंद्रे निर्माण करायची होती. म्हणून समर्थांनी ११०० मठांची स्थापना केली. समर्थांचा एकेक मठ म्हणजे विद्यापीठच आहे. अध्यात्मविद्येपासून ते भौतिक विषयांचाही अभ्यास, त्यांचे ग्रंथ या मठात असलेच पाहिजेत हा समर्थाचा दंडक होता. मठावर एकेक मठाधिपती म्हणजे महंत नेमला. आपला मठ हे एक प्रबोधन केंद्र आहे ह्या भावनेने महंताने कार्य केले पाहिजे. महंती स्विकारणे म्हणजे सुळावरची पोळीच होती. महंताना कडक नियम असत. महंताने लोक संग्रह करणे, बालोपासना चालवणे, उत्तम संस्कार घडविणे, उत्सवाच्या निमित्ताने सर्व समाजाला एकत्र आणणे, मुलांना सन्मार्ग दाखवणे, लोकांना साक्षर करणे, भक्ति मार्गाचा प्रसार करणे, दुःखितांची दुःखे निवविणे इ. कामे महंताने करावीत अशी समर्थांची आज्ञा असे. त्यासाठी महंत ब्रह्मचारीहवा, लोकशिक्षक हवा, समाजगुरु हवा आशी समर्थांची अपेक्षा होती. समर्थ कोणत्याही मठात केव्हाही जाऊन महंताचा आणि शिष्यांचा झाडा घेत असत. “जैसे बोलणे बोलावे तैसेचि चालणे चालावे। मग महंत लीला स्वभावे । आंगी बाणे ।।१२-९-२३ असा महंत समर्थांनी निर्माण केला.

भिक्षा: – प्रत्येक मठाचा उदरनिर्वाह हा भिक्षेवर चालत असे. भिक्षा ही सुद्वा समर्थ संप्रदायाचे खास वैशिष्ट्य मानावे लागेल. समर्थांच्या आधीही गोरक्षनाथ, आदिनाथांपासून भिक्षा पद्धत होती पण समर्थांनी भिक्षावृत्तीला तात्विक अधिष्ठान दिले होत. भिक्षेपासून निस्पृहता येते, भिक्षा मागून जो जेवतो तो निराहारी बनतो. भिक्षेमुळे सर्व देश आपलाच आहे ही भावना होते. ओळखी येतात निर्भयस्थिती प्राप्त होते भिक्षासिसे सकळ लोक पारखता होतात. गावागावात काय चालले आहे तेथील परिस्थिती रहाणीमान तेथील लोकव्यवसाय सगळे पारखून काही कार्ये गुप्तरितीने पार पाडता येतात हा भिक्षेचा फायदा. म्हणून समर्थांनी भिक्षा पद्धत सुरु केली. देवकारणाबरोबरच, समाजकारण, राजकारणही समर्थानी केले. देव, देश, धर्म ह्या तीन्ही करीता सव अर्पण करणारी एक संघटनाच समर्थांनी निर्माण केली.

समर्थांनी लिहिलेले वाडमय: – सांप्रदायिक प्रमाण ग्रंथ म्हणून मान्यता पावलेला “दासबोध” हा ग्रंथ म्हणजे समर्थांची वाडमयीन मुर्ती आहे. दासबोधामध्ये २० दशक आणि २०० समास आहेत. विविध विषयांचे निरुपण त्यात आले आहे. व्यवहार आणि परमार्थ ह्यांचा सुंदर संगम म्हणजे दासबोध. समर्थांनी २०५ मनाचे श्लोक लिहले. स्वहित आणि आत्मोद्वार कसा करुन घ्यायचा ह्याची शिकवण म. श्लोकातून पहावयास मिळते. आत्माराम हा ग्रंथ हा साधकांसाठी पूर्ण तत्वज्ञानाचा छोटे खानी ग्रंथ आहे. स्पुटकाव्य तर अफाट आहे. पद, अभंग, ओव्या, करुणाष्टक, सवाया तसेच कारखाने कसे बांधावे, विटा कशा भाजाव्या, बागा कशा लावाव्यात झाडे कोणती, त्यांची नावे,स्वयंपाक कसा करावा, अनेकस्त्र आरत्या, संगीत, खगोल शात्र, ज्योतिषशास्त्र वगैरे चाही अभ्यास. समर्थांच्या हातून काव्य करण्याचा एकही विषय सुटला नाही.

समर्थ रामदासस्वामींचे शिष्य आणि शिष्या:-
समर्थांचा शिष्य परिवार खुप मोठा होता. देशभर ११०० मठ त्यातील शिष्य आणि महंत. या शिष्यात निरनिराळ्या मठांवर नेमलेले महंत आणि ग्रंथनिर्मिती करणारे ग्रंथकार असे दोन्ही प्रकारचे शिष्य होते. त्यातील कल्याण, उद्धव, भोळाराम, अज्ञान, दिनकरस्वामी, दिवाकर, मुसळराम, वामन पंडीत, मधुकर, सदाशिवशास्त्री असे अनेकानेक शिष्य होते. समर्थ संप्रदायात स्त्रीयांनाही विशेष स्थान समर्थांनी दिले आहे. स्त्रीयांविषयीचा समर्थांचा दृष्टीकोन पराकोटीचा उदार होता. स्त्री विषयक एकही अनुद्वार आपल्या संपूर्ण वाडमयात काढला नाही. त्यामुळे २१,२२ स्त्री शिष्या समर्थ सांप्रदायात होता. त्यातील प्रमुख म्हणजे अक्का, वेणास्वामी, सतीबाई, नानाबाई, अंबिका, अन्नपूर्णा, गंगा, भीमा अशा अनेकानेक शिष्या होत्या. सर्वाना शिक्षण दिले. काहीना मठाधिपतीही केले.

समर्थांचे कार्य: – समर्थांनी आयुष्यभर खरोखरच राष्ट्राची चिंता वाहिली. प्रत्येक क्षेत्रात म्हणजे धर्मकारण, समाजकारण, राजकारण, व्यवहारकारण, भक्तीकारण ह्याचा अभ्यास केला. आधी केले मग सांगितले ह्या प्रमाणे स्वत: अनुभव घेऊन लोकांना शरीराने आणि मनाने बळकट केले. प्रयत्नवादाचा पुसस्कार केला. समाजाला सर्व प्रकारे सामर्थ्यदृष्टी दिली. समाज पुनर्घटनेसाठी सामर्थ्य हे नवीन मुल्य समाजजीवनात रुजवले. भक्ती आणि ज्ञानह्यांची सुरेख सांगड घातली. “सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जे करील तयाचे। परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे।।२०-४-२६” हे समर्थांनी कृतीने रूजवीले. मानवी जीवनाचे अंतिम ध्येय हे मोक्षच आहे. आणि ते प्रत्येकाने मिळवलेच पाहिजे हीच शिकवणूक समर्थांनी सर्व समाजाला दिली.

अशा सामर्थ्ययोगी समर्थांच्या लोकोत्तर कार्याची प्रेरणा आचरणात आणायचा प्रयत्न करायचा आणि त्यांना मनापासून वंदन करुन म्हणायचे,

शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे ।
वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ।।
करी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा ।
नमस्कार माझा सद्गुरु रामदासा ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।

— डॉ. सौ. रसिका वि. ताम्हनकर.
(वाशी, नवी मुंबई)

सौजन्य: गुरुतत्व
वर्ष २ रे, अंक ११ वा, (अंक २३) ठाणे,
मार्च – २०१९ पाने, ४८, किंमत रुपये २५/-

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..