नवीन लेखन...

श्री गुरुदेव रानडे प्रणित श्रीरामदासांचे भक्तिशास्त्र

निंबरगी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय यांचा फार घनिष्ठ संबंध असून उभयसंप्रदायांचा प्रमाणग्रंथ ‘दासबोध’ असून ‘मनाचे श्लोक’ आणि करूणाष्टकेही उपासनेत म्हटली जातात. समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधग्रंथात पहावे आपणासी आपण । या नांव आत्मज्ञान’ हा जो परमार्थबोध केला आहे त्याची प्रचिती निंबरगी संप्रदायातील गुरु परंपरेने विशेषतः श्रीनिबंरगी महाराज, श्रीभाऊसाहेब महाराज, श्रीअंबुराव महाराज, श्रीगुरुदेव रानडे यांनी घेतली आहेत. पण या सर्वांचे ‘दासबोध-मनाचे श्लोक’ या दोन्ही विषयक निरूपण आणि चिंतनही प्रसिद्ध आहे. त्यांतही श्रीगुरुदेव रानडे यांनी रामदास वचनामृत’ हा ग्रंथ संपादित/ संग्रहित करून त्यातील निवडक ओवीवेचे काढून त्यावर सूत्रभाष्य वजा शीर्षक देऊन, तसेच त्यास विवेचक प्रस्तावना लिहून निंबरगी संप्रदायाचा आध्यात्मिक दृष्टीकोनही उलगडून दाखविला आहे. त्यामुळे ‘श्रीरामदासांचे भक्तिशास्त्र’ कळून यायला मदत होते. दासबोधातील एक अध्यात्मानिरूपणाचा ओवीबंध विशद करून दाखविला.

पूर्वपीठिका

निंबरगीसंप्रदायातील गुरुपंपरेकडून कोणत्या प्रकारे समर्थ रामदासांना दासबोध-मनोबोध-करूणाष्टके यांच्या विषयीचा विचार केला गेला आहे त्याविषयीचे एक नोंदवजा-टीपण इथे केले असून नंतर श्री गुरुदेव रानडे यांनी प्रस्तावनेतून उलगडून दाखविलेले भक्तिशास्त्र विशद केले आहे. निंबरगीसंप्रदायाची परंपरा पढीलप्रमाणे आहे: नवनाथांपैकीरेवणनाथ-मत्स्येंद्रनाथ-रेवणसिद्ध-मरूळसिद्ध-काडसिद्ध-निंबरगीमहाराज-रघुनाथप्रिय महाराज-भाऊसाहेबमहाराज उमदीकर-अंबुरावमहाराज-श्रीगुरुदेव रानडे त्यापैकी कोल्हापूर जवळील, सिद्धटेकच्या डोंगरावर काडासिद्धांची गुहा आहे.

१) निंबरगीमहाराज (जन्म इ.स.१७८९ सोलापूर व निर्वाण १८८५ निंबरगी) यांनी लिहिलेले (त्यांनी सांगितलेले व रघुनाथाचार्य आद्य व बाबाचार्य काव्य यांनी लिहून घेऊन संपादित केलेले) ‘महाराज-रवरवचन’ हे ग्रंथस्वरूपात प्रसिद्ध झाले आहे. त्यांत दासबोध व मनाचे श्लोक उधृत केले गेले आहेत. मुळात हा ग्रंथ कानडी भाषेत असून त्याचा अनुवाद श्रीमती पद्माताई कुलकर्णी यांनी केला आहे. शीर्षकासह एकूण ४३ प्रकरणे त्यांत असून हा नाम आणि नीती यावरील उपदेशात्मक वचन स्वरुपाचा ग्रंथ आहे.

(२) श्री.रघुनाथप्रिय तथा साधुसुना (जन्म इ.स.१८२९-निर्वाण इ.स.१८७९) त्यांनी भक्ति प्रसाराचे बहुथोर कार्य केले. (भाऊसाहेब महाराज उमदीकर (जन्म इ.स.१८४३-निर्वाण १९१४) यांनी इंचगेरीमठाची स्थापना करून फार मोठ्या प्रमाणावर भक्तिप्रसादाचे कार्य केले. त्यांनी दासबोध व मनाचे श्लोक यावर निरूपण केले असून ते लक्ष्मणभटजी यांनी त्याची टिपणे केली होती. त्यावर आधारीत ग्रंथ ‘दासबोधसुधा’ व ‘मनोबोधामृत’ असून हे दोघही ग्रंथ विवेचक प्रस्तावनेसह संपादित केलेले आहेत. संपादन-प्रल्हादराव कुलकर्णी – हे ग्रंथ श्रीगुरुदेव रानडे आश्रम, निंबाळ येथे उपलब्ध आहेत. त्यांत दासबोधातील निवडक ओव्यांवर निरूपण केले गेले आहे.

(३) निंबरगी महाराजांचे आणखी एक शिष्य रामभाऊ यरगझिकर हे होते ते चिम्मडला होते. त्यांचीही अनेक पदे कैवल्य वैभव’ या ग्रंथात असून समर्थांच्या अध्यात्म विचारांचा त्यांत प्रभाव दिसतो.

(४) अंबुराव महाराज (जन्म इ.स.१८५७-निर्वाण इ.स.१९३३) त्यांनी इंचगेरी मठात राहून खूप भक्तिप्रसाा केला. त्यांनी दासबोधातील निवडक समासावर कलल विवरण ‘दासबोध विवरण’ या ग्रंथात त्यांचे शिष्य श्री रामण्णा कुलकर्णी यांनी विशद केले, हा ग्रंथ गुरुदेव रानडे आश्रमात उपलब्ध आहे.

(५) श्रीगुरुदेव रानडे (जन्म इ.स.१८८६-निर्वाण इ.स.१९५७) त्यांनी मराठी संतवाङ्मयातील परमार्थमार्ग’ तसेच ‘रामदास वचनामृत’ या ग्रंथात रामदासस्वामींचे कार्य आणि तत्त्वज्ञान विशद केले आहे. त्यांचे सर्वच ग्रंथ निंबाळ येथील आश्रमात उपलब्ध आहेत.

निबंरंगी संप्रदायातील गुरुपरंपरा व गुरुपदी असलेले साक्षात्कारीसंत यांनी दासबोध-मनाचे श्लोक’ मध्ये सांगितलेले अध्यात्मतत्त्व साधनयोगे जगून दाखविले. ईश्वरदर्शन प्राप्त करून घेतले. भक्ति प्रसार करून आत्मोद्धाराबरोबरच जगदोद्धाराचेही कार्य केले. त्यांच्या समाधीस्थानी/मठात-मंदिरात/त्रिकाल नामस्मरण, भजन, दासबोध वाचन चालते. पुण्यतिथी-सप्ताहात दासबोध ग्रंथाचे पारायण व ग्रंथसमाधीने उत्सवाची सांगता होऊन पुन्हा ग्रंथारंभ केला जातो. दासबोध वाचनानंतर दहा मनाचे श्लोक वाचले जातात. रात्रीच्या भजनात करूणाष्टकेही म्हटली जातात. त्यामुळे या संप्रदायाला स्वरूपसंप्रदाय असेही बिरूद लावले जाते. या संप्रदायाच्या उपासनेचे स्वरूप नित्यनेमावलीत असून त्यांत आत्मप्रचितीच्या खुणा असलेले अभंग व पदे असल्याने सांप्रदायिक-समन्वयही उत्तमरीतीने साधला गेला आहे.

रामदासवचनामृत

१) डॉ. रा. द. तथा श्रीगुरुदेव रानडे यांनी ‘अध्यात्म ग्रंथमाला’ प्रकाशित केली असून त्यात ज्ञानदेव, तुकाराम, एकनाथ, रामदास अशी चार वसंतवचनामृत असे पांचवे या स्वरुपात ग्रंथ संपादित/ संग्रहित केले असून त्या सर्वांस विवेचक-प्रस्तावना लिहिली आहे. रामदासवचनामृत हा ग्रंथ त्यांनी १९२६ साली प्रसिद्ध केला. ग्रंथमालेचे प्रयोजन श्रीगुरुदेव रानडे सांगतात की, ‘लोकांस परमार्थाचे उज्वलस्वरूप महाराष्ट्र वाङ्मयातून उघड करून सांगणे हे होय. परमार्थाबद्दलच्या निरनिराळ्या भ्रामक कल्पनांचे निरसन करून शुद्ध परमार्थाचे स्वरूप समाजवून देणे हे या वाङ्मयाचे पवित्र कर्तव्य आहे, अशी पुष्टी त्यांनी जोडली आहे. धर्माधर्मातील लढे केवळ अज्ञानामुळे उत्पन्न होतात, पण परमार्थाने शुद्धस्वरूप कळल्यास ते लढे नाहीसे करण्याचे सामर्थ्य त्यात असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. ग्रंथात लिहिलेल्या प्रस्तावनेत प्रथम त्यांनी चरित्रविषयक पुरावे दिले असून पुढे समर्थाच्या चरित्राचा महत्वपूर्ण घटनांच्या आधारे त्रोटके-आढावा घेतला आहे. नंतर  मात्र दासबाधाववरण, संकीर्ण ग्रंथविवरण (जुना दासबोध, मनाचे श्लोक, पंचसमासी, जनस्वभाव गोसावी, करूणाष्टके, काही पदे व अभंग) केले आहे.

ग्रंथरचना त्यांनी दोन भागात (त्याच पुस्तकात) केली आहे. ‘भाग पहिलामध्ये (१) प्रासंगिक (२) तात्त्विक (३) साक्षात्कार (४) कर्मयोग (५) उपसंहार असे भाग करून ओवीबंध उधृत करून त्यास समर्पक शीर्षक दिली आहेत. ‘भाग दुसरा’ मध्ये (१) जुना दासबोध, (२) मनाचे श्लोक (३) पंचसमासी (४) मानपंचक, (५) निर्गुणध्यान, (६) जनस्वभाव गोसावी, (७) राममंत्राचे श्लोक, (८) करूणाष्टके, (९) ऐतिहासिक (१०) सांप्रदायिक, अभंग-पदे वगैरे (११) स्फुट प्रकरणे असे भाग करून ओवीबंध शीर्षकासह उधृत केले आहेत.

श्रीगुरुदेवांनी आपल्या लहानपणी/शाळेत असताना खाऊला मिळालेल्या पैशातून सर्वप्रथम ‘मनाचे श्लोक’ पुस्तक सज्जन गडावरून मागविले होते. तसेच त्यांनी जमखंडी येथे मारुतीरायाच्या दर्शनोपासनेतून आपल्या सगुण भक्तीला प्रारंभ केला होता. नंतर त्यांनी निर्गुणभक्ती करून आत्मारामाचे दर्शन प्राप्त करून घेतले, हा त्यांच्या जीवनातील संदर्भ उभय सांप्रदायिकांना आनंद देणारा आहे.

‘दासबोध विवरण’ नानक प्रकरणातून प्रथम समर्थ रामदासांच्या ओवी बंधातून प्रकटलेल्या स्वरूपज्ञानाविषयीची चर्चा श्रीगुरुदेवांनी केली आहे. समर्थांची विश्वस्वरूपदेवाची कल्पना म्हणजे सगुणाकार ईश्वर ही नसून ‘आत्माराम’ ही आहे. तो आत्माराम कशाने प्राप्त होतो? तर, महावाक्याचा जप केल्याने प्राप्त होतो. महावाक्य म्हणजे काय? तर सद्गुरुमुखातून। सद्गुरुंकरवी/ समाधिस्थानावरून प्राप्त झालेली नामदीक्षा किंवा मंत्रदीक्षा ही मिळणे म्हणजे ज्ञान होय. नामरुपी ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर त्याचे अहर्निश स्मरण करणे ही मुख्य उपासना, असून त्यायोगेच ‘स्वरूपदर्शन’ होऊ शकते. निर्गुणस्वरूपाचे अनुभव/ रूप-रंग-तेज-नाद-आकार-रस इ./ येणे म्हणजे ज्ञानप्राप्ती (स्वरूपज्ञान) होणे होय. ‘सर्वसंतांचे गुह्यज्ञानतेचं होय, असे भाष्य सूत्र त्यांनी नमूद केले आहे.

‘स्वामी कृपेसहित अंत:करणात वसल्यास त्याला ज्ञान म्हणावे’ असे ‘ईश्वर दर्शन सापेक्ष ज्ञान’ त्यांनी प्रतिपादिले आहे. निंबरगी संप्रदायातील गुरुपरंपरेतील सर्व सत्पुरुष हे याच अर्थाने ‘आत्मज्ञानी’ म्हणून संबोधिले गेले आहेत. श्रीगुरुदेवांनीही त्यांचे सद्गुरु श्रीभाऊसाहेब महाराज यांना ‘आत्मज्ञानी’ असे संबोधिले आहे. त्यामुळेच आणि श्रीसमर्थ रामदासांनीही प्रतिपादिले आहे ”

त्यानुसार ‘नानाप्रकारच्या मूर्ती म्हणजे देव या नावास योग्य नसून फक्त अंतरात्माच देव आहे’ याची सिद्धता त्यांनी नोंदविली आहे. (तत्रैव) जगामध्ये चारप्रकारचे देव प्रसिद्ध आहेत. एक प्रतिमादेव, दुसरा अवतारदेव, तिसरा अंतरात्मादेव व चौथा निर्विकारी देव असून त्यामध्ये निर्विकारीदेवास देव म्हणावे’ हे समर्थ रामदास स्वामी कथित वचन श्रीगुरुदेवांनी ओवीबंध उधृतकरून प्रतिपादिले आहे. कारण त्यांनाही, निर्गुणदेवाच्या प्रचितीनेच ‘देव-प्राप्ती’ झाली आहे. त्याला ते ‘खरा-देव’ म्हणतात; तर समर्थानी त्यालाच रोकड़ीप्रचिती’ असे संबोधून साक्षात्काराच्या संदर्भाने व स्वानुभूतीच्या साक्षित्वाने विशद करून दाखविले आहे.

सदगुरुकृपा आणि नामसाधन

‘खरा-देव’ कशाने प्राप्त होतो? हा प्रश्न समर्थांनी उपस्थित केला असून तो ‘सद्गुरुच्या योगानेच प्राप्त होतो’ असे उत्तरही त्यांनी दिले आहे. तो ओवीबंध असा:

‘देवासी नाही थानमान । कोठे करावे भजन ।

हा विचार पाहता अनुमान। होत जातो।।

भूमंडळी देव नाना । त्याची भीड उल्लंघेना।

मुख्यदेव तो कळेना। काही केल्या।।

हे ज्ञानदृष्टीने पाहावे । पाहोनि तेथेचि राहावे ।

निजध्यासे तद्रूप व्हावे। संगत्यागे।

ऐसी सूक्ष्मस्थितीगती। कळता चुके अधोगती।

सद्गुरूचेनि सद्गती। तात्काळ होते ।।

(दा.१९-५-२१,२३,२८,३०)

‘मुख्य देवास शोधून काढणे हेच तत्त्वज्ञानाचे लक्षण होय’ या समर्थांच्या वचनाशी श्रीगुरुदेवांची सहमती आहे. कारण त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही देवशोधनासाठीच केला आहे. शिवाय अभ्यासास साधनाची जोड देऊन मुख्यदेव/आत्मज्ञान त्यांनी प्राप्त करून घेतले.

म्हणूनच ज्यास सुख पाहिजे असेल त्याने केवळ रघुनाथभजन केले पाहिजे असे प्रतिपादन उभयतांनी केले आहे. (प्रस्ता. पृष्ठ१८) रघुनाथभजन केव्हा करता येते? तर सद्गुरूकडून नाममंत्रस्वरूप कृपेची प्राप्ती झाली म्हणजे नामस्मरणाने साधना करून मग ईश्वरदर्शनाने प्राप्त होणारे सुख हाती येते, हा त्यांतील मतितार्थ होय. त्यासाठी एकसमर्पक ओवीबंध सांगता येईल तो असाः

‘आता मनासि जे अप्राप्त ते कैसे होईल प्राप्त ।

ऐसे म्हणाल तरी कृत्य। सद्गुरुविण नाही।

भांडारगृहे भरली। परी असती आडकली।

हातास न येता किली। सर्वही अप्राप्त ।

तरी ते किती ते कवण। मज करावी निरूपण।

ऐसा श्रोता पुसे खूण । वक्तयासी ।।

सद्गुरुकृपा तेचि किती। जेणे बुद्धी प्रकाशली।

द्वैतकपाटे उघडली। येकसरी।।

(दा. ७-२-१२, १३,१४,१५)

सद्गुरुकडून प्राप्त होणारे नाम’ ही पहिली कृपा, नामस्मरणाने दिसणारा ‘ईश्वर’ ही दुसरीकृपा असे दोन्ही अर्थ त्यांत समाविष्ठित आहेत. अप्राप्य काय आहे? तर देवच आहे! तो कशाने प्राप्त होईल? तर सद्गुरुकृपांकित नाम प्राप्तीने! भांडारगृह म्हणजे ईश्वरदर्शन होय! त्यासाठी ‘गुरुमंत्र’ हा सर्वाधिक महत्त्वाचा आहे, असे उभयतांनी प्रतिपादिले आहे. आता, हे रघुनाथभजन कसे करायचे? तर, नामस्मरणात्मक भक्तियोगाने होय. तो भक्तियोग समर्थांनी पुढील ओवीबंधात नमूद केला आहे.

‘स्मरण देवाचे करावे । अखंड नाम जपत जावे।

नामस्मरणे पावावे । समाधान।

नित्यनेम प्राप्तःकाळी। माध्यान्हकाळी सायंकाळी।

नामस्मरण सर्वकाळी। करीत जावे॥
सुखदुःख उद्वेगचिंता। अथवा आनंदरूप असता।

नामस्मरणेविण सर्वथा। राहोच नये ।।

हरूषकाळी विषयकाळी। पर्वकाळी प्रस्तावकाळी ।

विश्रांतीकाळी निद्राकाळी। नामस्मरण करावे॥

चालता, बोलता धंदा करता । खाता जेविता सुखी होता।

नाना उपभोग भोगिता। नाम विसरो नये॥

बालपणी तारूण्यकाळी। कठिणकाळी वृद्धाप्यकाळी ।

सर्वकाळी अंतकाळी। नामस्मरण असावे ।।

सहस्त्रनामामध्ये कोणीएक। म्हणता होतसे सार्थक ।

नामस्मरता पुण्यश्लोक। होईजे स्वये॥

नाम स्मरे निरंतर। ते जाणावे पुण्यशरीर।

माहादोषांचे गिरीवर । रामनामे नासती।।

चहू वर्णा नामाधिकार । नामी नाही लहानथोर ।

जडमूढ पैलपार । पावती नामे ।।

(दा.४.३.२ ते ५,७,१४,२० आणि २४)

यात नामस्मरण केव्हां करावे? कोणते नाम घ्यावे? ते घेतल्याने काय होते? ते कोणास घेता येते? इ. प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. ‘नामजप केल्यास चक्रपाणी संकष्ट होऊन भक्तास सांभाळतो’ (प्रस्ता.पृ.२०) अशी फलश्रुती उभयतांनी प्रतिपादिली आहे. सद्गुरुकृपा आणि नामसाधना या दोन्हीशिवाय परमार्थ घडतच नाही, ही उभयतांची श्रद्धा असल्याने त्यांनी या विषयीचा उहापोह केला आहे. स्वानुभव हाच उभयतांचा निकष आहे.

ज्ञानदृष्टीने देखणे: आत्मदर्शन

खऱ्या ध्यानाचा मार्ग म्हणजेच अहर्निशी-नामसाधना करून ईश्वराचे दर्शन घेणे होय. त्यायोगे हळूहळू देव व भक्त यांच्यात सख्यत्व घडून येते. सख्यत्वाची परिणती कशात होते? तर, देवाच्या इच्छेने वर्तावे। देव करील ते मानावे । पण सहजचि स्वभावे । कृपाळूदेव ||१ (दा.४-८-२३) इथे निंबरगी महाराजांच्या वचनबोधातील विचार सांगण्यायोग्य आहे. तो म्हणजे: आपण कोणतेही कार्य करताना त्यात यश आले, तर ती देवाची कृपा मानावी. अपयश आले तर ती देवाची इच्छा मानावी. म्हणजे काहीही घडून आले तरी दुःख/निराशा न होता श्रद्धा दृढ होवून राहते.? आपण देवाचे चिंतन केले असता देव आपली चिंता करतो, या कृपाळु देवाच्या कार्यावर उभयतांचा विश्वास आहे. (प्रस्ता. पृ.२१) संतांचे जीवन ईश्वराधीन असते.

त्या सद्गुरुरुपांकित नामप्राप्तीने आणि नामस्मरणात्मक भक्तीने ईश्वरदर्शन घडून येते, त्यालाच परब्रह्म म्हटले गेले आहे. परब्रह्माचे स्वरूप कोणते? तर, ‘जे चर्मदृष्टीचे देखणे नसून ज्ञानदृष्टीचे देखणे आहे, तेच परब्रह्म होय’ (प्रस्ता. पृ.२२-२३) नामध्यानाने ईश्वरदर्शन घडून येते, त्यालाच साक्षात्कार म्हणतात.

त्याचे स्वरूप पुढील ओवीबंधात प्रकटले आहे. तो ओवीबंध असाः

‘तैसे आपुलेनि अनुभवे । ज्ञाने जागृतीसी यावे।

मग माईक स्वभावे । कळू लागे ।। दा.७-४.१३।।

ब्रह्म ब्रह्मांडी कालवले | पदार्थासी व्यापोन ठेले ।

सर्वामध्ये विस्तारले । अंशमात्रे||१५||

तेजी असे परी जळेना | पवने असे परी चळेना।

गगनी असे परी कळेना | परब्रह्म ते ॥३२।।

सन्मुखचिचहुकडे। तयामध्ये पाहणे घडे ।

बाह्याभ्यंतरी रोकडे | सिद्धचि आहे ||३४||

जो जो पदार्थ दृष्टी पडे। ते त्या पदार्थापलिकडे ।

अनुभवे हे कुवाडे | उकलावे ||३७।।

पोथी वाचूजाता पाहे । मातृकामध्येचि आहे ।

नेत्री निघोनि राहे । मृदपणे ।।४२ ।।

चरणे चालता मार्गी। जे आढळे सर्वांगी।

करे घेता वस्तुलागी। आडवे ब्रह्म ||४४।।

ज्ञानदृष्टीचे देखणे | चर्मदृष्टी पाहो नेणे ।

अंतरवृत्तीचिये खुणे। अंतरवृत्ती साक्ष ||४८।।’

 

(ब्रह्माचे सर्वागत अस्तित्त्व कसे आहे, हे जिज्ञासूंनी दा.२०.१०- १ ते २३ ओव्यातून जरूर पाहावे.) हे परब्रह्म वामसत्य, अधऊर्ध्व सन्मुखविन्मुख सर्वत्र एकदम दिसते’ (प्रस्ता. पृ.२३) असे श्रीगुरुदेवांनी ओवीबंध देऊन नमूद केले आहे.

समर्थ हे कर्मयोगी संत आहेत, असे श्रीगुरुदेवांनी म्हटले असून ‘आपण करुनि करवावे | आपण विवरुन विवरवावे ।’ अशी त्यांची कार्यपद्धती आहे.’ (प्रस्ता.पृ.२३) तरजन्मास येऊन । देव पाहून । जन्माचे सार्थक करावे, हा समर्थांचा उपदेश निंबरगी संप्रदायांतील उपासकांसाठी गुरुपरंपरेने सांगितला आहेच! आत्मदर्शनासाठी ज्ञानदृष्टीचे पाहणे हवे म्हणजेच नामस्मरणाने निर्गुणदेवाचे दर्शन घेणे होय!!

‘सगुणाचेनि आधारे । निर्गुण पाविजे निधरि’ या समर्थांच्या वचनाचा निंबरगी संप्रदायातील सर्व सत्पुरुषांनी केलेला अर्थथोड वेगळा आहे. तो असा की, सगुणभक्तीने परमार्थपथावर वाटचाल करीत निर्गुणभक्तीकडे वळावे हा एक अर्थ रूढ आहे. पण सगुणाचा आधार कोणता? तर सद्गुरु हेच निर्गुण देवाचे सगुणावतार असून त्यांनी दिलेल्या नाममंत्राच्या आधारे निर्गुण देवाचे अनुभव घ्यावेत. तसेच ईश्वरदर्शन घडून येणे म्हणजे निर्गुण-परब्रह्म ओळखणे होय. त्यासाठी सगुणाधार म्हणजे नामस्मरण, पोथीवाचन-प्रवचन, कीर्तन-भजन, पालखी-प्रदक्षिणा इ. होय, त्याला भाऊसाहेब महाराज उमदीकर यांनी भक्ती-उपाधी असे म्हटले आहे. मुख्य भक्ती म्हणजे नामस्मरण व त्याला पूरक जे .सर्व काही ती उपाधी होय. त्यांतही उपाधीस सोडू नये आणि उपाधीचे अवडंबर माजवू नये, अशी विवेकदृष्टी ठेवण्याचाही बोध त्यांनी केला आहे. अर्थात् भक्तीला प्रारंभ करायचा तर तो सगुण उपासनेनेच केला पाहिजे. मग हळूहळू निर्गुण देवाच्या खुणा कळून येऊ शकतील, देवघर, मठ-मंदिरे येथील मूर्ती-प्रतिमा ही सगुणरूपातच असते. पुढे नामस्मरण अधिक होईल, तसे देवाचे दर्शन सर्वत्र आणि सदैव घडून येऊ लागते, ही पारमार्थिक प्रगतीतील उन्नतावस्था होय.

आत्मज्ञानी, तोंच सद्गुरू

‘जुनादासबोध’ चा मागोवा घेताना श्रीगुरुदेवांनी त्यातील देह पडोका देव जोडो’ अशा भावनेने देवाच्या पाठीशी लागल्यावाचून देवाचेदर्शन व्हावयाचे नाही, या समर्थ वचनाला पूर्णत्वाने ग्राह्य मानले आहे. कारण अशी तीव्र-तळमळ आणि साधन-सातत्य असल्याशिवाय ईश्वरप्राप्ती होणे शक्य नाही, अशी त्यांची धारणा आहे. प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी चालविणे हाच विवेक होय. हा बोध महत्त्वपूर्ण मानण्याचे कारण असे की, निंबरगी महाराज आणि भाऊसाहेब महाराज या दोघांनीही अनुक्रमे वचनबोधात आणि निरुपणात ‘प्रपंच आणि परमार्थ हा देवाच्या सत्तेने/इच्छेने चालतो. म्हणून प्रपंच न सोडता परमार्थ करावा. परमार्थ केल्याने देव प्रपंचही चालवितो’ असे स्पष्टपणे सांगितले आहे.

‘मनाचे श्लोक’ मधील ‘प्रभाते रामचिंतन करावे’ हा साधनमार्गही उभयतांनी प्रतिपादिला आहे. मुख्यदेव जगात चोरला असल्याने तो सद्गुरुवाचून कळत नाही। दिसत नाही.’ असे श्रीगुरुदेवांनी समर्थांचा बोध उधृत करून प्रतिपादिले आहे. देव तर सर्व आणि सदोदित आहेच. पण उपासकाला तो गुरुदृपांकित नामाच्या स्मरणाने कळतो/दिसतो. इतरांना तो दिसत नाही. म्हणून देव चोरला गेला आहे असे अज्ञानीजन म्हणतात. ज्ञानदेवांनीही अमृतानुभवात ‘देव प्रकट’ ना लपाला? असे म्हटले आहे. तिथेही उपासकांना तो साधनयोगे प्रकट आहे, इतरांसाठी तो लपल्याप्रमाणे आहे म्हणून सद्गुरूबोध आणि नामसाधना यांचे महत्त्व परमार्थात सर्वाधिक आहे.

‘जनस्वभाव गोसावी’ नामक प्रकरणात समर्थांनी भोंदूगुरुची लक्षणे सांगितली आहेत. ईश्वरानुभूतीवाचून बोलणारे ते भोंदूगुरुच होत. पण तोच गुरू खरा की ज्यास अध्यात्म विद्या कळली. व जो आत्मज्ञान पारंगत झाला’ असे उभयतांनी म्हटले आहे.

समर्थ हे बुद्धिवादी होते, तरी त्यांच्या अंत:करणात करुणेचा पाझर होता’ (प्रस्ता.पृ.२७) असे श्रीगुरूदेवांनी नमूद केले असून ‘करूणाष्टके’ त्या भाववृत्तीची प्रतिक आहेत असे सूचित केली आहे. विशेष म्हणजे ‘करूणाष्टकातील उद्गार फार हृदयस्पर्शी आहेत. या करूणावचनांवरून ज्ञान व भक्ती यांची रामदासांत किती उत्तम सांगड होती हे दिसून येईल’ (प्रस्ता. पृ.२६) असे श्रीगुरुदेवांनी भाष्य केले आहे ते अत्यंत समर्पक आहे. समर्थांनी संप्रदाय वाढविण्यासाठी महंतांना आज्ञा केली होती. समुदाय कारणे हा त्यांच्या कर्मयोगपर शिकवणुकीचा मुख्य धडा होता. शिव-समर्थ भेटीचा वृत्तांत महाराष्ट्रधर्म वाढविण्याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण होता. समर्थांचे गुरू कोण? असा प्रश्न नेहमी विचारला जातो. पण त्याचे उत्तर समर्थांनी स्वतःच दिले आहे. रामचंद्रांचा दृष्टांत होऊन त्यांना गुरुमंत्र मिळाला होता, असे दिसते. वसिष्ठ उपदेशी श्रीरामरायासी। रामदासी उपदेशिले ।’ (स्फुटकविता) असे समर्थांनी म्हटले आहे.

‘श्रीरामजयरामजयजयराम’ या तेरा अक्षरी मंत्राचा तेराकोटी जप केल्यास देवाचेदर्शन होईल, असे अभिवचन समर्थांनी दिले.

अभंग, पदे अशीही समर्थांची काव्यरचना आहे. त्यांत ‘एकदा रामाचे दर्शन झाल्यावर पुन्हा राम विन्मुख होत नाही’ तसेच ‘जसा भाव तसा देव’ असेही समर्थांनी प्रतिपादिले आहे. (प्रस्ता. पृ.३०) श्रीगुरूदेवांनी यासंदर्भात असे म्हटले आहे की, एकदा देवाचे स्वरूपदर्शन झाले की, तो साधक मुक्तिमार्गाकडे वाटचाल करीत निघाला हे नक्की! असे स्वरूपदर्शन सदैव आणि सर्व होऊ लागले की, तो साधक परमार्थात स्थिर झाला.

श्रीगुरुदेवांनी समर्थांच्या अशा निवडक वेचातून त्यांच्या अध्यात्मविचारांचे स्वरूप तर स्पष्ट केले आहेच पण (१) गुरू (२)नाम (३)साधना (४)संप्रदाय (५)प्रचिती ही परमार्थाची पंचपदी अन्य वचनामृत’ स्वरूप ग्रंथातही नमूद केली आहे. मुख्यगोष्ट म्हणजे माणसाने साधक व्हावे, नाम घेऊन गुरुपुत्र व्हावे, साधना करावी, साक्षात्काराच्या खुणा अनुभवाव्यात, ईश्वराशी एकरूप होऊन जावे. हीच नरदेहाच्या सार्थकतेची खूणगाठ आहे. समर्थांनीही हेच तत्त्व प्रतिपादिले आहे. उभय संतांनी साक्षात्कार पर्यवसायी नामसाधना प्रतिपादिली असून परमार्थात सद्गुरूचे असलेले महत्त्व पदोपदी विशद केले आहे, असे दिसून येते.

‘राघवाचा धर्म जागो’

समर्थांची जी अनेकपदे आहेत, त्यापैकी ‘राघवाचा धर्म जागो’ ही पांगुळ-रचना मोठी बहारीची आहे. श्रीगुरुदेवांनी रामदास वचनामृत’ ग्रंथात शेवटी हे पद घेतले असून त्याविषयी त्यांनी म्हटले आहे की, ‘अशा रीतीचे हे पद करून देवास “मागणे निरसी जेणे। ऐसे देगा रामराया” अशा प्रकारचे एकच मागणे मागितले आहे. हेसर्व पदबहारीचे असल्याने रामदासांच्या निष्कामभक्तीचा येथे कळसच झाला आहे.’ (प्रस्ता.पृ.३१) जिज्ञासूंनी मुळात हे पद वाचावे.इथेफक्त त्यातील पारमार्थिक-उपदेशाचा आढावा घेतला आहे. एकप्रकारे ही पसाय-प्रार्थनाच आहे.

‘भरत गा खंडामाजी।शरयूतीर बा गांव | धर्माचे नगर तेथे। राज्य करी रामराव ।।’ अशी या पदाची सुरूवात आहे. या नरजन्मात देहातील अंत:करणात आत्माराम राहतो, राज्य करतो, देवास पाहणे हाच धर्म असून तो मन-बुद्धी-शरीरासह साधकाने पाळावयाचा आहे. सांसारिक अहंकाराने मी पारमार्थिक वाटचाल करण्यास असमर्थ आहे, हेच माझे पांगुळपण आहे. परंतु ही वाटचाल करण्याचे बळ मला माझे सद्गुरू (प्रभु श्रीरामचंद्र) देतील आणि मी त्यांच्या धर्मनगरीपर्यंत जाऊन पोहोचू शकेन. माझे मागणे एवढेच आहे की, ‘राघवाचा धर्म जागो। सर्व अधर्म भागो। अज्ञान निरसोनिया । विज्ञानी लक्ष लागो ।।धृ.।। भक्तिमार्गी होता यावे यासाठी अधर्म म्हणजे परमार्थ निरहित सर्व होवो. अज्ञानही नाहीसे होवो.

साधनाधिष्ठित नामस्मरण आसनसिद्ध होऊन मला करता यावे, म्हणजे ‘प्रयोगाअंती- र्शनप्राप्ती’ हे विज्ञान मला साध्य होईल. ज्ञान म्हणजे गुरुमंत्र, अज्ञान म्हणजे भक्तिविरहित गोष्टी नष्ट होणे, विज्ञान म्हणजे ईश्वरदर्शनाची प्राप्ती होणे, असा त्यातील भावार्थ आहे ‘मीपणाचे मोडले पाय । म्हणून पांगुळ जाहलो’ ही गोष्ट खरी पण आता तूपणाची कीर्ति देई । ऐकोनिया शरण आलो ।।’ भक्तीसाठी मी ‘भजनभिंतीवर’ बसलो आहे. ही भजनभिंत म्हणजे नामस्मरणासहित भजन-कीर्तन, निरूपण-प्रवचन, पोथीवाचन. पूजा, प्रदक्षिणा, पालखी इ. होत. म्हणजेच ‘भक्ती-उपाधीसह मी परमार्थमार्गावरील वाटचाल करण्यास सिद्ध झालो आहे. प्रेमफडके’ पसरून मी त्यावर बसलो आहे. ‘कृपादान’ मागत आहे. नवविद्याभक्ती हा माझा भक्तिमार्ग असून भावशुद्धी हे बळ आहे. ज्ञानकाठीचा आधार घेऊन मी वैराग्याचे कांबळे पांघरले आहे. मला दासीहातीचे दान म्हणजेच, रिद्धी-सिद्धीच्या हातून कामनापूर्ती नको आहे. तुझ्याशिवाय/ दर्शनसुखाशिवाय मला दुसरे तिसरे काहीच नको आहे. तुझी कृपा मला फक्त हवी आहे.

मायारूपी थंडी मोहरूपी ताप मला नको आहे. गुरूबोधाचे ताक मला दे., निष्कामतेची भाकरी दे हे मागणे मागितल्यावर ‘रामदास पांगुळासी/रामे दीधलिया दान घेणेचि निरसले । कैसी मागण्याची खूण ॥ देणे घेणे निरसोनिया । पूर्ण केले परिपूर्ण॥दाता ना याचक तेथे | सहजीसहज संपूर्णा ।’ अशी सद्गुरूंच्या विषयीची कृतज्ञता समर्थांनी प्रकट केली आहे. सांप्रदायिक, उपासनेत सज्जनगडावर तसेच अन्यसर्वत्र समर्थांचे उपासक कल्याण करी रामराया’ हे मागणे मागतात. समर्थांनी हेच मागणे श्रीरामाजवळ/ सद्गुरुजवळ मागितले आहे. आपणही त्यांचेजवळ हेच मागणे मागू या । आत्मकल्याण आणि जनकल्याण होऊन जीवन आनंददायी व शांतीपर्यवसायी व्हावे, म्हणजे त्यात आपोआपच सुख-समाधान-तृप्ती भरून राहील, असे म्हणता येईल.

समर्थांनी आपल्या ‘ओवी-अभंग-पदे’ यामधून प्रकट केलेल्या ‘आत्मज्ञान प्राप्तीचा-भक्तिमार्ग’ निंबरगी संप्रदायाने साधनाधिष्ठित आसनासिद्ध ‘नामस्मरणात्मक-भक्तियोगाने’ आचरिला आहे, हा उभय संप्रदायातील फार मोठा ऋणानुबंध आहे. ।। जय जय रघुवीर समर्थ ।।

-प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे

(‘संतकृपा’ एप्रिल 2012 या नियतकालिकात प्रकाशित झालेला लेख)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..