स्तोष्ये भक्त्या विष्णुमनादिं जगदादिं
यस्मिन्नेतत्संसृतिचक्त्रं भ्रमतीत्थम्।
यस्मिन्दृष्टे नश्यति तत्संसृतिचक्रं
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।१।।
भगवान श्रीवैकुंठनाथ श्रीहरीच्या स्तवन स्वरूपात पूज्यपाद भगवान जगद्गुरु आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांनी ज्या विविध रचना साकारलेल्या आहेत त्यापैकी एक अत्यंत सुंदर, मनोज्ञ, भावगर्भ आणि लोकप्रिय रचना म्हणजे श्रीहरी स्तुति.
हरी शब्दाचा अर्थ हरण करणारा असा आहे. कशाचे हरण? तर शरणागत आलेल्या भक्तांच्या सकल दुःखाचे आणि सगळ्यात शेवटी या संसार रुपी बंधनाचे भगवान हरण करतात त्यामुळे त्यांना हरी असे म्हणतात.
प्रस्तुत स्तोत्रात प्रत्येक श्लोकाच्या शेवटच्या चरणात या संसार रुपी अंध:काराचा विध्वंस करणाऱ्या श्रीहरीचे मी स्तवन करतो, अशा शब्दात या हरि स्वरूपाचे वंदन केले आहे.
त्यामुळेच या स्तोत्राला श्रीहरी स्तुती असे म्हणतात.
येथे आचार्य म्हणताहेत,
स्तोष्ये भक्त्या – मी भक्तीपूर्ण रीतीने स्तवन करीत आहे.
विष्णुमनादिं – अनादि असणाऱ्या भगवान श्री विष्णूंचे.
या अनादी शब्दात अनंत गृहीत आहे, आणि अनादि-अनंत म्हंटले की त्याचा संबंध निर्गुण-निराकार स्वरूपाशी आहे.
जगदादिं – सगळ्या जगाच्या आधी विद्यमान असणारे.
यस्मिन्नेतत्संसृतिचक्त्रं भ्रमतीत्थम्- ज्यांच्यामुळे हे निर्मितीचे चक्र, अर्थात् ही अनंतकोटी ब्रह्मांडे अशी भ्रमण करीत राहतात. जन्म मृत्यूचा, निर्मिती विलयाचा फेरा सुरू राहतो.
यस्मिन्दृष्टे नश्यति तत्संसृतिचक्रं – यांचे दर्शन झाल्यावर या चक्राचा विनाश होतो. मुक्ती प्राप्त होते.
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसाररूपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या भगवान श्रीहरींचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply