नवीन लेखन...

शोधा म्हणजे सापडेल!

“आई आता बास झालं हं तुमचं, चांगुलपणा शोधणं! प्रत्येक गोष्टीत चांगुलपणा पाहावा, चांगुलपणा शोधावा हे ऐकून ऐकून आम्ही कंटाळलो. आयुष्यभर चांगुलपणा शोधून तुम्हाला मिळालं काय, ते तरी कळू दे.” वृंदा चिडून चिडून बोलत होती आणि तितक्याच थंडगारपणाने त्यांनी उत्तर दिलं, “तुझ्यासारखी सून मिळाली.”

काही क्षणभर वृंदा सुखावली खरी पण संतापाचा पारा एक शतांशानेही कमी झाला नव्हता. तिचा पट्टा सुरूच होता.

“एरवीची गोष्ट वेगळी. पण आज अणाडीपणाचा अतिरेक झाला. पाण्याची धार पडून पडून दगडालाही खोलवा येतो पण इथं दगडापलिकडची परिस्थिती आहे. कोणत्या मुशीतून परमेश्वर माणूस घडवतो त्याचं त्यालाच माहीत.”

“वृंदा, अगं किती चिडशील, अशानं बी.पी. वाढवून घेतेस. बाकी काही नाही. तरी बरं, सध्या वसंता इथे नाही. ट्रेनिंग द्यायला गेलाय, छान आहे. आता या क्षणाला सगळं नीट झालंय ना? मग का बरं संताप करतेस?”

“तुमच्या शांतपणानं माझा संताप वाढतोय. आत्ताच्या आत्ता चपलासुद्धा न चढवता मी वहिनीकडं चालले पण तुम्ही अडवलं म्हणून थांबले. ती एक टोक आणि तुम्ही दुसरं टोक. प्रत्येकात तुम्हाला चांगुलपणा दिसतो. धर्मराजानंतर मला वाटतं तुमचा नंबर लागेल,” असं म्हणून भांडी लावता लावता ती सगळा राग त्या निर्जीव भांड्यांवर काढत होती.

आईनाही त्या क्षणी हसू आलं. “अगं, तरी बरं नाव वृंदा आहे. किती चिडून लाल लाल झाली आहेस बघ! मनात दहा आकडे मोज. अगं, जेवणात आंबट, तुरट, तिखट, गोड सगळंच लागतं ना! तसंच आयुष्यात सगळ्या प्रकारची माणसं असतात म्हणूनच जीवन जगताना मजा येते.

गुलाबाला काटे असतात ते जसं खरं तसंच काट्यातही गुलाब असतो हे खोटं आहे का?”

“तुमचं आपलं मुळमुळीत बोलणं मला नाही जमत. माणसानं कसं जिथल्या तिथं आणि जेव्हाचं तेव्हाच करावं. आजही तुम्ही वहिनीत चांगलं काही शोधून दाखवाच! आपली पैज. मी हरले तर तुम्ही जे काही म्हणाल ते करायला मी तयार आहे.”

वृंदानं शब्द दिला खरा पण तिला पैज जिंकूच अशी खात्री नव्हती. आजची घटनाच मुळी तशी घडली होती.

झालं होतं असं की सकाळी नेहमीप्रामणे ईश्वरीला सात वाजता आजी बसस्टॉपवर जाऊन पोचवून आली. वसंताचा प्रश्न नव्हता. वृंदा ८.१० च्या लोकलनं सीएसटीला ऑफिसमध्ये गेली. कारण ही घटना आणि हे डायलॉग मोबाईल फोन येण्यापूर्वीचे. खूप दिवसांनी हा प्रसंग डोळ्यासमोर आला. आजीने आपले स्नान, देवपूजा, पोथी सर्व आटोपले. दीड वाजता आजी-आजोबांनी जेवण करून घेतले. अडीचला परत ईश्वरीला बसस्टॉपवर आणायला जायचे म्हणून आजीनी छोट्याशा पातेल्यात तिच्यापुरता गरम भात लावला आणि त्या स्टॉपवर गेल्या.

नेहमीप्रमाणे बस आली पण एकच गोष्ट नेहमीसारखी झाली नाही. म्हणजे ईश्वरी बसमधून उतरली नाही. आजी अवाक् झाली. आणि काही विचारण्यापूर्वीच बस सुटली. आजीला काही कळेना. तिने इतर उतरलेल्या मुलांना विचारले पण मुले म्हणाली, “ईश्वरी आज बसमध्ये नव्हतीच ” हे उत्तर ऐकल्यावर आजीला उभ्या जागी घाम फुटला. काही कळेना. आजीने एक रिक्षा पकडली आणि बसचा पाठलाग केला. बस लास्ट स्टॉपला थांबल्यावर ड्रायव्हरला आणि बसमधल्या ताईंना विचारले. ताईपण म्हणाल्या, “ईश्वरी आज आलीच नाही म्हणजे बसमध्ये ती नव्हती. पण तुम्ही घाबरू नका. माझ्याबरोबर शाळेत चला.” आजी शाळेत गेली पण ईश्वरी तेथे नव्हती. शिपाई म्हणाला, “एक मुलगी रडत उभी होती. मी काही विचारणार इतक्यात मला बोलावणे आले म्हणून मी गेलो.”

आजीला आधी घरी येणे महत्त्वाचे होते. आजोबा एकटेच येरझारा घालत होते. ३॥ वाजून गेले. आजी रडत रडत आली. तिची कंबर खचली. काय करावे? कुणाला सांगावे? दहा मिनीटात चाळीत बातमी पसरली की ईश्वरी घरी आली नाही. सगळी चाळ गोळा झाली. फोन नाही, मोबाईल तर नव्हताच. वृंदाला कसं कळवावं? तिला तोंड तरी कसं दाखवू? शिवाय सहा वर्षांच्या माझ्या पिल्लाचं काय? चाळीतली सर्वजण आपापल्या परीने उपाय सुचवत होते. बुधवारचा दिवस त्यामुळे चाळीतले तरुण सगळेच कामावर गेलेले.

पाटीलांचा राजू म्हणाला की वृंदावहिनीचा भाऊ काही कामासाठी रजेवर आहे असं काल ती म्हणत होती. मी सायकलने तिच्या माहेरी जातो आणि मामाला सांगतो. त्याच्या कानावर घातलं तर तो नक्की काहीतरी करेल. आजीने मानेनेच होकार दिला कारण ती मनःस्थितीतच नव्हती. आजोबा म्हणाले, “तू नीट पाहिलंच नाहीस.”

“अहो, ती काय चेंडू आहे का न दिसायला? आणि रोजच दिसते, आजच दिसली नसेल का? माझ्या पोरीशिवाय काही दिसत नाहीये. कुणी पोरीला उचललं नसेल ना? माझी चांदणी आहे ती! वृंदाला कसं सांगू?”

राजू म्हणाला, “आजी रडू नका. मी गेलो आणि हा आलो. आता साडेपाच झालेत. मी सहाच्या आत हजर.” राजू सायकलने निघाला. जाऊन मामाला काय सांगायचं? या विचारात दहा मिनिटांत तो पोहोचला. खाली सायकल लावली आणि धावत धावतच दोन जिने चढला. ब्लॉक नेमका कुठला? तो इकडं तिकडं नावं बघत असताना त्याला आवाज ऐकू आला, “राजूदादा, राजूदादा एऽऽ” ईश्वरीचा आवाज ऐकून राजू चमकलाच. “ईश्वरीऽऽऽ” असं म्हणून त्यानं धावत जाऊन तिला उचलून घेतलं आणि घट्ट मिठी मारलीन. तोवर मामी बाहेर आली. राजूने विचारलं, “मामा रजेवर आहे ना?”

“बाहेरची कामं असतात ना? सकाळीच गेलेत.”

“आजी?”

“त्या बँकेत आहेत. घरी सात वाजता येतात.”

“मी ईश्वरीला घेऊन जातोय.”

“हं.” हे दोघातील संभाषण!

राजूनं उचलून तिला खाली आणलं. सायकलवर बसवलं आणि त्याला असं झालं की कधी एकदा मी मिळविलेली मोठी विजयश्री वृंदावहिनी यायच्या आत आजीच्या स्वाधीन करतोय.

राजू पॅडल मारतच होता, मारतच होता पण त्याला वाटलं सायकल पुढंच जात नाहीये आणि ईश्वरी म्हणत होती, “राजूदादा, हळू चल ना!… पण चल. मला भूक लागली आहे. आजीनं भात केला असेल ना?”

राजू तिला काही विचारणार इतक्यात कोपऱ्यावर चाळकऱ्यांना राजू दिसला आणि पुढे दिसलेली ‘ईश्वरी!” एकच गलका.

“ईश्वरी, ईश्वरी, ईश्वरीऽऽ”

ते ऐकून आजीला बारा हत्तींचं बळ आलं. ती उठून आली. येताना मूठभर तांदूळ आणायला विसरली नाही. राजूनं तिला उतरवलं. आजीनं तांदूळ तिच्यावरून उतरविले. ‘इडा पिडा टळो,” म्हणत तिला धरून भराभर पापे घेतले. डोळ्यातून गंगा-जमुना चालू होत्या. राजूला काय करू आणि काय नको असं त्यांना झालं.

राजूला वाटलं, एकही पैसा खर्च न करताही माणूस माणसाला किती आनंद देऊ शकतो. आज मी धन्य झालो.

“बबडे,” आजीनं विचारलं. “अगं कुठे होतीस?”

“आजी, आम्हाला सांगितलं की आज बस पाच-दहा मिनीटं उशिरा येणार आहे म्हणून मी शालेय भांडारात पेन्सिली आणि रबर आणायला गेले. ते घेऊन येईपर्यंत बस सुटली. ती वेळेवर आली.”

“मग तू मामाकडे कशी गेलीस?”

“मी रडतच उभी होते. तिथे कट्ट्यावर बसले. तिथून स्कूटरवरून आपल्या मामाचा मित्र, जितूमामा चालला होता. मला रडताना पाहून त्यानं स्कूटर थांबवली. मला म्हणाला, ‘तू वृंदाची मुलगी ना? का रडतेस?’ मी त्याला सगळं सांगितलं. पण आजी मला खायला दे ना, खूप भूक लागलीय.”

आजी खूप शरमली आणि केलेला शिरा गरम करून तिला भरवू लागली आणि नात पुढे बोलू लागली अन् अख्खी चाळ ऐकत उभी राहिली.

ईश्वरी म्हणाली, “जितूमामा म्हणाला, मी तुझ्या मामाच्या घराजवळ कामाला जातोय मामाकडे पोहोचवितो. तुला घरी कोणीतरी पोहोचवेल. मी डोळे पुसले. जितूमामाने आपल्या मामाकडे वरपर्यंत आणून सोडले आणि मामीकडे सोडले. आजीऽऽ, आजीऽऽऽ, आपल्याकडे कोणी आलं तर आपण आधी पाणी देतो की नाही? मामीनं काहीच दिलं नाही. जितूमामा गेला पण.”

“असू दे, तुला काय म्हणाली जेवलीस की नाही?”

“नाहीऽऽ, मामी म्हणाली आली आहेस तर बैस. मामा जेव्हा केव्हा येईल तेव्हा तुला सोडले. मी बरं म्हटलं. तेव्हापासून मी दारात बसून राहिले आणि राजूदादा दिसला. राजूदादा आला ना न्यायला? मग आता कशाला रडतेस?” असं म्हणून चिमुकल्या बोटांनी ईश्वरीने आजीचे डोळे पुसले.

सात वाजायची वेळ आली आणि वृंदा ऑफिसमधून घरी आली. रिक्षा दाराशी सोडली तर हीऽऽ गर्दी बघून घाबरली. आजींना-आजोबांना काही झालं नाही ना? माणसाच्या मनात चांगलं आधी येतच नाही. वृंदानं उरलेले पैसेही रिक्षावाल्याकडून घेतले नाहीत आणि धावतच आली.

“काय झालं?…”

आजी-आजोबा, ईश्वरीला पाहून तिचा जीव भांड्यात पडला.

“कुणाला काय झालं?” असं विचारल्यावर राजूनं इथपासून इतिपर्यंत पूर्ण अध्याय सांगितला. नाहीतरी आजच्या स्टोरीचा खरा हिरो तोच होता.

वृंदाचे डोळे भरले. पण कपाळावर एक तिडीक होती. सगळीजणं आपापल्या घरी गेले आणि वृंदा चपला घालून वहिनीकडे निघाली. तिला जाब विचारायचा होता.

“साधी माणूसकी तुझ्याजवळ नाही? ईश्वरी आल्यापासून सहा पर्यंत तू जेवण लांब राहिलं, पण पाणी-दूध काहीच दिलं नाहीस? इथे माझी म्हातारी सासू किती काळजीत असेल याची कल्पनाही नाही आली? दुपारी नुसती झोपलीस, ईश्वरीला रिक्षाने घरी आणून सोडता आलं नाही? इतकी कशी भावनाहीन तू वागू शकतेस?” अजूनही बरंच काही विचारायचं होतं….

पण आजीनं हातालाारून वृंदाला बसवलं. “आता तू कुठंही जाणार नाहीस. पोर सुखरूप आली आहे. असतो एखाद्याचा स्वभाव! आता बोलून नात्यात दुरावा का आणणार आहेस?”

“आई, कमाल तुमची. अजूनही ती चांगलीच?…”

“चांगुलपणा शोधला की सापडतो. दगडाला ठेच लागली म्हणून रागवायचं नाही. दगड गुरू. त्यानं शिकवलं की चालताना खाली बघून चालावं. अगंऽऽ, वहिनीनं जर म्हटलं असतं माझ्याकडे सोडू नकोस तर काय झालं असतं? किंवा जितू गेल्यावर ईश्वरीला ‘जा तुझी तू घरी.’ तर पोरगी रस्त्यातून एकटी लांब आली असती? बिना उन्हा-तान्हाची आसऱ्याला राहिली ना? भुकेचे हाल झाले खरे पण एकदम तुझ्या भाषेत ‘सेफ’ होती. वहिनी तरी घरी होती. मग वहिनी काही म्हणाली नाही हा चांगुलपणाच! माणसानं चंद्र आधी पाहावा त्यावरचा डाग नंतर शोधावा.

काढ त्या चपला.”

वृंदा आईंकडे पाहतच राहिली आणि चपला काढून त्यांच्या पायावर डोके ठेवले. त्यांची पावलं ओली कधी झाली ते दोघींनाही कळली नाहीत.

“वृंदा मावशी, खरंय तुमचं. शोधलं की सापडतं.”

-–माधवी घारपुरे

(अनघा प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या लॉटरी ह्या पुस्तकामधून लेखिका माधवी घारपुरे ह्यांनी लिहिलेली ही कथा)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..