नवीन लेखन...

शतक पाहिलेला माणूस – शहाण्यांचे बहुमत !

डॉ सागर देशपांडे यांनी संपादित केलेल्या “शतक पाहिलेला माणूस ” या पुस्तकाच्या प्रकाशनाचे त्यांनी मला निमंत्रण पाठविले. अविनाश धर्माधिकारी, देगलूरकर सर, पी डी पाटील, भूषण गोखले सर, प्रदीप रावत आणि बाबासाहेबांचे चिरंजीव (अमृत पुरंदरे) ही बिनीची नावं समारंभाकडे खेचून नेण्यास समर्थ होती.

(२३ जुलैला असाच एक संस्मरणीय पुस्तक प्रकाशन सोहोळा मी सोलापुरात याचि देही अनुभवाला होता. त्यांवर २ ऑगस्टला एक नवा थर चढला.)

बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील सदर पुस्तकात भारतातील “हूज हू ” बाबासाहेबांबाबत भरभरून लिहिती झाली आहेत. तो सगळा मुळातूनच वाचण्याचा ऐवज आहे आणि मी विनाविलंब हे काम सुरु केले. बऱ्यापैकी संपवत आणलंय. म्हणून व्यासपीठावरील ख्यातनाम मंडळी काय बोलणार आहेत (त्यांतील काहींचे लेखन या पुस्तकात आहे.) याची उत्सुकता होती. सभागृह अपेक्षित भरले होते.

बाबासाहेबांच्या शिरस्त्यानुसार ठीक सहा वाजता हा समारंभ सुरु झाला आणि वरील सर्व मंडळी त्याआधी उपस्थित होती. बाबासाहेबांचा धाक(?) त्यांच्या पश्चातही दिसला. वक्त्यांनी बाबासाहेब तर सांगितलेच पण अपरिहार्यपणे शिवरायांचा उल्लेख सतत सगळ्यांनी केला.

डॉ सागर देशपांडे यांनी बाबासाहेबांबद्दल “बेलभंडारा ” मध्ये उल्लेखनीय लिहून ठेवलं असल्याने बहुधा या पुस्तकात ते जास्त वावरलेले नाहीत आणि त्यांनी संपादकीय भूमिकेत काठावर राहणे पसंत केले आहे. मात्र त्यांचे संपादकीय प्रास्ताविक (बहुधा) आत्मीयतेमुळे बरंच लांबलं आणि संकेत काहीसा पाळला गेला नाही.

एक खुसखुशीत वाक्य मात्र त्यांनी उच्चारलं- ” बाबासाहेबांचे आणि घड्याळाचे संदर्भ आणि नातं जुने आहे” सभागृहाने अपेक्षित दाद दिली. मग अशीच काही चांगली वाक्ये विविध वक्त्यांनी ऐकविली-

१) आपल्या लष्करी दलाचा “डिफेन्स ” असा उल्लेख कां केला जातो? आपण सदैव स्वसंरक्षणाच्या पवित्र्यात कां असतो? खरं तर आता आपण
“सशस्त्र सेनादल ” असा अभिमानास्पद संदर्भ वापरला पाहिजे.

२) छत्रपती शिवरायांना अजून दहा वर्षे आयुष्य लाभले असते तर ? या प्रश्नाचे उत्तर- त्यांनी आसेतुहिमाचल हिंदुस्थान पादाक्रांत केला असता आणि भगवा काबुल-कंदाहार पल्याड फडकला असता.

३) History is a bridge between past and present ! It connects us with today to establish its relevance in present times.

४) मराठी साम्राज्य म्हणजे मोगलांचा संधीकाल आणि इंग्रजांचा उदय या दोहोंमधील कालखंडाची तळटीप नसून तो एक दैदिप्यमान आणि उर्जायुक्त कालावधी आहे. म्हणूनच शिवाजी महाराज विश्ववंद्य आहेत. त्यांच्याबद्दल बाबासाहेबांनी केलेले लेखन आणि “जाणता राजा ” या महानाट्याचे प्रयोग भारतातील सर्व भाषांमध्ये व्हायला हवेत.

दस्तुरखुद्द बाबासाहेब परधर्मीयांबद्दल कधीच अनुचित बोलले नाहीत असा उल्लेख समारंभात झाला असला तरीही दोन वक्त्यांनी “इस्लाम “असा स्पष्ट उल्लेख त्यांच्या भाषणात केला.

आणि हो, जेवढे पुस्तक वाचून झालंय तेवढ्या भागात मला मुद्रिताच्या ५-६ गंभीर चुका आढळल्या.

बाबासाहेब पुरंदऱ्यांना हेही नक्कीच खटकले असते.

एक मात्र महाराष्ट्राच्या शतकाची नोंद असलेले हे पुस्तक नव्या पिढीच्या हाती असायलाच हवे, हे नक्की !

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..