नवीन लेखन...

शंकर मुडके!

सकाळचे ते ‘गोल्डन अवर्स’ होते. सकाळी सात ते नऊ म्हणजे, माझे ‘गोल्डन अवर्स’ असतात. म्हणजे मी सकाळी सातवाजता उठून माझ्या साठी, दुधाचा दाट चहा करून घेतो. याला टपरीवर ‘गोल्डन’ चहा म्हणतात.
(म्हणजे  आमच्या वेळेस म्हणायचे!). मग बायको आठ वाजता उठते, तोवर ‘ताजे दूध’ आलेले असते, त्याचा पुन्हा गोल्डन! हे दोन कप पोटात गेल्यावर.
“अग, राहिला असला तर, गुटकाभर चहा तर बघ कि!” माझी सवय माहित असल्याने, तिने तो ठेवलेलाच असतो. त्या गुटक्या, नंतर माझी झोप उडून, मी नव्या दिवसाचे स्वागत करायला मोकळा होतो.
तर काय सांगत होतो? सकाळचे ते ‘गोल्डन अवर्स’ होते. पहिला चहा झाला होता. लोखंडी गेटच्या बेचक्यात, पेपरवाल्या पोराने खुसून ठेवलेला पेपर, मी काढून घेतला. चारदोन ठिकाणी हुडकल्यावर चष्मा सापडला आणि तो नाकावर चढवून, पेपर पालथा घातला आणि वाचायच्या विचारात होतो. हो, मी पेपर मागच्या पानापासूनच वाचायला सुरुवात करत असतो!
“काय? सुरेशअण्णा हैती का घरात?” मी एकदम दचकलोच.
‘सुरेश आण्णा’ म्हणजे हा मुडक्याचा आवाज! त्याच्या शिवाय ‘सुरेशआण्णा!’ या नावाने मला या त्रिभुवनात कोणी हाक मारत नाही! मी याला विसरूनही गेलो होतो. कारण नाही म्हटले तरी, सोलापुर सोडून मला आठ दहा वर्ष झाली होती.
“कोण? मुडक्या तू?” मी हातातला पेपर फेकून उठलो.
गेट बाहेर सव्वा पाच फुटाचा, पांढरा शर्ट, विजार आणि हातात, जमिनीला टेकण्याच्या बेतांत असलेली सोलापुरी चादरींची शिवलेली पिशवी, आणि चेहऱ्यावर या कानापासून त्या कानापर्यंत, जिवणी ताणून केलेले निर्मळ हास्य! मुडक्या उभा होता. त्याच्या चेहऱ्यात, शरीराच्या ठेवणी बराच फरक पडला होता, पण आवाज आणि हास्य मात्र तेच होते.
गेट उघडून मी त्याला आत घेतले. त्याने घरात पिशवी ठेवली. बाहेरच्या नळावर तोंड खंगाळले. बायकोने तोवर चहा केला होता. तो त्याने घेतला.
मी सोलापूरला असताना, आमच्या बँकेपासून हाकेच्या अंतरावर एक उडपी हॉटेल होते. आता त्याच नाव आठवत नाही, पण आम्ही बँकेचे काही मित्र, इंटरव्हल मध्ये तेथे जात असू. दुपारचे डब्बे खाऊन सुद्धा, एखादा प्लेट डोसा किंवा वडा पोटात जायचाच! कारण अश्या हॉटेलमध्ये, एक अगम्य असा, भूकवर्धक दरवळ कायम झिरपत असतो!(माझा अनुभव) खाण झाल्यावर, ज्या कारणासाठी आम्ही येथे आलेलो असायचो, ते कार्य उरकले जायचे, म्हणजे चहा आणि सिगरेटी पिणे!
“शंकर्या! दोन नंबरला फडकं मारकि भाड्या! साहेबलोक आल्यात! उगा मुसळासारखं उभा काय राहिलास?” मिरची भज्या सारख्या नाकाचा, धुस तेलकट काळा मालक गल्ल्यावरून खेसकयचा. (काळा रंग दोन प्रकारचा असतो. एक धुरकट काळा आणि एक तेलकट!) आणि पुन्हा स्टिलच्या पेल्यातल्या चिल्लर नाण्यात, बोट खुपसून खेळत बसायचा. तो त्याचा दिवसभराचा चाळा असावा.
मग कुठूनतरी एक काटकुळा, बारा तेरा वर्षाचं पोरग येऊन, चांगलं कोरड पडलेलं टेबल ओल करून, तेथच उभं राहायचं. आमची ऑर्डर घ्यायला. तोंडातल्या तोंडात मालकाचे ‘मातृ कुळ’ उद्धार चालू असायचा.
“काय शंकर, काय पुटपुटतोयस?”
“ह्या! गल्ल्यावर बसलेलं डुबर, माकड! मायला, कायम शिव्या देतंय बेन! याला वशाडी येवो! आण्णा, एक दिवस बगा, मी याचा मुडदा  बशिवतो का नाही ते?”
“अरे, तो मालक आहे. आपण लक्ष देऊ नये. बर ते, राहू दे. आज आम्हाला इडली दे. सांबर मात्र गरम पाहिजे. परवा गार होत!”
“आण्णा, इडली नका घेऊ! वडा ताजा तळतोय भट्टिवाला, ते घ्या!” तो हलक्या आवाजात सांगायचा.
“इडली का नको?”
‘का काय? सकाळा पिठात चाटू होते!”
हे नेहमीचे होते. खरे खोटे, आतला भट्टीवाला, समोरचा शंकऱ्या, नाहीतर आभाळातील परमेश्वरच जाणे!
आम्ही हॉटेलात जायचो, पण खाणे शंकऱ्याच्या मर्जीवर अवलबून असे.
मी इतरांप्रमाणे त्याची चेष्टा मस्करी कधीच केली नाही. तसाही मला चेष्टा मस्करी आणि हुल्लडबाजीत रस नाही. घसट वाढली तशी, त्याचा तोंडून त्याच्या घरची परस्थिती कळली. त्याची आई, त्याला न आठवण्याचा वयात वारली. बापाने दुसरे लग्न केले. आणि दारू पिऊन, पिऊन एके दिवशी तो हि मरून गेला. दुसऱ्या आईने, तिला जमेल तसे, शंकराचा सांभाळ केला. पण शेजारीपाजारी आपल्या कर्तव्याला चुकले नाहीत. ‘सावत्र’पणाच विष दोघांच्या मनात पेरून दिल. ‘आण्णा, हि नवी अव्वा, गल्लीतल्या बायांचं ऐकची अन मला तरास करायची!’ असे त्याने एकदा सांगितले होते. पण या सावत्र आईवर त्याचे प्रेम असावे. कारण बापाच्या माघारी, तो या हॉटेलात तिच्या साठी राबायचा.
“शंकऱ्या, उठ सूट मालकाला शिव्या देत बसतोस, त्या पेक्षा दुसरं काम, का नाही बघत?” मी एकदा त्याला सुचवून पहिले.
“आण्णा, हे माझं शेवटचं काम! म्हातारी हाय तवर करणार! तुमाला सांगतो, एक दिस मी पण या मालकासारखा गल्ल्यावर बसून गिलासात चिल्लर घोळणार! बाप मेला तवा, याच मालकानं अव्वाला भांडे घासाच काम दिल, तिला होईना तवा मला काम दिलंय! उपकार हैत! फकत, चार लोकात तोंड टाकून बोलतो, मग टाळकं फिरत आपलं!”
ह्या, अश्या स्वभावाचा शंकऱ्या. मला ‘सुरेशअण्णा’ म्हणू लागला. कधी शंभर दोनशे उधार मागू लागला. वीस वीस रुपयांनी परतही करू लागला. माझी बदली झाल्यावर तो गहिवरला होता.
“अरे, मी येत जाईन तुला भेटायला. आणि काही अडचण वाटली तर, बिनघोर ये माझ्या कडे!” मी त्याची समजूत काढली, तेव्हा कोठे त्याने, मनगटाने डोळे पुसून मला निरोप दिला होता.
                                                                                                                                                       ०००
तोच शंकर मुडक्या माझ्या समोरबसून चहा पीत होता. आता तो अंगाने चांगला भरला होता.
“मुडक्या, कस काय आलास? अन माझा पत्ता कसा मिळाला?”
“बँकेत गेल्तो! तिथनं घेतला!”
एकंदर त्याने सांगितलेली हकीकत अशी होती. त्याची ती सावत्रआई त्याला तिसऱ्यांदा बेवारशी करून मरून गेली. तिचा अडसर नसलेले, तो मालकाशी मनमोकळेपणे भांडू लागला! मालकाने लात मारून, दिले हाकलून. आणि आज, तो ‘काही अडचण वाटली तर, बिनघोर ये माझ्या कडे!’ या वाक्यावर विश्वास ठेवून, पिशवीत एक, विजार शर्ट आणि सोलापूर चादर घेऊन आला होता! नाही म्हटले तरी मला खूप ऑड वाटले.
“आण्णा, काय त पोटापाण्याच बघा! इथंच राहीन. सोलापुरात कुणी उरलं नाही!”
“अरे, या परक्या गावात कसा मेळ बसेल? तुला कुठं काम मिळणार, बाबा!”
‘आण्णा, गाव परक कस? तुम्ही हैंसा कि! जस तुमचं, तस मज पण हेच गाव!”
या मुडक्याच्या येण्याने मोठी पंचाईत झाली होती. चार सहा दिवसाची गोष्ट वेगळी होती. याचे नव्याने पुनर्वसन करावे लागणार होते.
मी मोबाईल काढला.
“हॅलो, राठी सेठ आहेत का?” आमच्या एका खातेदारास फोन लावला. त्याचे एक फॅब्रिकेशनचे युनिट होते.
“सेठ पुण्याला गेलेत. काही काम होत का?”
“होत. राजन, अरे आपल्या युनिट मध्ये एखादा माणूस लागेल का? माझ्या ओळखीचा आहे.”
“व्हॅकन्सी तर नाही, पण सेठ तुम्हाला नाही म्हणायचे नाहीत!”
“उद्या करतो मी त्यांना फोन!” मी फोन कट केला.
“आण्णा, नौकरीच विचारत होता का?”
“हा, का?”
“नौकरीच नका बघू!”
“नौकरी नको? मग काय करणार?” मी वेड्यासारखा त्याच्याकडे पाहू लागलो.
” ते ‘शाप’ टाकायचंच बगा!”
” ‘शाप?’ शाप देत असतात! टाकत नाहीत.”
“हॉटेलीच शाप हो!”
“हॉटेलच दुकान? मुडक्या, अरे. ते कस शक्य आहे? आबे. हॉटेल म्हणजे,ती काय चहाची टपरी आहे का?”
मी या मुडक्याच्या अपेक्षेने वैतागून गेलो होतो. एक तर न काही कल्पनादेता आला, वर हॉटेल टाकून द्या! मला काय हा कुबेराचा बाप समजतोय का? या माकडाला नौकरीची लाज वाटते!
“चालतंय कि! आण्णा चहाचाच गाडा बघा! त्याची हाटील कशी करायची ते मी बघतो!”
चहाचा गाडा? या विचारासरशी माझं डोकं त्या दिशेने कार्यरत झालं. मी पहिला फोन शाम्याला केला. माझं बोलणं, नेहमी प्रमाणे त्यानं ‘बघू’ म्हणून फोन कट केला.
वश्याच्या मेव्हण्याचं एक स्टेशनरी दुकान, प्रोफेसर चौकात आहे. त्याच्या शेजारी एक वाकड्या चाकाचा जुना गाडा धूळखात पडलेला, बरेचदा पहिल्याच आठवलं. मी वश्याला रिंग दिली.
“वेश्या, तुझ्या मेव्हण्याच्या दुकान शेजारी एक गाडा आहे, तो त्याचाच आहे का?”
“का?”
“मला तो हवाय?”
“कशाला?”
“चहाची टपरी घालायची आहे.”
“भिकार डोहाळे! सुरश्या, पण बरच आहे! त्या मॅडकॅप शाम्याशी चकाट्या पिटत बसण्यापेक्षा हे बरं!”
या वश्याला फोनवर बोलणं म्हणजे महापातक! साला पक्का फाटेफोडू आहे. मी त्याच्याकडून त्याच्या मेव्हुण्यांचा नंबर घेतला. त्याने तो गाडा तर दिलाच, वर स्वच्छता ठेवण्याच्या बोलीवर, गाड्या मागची थोडी जगापण दिली.
बायकोने घरातले दोनतीन वापरात नसलेले स्टीलची पातेली, आणि रॉकेलचा स्टोव्ह काढून मुडक्यासमोर ठेवला. मी मुडक्याला सामना सगट त्या गाड्यावर नेवून सोडले. तो सफाईचा कामाला लागला. तोवर मी दोन प्लॅस्टिकच्या बादल्या, दोन प्लास्टिकचे मग, जाडसर ताडपदरीचा मोठ्ठा तुकडा, खराटा झाडू अश्या मला सुचतील तश्या वस्तू घेऊन आलो.
आणि संध्याकाळ पर्यंत मुडक्याची, आमच्या साठी ‘चहाची टपरी’ तर, त्याच्या साठी ‘शाप!’ तयारही झाले होते! मुडक्याने, एका खपटावर ‘सिदेश्वर टी’ खडूने लिहून पाटी पण, त्या गाड्याच्या गळ्यात अडकली होती. कहर केला तो शाम्याने. दोन डझन चिलीमछाप काचेचे ग्लास मुडक्याच्या शापला बहाल केले!
                                                                                                                                              ०००
चार दिवसात मुडक्या आमच्या नगरमध्ये जुना झाला. चहा, साखर, रॉकेल त्याने जमवले. ताडपदरीचे दोन तुकडे केले होते. एक गाड्याच्या डोक्यावर आणि एक गाड्या मागे अंथरले होते! रात्री तो तेथेच झोपू लागला. ‘चल घरी झोपायला’ म्हणालो, ‘आता झाली कि सोय, नसती तर आलो असतो!’ मीहि आग्रह केला नाही. तो स्वाभिमानी होता. माझ्यावर विनाकारण ओझे पडणार नाही, याची दक्षता त्याने घेतली असावी. पण त्याच्या डोक्यावर छत पहाण्यासाठी, दोघांना रूम पहाण्यासाठी फोन केले.
एकदिवस त्याने मला आणि शाम्याला त्याने चहाचे आमंत्रण दिली. आम्ही संध्याकाळी त्याच्याकडे गेलो. बऱ्या पैकी लोक त्याच्या टपरीवर होते. त्याने आम्हाला चहा करून दिला. आई शप्पथ सांगतो, असा चहा आजवर कधी पिला नव्हता. कितीही ठरवून इतका बेचव चहा करता येणे शक्य नव्हते! माझे तोंड वेडवाकडे झाले, तरी शाम्याने गुमान चहा पिला. तो  तिथून उठला, आणि मुडक्याच्या स्टोव्हजवळ गेला.
“मुडक्या! ये इकडं! चहा करताना एक कप दूध, एक कप पाणी, एक चमचा पत्त्ती, अन एक चमच्या साखऱ्या! हे माप ठेव! चहा बिघडत नाही.”
मी विचारात पडलो, या मुडक्याच्या चहात मुळीच दम नसताना, लोकांची उपस्थिती कशी काय? लवकरच मला त्याचे उत्तर सापडले. त्याला मुडक्याच कारणीभूत होता!
‘काय आण्णा? संपली का ड्युटी?’
‘पोट्ट शाळेत सोडून आलाव जणू?’
‘रंभ्या, काय उन्हात तळतुस ये जरा अडुशाला.’
‘आक्का गेल्या का सासरी’
असल्या चौकश्या मुडक्याच्या चालू असत. त्याच्या गल्ल्यात भलेही आज पैशे जमत नसतील, पण ओळखी अन नाती मात्र तो वेचून ठेवत होता!
                                                                                                                                                        ०००
मुडक्याचे गाडगे बऱ्यापैकी आळ्यावर बसले होते. गाड्यासमोर आता दोन लाकडी बाकडे दिसू लागली. एक मोठी कढई, काही स्टीलच्या डिश आणि चमच्यांची, त्याच्या जंगम मालमत्तेत भर पडली होती. चहाला चव आली होती. त्याच्या जोडीला दोन जम्बो प्लॅस्टिकच्या बरण्या जुळ्या बहिणीसारख्या उभ्या दिसल्या. एकात बिस्किटाचे पुडे होते. आणि दुसरीत खारी होती. ‘हे कशाला?’ म्हणून विचारले, तर ‘शामूआण्णा ला खारी लागती म्हणून ठेवली!’ म्हणाला. श्याम्या न आपली सोय करून घेतो.
त्यात मुडक्याने तिखटजाळ मुगाचे वडे, तेलात सोडायला सुरवात केली आणि त्याचा गाडा नावारूपाला आला. गोडचीटट्टूकचहा आणि जाळ वडा! एकदम खतरा कॉम्बिनेशन! आमचे नगरकर असल्या ‘बेक्कार!’ वड्या, बोन्डावर जीव टाकतात. आमच्या येथे ‘बेक्कार’ म्हणजे ‘बेस्ट’!. बेक्कारचा हा अर्थ जगाच्या पाठीवर नाही सापडणार! नगर म्हणजे ‘बेक्कार’ गाव, लोक उगाच नाही म्हणत!
                                                                                                                                                       ०००
रात्रीचे साडे नऊ होऊन गेले होते. आमची रात्रीचे जेवणे, नुकतेच उरकले होते. तेव्हड्यात मुडक्याने दार वाजवले.
“काय रे, कस काय आलास? या वेळेला?”
“अव्वा, काय उरलं सुर्ल आसन ते द्या!” याने माझ्या बायकोला ‘अव्वा’ म्हणायला सुरवात कधी केली कोणास ठाऊक? (अव्वा-म्हणजे आई!)
“का? कशाला पाहिजे? तू जेवला नाहीस का?”
तोवर बायकोने उरलेल्या चार पोळ्या अन त्यावर दोन टपोऱ्या लोणच्याच्या फोडी त्याला दिल्या.
“उद्या सकाळा सांगीन!” म्हणून पोळ्याची पुरचुंडी घेऊन पळाला. मी बुचकुळतात पडलो. काय भानगड आहे? कळेना. जेवण झालंच होत. शतपावलीच निमित्य करून घराबाहेर पडलो. मुडक्याचा गाडा घरापासून फारसा लांब नव्हता. गाड्याच्या पाठीमागे मिणमिणता उजेड दिसत होता. मी हळूच जवळ जाऊन गाड्या मागे डोकावलं. मेणबत्तीच्या उजेडात एक म्हातारी जेवत होती.
“म्हातारे, दम्मान जेव. भाजी नाय भेटली, तवा दुद दिलंय, कोरडा तुकडा भिजवून खा! काय घोर नग करुस!”
“लेकरा, मज्या पायी लै तरास घेतलास? उपाशी पोटाला तुकडा दिलासा. देव तुज भलं करील बाबा! “
“आग, दुवा द्यायची आसन तर, आण्णा अन अव्वाला दे! त्यांचीच पोळी तुला मिळालीयय!”
“शंकरराव!” मी त्याला आवाज दिला. तो पटकन गाड्याच्या मागून बाहेर आला.
“आण्णा! तुमि?”
“मुडक्या, हे काय चाललंय तुझं? कोण आहे हि म्हातारी?”
“वारीला गेल्ती. बिमार पडली. बाकी गावकऱ्यांची आणि तिची चुकामुक झाली. पैसा नाही. पायी गावाकडं निघाली, भुकेली होती म्हणून —.” मुडक्याचा आवाज कापरा झाला.
“कोणत्या गावची आहे?”
“गंगापूर जवळ गाव आहे म्हणती.”
मी खिशातून शंभराची नोट काढून त्याच्या हातावर ठेवली.
“सकाळी, म्हातारीला तिच्या गावाच्या एसटीत बसवून दे. काही केळी घेऊन दे, भुकेला प्रवासात बरे असतात!” मी मागे वळून न पहाता तडक घरी निघालो.
हा असाच, समाजसेवा करत राहिला तर, एखाद दिवशी निवडणुकीत निवडून येईल! काही नेम नाही!
                                                                                                                                                             ०००
संक्रांत नुकतीच झाली होती. माझा मोबाईल वाजला. शाम्या होता.
“सुरश्या, मुडक्या कुठाय?”
“कुठाय? म्हणजे, असेल कि त्याच्या टपरीवर!”
“मी टपरीसमोर उभा आहे! ‘आज सुटी!’ अशी पाटी गळ्यात अडकवून गाडा उभा आहे. मुडक्या नाही दिसत. कुठाय?”
“अरे, मला पण माहित नाही!”
“तूला माहित नाही? तुला सांगितल्या शिवाय ते बेन मुतायला पण जात नाही! अन तू मला सांगतोस ‘मालूम नही!’, तू ड्याम्बीस आहेस!” श्याम्याचा जीव खारीसाठी वरखाली होत असणार! पण खरच मुडक्या न सांगता गेला कुठं? मला लगेच आठवले.
“श्याम्या, गड्डा जत्रेला गेला असेल. या दिवसात, पंधरा दिवसाची जग्गी जत्रा सोलापुरात भरते!”
पण मला माहित आहे. तो जत्रेला का जात असतो ते. तुम्हाला म्हणून सांगतो. त्याच एका मुलीवर प्रेम होत एकतर्फी. नकळत्या वयातलं. ती जत्रेत बेल पत्राचे दुकान लावून बसत असे. मुडक्याचे लग्न त्याचा आजोबाने लहानपणीच ठरवले होते. ‘तू जर लग्न नाही केलंस तर, तुजा आजोबा, नरकात जाईलत्याला!’ अशी भीती दाखवून, त्याला लग्नास उभे केले होते. आणि रात्रीतून लग्न उरकून घेतले! हे, तो आपल्या प्रियसीस सांगून, ‘ तू मला विसरून जा. चांगल्या पोराबोरोबर लग्न करून सुखी हो.’ म्हणून विनवणार होता.
पण ती, त्याला त्याच्या लग्नानन्तर पुन्हा कधीच दिसली नाही. तिचे नाव, गाव, पत्ता याला माहित नव्हता, ती कधीतरी जत्रेत भेटेल, मग तिला सगळी कहाणी सांगू, या आशेवर तो, दर जत्रेला सिद्धेश्वराला जात असे! मुडक्या म्हणजे ‘भोळा शंकर’ होता.
                                                                                                                                                  ०००
चार दिवसांनी मुडक्याचा गाडा सुरु झाला. त्याने मला अन श्याम्याला जत्रेचा प्रसाद दिला.
‘मुडक्या, काय म्हणाला सिद्धेश्वर? किती वेळ लागला रे दर्शनाला?”शाम्याने विचारले.
“मी — मी जत्रेला जातो. देवदर्शनाला जात नाही!” मुडक्या तुटकपणे म्हणाला.
“का?” श्याम्याने नको तो प्रश्न विचारला.
“मी –मी नवस बोललोय, माझं ‘काम’ झाल्याशिवाय, मी देवाचं दर्शन घेणार नाही म्हणून!”
मी शाम्याचा हात दाबून फार विचारू नकोस म्हणून खुणावले.
                                                                                                                                                  ०००
लवकरच मुडक्याने अपेक्षित भरारी घेतली. त्याचा गाडा आता बंद झालाय. मस्त कोपऱ्यावरला एक गाळा त्याला मिळालाय. सन्मयकाचे चकाचक फर्निचर आलय. उंच गल्ल्यावर मुडक्या बसतो. चार वेटर्स त्याच्या हॉटेलात राबताहेत. ‘सिद्धेश्वर टी अँड स्न्याक्स’ची, नियॉन साइन बोर्ड त्याच्या हॉटेलच्या टाळूवर दिमाखात चंमकत असते.
त्याच्या काळ्या डुबऱ्या मालकाने, त्याला फक्त शिव्याच दिल्या नव्हत्या, तर ‘गिलासात चिल्लर खेळवत बसण्याचे.’ स्वप्न पण दिले होते! खरेतर त्याने या बद्दल त्या मालकाचे आभारच  मानायला पाहिजेत. आणि श्याम्याचे पण कारण त्याने या हॉटेलच्या ओपनिंगला त्याने एक स्टीलच्या ग्लास अन शंभर रुपयाचे चिल्लर प्रेसझेन्ट दिलंय, पहिल्या दिवशी पासून चिल्लर ग्लासात घालून खेळायला!
— सु र कुलकर्णी. 
पुन्हा आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..