नवीन लेखन...

शहर पुण्याचा कवी

जाहिरातींच्या व्यवसायातील सुमारे चाळीस वर्षांच्या कालावधीत, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी आमच्या संपर्कात आली. साहित्य विषयाची तर मला शाळेपासूनच गोडी असल्याने, एखादा लेखक किंवा कवी भेटल्यावर, माझ्या आनंदाला पारावार रहात नाही..

‘गुणगौरव’मध्ये काम करीत असताना एके दिवशी बुल्गालीन दाढी राखलेले, खादीचा झब्बा व सुरवार घातलेले एक गृहस्थ एका तरुणीसोबत ऑफिसमध्ये आले. त्यांना ‘धर्मशाळा’ या कवितांच्या कार्यक्रमाचं पेपरसाठी डिझाईन करुन हवं होतं. ही ‘मभां’ची झालेली माझी पहिली भेट! ती ‘मभां’च्या सोबत असलेली तरुणी म्हणजे आजची आघाडीची प्रकाशिका, मोहिनी कारंडे. ‘मभा’ चव्हाणांचं पूर्ण नाव मला अद्याप माहीत नाहीये.. सिर्फ ‘मभा’ही काफी है….

या ‘धर्मशाळा’ चे पुण्यातील व पुण्याबाहेरील महाविद्यालयांतून असंख्य कार्यक्रम झाले. त्यानंतर ‘मभां’नी ‘प्रेमशाळा’ नावाचा कार्यक्रम सुरु केला. त्याचे देखील जाहिरातीचे डिझाईन आम्हीच केले होते.

मराठी चित्रपट निर्माते अरविंद सामंत यांच्याशी आमची व्यवसायाच्या दृष्टीने घनिष्ठ मैत्री होती. त्यांचे ऑफिस लक्ष्मी रोडला शेडगे विठोबा मंदिराजवळ आहे. त्यांनी ऑफिसच्या दोन खोल्यांपैकी एक खोली ‘मभां’ना भाड्याने दिली होती. तिथे सामतांना भेटायला गेल्यावर ‘मभां’ची भेट होत असे.

दरम्यान ‘मभां’नी त्यांच्या काही पुस्तकांची मुखपृष्ठं आमच्याकडून करुन घेतलेली होती. अरविंद सामंत यांच्या निधनानंतर ‘मभा’ पुन्हा लक्ष्मी रोडच्या ऑफिसमध्ये आले. नाना देसाई अलीकडे व ‘मभा’ पलीकडे बसू लागले.‌ दोनच वर्षांनंतर नाना देसाई गेले व ‘मभां’चं पृथ्वीराज प्रकाशन सुरळीत चालू लागलं..

‘मभां’कडे खास करुन कवितांची पुस्तकं प्रकाशनासाठी येत असत. त्या बहुतांशी पुस्तकांची मुखपृष्ठं मी केलेली आहेत. काही इंग्रजी, काही अध्यात्मिक पुस्तकांची मुखपृष्ठ करण्याचीही संधी मला मिळाली. लेखक, कवींना मुखपृष्ठ दाखविण्यासाठी ‘मभा’ त्यांना घेऊन माझ्याकडे येत असत, साहजिकच त्यांच्याशी माझा परिचय होत असे.

मध्यंतरी तीन वर्षे मी संस्कृती प्रकाशनच्या ऑफिसमध्ये काम करीत असताना, ‘मभा’ तिथे येऊन माझ्याकडून मुखपृष्ठ करवून घेत असत. ‘मभा’ आले की, गप्पा होत असत. एकदा माझा मित्र, हेमंत शहा बसलेला असताना, कामाच्या निमित्ताने ‘मभा’ आले. दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. ‘मभां’नी कितीतरी सुंदर कविता ऐकवल्या.. कान तृप्त झाले.. ती मैफल अविस्मरणीय ठरली.

नंतर अनेक दिवस ‘मभा’ दिसलेच नाहीत. वर्षभरानं समजलं ते आजारी होते. जेव्हा दिसले तेव्हा ओळखू न येण्याइतपत कृश झाले होते. चालताना खांद्यातून थोडेसे वाकून चालत होते.

मभानी पुन्हा उभारी घेतली व चंदना सोमाणी हिच्यासोबत नवीन मुखपृष्ठाचं काम घेऊन आले. ‘मभां’ना बाबा मानणारी चंदना, स्वतः उत्तम गझला लिहिते. ‘मभां’चं कमी बोलणं, ती बेलगाम बोलून भरुन काढते.. दोन वर्षे ‘मभा’ आणि चंदना आमच्या ऑफिसवर येत होते. नवीन मुखपृष्ठं होत होती.

नंतर ‘मभा’ आले, तेव्हा त्यांच्यासोबत अमृता जोशी नावाच्या मॅडम होत्या. दरम्यान ‘मभां’च्या ‘करम’ दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ केलं. अलीकडे गेल्याच महिन्यात त्यांच्या एका पुस्तकाचं मी मुखपृष्ठ करुन दिलं..

तर असे हे ‘मभा’ साहित्य वर्तुळातील सर्वांना परिचित आहेत. खेड तालुक्यातील, एका खेड्यात ‘मभां’चा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना साहित्याची आवड. माध्यमिक शिक्षणानंतर ते पुण्यात आले. एल.एल.बी. झाले. मात्र त्यांनी शाब्दीक चातुर्याच्या काळ्या कोटाऐवजी शब्दांना प्रासादिक करणाऱ्या कवीचा, खादीचा झब्बा पसंत केला. गझलकार सुरेश भटांचे शिष्य असलेले ‘मभा’ त्यांचा वारसा वर्षानुवर्षे चालवताहेत…

सरस्वतीच्या आशीर्वादाने आजपर्यंत यांनी विपुल कविता व गझला लिहिल्या. त्यांच्या पुस्तकांना भरघोस प्रतिसाद मिळाला. पुस्तक निर्मिती करताना, गांधींवरच्या एका पुस्तकाने त्यांना संपन्नता मिळवून दिली. ‘मभा’ आई विषयावरील एका कवितेत म्हणतात.. आई नावाची वाटते, देवालाही नवलाई.. विठ्ठलही पंढरीचा, म्हणे, स्वतःला विठाई…

योग्य कालावधीत त्यांचं लग्न झालं. त्यांचा थोरला चिरंजीव सिनेफोटोग्राफीमध्ये काम करतो आहे व धाकट्याने अभिनव कला महाविद्यालयातून पेंटिंग्जचा डिप्लोमा घेतला आहे. तो पोर्ट्रेटमध्ये मास्टर आहे!

गेल्याच आठवड्यात ‘मभा’ माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘नावडकर, माझ्या नवीन पुस्तकाचं मुखपृष्ठ तुम्हीच करायचं… पुस्तकाचं नाव आहे…’शहर पुण्याचा कवी’

© सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

२६-७-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..