नवीन लेखन...

सेवाव्रती

साडेपाच फुटाच्या आत बाहेर उंची, किरकोळ शरीरयष्टी, अंगात वीटकरी किंवा फिकट निळ्या रंगाचा बुशकोट, लक्षात न राहील अशा कोणत्याही रंगाची पँट, पायात चपला, निवृत्ती जवळ आल्याचा निदर्शक असा रापलेला अस्पष्ट सुरकुत्यांनी भरलेला उभट चेहेरा, विस्कटलेल्यात जमा व्हावे असे पिकलेले केस, आणि बारीक परंतु एका नजरेत समोरच्या माणसाला आरपार वाचणारे तीक्ष्ण डोळे…. हे वर्णन आहे ऐंशीच्या दशकातील, डीटेक्शन ऑफ क्राईम ब्रांच सी आय डी मधील परब जमादार यांचे.

या अतिसामान्य व्यक्तिमत्त्वाच्या, जेमतेम आठवी पर्यंत शिक्षण झालेल्या माणसाकडे पाहिल्यावर त्याच्या डोक्यात, कुलाब्या पासून दहिसर आणि मुलुंड पर्यंत पसरलेल्या मुंबईतील असंख्य गुन्हेगारांची किती अचूक माहिती भरलेली आहे याची कल्पना येत नसे.

१९८५ साली माझी बदली मुंबई पोलिसांच्या या महत्त्वाच्या विभागात झाली. त्या काळी मुंबई पोलिस क्षेत्र गोदी आणि विमानतळ परिमंडळे धरून नऊ परिमंडळात विभागले गेले होते. साधारण सात ते आठ पोलिस स्टेशन्स एका परिमंडळात असत. प्रत्येक परिमंडळाचे क्षेत्र एका युनिट कडे अशी आमच्या क्राइम ब्रांच सी आय डी ( गुन्हे अन्वेषण ) विभागाची पहिल्यापासून रचना होती. माझी नेमणूक मध्य मुंबईचे क्षेत्र अंतर्भूत असलेल्या “युनिट तिन ” मधे होती. प्रत्येक युनिटमधे आठ ते दहा हवालदार आणि त्यांच्यावर एक जमादार किंवा सीनिअर हवालदार असे. जमादार परब हे आमच्या युनिट मधे होते.

अत्यंत मितभाषी असलेल्या परब जमादरांचे पूर्ण नाव मला माहीत नाही. त्यांच्याबरोबर युनिटमधे असताना कधी विचारायची वेळ आली नाही. मात्र त्यांचे समकालीन त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचा “फ्रामरोझ परब ” म्हणून उल्लेख करीत. परब जमादाराना ती चेष्टा कानावर आली की ते अस्सल मालवणीतील खास ठेवणीतल्या शिव्यांनी चेष्टा करणाऱ्यांचा उद्धार करत हे आम्हाला माहीत होते.

या टोपण नावाची पार्श्वभूमी अशी की परब यांची भरती स्वातंत्र्य पूर्व काळातील. त्यावेळी त्यांचे अनेक वरिष्ठ अधिकारी अंग्लो इंडियन्स किंवा पारशी असत. असेच एक फ्रामरोझ नावाचे पारशी पोलिस उपायुक्त होऊन गेले. परब हे त्यांच्या खास मर्जीतील. म्हणून परब यांच्या पाठीमागे त्यांचा उल्लेख, त्यांचे मूठभर उरलेले समकालीन ” फ्रामरोझ परब ” असा करत असत.

त्यावेळी जेमतेम आठ वर्ष सेवा काळ झालेल्या मला, माझ्या वयापेक्षाही जास्त वर्ष खात्यात काढलेल्या परब जमादार यांच्याविषयी एक प्रकारचे कुतूहल असे..

परशुराम (उर्फ परश्या) कदम जमादार, ठोंबरे जमादार, रामभाऊ इंदुरकर जमादार आणि आमचे परब जमादार ही त्या वेळची क्राइम ब्रँचची कायमची आणि सगळ्यात जुनी माणसे. त्यांची क्राईम ब्रँच बाहेर बदली होत नसे कारण मुंबईतील त्या वेळच्या गुन्हेगारी विश्वाबद्दल त्यांच्या इतकी खडा न खडा माहिती त्याकाळी क्वचितच कोणाला असेल!.

परब जमादाराना मी फार कमी वेळा युनिफॉर्म मधे पाहिले असेल. तेही १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी ला सकाळी होणाऱ्या झेंडावंदन प्रसंगी. अर्थात झेंडावंदन आटोपले की लगेचच ते इतर सहकारी पोलिसांना घेऊन साध्या वेषात लगबगीने पुढच्या अल्पोपहाराच्या तयारीला लागत असत.

झेंडावंदन झाले की त्या दिवशी आवश्यक असलेला First Suit परिधान केलेले सर्व अधिकारी, कमरेच्या swords काढून,बाजूच्या भिंतीला उभ्या ठेऊन आपापल्या युनिट मधे अल्पोपहार करत असत. मी अनेक वर्ष क्राइम ब्रँच सी आय डी मधे नेमणुकीस होतो. त्यामुळे असे अनेक अल्पोपहार मी अनुभवले. मात्र इतक्या वर्षात जिलबी,फरसाण, केळी आणि चहा हा बाबा आदमच्या काळा पासूनचा बेत बदलल्याचे मी कधीही पाहिले नाही.

त्या काळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोडून सगळे अधिकारी आपापल्या मोटर सायकल ने सकाळी ९.३० पर्यंत ऑफिस मधे येत असत. १० वाजेपर्यंत ऑफिसबाहेर बुलेट्स ची मोठी रांग लागत असे. थोड्याच वेळात कोर्टाला पाठवायच्या रिमांड रिपोर्ट्सचे टायपिंग सुरू होऊन सगळ्या युनिट्स मधून टाईप रायटर्स खडखडायला लागत. पोलिस हवालदार मंडळी आरोपींना कोर्टात नेण्यासाठी lock up मधून आणणे, त्यांच्या नोंदी करणे इत्यादी कामात व्यग्र असे. तर इतर अधिकारी वर्ग कोर्टात घेऊन जाण्याच्या गुन्हे तपासाच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात गुंतलेला असे. या गडबडीत परब जमादार मात्र कुठेच नसत. ते असायचे पोलिस कमिशनर कार्यालय संकुलातील क्राइम ब्रँच इमारतीसमोर त्या काळी असलेल्या मैदानवजा मोकळ्या जागेमधील बदामाच्या भल्या थोरल्या झाडाच्या पारा शेजारी उभे. डाव्या हाताचा कोपरा पाठीमागून उजव्या हाताने धरून उभं राहायची त्यांची कायमची लकब. डाव्या हातात विडी,जी समोरून कोणी अधिकारी जात असताना,पटकन् बोटांमधेच लपवली जायची. त्यांच्यासमोर कोणीतरी त्यांच्याच वयाचा केस लाल केलेला किंवा चेहेऱ्यावर कधीकाळी झेललेल्या वाराचा लांबलचक व्रण मिरवणारा, नजरेत जगाप्रती अत्यंत बेफिकीरी असलेला आणि ज्याच्याकडे पोलिसी नजर जाताच त्याची गुन्हेगारी जगताची पार्श्वभूमी लगेच लक्षात यावी असा त्यांचा एखादा खबरी बोलत उभा असे. परब जामदार डोळे आणखी बारीक करून कपाळावरच्या आठीमागुन शांतपणे त्याचं बोलणं ऐकत आहेत हे चित्र बऱ्याच वेळा मी पहात असे.

आम्ही रोज सकाळी कार्यालयात पोहोचण्या पूर्वी परब जमादार त्या पारावर पोचलेले असायचे आणि सगळे अधिकारी घरी निघेपर्यंत ते तिथे उपस्थित असत.

रविवार,सणासुदीची सुट्टी, अगदी दिवाळी, दसरा काहीही असले तरी ही जुनी जाणती ठराविक मंडळी त्या पारावर हटकून असायचीच. गुन्हे शाखा हेच त्यांचं घर म्हणाना!

कधी महत्त्वाच्या कामासाठी कार्यालयात अगदी लवकर जाण्याचा प्रसंग आला आणि गेल्या गेल्या टेबलाच्या खणातील फडके काढून आपण टेबलावरील धूळ झटकायला सुरुवात केली, की समोरून जुन्या जमान्यातील शिस्तीचे परब जमादार लगबगीने येऊन ” द्या इकडे. तुम्ही नुको करू” असं म्हणत टेबल साफ करून परत पारावर जाऊन बसत. एरवी सुद्धा प्रसंगी समोर उभे असताना बसायला सांगितले तर कधीही खुर्चीत बसत नसत.

सकाळी बृहन्मुंबईचे पोलीस कमिशनरसाहेब ऑफिसमधे आल्याची वर्दी, ते आल्याबरोबर त्यांना दिल्या जाणाऱ्या ” Guard Of Honour ” च्या सलामीच्या ब्युगल कॉल बरोबर साऱ्या कार्यालयांना मिळत असे. त्यानंतर काही वेळात आमचे. ” Detection of Crime Branch ” चे प्रमुख असलेले सहाय्यक पोलिस आयुक्त लगबगीने कमिशनरसाहेबांच्या इमारतीकडे निघाले की समजावं, तिकडून क्राईम ब्रांच साठी काही तरी काम येत आहे. अधिकारीवर्गाची प्रश्र्नार्थक कुजबुज सुरु होई. कोणत्या युनिटच्या हद्दीमधे आदल्या दिवशी किंवा रात्री घडलेल्या रॉबरी, दरोडा, खून, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपी मिळणे बाकी आहे का, हे पाहायला क्राईम बुलेटिन पुनः पुनः चाळले जाई. कमिशनर साहेबांकडून सहाय्यक पोलिस आयुक्त परत आले, की एखाद्या युनिटच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा इंटर कॉम वाजत असे.लगेच ते आपल्या युनिटच्या अधिकाऱ्यांसह साहाय्यक पोलिस आयुक्त यांना रिपोर्ट करत असत आणि त्या ठराविक गुन्ह्याच्या तपासाबाबत सूचना घेऊन कामाला लागत.

अशा वेळी परब जमादारांची उत्सुकता आणि अस्वस्थता त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट दिसत असे. मोठया साहेबांकडून ऑफिसर्स खाली आले की ” काय प्रकार आहे ” याअर्थी भाव चेहेऱ्यावर लेऊन, परब जिन्याजवळ वाट पहात असायचे आणि गुन्ह्याची माहिती घेऊन विचारमग्न व्हायचे. मग स्टाफमधील कुणाला तरी ” ए हकडं ये. असा कर, अंजीर वाडीला जा. गुलाब हाटलच्या मागच्या गल्लीत तिसरा दुकान. उस्मान स्टो रिपेरिंगवाला. त्याला सांग परबचाचाने अभी के अभी बुलाया है. हे धा रुपये दे त्याला बस भाड्याला.जा. निघ.”

समजून जायचं. परब जमादारांची खबऱ्यांची साखळी कामाला लागणार. केस डीटेक्ट होणार.

एकदा असे झाले, आमच्या साहाय्यक पोलीस आयुक्तांना एक दाक्षिणात्य व्यक्ती भेटायला आली. त्यांच्या सांताक्रुझ येथील घरात घरफोडी होऊन काही मौल्यवान वस्तूंबरोबर, टेप रेकॉर्डरच्या कॅसेट्स चोरीला गेल्या होत्या. तक्रारदार अत्यंत व्यथित झाला होता. अशाकरता की त्या कॅसेट्स त्याच्या आईने घरात गायलेल्या गाण्यांच्या होत्या. बाकी काही परत मिळालं नाही तरी हरकत नाही पण माझ्या दिवंगत आईच्या आवाजातील गाणी मला मिळवून द्या असे तो पन्नाशीच्या घरातील इसम अक्षरशः रडत सांगत होता. तपशीलवार माहिती घेत असताना असं कळलं की चाळीच्या छपरावरून मागच्या बाजूच्या रस्त्यावर उडी मारून चोराने पलायन केले होते.

परब जमादारानी ” छप्पर किती उंच आहे? ” एवढा एकच प्रश्न विचारला. आणि

” साहेब,विकीचं काम आहे ” असं मला सांगितलं.

विकी या संशयिताचा, गावचा एक खास मित्र पनवेलमधील एका हॉटेलात तंदुरी रोटी भाजण्याचे काम करत असे. त्याचा पत्ता बकरी अड्ड्यावर राहणाऱ्या त्याच्याच मेहुण्या कडून घेऊन त्याला आणून आम्ही,एअर इंडिया कॉलनीत एका लोडरच्या तिसऱ्या मजल्यावरील घरातून, तिथे पेईंग गेस्ट म्हणून रहात असलेल्या विक्रमसिंह वृंदावन सामल ऊर्फ विकीला त्याच मध्यरात्री ताब्यात घेतले.

रात्री आम्ही निघालो तेंव्हा परब जमादारानी मला सांगून ठेवले होते, ” सर, घराला गॅलरी असेल तर तिच्या खाली दोन जण ठेवा “.

मध्यरात्री दारावर पडलेली थाप पोलिसांचीच असणार हे जाणून विकीने तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली उडी मारली आणि सावरून परत उठून उभा राहण्या पूर्वीच त्याच्या हातात बेडी पडली.

त्याच घरातून विकीची बॅग हस्तगत झाली. चोरीच्या एकुणएक वस्तू ताब्यात आल्या. तक्रारदाराने दुसऱ्या दिवशी त्या ओळखल्या तेव्हा त्याचा विश्वास बसत नव्हता. त्याच्या आईच्या गाण्याच्या कॅसेट्स पाहून तर तो भारावून गेला. परब जमादाराना मी बोलावून त्यांच्यामुळे घरफोडी उघडकीस आली असे सांगून त्यांची ओळख करून दिली. दोन मिनिटे तिथे रेंगाळून परब आपल्या आवडत्या पाराकडे गेले.

स्वतःच कौतुक करून घेणे, “हे मी केलं “, “हे माझ्यामुळे झालं” अशा प्रकारचे “मी” पण मिरवण्याच्या वृत्तीपलीकडे गेलेल्या, आपल्या कामात निष्णात असलेल्या परब जमादारांची नाळ फक्त गुन्ह्यांची उकल करण्याच्या कर्तव्याशी जुळली होती. बाकी कोणत्याही गोष्टीचे त्यांना अप्रूप नव्हते. आपले कर्म स्वाभाविक निष्ठेने करणे हीच भगवंताची पूजा मानून समाधानाची परमसिद्धी प्राप्त करणे इतकेच त्यांना माहीत.

हाताखालून गेलेल्या प्रत्येक गुन्हेगाराचे पूर्ण नांव, त्याची गुन्हा करण्याची पद्धत, तो कधी, कुठे अटक होता, आधी काय करत होता, नातेवाईक कोण, लॉक अप मधे असताना कोण भेटायला येत असे इथपासून त्याच्या जामिनाचा खर्च कोणी याची तपशीलवार माहिती यांच्या डोक्यात कायमची कोरलेली.

पोलिसी गुप्तवार्ताचे भांडार असलेले परब जमादार अनेक पोलिसपर्वांचे साक्षीदार होते. त्यामुळे प्रचलित पद्धतींबाबत एक प्रकारचं निरीच्छ त्रयस्थपण त्यांच्यात आलेलं असावं.

एका कुप्रसिद्ध आणि खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखेने अटक केल्यावर त्याने बऱ्याच व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावले असल्याचे निष्पन्न झाले. भीतीपोटी त्यापैकी काही जणांनी तक्रारी केल्या नव्हत्या. त्यांना बोलाऊन धीर देऊन त्यांच्या तक्रारी नोंदविण्याची प्रक्रिया चालू होती. अशाच एका दिवशी एक पांढरी शुभ्र मर्सिडीझ कार कंपाऊंड मधे आली. परब जमादार ज्या पारावर बसले होते तिथे गाडी पार्क करून white and white कपड्यातील ३०/३५ वर्षांचा एक देखणा इसम उतरला. झोकात तोंडातील सिगारेट पायाखाली चिरडून तो गुन्हे शाखेच्या ईमारती कडे निघाला. परब जमादारानी एकदम

” काय रे सलीम, लई टायली मारतस! बरा हाईस ना?” असे जोरात विचारले.

तो आवाजाच्या दिशेने वळला आणि अक्षरशः धावत त्यांच्याकडे गेला. पायाला हात लाऊन त्यांना.” अरे, परबमामू? कैसे हो मामू? खैरियत है ना? ” असे म्हणत त्यांना मिठी मारली. ” मामू, परसोही ये नया गाडी लिया. आओ ना, बैठो. सिर्फ एक राऊंड मारके आयेंगे. सुकून हो जाएगा ” असं म्हणत कारचा पुढचा डावीकडचा दरवाजा उघडून त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवलं आणि स्टिअरिंग व्हीलवर स्वतः बसून जवळची चक्कर मारून आला. त्या कोणा सलिमच्या चेहेऱ्यावर खरोखर आवडता ज्येष्ठ नातेवाईक खूप दिवसांनी भेटल्याचा निर्भेळ आनंद होता. परब जमादार गाडीतून उतरल्यावर त्या सलिमने खिशातील आपले पैशाचे पाकीट काढून. ” मामू मेरे लिये ये रख दो मामू ” असे म्हणत त्यांच्या पँटच्या खिशात टाकले.” परब हसले. ते पाकीट त्यांनी परत सलीमच्या गाडीच्या सीटवर ठेवले आणि त्याची पाठ थोपटत ” असाच खुष रहा. जा ” असं म्हणाले. त्यांच्या पायाला हात लाऊन सलीम गुन्हे शाखेकडे गेला.

बाजूलाच पार्क केलेल्या जीपमधे ड्रायव्हरची वाट पहात असलेला मी हे सर्व पहात होतो. न राहवून मी परब जमादारांना विचारलेच. ” कोण हो हा? ”
“अहो, डोंगरीच्या हद्दीत एक खोजाचं हॉटेल होतं. हा त्याचा पोरगा. शाळेत असताना याला सोरटचा नाद लागला. अभ्यास करेना. बाप चांगला माणूस. नाक्यावर बंदोबस्ताला असायचो तेव्हाची ओळख. माझ्याकडे आला. शाळा सुटली की याला मी पोलिस स्टेशनला डीटेक्शन रूमच्या बाजूला आणून बसवायचो. तिथेच अभ्यास करायचा. वाईट संगत सुटली,जुगाराचा नाद गेला. चांगला शिकला. हाँगकाँगला असतो. कपडा एक्स्पोर्ट करतो.”

मनात आले, ज्या परब नावाच्या पोलिसाने सद्भावनेने त्या सलिमचे भविष्य बदलले, त्याच्या खिशातील पाकिटात कोणत्याही वेळी परब यांच्या पगाराहून जास्त रक्कम असेल. मात्र त्याचा यत्किंचितही मोह त्यांना नव्हता.

कर्माशी निष्ठा ठेऊन निर्मोही आचरण करत निवृत्त होणाऱ्या असंख्य पोलिस कर्मचाऱ्यांचे परब जमादार हे एक प्रातिनिधिक उदाहरण. खिसा कसा कापला आहे हे पाहून कोणत्या ‘लाईन’ वरचा आरोपी आहे हे ओळखणारे, कडी कशी तोडली आहे हे पाहून आणि चोराने काय नेलं या पेक्षा काय सोडून गेला हे पाहून आरोपींचा नेमका अंदाज बांधणारे आणि काही तासात केस उघडकीला आणणारे unsung heroes या DCB CID ने पाहिले आहेत. यांना ना मानमरातब मिळतात ना मेडल्स. कारणे पहिली तर व्यवस्थेची कीव यावी. नोकरीच्या सुरुवातीला बंदोबस्त किंवा परेड वर यायला काही मिनिटे उशीर झाला म्हणून रागीट वरिष्ठांनी दिलेली “सक्त ताकीद” ही किरकोळ शिक्षा सुद्धा सेवा पुस्तकात कायमची ” लाल बावटा” ठरते आणि भविष्यात कितीही पराक्रम गाजवले तरीही “Unblemished record ” नाही म्हणून मोठ्या बहुमानांच्या आड अनेक वर्षापूर्वीचा तो ” रेड मार्क ” येतो. यांचे फोटो सोडा यांची नांवेही ” पोलिस चातुर्यकथां ” मधे झळकत नाहीत. BDD चाळीतील सिंगल रूम मधे कुटुंब वाढवत, निवृत्तीपर्यंत दिवसाचा जास्तीत जास्त काळ ड्युटीवर राहून, निवृत्ती झाल्यावर गावी जाऊन राहायचे हाच जवळ जवळ प्रत्येकाच्या आयुष्याचा ढाचा.

निष्काम वृत्तीने सेवा करत आयुष्य व्यतित करणारे असे अनेकजण मनाच्या व्यथा बाळगून असतीलही. परंतु या व्रतस्थाना त्यांच्या व्रणांची तमा नसते. कारण त्यांना कशाचेही प्रदर्शन करायचे नसते.

— अजित देशमुख.

(निवृत्त)अप्पर पोलिस उपायुक्त

9892944007.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..