नवीन लेखन...

सत्याहूनी स्वप्न ते ‘सुंदर’

नऊ वर्षांपूर्वी मला दिलीप नावाच्या प्रोफेसर मित्रानं त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ‘माझ्याबद्दल तुला जे काही वाटतंय, ते लिहून काढ.’ असं सांगितलं. मी त्याची पहिली भेट झाल्यापासून ते त्या दिवसापर्यंतचं जेवढं आठवत होतं, तेवढं लिहून काढलं. त्यालाच नव्हे तर जो वाचेल त्याला ते लेखन मनापासून आवडलं!
मला लिहिण्याची आवड होतीच, मी वरचेवर सुचेल त्या विषयावर लिहू लागलो. कथा, व्यक्तिचित्र, ललित, आदी मला लिहिण्यात समाधान मिळू लागलं.
ऑफिसमध्ये फावल्या वेळात मी ए-फोर साईजमध्ये प्रासंगिक, व्यक्तीचित्रं, आठवणी लिहून व्हाॅटसअपवर, फेसबुकवर पोस्ट करु लागलो. सुरुवातीला वाचकवर्ग फारच कमी होता. प्रत्येक लेखाची कलर प्रिंट काढून मी फाईल तयार केली. चाळीस लेख झाल्यानंतर, ते वाचणारा जो तो ‘आता पुस्तक करा!’ असं म्हणू लागला.
गेल्या वर्षी मार्चला कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरु झालं. ऑफिस बंद. घरात बसून मी एकेक विषयावर लिहू लागलो. वाचक वाढले, प्रोत्साहनाच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या.
राजीव सायगावकर या काॅलेज मित्राने त्याच्याकडील ‘पोस्ट’ फाॅरवर्ड करुन काही नवीन विषय सुचविले. कधी दिवसाआड तर कधी रोजच मी लिहून पोस्ट टाकत होतो. प्राचार्य वसंत वाघ सर, श्रीराम रानडे सर, वाळुंज सर, राजगुरू सर, बण्डा जोशी, सुनीताराजे पवार, इत्यादींनी आग्रहाने ‘पुस्तक करा’ असा सल्ला, मला वेळोवेळी दिला.
कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्येच माझ्या सहव्यवसायी दिपक नावाच्या दिलदार मित्राने ‘पुस्तक’ करण्यासाठी पुढाकार घेतला. मी माझे सर्व लेख त्याच्या स्वाधीन केले. त्यावर आवश्यक ते लेखन संस्कार करुन पुस्तक २२ मार्चच्या पूर्व संध्येला प्रकाशित करण्याचा त्याने चंग बांधला.
‘साठवणींची वाकळ’ या नावाने पुस्तक तयार झालं. खेडेगावी वाकळ अंगावर घेतल्यावर जो आनंद मिळतो, तसा या प्रत्येक रंगेबेरंगी आठवणींच्या तुकड्यांनी तयार झालेली वाकळ मला गेल्या साठ वर्षांतील अनेक प्रसंगांची साक्ष देते.
म.सा.प. चं सभागृह बुक केलं. आतापर्यंत ज्यांच्यावर लिहिलं, त्या सर्व मित्रांना, मान्यवरांना या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आवर्जून बोलावलं.
प्रकाशनाचा दिवस उजाडला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे प्राचार्य वसंत वाघ सर, पुस्तकाला प्रस्तावना लिहिणारे माधव राजगुरू सर, अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार मल्हार अरणकल्ले सर, सन्माननीय उपस्थिती म्हणून संस्कृती प्रकाशनच्या सुनीताराजे पवार, पुस्तकाला मूर्तस्वरूप देणारे दिपक काठाळे स्थानापन्न झाले होते. सूत्रसंचालन संतोष चोरडिया करीत होते. मी व्यासपीठावर न बसता समोरच्या पहिल्या रांगेत बसलो होतो.
सहाच्या सुमारास कार्यक्रम सुरु झाला. रसिकांनी हाॅल भरुन गेला. ज्यांच्यावर मी व्यक्तीचित्रं लिहिली होती, ते सर्व आले होते. किसन पवार, श्रीराम रानडे, अनिल उपळेकर, वाळुंज सर, चंद्रशेखर महामुनी, विजय फळणीकर, मनोहर कोलते, प्रकाश कान्हेरे, सूर्यकांत पाठक, बण्डा जोशी, दिलीप हल्याळ, सुबोध गुरूजी, प्रोफेसर येवलेकर, बबन पोतदार सर, सुरेश पाटोळे, विश्वेश देसाई, उल्हास वेदपाठक, राजन कुलकर्णी, कुमार गोखले, तात्या ऐतवडेकर, रूबीना मुलाणी, सुमेधा आगाशे, सीमा शिंदे, आदींच्या उपस्थितीने सभागृह भरुन गेले होते. मी सहज वरती गॅलरीत नजर टाकली तर मला आश्चर्याचा धक्का बसला. माझे आता या जगात नसलेले मित्रगण वरती बसलेले होते. त्यात राजीव सायगावकर, वसंत पंडित, प्रकाश इनामदार, अण्णा कडकोळ, राजा गोसावी, शरद तळवलकर, बाबुलाल शेठजी, विवेक कुदळे, अरविंद सामंत, गजाकाका सरपोतदार, बाळासाहेब सरपोतदार, अण्णा देऊळगावकर, फत्तेलाल बंधू, दत्ता गोर्ले, श्रीराम बडे, वसंत आचार्य, केशव कुलकर्णी, अनिल पटवर्धन, गोदूताई, बोकील आजी, बारामतीचा रामभाऊ, तात्या बिचकर, इत्यादींनी गॅलरी भरुन गेली होती.
फोटोग्राफी सचिन नाईक करीत होता. कार्यक्रम सुरू झाला. प्रास्ताविक दिपक काठाळे यांनी केलं. एका दिपकनं, चित्रकारातील लेखकाला प्रकाशात आणलं. समाजात सहव्यावसायिकाला स्पर्धक म्हणून बघितले जाते, मात्र या जगावेगळ्या मित्रानं मला लिहायला ऊर्जा दिली. कोरोनाच्या संकटात आधार दिला. पुस्तक निर्मितीची पूर्ण जबाबदारी घेऊन मला आजन्म ऋणानुबंधात ठेवलं.
राजगुरू सरांनी पुस्तकाबद्दल त्यांचं मनोगत व्यक्त केलं. माझा प्रत्येक लेख लिहून पूर्ण झाल्यावर मी सरांना पाठवत होतो. त्याच्यावर प्रतिक्रिया मिळाली नाही तरी तो वाचल्याचं पाहून मला समाधान मिळत होतं. लेखनात मी तीन गुरूंना महत्त्व देत आलो. शुद्ध व अचूक लिहिण्यासाठी राजगुरू सर, आटोपशीर, मुद्देसूद लिहिण्यासाठी बण्डा जोशी सर व अचाट स्मरणशक्तीचे आदर्श असलेले वाळुंज सर.
राजगुरू सरांनंतर सुनीताराजे पवार यांना संतोषने आमंत्रित केले. माई बोलू लागल्या. मी संस्कृती प्रकाशनचे काम करीत असताना लिहिलेले लेख त्यांनी वाचलेले होते. माझ्या लेखनाला त्यांनी नेहमीच ‘लेखणी बहरते आहे’ म्हणून प्रोत्साहन दिले. एका दिवाळीला शुभेच्छा म्हणून मी केलेली त्यांच्यावरील कविता त्यांनी वाचून दाखवली व चित्रकार हा संवेदनशील कवी देखील असू शकतो, हे पटवून दिले.
संतोषने पुस्तक प्रकाशन करण्यासाठी सर्व मान्यवरांना विनंती केली. प्रमुख पाहुणे प्राचार्य वसंत वाघ सरांनी पुस्तकाचे प्रकाशन केले. सर्वांनी हातात पुस्तक धरुन फोटोसाठी पोज दिली. सभागृहात टाळ्यांचा गजर झाला.
वाघ सर बोलू लागले. सर सांगत होते, मी निवृत्त झाल्यावर देखील, सुरेशसारख्या विद्यार्थ्यात रमलेलो आहे. आम्ही वारंवार भेटतो, गप्पा मारतो. डेक्कनवरील गुडलक हे आमचं आवडतं भेटण्याचं ठिकाण आहे. मला नवीन विषय सुचले की, मी फोन करुन सुरेशला सांगतो. काही दिवसांतच तो लेख मला व्हाॅटसअपवर दिसतो. या पुस्तकाने त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला झालेला आहे. काठाळे सरांसारखे मित्रं हे सुरेशचं ‘खरं वैभव’ आहेत.
अध्यक्षीय भाषणाआधी वाचकांना जी व्यक्तीचित्रं वाचून त्यांना पाहण्याची उत्सुकता होती त्यांना स्टेजवर बोलावून गुलाबाचे फूल व पुस्तकाची प्रत भेट दिली. त्यामध्ये ‘एक दिन का सुलतान’ नरेंद्र लिमण, ‘इडली वडा आणि अनिल’चा अनिल शानबाग, ‘ग्राफिना’चे तात्या ऐतवडेकर, ‘चिमणी’ सुमेधा आगाशे, ‘पक्या’ संजय डोळे, ‘अजब रसायन’ किसन पवार, ‘एव्हरग्रीन’ चंद्रशेखर महामुनी, ‘दीपस्तंभ’ आदरणीय म. द. वारे सर प्रामुख्याने होते.
मल्हार अरणकल्ले सर बोलायला उभे राहिले. अर्धा तास सर लेखन विषयावर बोलत होते. त्यामध्ये सरांनी, मी व कोलते सर त्यांना भेटत असू याचा उल्लेख केला. सर माझे सर्व लेख वाचत होते हे मला त्यांनी आवर्जून सांगितले. प्रतिक्रिया दिली नसली तरी त्या लेखांची नोंद त्यांनी ठेवलेली होती.
संतोषने आभार प्रदर्शनासाठी कोलते सरांना विनंती केली. सरांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले व एका ‘मनोहर’ कार्यक्रमाची सांगता झाल्याचे जाहीर केले.
चहापानाची व्यवस्था केली होती. उपस्थितांनी एकमेकांच्या भेटी घेतल्या. ग्रुप फोटो झाले. काही प्रेसचे प्रतिनिधी आले होते. माझा आनंद गगनात मावत नव्हता. मला कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते. कारण माझं पुस्तकाचं स्वप्न सत्यात अवतरलं होतं.
‘अहो, आज तुमचा वाढदिवस, तरीदेखील तुम्ही अजून झोपलाय.’ सौभाग्यवती मला उठवत होती आणि मी प्रकाशनाच्या गर्दीत स्वतःला हरवून गेलो होतो.
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२२-३-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..