नवीन लेखन...

संयमाची परीक्षा

जुळ्यांना वाढवताना आपल्या संयमाची परीक्षा होते, असं जे मी म्हणते त्याला काही संदर्भ या लेखातून देते.

एक तर जे सहज लक्षात येतं ते म्हणजे, जरी वर्षभराच्या अंतरातली दोन मुलं घरात असली, तरी त्यांची समज थोडीतरी वेगळी असते. म्हणजे दोघांच्या समोर खाऊ ठेवून आपण खायला शिकवत असू, तर या उदाहरणात दुसरं मूल किमान सहा महिन्यांचं असेल आणि पहिलं दीड वर्षाचं. त्यामुळे याही दोघांकडे एकाचवेळी लक्ष पुरवणं अवघड असतंच, पण किमान पहिल्याला बोललेलं कळतं, सूचना समजतात, इकडे या बाळाचा घास नीट गेलाय ना, ते बघेपर्यंत दुसरं कलंडलेलं असण्याची शक्यता नसते! या प्रकारे दिवसभरातल्या प्रत्येक घडामोडींची दखल दोन्ही डोळे, दोन्ही कान, दोन्ही हात अन् पाय सतर्क ठेवून घ्यावी लागते..

ज्या पालकांना सुजाण पालकत्व अनुभवायचं असतं, आपापले अनुभव, अभ्यास, वैचारिक धाटणी, यांनुसार मुलांना घडवायची इच्छा असते, त्यांना हे विशेषत्वाने आव्हानात्मक जातं. फक्त ‘मुलांना खाऊ-पिऊ घालणे, झोपवणे आणि generally दैनंदिन आवरणे, त्यांचा सांभाळ करणे, हे कुणीतरी करायचं.. पटापट आवरून टाकावं, आणि मोकळं व्हावं, झालं..’ या व्यतिरिक्त अधिक ज्यांना रस असतो त्यांना त्यासाठी तेवढी ऊर्जा पणाला लावावी लागते. उदा. समोर टीव्ही किंवा youtube लावून ‘एकदाचं बाळाला भरवणे’ हे करायचं नसेल तर आपल्याला (दररोज) मेहनत करावी लागते!

काही टिपा देते. विडिओज् बघताना मुलं का तल्लीन होतात, तर तिथे तशा प्रकारे त्यांना गुंतवून ठेवलं जातं, मुलांच्या वाढत्या बुद्धीला खाद्य पुरवलं जातं आणि खास आपल्याशी कुणी संवाद साधतोय, हे ‘भासवलं’ जातं. मग आपण तेच करायचं! आणि आपल्याला आभासी जागाची गरजही नाहीये. आपण आपलं खरं खरं नातं, घरातली इतर माणसं, नाती, झाडं, प्राणी, भांडी, कपडे, खेळणी, अशा य वस्तू दाखवून त्यांच्याशी संवाद साधू शकतो. म्हणजे आपण एकटंच बडबड करत राहायची नाही हं! सावकाशपणे एकेक शब्द, वाक्य उच्चारत त्याच्या हातात वस्तू देत, त्याचं वर्णन करायचं. त्यांचा मनोरा करत, खेळत, वस्तूंना स्पर्श करू देत, त्याबद्दलची त्यांची प्रतिक्रिया पाहायची, समजून घ्यायची, त्यांना बौद्धिक आव्हान वाटेल असं द्यायचं. एकावेळेस एकच हं पण! आपण जेवढ्या जास्त गोष्टी एकावेळेस दाखवू, तेवढं जास्त अस्थीर ते पुढे होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि हो, हे सगळं दाखवायला घरभर, अंगणभर फिरवत राहायचं नाही. जेवण ही एका जागी बसूनच करायची गोष्ट आहे, हे याच वयात शिकवायचं.

यावर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की, तुमच्या मुली जेवत असतील एका जागी बसून, आमची जेवत नाहीत! त्यासाठी दुसरी टीप अशी की बाळाला जेवायला आवडत नसेल तर त्याचं ९९% कारण म्हणजे त्याला भूक नाहीये! तुम्हाला धष्टपुष्ट बाळ हवंय, तुमच्या वेळेत त्याचं जेवण बसवायचंय म्हणून तुम्ही त्याच्यावर भडिमार करताय! पण इथे खाल्लेलंच अजून नीट पचलं नसेल, आणि/ किंवा पोट नीट साफ झालेलं नसेल तर त्याला जेवायची इच्छा होणारच नाही! सारखं उचलून फिरवल्याने किंवा बसून झोपून खेळल्याने शारीरिक हालचाल तर कमी होत नाहीये ना, हे पाहिलं पाहिजे. त्याचं शरीर आणि मेंदू दोन्हीला खाद्य पुरवत राहिलं पाहिले, आणि ते प्रोसेस होतंय ना, याकडेही लक्ष पुरवलं पाहिजे. हे असं समजून उमजून करत राहायचं म्हणजे जास्त शक्ती खर्च होणारंच! त्यातून जर का जुळ्यांमधल्या दोघांच्या प्रकृती/ आवडी भिन्न असतील तर तर पालकांची शर्थच आहे! उदा. एकाला गोड नको दुसऱ्याला तिखट सोसत नाही, एकीला एका जागी बसून खायचंय दुसरीला स्थिर बसवत नाही, एकीला आंघोळ आवडत नाही, दुसरी पाण्यातून उठत नाही, हे असं असताना दोन्ही मुलांना विरुद्ध गोष्टींमधली मजा त्यांच्या कलेनी लक्षात आणून द्यावी. अधूनमधून त्यांच्या मर्जीविरुद्ध केलेले बदल फारसे त्रासदायक नाहीयेत याची कल्पना देत राहावं. याने त्यांच्याच जाणिवांच्या कक्षा, आणि क्षमता वाढविण्यास मदत होते.

असंच दुसरं उदाहरण सांगते. दोन्ही मुलांना एकत्रच जेवायला देणे, स्वतंत्रपणे किंवा एकाचवेळी, एकत्र झोपवणे, यातले मतभेद एका जागी. आणि आपल्या बाळाला असं वाढताना, मोठं होताना पाहाणं, त्याच्या एकेक कला-गुणांचं संवर्धन होताना अनुभवणं, हे आपल्याला ज्या एकतानतेने करायचं असतं ना, ते जमत नाही जुळी असताना! आपलं लक्ष, प्रेम, सामुग्री, सगळीच कायम विभागलेली असते दोघांमधे! अगदी सुरुवातीपासून सांगते. एका बाळाला दूध पाजायला घेतलेलं असताना, जर दुसरं बाळ झोपलेलं असेल तरच कुशीतल्या बाळामधे पूर्ण जीव ओतता येतो. नाहीतर शेजारी पहुडलेलं बाळ आपली वाट पाहातंय, या विचाराने मन अपुरं, विचलीत राहातं. दोघींचीही शाळेत जायची, किंवा आईपासून दूर राहायची समजा पहिली खेप असली, तरी जी रडत नाहीये, दमानं घेताना दिसतेय, तिच्याकडे साहजिकच कमी लक्ष दिलं जातं. एकीची एखादी गोष्ट अगदी उत्कृष्ट झाली असेल, आणि दुसरीला ती तेवढी छान येत नसेल, तर कधी कधी हिचं पुरेसं कौतुक केलं जात नाही.. दोघींना रात्री झोपण्यापूर्वी पाय दाबून द्यायला हवे असतील, आणि मीही दमलेली असेन तर माझ्या स्टॅमिनाप्रमाणे वेळ दोघींना अर्धाच मिळतो! .. आणि हे खटकत राहातंच.. आपण कितीही देण्याचा प्रयत्न केला तरी ते दोघींत अर्ध अर्धंच विभागलं जाणार आहे, हे दुखत राहातं.. आपण पुरे पडत नाहीयोत, आणि ही मुलं पुरवून घेतायत याची कौतुक, कृतार्थता वजा बोचणी राहातेच.. कायम..

— प्रज्ञा वझे घारपुरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..