नवीन लेखन...

दवबिंदू

निखळता जपणारा घटक

दवबिंदूचं मला नेहमी कौतुक वाटत आलेलं आहे. आपल्या लहानशा अस्तित्वाच्या काळात तो किती डौलात चमकत असतो ! दररोज एक नवा बिंदू चमकताना दिसला कि किती प्रसन्न वाटतं. आपणही असेच असतो तर? दवबिंदू आणि लहान मुलं ही मला एकसारखी वाटतात नेहमी.

  मोठं होणं म्हणजे नेमकं काय? समजूतदार होणं ? समजूतदार झालो असं म्हटलं तर आपण आपल्या आणि सर्वांच्या आवडीचे झालो असतो नाही का? पण होतं नेमकं उलटं ..मोठं झाल्यावर आपण स्वतःला आणि इतरांना आवडेनासे होतो ..लहान असताना अगदी ‘अले अले’ करत गोंजारणारी माणसं ढिगाने असतात. पण मोठे झालो की ,म्हणजेच समजूतदार झालो की असं कुणीही गोंजारत नाही आपल्याला..

मोठ्या होण्यातला समजूतदारपणा हाच असला पाहिजे की आधी आपण स्वतःला आवडतोय का? लहान मूल स्वतः स्वतःचा आनंद घेत असतं ..म्हणूनच ते सगळ्यांनाच आवडतं ..त्याला काय आणि किती कळत असेल ? हा आपला बाप, ही आई , हा अमका हा ढमका …पण सगळे अगदी पायघड्या घालायला तयार असतात त्याच्यासाठी..याचं खरं कारण , माफ करा थोडं पठडी सोडून लिहितेय, पण ते मूल कुणाला ‘घंटा’ विचारत नसतं ..मला झोप आली मी झोपणार, मला वाटेल तेव्हा जेव्हा, खेळणार. वाटेल तेव्हा आणि वाटेल ते करणार.. अर्थात यातल्या सगळ्या गोष्टी आपण मोठेपणी नाही करू शकत, सभ्यतेच्या मर्यादा असल्यामुळे.. मात्र मर्म हेच की मी माझ्या आनंदात आहे. तुम्ही कोण, काय विचार करताय याच्याशी मला काहिही घेणं देणं नाही. थोडक्यात ते जगाकडे पाठ फिरवतं म्हणूनच जग त्याच्या मागे येतं .

मोठं होताना आपण आपल्यालाच आधी आवडेनासे होतो.. स्वतःकडून आणि इतरांकडून असलेल्या अपेक्षांचे डोंगर तयार करतो..आणि त्याच्या खाली रुतायला लागलं कि मग वाटतं कुणीतरी बाहेर काढलं पाहिजे यातून आपल्याला.

मला तर वाटतं शाळेत जायचं खरं वय हे १८ च्या पुढे हवं होतं नाही.. कारण आपण so called मोठे झालो की काहितरी बिनसतं …लहान मूल सगळं आपापलं शिकत असतं ..आपल्याला उगाच वाटत राहतं कि मी त्याला शिकवलंय..पण असतं उलटंच ..त्याच्या कक्षा इतक्या रुंद असतात लहानपणी की शिकण्याच्या पलीकडे जाऊन केवळ जाणिवांच्या आधारे ते मूल मोठं होतं ..आणि आपण मोठं झालं की इथेच माशी शिंकते …जाणीवा खड्ड्यात जातात आणि मग त्यावर मातीचा थर लावत लावत ..आपण बी पेरतो आणि अपेक्षा करतो वटवृक्ष बहरायची.

त्यामुळे खऱ्या शिक्षणाची गरज असते ती या so called मोठ्या वयात..पण तशी सोय नाही..मग प्रश्न असा की करायचं काय ? लहान तर होता यायचं नाही पुन्हा. आणि मोठ्या वयातल्या गोष्टी शिकवायला शाळाही नाहीत. हो..पण गुरू मात्र आहे…आपल्या आसपास असणाऱ्या लहान मुलांचं नुसतं निरीक्षण केलं तरी ती आपली गुरु होऊ शकतात..स्वतः स्वतःवर प्रेम कसं करायचं हे लहान मुलं नक्की शिकवतात. आणि त्याकरता ती काहीही वेगळं करत नसतात बरं का? आहे तो क्षण पूर्ण जगतात ..आत्ता मला जे वाटतंय तेवढं आणि तेवढंच करणं . स्वतःकडे रोज नव्याने पाहत असतात. रोजचा दिवस हा नवीन दिवस म्हणून रोज काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करतात.

हे सगळं करता येणं म्हणजेच तर समजूतदारपणे वागणं नाही का? दवबिंदूचं अस्तित्व क्षणिक असतं पण ते सर्वांच्या आवडीचा विषय ठरतं . आपलं मोठेपणही असंच दवबिंदू सारखं असलं पाहिजे. दवबिंदू इतकं साधं पण लक्ख ..आपल्या स्वतःसाठी.

करून बघायला काय हरकत आहे?

— गौरी सचिन पावगी

Image: google

Avatar
About गौरी सचिन पावगी 26 Articles
व्यवसायाने भरतनाट्यम नृत्यांगना आणि नृत्य शिक्षिका आहे. मराठी या माझ्या मातृभाषेचा मला अभिमान आहे .दैनंदिन जीवनातले अनुभव गोळा करून त्यावर लेखन करणं हे विशेष आवडीचं .ललित लेखन हा सुद्धा आवडीचा विषय . वेगवेगळ्या धाटणीचं लेखन करायच्या प्रयत्नात आहे. वाचकांनी प्रतिक्रिया आवर्जून comments किंवा ई-मेल द्वारे कळवाव्या ही नम्र विनंती. email id: gauripawgi@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..