नवीन लेखन...

सांगायचं राहूनच गेलं

 
बरेचदा मला काही गोष्टींचं खूप आश्चर्य वाटतं. आज आपण महागाई झालीय, महागाई झालीय म्हणून सतत ओरडत असतो. आपल्या घरात दोन दोन व्यक्ती कमावणाऱ्या आणि लहानसं कुटुंब असूनही आपण सदैव रडत किरकिरत असतो. आपल्या सगळ्या छानछौकी सुरू ठेवून घरातल्या ज्येष्ठांच्या एखाद्या लहानशा अत्यावश्यक खर्चाला मात्र काही ना काही कारणाने बगल देत असतो. आपल्या गरजांना आपण इतकं मोठं करून ठेवलंय की आवश्यक आणि गरजेचं यामधील दरी दिवसेंदिवस अगदी बारीक होत चाललीय. साऱ्या अनावश्यक गोष्टी आज आपल्याला गरजेच्या आणि आवश्यक वाटू लागल्यायत , इतकंच नव्हे तर या गरजांच्या वाढत्या भारापुढे आपण अक्षरशः गुढगे टेकून शरण येत चाललो आहोत.
मग मला व्यक्तिशः प्रश्न पडतो ,की माझ्या वडिलांनी गावातून या शहरात येऊन आपलं शिक्षण पूर्ण केलं , बरं ते करत असताना जे पडेल ते काम केलं , जसं जमेल तसं आणि मिळेल तिथे रहाणं सोसलं , रिक्षा , टक्सी परवडणं शक्यच नव्हतं. बहुधा पायी , अगदीच नाही तर ट्रेन किंवा बस यांनीच प्रवास केला. स्वतःच्या हिमतीवर या शहरात नोकरी मिळवली. आपल्या आई वडिलांना आधार देतानाच या शहरात स्वतःचा संसार उभा केला.
आर्थिक चणचण आम्हा मुलांना जाणवणार नाही याची सदैव काळजी घेतली. आमच्यासमोर सदैव शक्य होतील तितके आनंदाचे क्षण ठेवले.
आमच्या लहानपणी प्रत्येक चांगल्या गोष्टींचा आणि वस्तूंचा आस्वाद आम्ही घेतला. प्रत्येक हंगामात बाजारात येणाऱ्या वस्तू तात्या आवर्जून घरी आणायचे.
विचार केल्यावर जाणवतं की या शहराने आम्हाला खूप काही दिलं. लहानपण समुद्र किनाऱ्याच्या जवळचं असलेल्या घरात गेलं. घरात आणि घरासमोर खेळायला जागाच नव्हती. परंतू चौपाटी पाच मिनिटांच्या अंतरावर होती. संध्याकाळी वाळूमध्ये खेळण्याची , ओल्या मातीचे डोंगर किल्ले बनवण्याची , अथांग समुद्राच्या लाटांमधून किनाऱ्याने चप्पल हातात घेऊन चालत राहण्याची आणि सूर्यास्त पाहण्याचा आनंद घेत वाळूत पडून राहण्याची मज्जा काही औरच होती. खिशात पैसे अजिबात नसायचे पण त्याचं कधी वैषम्य जाणवलं नाही. समुद्र किनाऱ्याजवळ एक सुंदर प्रशस्त ज्ञानेश्वर मंदिर होतं. रोज सायंकाळी तिथे मी कीर्तन असायचं. खेळून झाल्यावर माझी पावलं कीर्तनात येणारी गोष्ट ऐकायला नकळत तिकडे वळायची. याच शहराने मला शिक्षणाबरोबरच सर्वार्थाने सुसंस्कारित आणि एक सुजाण नागरिक म्हणून घडवणारी शाळा दिली. अगदी आजही कधी शाळेत जाण्याचा योग आला तर मला अक्षरशः गहिवरून येतं.
माझ्या वडिलांच्या संग्रही अनेक उत्तमोत्तम पुस्तकं होती. जवळजवळ हजारेक चरित्र, आत्मचरित्र, विविध साहित्य, अध्यात्म अशी मराठी , इंग्रजी , संस्कृत भाषेतील पुस्तकांनी भरलेलं कपाट होतं. त्यांना वाचनाची ,शास्त्रीय , सुगम संगीत श्रवणाची त्याचबरोबर खेळामध्ये क्रिकेटची मनापासून आवड होती. माझ्या वडिलांचा स्वभाव तसा अव्यवहारी आणि आई अर्थातच व्यवहारी होती. त्यामुळे आमच्या घराचा संसाररथ कधी अडखळला नाही की त्याने कधी भन्नाट वेगही घेतला नाही, परंतू सतत धीम्या गतीने चालत मात्र राहिला. माझ्या वडिलांच्या अव्यवहाराला चांगुलपणाचं , धर्मिकतेचं अणि कुटुंबवत्सलतेचं कोंदण होतं. आणि त्यामुळे अव्यवहाराने कधीही वाकडं वळण घेतलं नाही. कुठेही बाहेर जाताना आम्ही टॅक्सी , विमानाने किंवा पहिल्या वर्गाने प्रवास केला नाही किंवा कधी नाटक पाहायला गेल्यावर अगदी पहिल्या रांगेतून पाहिली नाहीत. परंतू हे सगळं आम्ही भोगलं हे महत्त्वाचं. याच शहरात भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आनंद मी वडिलांबरोबर घेतला.
या सगळ्यामध्ये माझ्या वडिलांनी त्यांच्या मानसिक रुग्ण असलेल्या सख्ख्या भावाला आयुष्यभर सांभाळलं. तो बरा व्हावा म्हणून अक्षरशः सगळे उपाय केले परंतू गुण मात्र जराही आला नाही. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे वडिलांच्या या प्रयत्नांना माझ्या आईने मनापासून साथ दिली.
१९८८ साली माझी आई गेली आणि वडील खूप एकटे झाले. माझ्या आई वडिलांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं हे मला वेळोवेळी जाणवलं आहे. आपल्या कुटुंबावर , आप्तांवर आणि त्यांच्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येकावर त्यांनी केलेल्या निरपेक्ष प्रेमाचा मी साक्षीदार आहे.
प्रत्येकाने एकमेकांवर मनापासून प्रेम करावं , कुणीही कुणाशी भांडू नये , कुणाचाही द्वेष करू नये , साऱ्यांनी आनंदात राहावं हे माझ्या वडिलांचं जीवनसुत्र होतं.
२०१० साली वडील गेले. आई वडिलांच्या सान्नीध्यात लहानपणी जगलेल्या या आठवणी कधी कधी जाग्या होतात आणि एक गत सुखाचा फेरा करून आणतात.
या घराने जन्मदात्यानी मला एक समृद्ध जीवन दिलं , माणुसकी शिकवली , आयुष्याकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी दिली. आणि या सगळ्यांपेक्षाही “वाचाल तर वाचाल” हा अत्यंत महत्त्वाचा कानमंत्र दिला. वाचनसंस्कृतीने आम्हाला खूप प्रगल्भ करण्याचा मनापासून प्रयत्न केला. आज मी कागदावर जे काही चार शब्द खरडतोय , जे काही लिहिण्याचा मनापासून प्रयत्न करतोय आणि या सगळ्यात जो काही किंचितसा यशस्वी होतोय त्याचं संपूर्ण श्रेय जातं माझ्या वडिलांना. ते हयात असताना मी जे काही बाळबोध लिहून त्यांना दाखवत असे. जे वाचून त्यांना खूप आनंद होत असे आणि त्याचं मुख्य कारण होतं , कसं का असेना पण मी लिहिण्याचा प्रयत्न करतोय. माझी थोरली बहिण सिद्धहस्त होती पण तिने प्रासंगिक लेखनच केलं. मधल्या भावाचा मराठी लेखनाकडे विशेष ओढा नव्हता. माझे वडील आध्यात्मिक मासिकांमधून इंग्रजी मराठीत लेख लिहित असत. त्यामुळे मी सोपं , बाळबोध का होईना पण लेखनाकडे वळलो याचा त्यांना मनापासून आनंद व्हायचा.
वाईट एव्हढच वाटतं , की आज जेव्हा माझ्या लिखाणाला जरासं बाळसं , बंदिस्त स्वरूप येऊ लागलं ते सगळं त्यांच्या हयातीत त्यांना दाखवायचं , सांगायचं राहूनच गेलं. त्यांना मनाच्या अगदी खोल तळापासून Thank you म्हणायचं राहून गेलं. काव्य , गद्य लिखाणातून मला जे पुरस्कार प्राप्त झाले ते दाखवून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहायचं राहून गेलं. एकूण काय ? तर माझ्या लिखाणाने ज्यांना सगळ्यात जास्त आणि मनोमन आनंद झाला असता त्यांनाच ” हे सगळं तुमच्यामुळे” हे सांगायचं राहून गेलं.
आज जेव्हा मी एखाद्या क्षेत्रात समर्पित वृत्तीने , निष्ठेने , प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीवर शब्दचित्र लिहीतो , वाचक त्याला भरभरून प्रतिसाद देतात. खरं सांगायचं तर माझ्या लेखनापेक्षा तो प्रतिसाद त्या व्यक्तीच्या कार्याला असतो. परंतु ती व्यक्ती जेव्हा भारावून म्हणते , “हे होत असलेलं माझं कौतुक , मिळत असलेल्या प्रतिक्रिया तुझ्या शब्दांमुळे आणि लेखनामुळे आहे. हे क्रेडिट तुझं आहे.”. तेव्हा मनात येतं खरंच वडिलांना , हे संपूर्ण संपूर्ण क्रेडिट तुमचं आहे ,
“हे सांगायचं राहूनच गेलं”
प्रासादिक म्हणे
— प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..