नवीन लेखन...

सांगावसं वाटलं म्हणून , त्या भाजीविक्रेत्या

आमच्या घरापासून साधारण दहा मिनिटांच्या अंतरावर आमचा मुख्य भाजीबाजार. रेल्वे स्टेशन लगत असणारा हा घाऊक आणि किरकोळ भाजी बाजार , सकाळी अगदी गजबजून गेलेला असायचा. सकाळी ताजी भाजी खरेदी करायला बरीच लोकं हजर असायचे. हे सगळं मी भूतकाळात बोलतोय कारण कोरोना काळात हा भाजीबाजार बंद झाला आणि जवळच असलेल्या एका लहानशा बगीचा वजा मोकळ्या जागेत बंदोबस्तात भरू लागला. रस्त्यावर वहानांच्या रहदारीचे बारा वाजवत कुठेही आपली टोपली घेऊन बसणारे भाजीवाले, फळवाले बसणं बंद झालं. यापैकी काहीही हवं असलं तरी त्या नव्या बाजारात जावं लागू लागलं. पुढे हळुहळु सगळं शिथिल झालं आणि बाजारही त्या जागेवरून उठून, पुन्हा आपल्या जुन्या जागी विराजमान झाला. रस्त्यावर जागोजागी पूर्वीसारखे विक्रेते पुन्हा दिसू लागले. आता सध्या तर कोरोना पूर्णपणे नष्ट झालाय असं चित्र बाहेर पडल्यावर नजरेला पडतं.
आज मला जे सांगायचंय ते काही स्त्री भाजीविक्रेत्यांबद्दल. वर उल्लेखलेल्या  त्याच ठिकाणी काही भाजीविक्रेत्या रांगेत भाजी विकायला बसतात. बहुधा या डहाणू , पालघर, वसई इथून येत असाव्यात.मुख्य बाजारात जाण्याआधी डावीकडे जाणाऱ्या एका रस्त्याने थोडं पुढे आलं की तिथे तीन रस्ते एका ठिकाणी मिळतात . अगदी सकाळी साडेआठ नऊ पासून या जागी त्यांची डेरेदाखल व्हायला सूरवात होते. प्रत्येकीचं अढळपद ठरलेलं असतं. ट्रेनमधून भाजीच्या टोपल्या, बोचकी उतरवून पुढे ऑटोने आपल्या नित्याच्या जागी त्या दाखल होतात आणि आपला भाजीबाजार मांडायला सूरवात करतात. यामध्ये फळभाज्या, पालेभाज्यापासून चिकू , पेरू, जाम (रानफळ) पिवळ्या सालीची केळी, झेंडूची, जास्वंदीची फुलं अशा बऱ्याच गोष्टी असतात. आपली भाजी मांडून झाली की सावलीसाठी मोठी थोरली छत्री लावून त्या स्थानापन्न होतात. एव्हाना ग्राहकांचीही ये जा सुरू झालेली असते. बरेच ग्राहक सकाळी गर्दी कमी असते म्हणून लवकरच हजर झालेले असतात. यामध्ये स्त्रियांचं प्रमाण अधिक असतं. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, आठवड्याच्या भाज्या मोठ्या पिशव्यासहित घ्यायला आलेले नवरा बायको, याचबरोबर घरून बायकोने दिलेली भाज्यांची यादी हातात घेऊन आलेले आज्ञाधारक नवरे, भाज्यांशी फक्त खाण्यापुरता संबंध असलेले, आणि त्यामुळे मूळ भाजी कशी असते हेच माहित नसलेले पुरुष यादी वाचत लाल भोपळ्याला सुरण , शिराळयाना पडवळ म्हणत अखेर तिच्याकडेच यादी सोपवून भाजी खरेदी करताना दिसतात. प्रत्येक ग्राहकाची भाजीविक्रेती ठरलेली असते. त्यामुळे दोघंही एकमेकांना ओळखत असतात. एखाद दिवशी पुरुष एकटाच आला तर ती विचारते,
“आज वैनी नाय आल्या ?”
किंवा वहिनी आल्या तर विचारते ,
“आज भाऊंना नाय आणलं ?”
मग ग्राहक सुद्धा भाजी विक्रेतीच्या नावाने तिच्याशी संवाद साधत विचारतात,
“काल आली नव्हतीस वाटतं ? मला मटार हवा होता. तू नसल्यामुळे तुझ्या जोडीदारणीकडून घेतला.”
त्यावर ती म्हणणार ,
“हो भाऊ , काल माझ्या अमुक कोणाचं लग्न होतं.”
किंवा
“कोणाच्या हलदिला गेले होते.”
किंवा
“नवऱ्याला जरा बरं नव्हतं.”
कुणी एखादी नेहमीची ग्राहक स्त्री तिच्या भाजीवालीची जागा रिकामी पाहून बाजूच्या भाजीवलीला विचारणार,
“काय ग कुसूम, आज ही आली नाही ती ?”
सगळ्या साधारण एकाच ठिकाणाहून आलेल्या , त्यामुळे एकमेकींच्या बातम्या जाणून असतात.
मग ती सांगणार,
“ताई आज ती देवीला गेलीय. काय हवं होतं तुम्हाला ?”
म्हणजे सगळा आपुलकीचा मामला असतो. ग्राहकांशी मोजकीच थट्टा मस्करी करत भाजिविक्री सुरू असते त्यांची. असाच एकदा मी माझ्या नेहमीच्या भाजिविक्रेतिकडून खरेदी करत होतो. तिच्या बाजूला बसलेल्या दुसरीच्या समोर दोन तरुण मुलं भाजी घ्यायला आली. त्यातल्या एकाला पाहून तिला आपल्या लेकाची आठवण झाली, आणि तिला इतका आनंद झाला की ती सारखी शेजारणीला कौतुकाने सांगू लागली,
“बघ ग, अगदी माझ्या पोरासारखा दिसतो ना ?”
हे तिने त्यालाही सांगितलं . भाजी विक्री करताना समोर आलेल्या ग्राहकांमध्ये त्यांना आपला लेक ,पोरगी, बाप, भाऊ, वहिनी, माय दिसत असते.
मी जीच्याकडून भाजी घेतो ती यामध्ये सर्वात जास्त दांड्या मारणारी आहे. मी येताना दिसलो की बाजूची म्हणते,
“भाऊ, आज नाय आलीय तुमची.”
नशीब बायको बरोबर नसते. नाहीतर नसती आफत.
मला नेहमी प्रश्न पडतो, की इतक्या सकाळी या भाजीसहित हजर होतात, म्हणजे घरचं, लेकरा मुलांचं आटपून घर कधी सोडत असतील ? बरं असही नाही की कशाही गबाळ्यासारख्या येतात. व्यवस्थित केसांचा आंबाडा , त्यावर घसघशीत वेणी माळलेली, टापटीपीने आलेल्या असतात. सकाळचा नाश्ता सोबत घेऊनच येतात सगळ्या , कारण मी कधी लवकर गेलो भाजी घ्यायला तर आपापले डबे उघडून एकमेकांत शेअर करत ,चपाती भाजीची न्याहारी सुरू असते त्यांची. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हास्य आणि तोंडात साखर असते. हिशोब तर तोंडावर असतो. पिशव्या भरभरून लोकं भाज्या खरेदी करतात. भरलेल्या पिशव्या ग्राहकांच्या हातात देण्याच्या आत त्यांचा हिशोब तयार असतो. अर्थात तसही कुणी फारसं हिशोब तपासत बसत नाही. तिच्या सांगण्याप्रमाणे पैसे हातावर टेकवतात . आणि त्या सुद्धा आपल्यावरच्या विश्वासाला तडा जाऊ देत नाहीत. मला वाटतं नीतिमत्ता आता फक्त या वर्गाकडेच उरलीय. तसे काही ग्राहक असतात , जे विचारतात,
“एव्हढे कसे झाले ? याचे किती ? त्याचे किती ? व्यवस्थित विचारून खात्री करून घेणारे. परंतु न वैतागता त्यांनाही व्यवस्थित हिशोब त्या समजवून सांगतात. अकरा वाजता जर गेलं तर बरीचशी भाजी संपलेली असते. मला वाटतं सगळा माल संपेपर्यंत दोनेक वाजत असतील त्यांना. संध्याकाळी मात्र ही पलटण दिसत नाही.
रंगीत साड्या नेसून, नीटनेटकेपणाने , आपल्या घरासाठी, प्रपंचासाठी , आपल्या लेकरांना असं रस्त्यावर बसून भाजी विकायला लागू नये, त्यांनी तरी चांगलं शिकावं या एकाच विचाराने अर्थार्जन करायला नित्यनेमाने इतक्या लांबून येऊन भाजी विक्री करणाऱ्या या कुणी कुसूम, विमल, कुंदा, मंदा नावाच्या स्त्री भाजी विक्रेत्या, खरंच त्यांच्या मेहनतीला एक शब्दसलाम .
म्हटलं तर विशेष असं काहीच नाही,
तरीही सांगावसं वाटलं म्हणून इतकंच.
प्रासादिक म्हणे,
— प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..