माजघर सोडलं तर हरचिरीच्या आमच्या मोठ्या घरात त्यादिवशी अस्वस्थ , निःशब्द गडबड सुरू होती . लहानग्या वयातल्या मला आणि माझ्या लहान बहिणीला शैलजाला काही कळत नव्हतं . एक भयाण मौन सर्वत्र पळत होतं. आणि सर्वांना पळवत होतं.
ओटीवरच्या लाकडी माच्यावर , ऊर्ध्व लागलेल्या स्थितीत असलेल्या अण्णाना ठेवलं होतं .अण्णा म्हणजे माझे वडील . त्यांच्या जवळ लांज्याचे डॉ . लिमये बसले होते . त्यांचा चेहरा बरंच काही सांगत होता . उशालगत आई बसली होती . अण्णांच्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या घड्या सारख्या बदलत असणाऱ्या आईच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं . काकुची धावपळ पाहवत नव्हती .स्वयंपाक घरात जाऊन रडणाऱ्या काकुला सावरावं तरी कसं हा अनेकांना प्रश्न पडला होता . मी अण्णांचा गरम हात हातात घेऊन भिरभिरत्या नजरेनं रडवेला होऊन सगळीकडे पाहत होतो .
आणि पौरोहित्य करणारे , अण्णांचे सगळे मित्र माजघरात महामृत्युंजय मंत्राचा जप करीत होते . धीर गंभीर तरीही मोठ्या आवाजातला त्र्यंबकम यजामहे चा घोष संपूर्ण घरभर पसरत होता . अनुष्ठान चालू होतं .
अण्णांना विषमज्वर झाला होता . डॉक्टरांच्या मते काही तासच हाताशी होते . नाडी हाताला लागत नव्हती आणि श्वास अनियमित झाला होता .
कुठल्यातरी एका क्षणी डॉक्टरांनी अण्णांचा हात सोडून दिला . आणि आईने हंबरडा फोडला . मी आणि शैला रडू लागलो . आणि तो आवाज ऐकून माजघरात महामृत्युंजय मंत्र म्हणणाऱ्या सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला . शंकरावर रुद्राभिषेक चालू होता . त्यातील तीर्थ घेऊन अण्णांचा जिवलग असणारा हरिभाऊ मोठ्यांदा मंत्र म्हणत बाहेर आला आणि अण्णांच्या मुखात ते तीर्थ घातले . महामृत्युंजय मंत्र चालूच होता .
डॉ .लिमयांच्या औषधांचा परिणाम म्हणा किंवा महामृत्युंजय मंत्राचा परिणाम म्हणा पण काहीतरी अतर्क्य घडत होतं .
– आणि काय झालं कुणास ठाऊक , मला अचानक जाणवलं . अण्णा क्षीण बोटांनी माझा हात घट्ट धरत आहेत . मी ते आईला दाखवलं . तिनं डॉक्टरांकडे पाहिलं आणि डॉक्टरांनी तपासायला सुरुवात केली . त्यांचा चेहरा उजळला .
आणि पुढच्याच क्षणी सगळे ओटीवर आले . प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते .
अण्णांचा ताप उतरला होता .
-अण्णांचा जणू पुनर्जन्मच झाला होता …
आज इतक्या वर्षांनी सगळं लख्ख आठवतंय .
आज अण्णांचा स्मृतिदिन .
२००२ मध्ये अर्धांगवायू आणि तो आघात झाल्याच्या पंधराव्या दिवशी हृदयविकाराच्या धक्यानं ते गेले .
आम्हा कुटुंबियांना सेवा करण्याची कसलीही संधी न देता .
चेहऱ्यावर वेदनेची कोणतीही पुसटशी खूण न ठेवता .
अण्णांचं व्यक्तिमत्व विलक्षण होतं .
सहा फुटापेक्षा जास्त उंची . मजबूत शरीरयष्टी . स्वच्छ धोतर .लांब हातांचा सदरा.अंगावर उपरणे.डोक्यावर काळी टोपी . खांद्याला पिशवी आणि हातात जाड काठी .
गरिबी पाचवीला पुजलेली . दोन भावांचा मृत्यू झाल्यावर लहान वयात अंगावर येऊन पडलेल्या कुटुंबाच्या जबाबदारीने खचून न जाता भिक्षुकी करून प्रपंच सावरताना त्यांनी दाखवलेलं धैर्य विलक्षण होतं.
सखाराम कृष्ण जोशी हे नाव व्यवहारापुरतं , प्रत्यक्षात बापुकाका जोशी हीच सर्वत्र ओळख . भिक्षुकी करताना आजच्या हिशोबात सांगायचं तर दहा पंधरा मैल चालायचं , घाटया, डोंगर चढायचे आणि मिळेल त्या रुपया दोन रुपये दक्षिणेवर समाधान मानून घरी परतायचं . यात आयुष्य सरलं. पण चेहऱ्यावरचा आनंद , स्वभावातला सरळपणा आणि वृत्तीतला प्रामाणिकपणा हरवला नाही शेवटपर्यंत .
अनेकांनी व्यवहारात फसवलं तरीही कुणाबद्दल आकस , सूड , द्वेष या भावना शिवल्याच नाहीत त्यांना . असहकार्य , अपमान , अनादर , अकिंचनावस्था यामुळे खचून न जाता परमेश्वर आणि पावसच्या स्वामी स्वरूपानंदांवरची श्रद्धा यामुळं परिस्थितीनं वाटेवर पेरलेल्या काट्यांना त्यांनी फुलं मानली .
त्यांचं एक आवडतं वाक्य होतं .
झोपाळ्यावरच्या आडव्या बारावर माझ्याकडून त्यांनी ते खडूनं लिहून घेतलं होतं .
दिधले दुःख पराने , उसने फेडू नयेची ,सोसावे ।
तसं ते सोसत राहायचे .
आई म्हणायची ,
” संत एकनाथ पैठणात गेले आणि वृत्तीनं जोशांच्या घराण्यात आले “
यावर अण्णा नेहमीप्रमाणे मान हलवून हसायचे आणि पडवीतला झोपाळा संथ लयीत झुलायचा .
पंचक्रोशीत होणाऱ्या सगळ्या उत्सवांना ते जायचे . पायपीट करून जायचे , रात्रीच परत यायचे आणि सकाळी उठून पुन्हा भिक्षुकीला जायचे .
थकवा माहीत नसायचा त्यांना .
हरचिरीच्या महाशिवरात्रीच्या उत्सवात अण्णांचा उत्साह दांडगा असायचा .
सकाळपासून रुद्राची आवर्तने , रात्री आरत्या , भोवत्या, कीर्तन यात ते अखंड रंगून जायचे . त्यांचा आवाज घरीदारी मृदू असायचा , पण रात्री आरती म्हणताना , भोवत्यांचे अभंग सांगताना , रिंगण करून नाचताना , त्यांचा आवाज पहाडी व्हायचा .
उत्सवातल्या समाराधनेच्या दिवशी आग्रह करकरून वाढताना तोच उत्साह असायचा . ते स्वतः कमी जेवायचे पण त्यांचा आग्रह म्हणजे अगदी शेंडी तुटेपर्यंत असायचा .
माझी काही संगीत नाटकं , खल्वायन संस्थेनं हरचिरीच्या उत्सवात सादर करावी असा त्यांचा आग्रह होता , तो संस्थेनं पूर्ण केला , त्यावेळी अण्णांचा उत्साह अवर्णनीय होता . सगळ्यांना चहा करून देणं , जेवण वाढणं आणि प्रत्येक रंगकर्मीची आपुलकीनं चौकशी करून प्रोत्साहित करणं यात ते रंगून , रमून जायचे . नाटकातल्या विनोदाला खळखळून दाद देणं , गाण्यात गुंग होणं आणि करुण प्रसंगाच्या वेळी, खांद्यावरच्या उपरण्यात , भरून आलेले डोळे मोकळे करणं हे त्यांचं रूप मी अनेकदा पाहिलंय .
माझं लेखन प्रसिद्ध झालं की वाचण्यासाठी आई आणि अण्णा यांच्यातली वादावादी ऐकण्यासारखी असे . ते दिवसा वाचायचे आणि रात्री मला , अण्णांना जाग येऊ नये म्हणून आई लाईट घालवून कंदिलाच्या प्रकाशात वाचत असायची . रोज पहाटे तीन वाजता मला ते जागं करायचे , चहा करून द्यायचे आणि मग सकाळपर्यंत पाणचुली जवळ बसून गप्पा मारत बसायचे . कधी वेगवेगळी स्तोत्रं , तर कधी अनुभव सांगत बसायचे .
स्वभावतली उदारता , हळवेपण , शहाळ्याच्या पाण्यासारखी वृत्ती , हिंदू संस्कृतीतील सगळे सण उत्सव साजरे करण्याची हौस , माणसं जोडण्याची जन्मजात आवड , जोडलेली नाती टिकवण्यासाठी जीवाचा आटापिटा , निर्व्याज हास्य , जीवन संघर्षाला संधी म्हणून पाहण्याची सवय आणि तरीही भावनेच्या ओलाव्याने आकंठ भरलेलं मन….
किती सांगावं अण्णांबद्दल ?
शब्दच कमी पडतील .
नातवंडांत रमणारे , त्यांच्यात मूल होऊन खेळणारे , मैत्री जपणारे , स्वतःचं दुःख लपवून सगळ्यांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी धडपडणारे अण्णा आज नाहीत .
आज त्यांचा स्मृतिदिन .
त्यांच्याबद्दल नंतर खूप लिहिणार आहे ,कारण इतकं वेगळं जीवन ते जगले होते , जे इतर कुणाला माहीत नाही .
ते गेले तेव्हा ८५ वर्षांचे होते .
पण इतक्या वर्षानी आजही पोरकेपणाच्या भावनेनं मन उदास होतं . आणि डोळे भरून येतात .
त्यांना आदरांजली वाहताना , अण्णांनी, स्वामी स्वरूपानंदांच्या अभंगातून केलेला संस्कार सांगतो आणि अल्पविराम घेतो!🙏
भुकेल्यासी अन्न । सत्पात्री ते दान ।
भावे दिल्याविण । राहू नये ।।
— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
९४२३८७५८०६
Leave a Reply