नवीन लेखन...

संधिप्रकाशातील सावल्या – ४ : तू भ्रमत आहासी वाया

आजचा माहौल काही वेगळाच होता .
गुलमोहराच्या झाडाखाली फुलांची पखरण होती .
वाऱ्याची झुळूक आल्यावर फुलं अजून खाली पडत होती . आणि तेवढीच फुलं झाडावर फुललेली होती .
पण का कुणास ठाऊक , झाडावरची आणि झाडाखालची सगळी फुलं एकेकटी वाटत होती .

आज ‘ तो ‘ एकटा नव्हता .
त्याच्याबरोबर अनेक होते .
मध्यमवयीन होते तर काही वृद्धावस्थेकडे झुकलेले होते .
तरुण होते आणि तरुणीसुद्धा होत्या .किंबहुना त्यांचीच संख्या जास्त होती .
जागा मिळेल तिथे सगळे बसले होते .

गेल्या काही दिवसातल्या संधिप्रकाशातल्या सावल्यांचा गोष्टी अनेकांच्या कानावर गेल्या होत्या .
त्यामुळं सगळे उत्सुकतेनं आले होते .
उत्सुकता नावालाच , प्रत्येकजण भलंमोठं प्रश्नचिन्ह घेऊन आला होता . पण सुरुवात कुठून करायची हे कुणाच्या लक्षात येत नव्हतं .

” सुरुवात मलाच करायला हवी .”
गुलमोहर स्वतःशी पुटपुटला .आणि त्याने अश्वत्थाकडे पाहिलं . त्यानं नजरेनं होकार भरला .
गुलमोहरानं एकदा सगळ्यांकडे पाहिलं .
सगळे त्याच्याकडेच पहात होते .

” आज मी गोष्ट सांगतो . एका गुहेची . खूप छान होती गुहा . त्या गुहेचं प्रवेशद्वार कमालीचं सुंदर होतं . पाहताक्षणी प्रेमात पडावं इतकं विलक्षण आणि आकर्षक . गुहेत नजर पोहोचेल तिथपर्यंत वेगवेगळ्या दिव्यांची आरास होती . गुहेत वर खाली सर्वत्र आरसे बसवलेले होते . त्यामुळे प्रतिबिंबांची दिवाळी मनाला मोहून टाकायची . गुहेच्या आतून खोलवरून कुठूनतरी संगीत पाझरत होतं . अवर्णनीय असा एक मादक सुगंध बाहेर झिरपत येत होता .चित्ताकर्षक रंगांमुळे , नशिल्या वातावरणामुळे ती गुहा म्हणजे भुलभुलैया झाली होती . गुहा कुणाची होती हे कुणालाच माहीत नव्हतं . पण आत जाण्यासाठी कायम गर्दी असायची . मोह पडावा असंच सगळं वातावरण असल्यानं गुहेत जाण्यासाठी झुंबड उडायची . पण त्या गुहेची एक वेगळी गंमत होती . त्या गुहेत जाणारांची पावलं दिसायची , पण त्या गुहेतून परत माघारी येणारी पावलं कधीच कुणाला दिसली नाहीत . एवढं सगळं चांगलं असून त्या गुहेला , लांडग्यांची गुहा असं का म्हटलं जायचं ते कधीच कुणाला कळलं नाही … बस ! संपली माझी गोष्ट . ”

” ही काय गोष्ट झाली ? हे आधुनिक पंचतंत्र झालं . पण यातलं तथ्य नाही कळलं .”
कुणीतरी म्हणालं .

गुलमोहर उदास हसला , म्हणाला ,
” कळायला हवं होतं . मी जेव्हा गुहेचं वर्णन करत होतो , तेव्हाच तुमच्या लक्षात यायला हवं होतं . तुम्ही एवढे , इतक्या संख्येनं आलात , याचा अर्थ तुमच्या मनात भयंकर चलबिचल चालू आहे , हे आम्ही सगळ्यांनी ओळखलं होतं . इथली तुमची संख्या म्हणजे समुद्रातल्या पाण्यातला एक थेंब इतकीच आहे . पण त्याहून मोठा समुद्र समाजात वावरतो आहे , तोंड लपवून . तुम्ही इथं यायचं धाडस केलंत , कुठेतरी व्यक्त व्हायचं म्हणून इथं आलात , पण अद्याप काहीच बोलला नाहीत . आणि बोलणारसुद्धा नाहीत तुम्ही . तुमच्यापैकी कुणाची तरी मुलगी , कुणाची तरी बहीण , कुणाचा तरी भाऊ , मुलगा , परिस्थितीनं गांजल्यामुळं कुणाची तरी बायको , कुणाचा तरी नवरा , मी सांगितलेल्या गुहेत गेले आहेत , पण परत माघारी फिरलेले नाहीत . खरं आहे ना ? ”

गुलमोहर बोलताना थांबला . सर्वांवर नजर फिरवली . सगळ्यांच्या माना खाली गेल्या होत्या .

” मला खरं खरं सांगाल ? काय झालंय ? ”

खूप वेळानं एक आई उठली .
” माझ्या मुलीला मॉडेलिंग मध्ये करिअर करायचं होतं .”
” माझ्या मुलाला वेबसिरीज मध्ये चमकायचं होतं.”
” माझी बहिण नाटकात आणि मग सीरिअल्स मध्ये नशीब आजमावणार होती .”
” माझा नवरा …”
” माझी बायको…”
” माझा …”
” माझी…”

अनेक जण आता मोकळेपणानं बोलू लागले .
स्ट्रगल सांगू लागले .
त्यासाठी केलेले प्रयत्न …
त्यासाठी केलेले महागडे कोर्स …
त्यासाठी केलेला महागडा पोर्टफोलिओ …
अपडेट राहण्यासाठी केलेला खर्च …
संबंधितांच्या नजरेत भरण्यासाठी केलेली यातायात …
होणारा मनःस्ताप , न बनलेलं करिअर …
आणि शेवटी कुठंतरी काम मिळाल्यानंतर कामाच्या तुलनेत मिळणारा प्रचंड पैसा आणि त्या संपत्तीनंतर घरात सुरू झालेला संशयकल्लोळ …

संधिप्रकाशातील सावल्या आपल्याला काहीतरी मार्ग दाखवतील या आशेनं आलेले सर्व भडाभडा बोलत होते . कुणी नर्व्हस होऊन , तर कुणी रडत . कुणी मान खाली घालून तर कुणी नजर टाळून .

तिथल्या झाडांच्या सावल्या व्यथित झाल्या होत्या .
जमलेल्या सर्वांना गुहेची , अंत नसलेल्या गुहेची , तिथल्या कसल्याच गोष्टीची कल्पना नव्हती .
आकर्षक प्रवेशद्वार , आरसे , लाईट्स , मादक गंध , मोहमयी दुनिया … या सगळ्यांपासून हे लोक खूप दूर होते , भाबडे होते , असं जाणवत होतं . यांना आणि यांच्या निमित्तानं इतरांना सांगायलाच हवं असं गुलमोहराला वाटलं . त्यानं अश्वत्थाकडे पाहिलं . त्यानं मानेनं संमती दिली .
गुलमोहरानं सर्वांकडे पाहिलं .
तो काय म्हणतो याकडे सगळ्यांचं लक्ष होतं…

” स्पष्टच बोलतो . कटू वाटेल , राग येईल माझा , मी कदाचित प्रतिगामी वाटेन , कलाकारांचा शत्रू वाटेन , स्वातंत्र्याची गळचेपी करणारा वाटेन . कदाचित माझे विचार कालबाह्य वाटतील . पण जरा सखोल विचार केलात तर कदाचित पटेल माझं बोलणं . पण ते पटावं , स्वीकारावं असा माझा मुळीच आग्रह नाही . सक्ती नाही . आणि हट्ट तर नाहीच नाही . वर्षानुवर्षं स्ट्रगल केल्यावर नामांकित प्रॉडक्शन हाऊस मध्ये संधी न मिळताच आपली मुलगी किंवा मुलगा प्रचंड पैसा कुठून आणतो याची कधी शहानिशा करावीशी नाही वाटली ? ज्यात तो कलाकार म्हणून काम करतोय तो प्रोजेक्ट अधिकृत स्क्रीनवर कधी पाहायला मिळणार याची विचारणा कधी केली आहे ? रिहर्सल , रात्र रात्र चालणाऱ्या पार्ट्या , आऊटडोअर शूटिंग , इनडोअर शूटिंग यामध्ये कधी डोकावण्याचा , त्याबद्दल काही विचारण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही ? वेबसिरीज वा मुव्हीतले वा सीरिअल मधले इंटिमेंट सीन कसे चित्रित होतात , कितीवेळ चित्रित होतात , रिटेक किती होतात , त्याचा गैरफायदा कोण कसा घेतो याची माहिती कधी घेतली आहे ? कथानकाची गरज म्हणून होणारे रेप सीन , गीताच्या शब्दांशी विसंगत असे मादक , कामुक हावभाव किंवा गरज असो नसो , उतरवले जाणारे कपडे याबद्दल , दिग्दर्शकाला , नृत्यदिग्दर्शकाला , पालक म्हणून विचारणा केली आहे तुम्ही ? उत्तम नर्तिका म्हणून असणारी तुमची मुलगी , बहीण , पत्नी ही नंतर कुठल्यातरी डान्सबारमध्ये नाचायला जात असेल याची कल्पना केलीय तुम्ही ? करिअरसाठी ऑडिशन देताना स्क्रीनटेस्ट होतेय की स्किनटेस्टला प्राधान्य दिलं जातंय , याचा डोळसपणे विचार केलाय तुम्ही ? अभिनयात करिअर करायचं या भ्रमात , कसलं कसलं स्वातंत्र्य , मुलांना तुम्ही देताय ? त्या ट्रेनिंगच्या नादात तरुण तरुणी काय काय करून बसतात , त्याकडे लक्ष आहे ? ऑडिशनच्या नावाखाली जे चालतं , त्याचा वापर ब्लॅकमेलिंग साठी होतो आणि त्यातून पॉर्न इंडस्ट्री किती स्ट्रॉंग होते किती फोफावतेय , ते महित्येय तुम्हाला ? अचानक एकेदिवशी मोबाईल मध्ये नको त्या अवस्थेतल्या क्लिप्स , तुमच्या समोर आले तर पाहू शकाल तुम्ही ? त्यानंतर तुमच्या मुलामुलींच्या नजरेला नजर देऊ शकाल तुम्ही ? मला महित्येय ही सगळी इंडस्ट्री वाईट नाही , पण चांगलं वाईट कसं ठरवणार तुम्ही ? त्यासाठी तुम्ही पालक म्हणून पुढाकार घ्या . मुलांना स्वातंत्र्य द्या पण स्वातंत्र्य म्हणजे मनःपूतम समाचरेत ,असं नसतं हे शिकवा . त्यांच्यातला कलाकार जपा , जगवा , वाढवा , प्रोत्साहन द्या पण बरं वाईटाची जाणीव करून घ्या . त्यांना ‘ नाही ‘ म्हणायला शिकवा . सगळेच स्पर्श मायेचे नसतात , त्यामुळे सहेतुक स्पर्शातले अर्थ ओळखायला शिकवा . लेदर करन्सी या भयानक शब्दाचा अर्थ समजावून द्या . ब्लॅकमेलिंगमुळे केवळ व्हिडीओ , क्लिप्स बनतात असेच काही नाही , तर ड्रग्ज माफियांच्या हातातली चलनी नाणी बनण्याची भीती ओळखून सावध राहायला शिकवा . असे शिक्षण देणारी एकमेव संस्था म्हणजे आई असते हे विसरू नका आणि बाबा हे त्या संस्थेचे आधारवड असतात हेही समजावून द्या . आपलं परकं ओळखण्याचे धडे लहानपणापासून द्या . हे सगळं सांगतोय म्हणजे मी घाबरवतोय असं समजू नका . समजून घेण्याच्या प्रयत्नांची ही केवळ पहिली पायरी आहे असे समजा …”

गुलमोहर बोलताना थांबला .
त्यानं स्वतःचे डोळे पुसले . उरलीसुरली चारदोन फुले खाली घरंगळली .

सगळे उठले . घरी निघाले .
त्यांच्या पायात आत्मविश्वासाचं बळ संचारलं .

— जाताना सगळ्यांच्या लक्षात आलं ,
गुलमोहर , गुहेला ‘ लांडग्यांची गुहा ‘ असं का म्हणाला .

— डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
९४२३८७५८०६
———-
संधिप्रकाशातील सावल्या ही कथामाला आपण गेला महिनाभर वाचली आहे. आपल्याला आवडली का ?
असेल तर नावासह शेअर करायला हरकत नाही .
सध्याच्या परिस्थितीत सकारात्मकतेची गरज आहे , आपण ती पूर्ण करू या .
अभिप्रायाची वाट पहात आहे .
नमस्कार !

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 118 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..