नवीन लेखन...

समुद्रतळावरचं ‘ओॲ‍सिस’

पृथ्वीवरचं जीवन सूर्यप्रकाशावर आधारलेलं आहे. सूर्यप्रकाशाच्या मदतीनं वनस्पती अन्नाची निर्मिती करतात व या अन्नावर इतर सजीवांची गुजराण होते. अर्थात, जिथे थोडाही सूर्यप्रकाश पोचू शकत नाही, अशा पूर्ण काळोखी जागेत राहणारे सजीवही पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. अशा ठिकाणी सजीवांची विविधता मर्यादित असणं, अपेक्षित असतं. मात्र हा तर्क चुकीचा ठरेल, असा एक शोध अलीकडेच लागला आहे. अंटार्क्टिकाजवळच्या समुद्रात तरंगणाऱ्या बर्फाच्या एका प्रचंड थराखालील, पूर्ण अंधारात असणारा समुद्रतळ हा अनेकविध जाती-प्रजातीच्या प्राण्यांनी व्यापलेला असल्याचं आढळलं आहे. आत्यंतिक परिस्थितीत जगणाऱ्या या प्राण्यांचा हा शोध ‘करंट बायॉलॉजी’ या शोधपत्रिकेत अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे.

अंटार्क्टिकाभोवतालच्या समुद्रातल्या बर्फाच्या थरांखालील परिस्थितीवर फारसं संशोधन झालेलं नाही. जर्मनीतील आल्फ्रेड वेगेनेर इंस्टिट्यूटसारख्या काही संस्थांनी हे संशोधन आता हाती घेतलं आहे. या संशोधनासाठी, गरम पाण्याद्वारे बर्फाच्या या थरात तीस ते चाळीस सेंटिमीटर व्यासाचं आरपार छिद्र पाडलं जातं. या छिद्रामधून व त्याखालच्या पाण्यातून, समुद्रतळापर्यंत कॅमेरा व इतर आवश्यक उपकरणं पाठवून, या तळाची छायाचित्रं घेतली जातात व तिथली विविध माहिती मिळवली जाते. त्याचबरोबर या छिद्राद्वारे, स्वयंचलित पद्धतीनं तिथल्या गाळाचे नमुने गोळा करून ते बर्फाच्या थराच्या पृष्ठभागावर आणले जातात. या नमुन्यांचं त्यानंतर विविध दृष्टींनी विश्लेषण केलं जातं.

अंटार्क्टिकाच्या ईशान्येकडील वेडडेल समुद्रात ’एकस्ट्रोम आइस शेल्फ’ या नावानं ओळखला जाणारा, बर्फाचा एक प्रचंड थर तरंगतो आहे. सोळा लाख चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ असणाऱ्या या थराची जाडी सुमारे दोनशे मीटर इतकी आहे. बर्फाच्या या थराखाली पन्नास ते शंभर मीटर खोल पाणी आहे. या पाण्याचं तापमान शून्याखाली दोन अंश सेल्सियस इतकं कमी आहे. आल्फ्रेड वेगेनेर इंस्टिट्यूटमधील संशोधक काही वर्षं या थराखालील सागरतळाचा शोध घेत होते. सन २०१८-१९ या काळात या संशोधकांनी इथल्या समुद्रतळावरील गाळाचे नमुने गोळा केले. या नमुन्यांचं प्राथमिक निरीक्षण करताना, या संशोधकांना त्यांत अनेक छोट्याछोट्या प्राण्यांचं अस्तित्व दिसून आलं. या प्राण्यांच्या तपशीलवार विश्लेषणासाठी त्यांनी हे नमुने काही काळानंतर इंग्लंडमधील ब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हे या संस्थेतील डेव्हिड बार्न्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे पाठवले.

डेव्हिड बार्न्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या नमुन्यांतील प्राण्यांची नोंद करायला सुरुवात केली आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण या नमुन्यांत सापडलेली जैवविविधता ही अत्यंत अनपेक्षित होती. डेव्हिड बार्न्स यांना या नमुन्यांत तब्बल ७७ वेगवेगळ्या जातींचे प्राणी सापडले. अंटार्क्टिकातील बर्फाखाली आतापर्यंत नोंदल्या गेलेल्या विविध जातींच्या एकत्रित संख्येपेक्षा ही संख्या अधिक आहे. या प्राण्यांपैकी काही प्राणी हे जरी इतरत्र सापडत असले तरी, अंटार्क्टिकाच्या परिसरात ते आतापर्यंत कधीच सापडले नव्हते. इथे सापडलेल्या प्राण्यांपैकी काही प्राणी हे, शेवाळासारखे दिसणारे प्राणी आहेत, काही प्राणी कृमीसदृश आहेत, तर काही प्राण्यांचा आकार तलवारीसारखा आहे. इथे राहणारे सर्व प्राणी हे एकाच आधाराला सतत चिकटून राहणारे प्राणी आहेत. हे प्राणी एका जागी बसूनच, आपल्या आजूबाजूच्या पाण्यातून अन्न मिळवतात. यातले काही प्राणी हे आपल्या लांबलचक नलिकांद्वारे अन्न शोषून घेतात, तर काही प्राणी आपल्या सोंडेसारख्या अवयवांद्वारे अन्न गोळा करून त्याचं भक्षण करतात. समुद्रतळावरच्या या नमुन्यांत आणखीही इतर जाती-प्रजातींचे प्राणी सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. डेव्हिड बार्न्स यांच्या मते, एकाच ठिकाणी आढळलेली प्राण्यांची ही इतकी विविधता, अंटार्क्टिकाच्या परिसरातील खुल्या जागेतही आढळत नाही.

प्राण्यांची ओळख पटल्यानंतर, डेव्हिड बार्न्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्राण्यांचं इथलं वास्तव्य केव्हापासून आहे, याचा शोध घ्यायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी, या नमुन्यांतील काही सागरी प्राण्यांद्वारे निर्माण होत असलेल्या कॅल्शिअम कार्बोनेटयुक्त पदार्थांचा आधार घेतला. काही मिलिमीटर आकाराच्या तुकड्यांच्या स्वरूपात हे पदार्थ या नमुन्यांत अस्तित्वात होते. या तुकड्यांतल्या कार्बनच्या एका विशिष्ट समस्थानिकाच्या प्रमाणावरून, हे तुकडे किती काळापूर्वी निर्माण झाले हे या संशोधकांना कळू शकलं. यातील काही तुकडे जरी अलीकडच्या काळात निर्माण झाले असले तरी, काही तुकड्यांची निर्मिती ही काही शतकांपूर्वी झाली होती. इतकंच काय, तर यातला एक तुकडा तर सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी निर्माण झाला असल्याचं त्यांना आढळलं. याचा अर्थ, इथल्या प्राण्यांच्या काही जाती या हजारो वर्षं इथेच वास्तव्याला आहेत. याहूनही जुने तुकडे या नमुन्यांत सापडण्याची शक्यता या संशोधकांना वाटते आहे.

या संशोधनामुळे आता नवा प्रश्न निर्माण झाला आहे. खुल्या समुद्रापासून काही किलोमीटर दूरवर आणि सुमारे अडीचशे-तीनशे मीटर खोलीवर, निबिड काळोखात दडलेल्या या थंड जागी हे प्राणी इतका दीर्घकाळ अस्तित्वात राहिले कसे? कारण अशा जागी अन्नाची नेहमीच कमतरता असते. डेव्हिड बार्न्स यांनी या प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न केला आहे. या जागा खुल्या समुद्रापासून खूप दूर असल्यानं, तसंच त्या बर्फाखाली दडलेल्या असल्यानं, इथली परिस्थिती अत्यंत शांत आहे. इथे वादळं नाहीत, पूर नाहीत, बाहेरची कोणतीही ढवळाढवळ नाही… त्यामुळे इथल्या प्राण्यांच्या वाढीत कोणताच अडथळा येत नाही. इथे सापडलेले प्राणीसुद्धा इकडे-तिकडे फिरणारे प्राणी नाहीत. ते आपल्या शरीराखालील आधाराला सतत चिकटून बसले आहेत. त्यामुळे त्यांची हालचालही अत्यंत कमी होते आहे. त्यांचे आकारही मोठे नाहीत. या प्राण्यांचा जीवनप्रवास अत्यंत धिम्या गतीनं चालू आहे. त्यामुळे त्यांच्या अन्नाच्या गरजा अत्यंत मर्यादित आहेत. त्यांच्या या अल्पशा गरजा पुरवल्या जातील, एवढं सूक्ष्मशैवालाच्या स्वरूपातलं अन्न इथे नक्कीच उपलब्ध होत असणार.

अंटार्क्टिकाच्या परिसरात आढळणारे अनेक अधिवास आणि परिसंस्था वैशिष्ट्यपूर्ण आहेत. सागरीतळावर सापडलेला हा अधिवाससुद्धा वैशिष्ट्यपूर्णच आहे. अपेक्षा नसलेल्या ठिकाणी सापडलेला, आत्यंतिक परिस्थितीतला हा वैविध्यपूर्ण अधिवास म्हणजे काही संशोधकांच्या मते, एक प्रकारचं समुद्रतळावरचं ‘ओअ‍ॅसिस’च आहे – वाळवंटात क्वचित सापडणाऱ्या हिरवळीसारखं! मात्र दीर्घकाळ अस्तित्वात असलेली ही परिसंस्था, वातावरणात घडून येत असलेल्या तीव्र बदलांना तोंड देऊ शकेल का, याची या संशोधकांना शंका वाटते. डेव्हिड बार्न्स यांच्या मते, बदलत्या तापामानामुळे नष्ट होणाऱ्या परिसंस्थांत, या परिसंस्थेचा कदाचित बराच वरचा क्रमांक असेल. आणि ही परिसंस्था इतकी आगळीवेगळी आहे की, ती प्रयत्नपूर्वक टिकवून ठेवणं किंवा तिची पुनर्निर्मिती करणं, हेही आपल्याला शक्य नाही!

— डॉ. राजीव चिटणीस.

छायाचित्र सौजन्य: Hannes Grobe/Alfred Wegener Institute, Alfred Wegener Institute.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..