नवीन लेखन...

समर्थ रामदास स्वामी …….८

समर्थांनी दासबोधात सत्व गुण , रजो गुण , आणि तमोगुणांचे वर्णन केले आहे.हे तीनही गुण असलेली माणसे आपल्या आजूबाजूला फिरत असतात.सर्व प्रथम आपण तमोगुण पाहू.

समर्थांचा दासबोध वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते कि त्यांनी केलेले भाष्य हे त्रिकाळ बाधित सत्य आहे हे नंतरच्या काळात सिद्ध झालेले आहे. समर्थ ज्या काळात वावरत होते त्या काळात शहरे विकसित झाली नव्हती.आज जो लोकसंखेचा भस्मासुर उभा राहिलेला आहे तो नव्हता. सर्व सामान्य लोकांच्या गरज त्याकाळात खूप कमी होत्या .तरी सुद्धा स्त्री भ्रूण हत्या. अप्पल पोटेपणा, श्रीमंतीचा हव्यास ,दुस-यांना त्रास देण्याची मानसिकता.आपले तेच खरे करण्याची वृत्ती ,.स्वतःच्या माता- पित्याला सुद्धा मारण्याची मानसिकता, स्वार्था साठी दुस-याचा प्राण घेणे , सतत भांडणे लावून आपण त्याची मजा पाहत राहणे,किडामुंगी श्वापद याची हत्या करण्याची आवड ,सदैव मस्तवाल आणि उद्धट वागणे, फळझाडे ,वृक्ष यांची कत्तल करणे ,ज्यास निष्ठुर पणाच आवडतो,भक्ती मार्ग आणि ईश्वारोपासना न करणे इत्यादी अनेक कु कर्माची यादी समर्थांनी या दशक २ समास ६ मध्ये दिलेली आहे.तमोगुण सर्वथा टाळावा आणि तो अत्यंत प्रयत्न पूर्वक टाळावा हे समर्थांनी दासबोधात सांगितले आहे. तो हा समास……वाचा तमोगुण लक्षण ….

समास सहावा : तमोगुणलक्षण* || २.६ ||

॥श्रीराम॥
आतां ऐका तमोगुण | तोहि सांगिजेल ||१||
संसारीं दुःखसंमंध | प्राप्त होतां उठे खेद |
कां अद्भुत आला क्रोध | तो तमोगुण ||२||
शरीरीं क्रोध भरतां | नोळखे माता पिता |
बंधु बहिण कांता | ताडी तो तमोगुण ||३||
दुसऱ्याचा प्राण घ्यावा | आपला आपण स्वयें
द्यावा | विसरवी जीवभावा | तो तमोगुण ||४||
भरलें क्रोधाचें काविरें | पिश्याच्यापरी वावरे |
नाना उपायें नावरे | तो तमोगुण ||५||
आपला आपण शस्त्रपात | पराचा करी घात |
ऐसा समय वर्तत | तो तमोगुण ||६||
डोळां युध्यचि पाहावें | रण पडिलें तेथें
जावें | ऐसें घेतलें जीवें | तो तमोगुण ||७||
अखंड भ्रांती पडे | केला निश्चय विघडे |
अत्यंत निद्रा आवडे | तो तमोगुण ||८||
क्षुधा जयाची वाड | नेणे कडु अथवा गोड |
अत्यंत जो कां मूढ | तो तमोगुण ||९||
प्रीतिपात्र गेलें मरणें | तयालागीं जीव देणें |
स्वयें आत्महत्या करणें | तो तमोगुण ||१०||
किडा मुंगी आणी स्वापद | यांचा करूं आवडे
वध | अत्यंत जो कृपामंद | तो तमोगुण ||११||
स्त्रीहत्या बाळहत्या | द्रव्यालागीं ब्रह्महत्या |
करूं आवडे गोहत्या | तो तमोगुण ||१२||
विसाळाचेनि नेटें | वीष घ्यावेंसें वाटे |
परवध मनीं उठे | तो तमोगुण ||१३||
अंतरीं धरूनि कपट | पराचें करी तळपट |
सदा मस्त सदा उद्धट | तो तमोगुण ||१४||
कळह व्हावा ऐसें वाटे | झोंबी घ्यावी ऐसें
उठे | अन्तरी द्वेष प्रगटे | तो तमोगुण ||१५||
युध्य देखावें ऐकावें | स्वयें युध्यचि करावें |
मारावें कीं मरावें | तो तमोगुण ||१६||
मत्सरें भक्ति मोडावी | देवाळयें विघडावीं |
फळतीं झाडें तोडावीं | तो तमोगुण ||१७||
सत्कर्में ते नावडती | नाना दोष ते आवडती |
पापभय नाहीं चित्ती | तो तमोगुण ||१८||
ब्रह्मवृत्तीचा उछेद | जीवमात्रास देणें खेद |
करूं आवडे अप्रमाद | तो तमोगुण ||१९||
आग्नप्रळये शस्त्रप्रळये | भूतप्रळये वीषप्रळये |
मत्सरें करीं जीवक्षये | तो तमोगुण ||२०||
परपीडेचा संतोष | निष्ठुरपणाचा हव्यास |
संसाराचा नये त्रास | तो तमोगुण ||२१||
भांडण लाऊन द्यावें | स्वयें कौतुक पाहावें |
कुबुद्धि घेतली जीवें | तो तमोगुण ||२२||
प्राप्त जालियां संपत्ती | जीवांस करी यातायाती |
कळवळा नये चित्तीं | तो तमोगुण ||२३||
नावडे भक्ति नावडे भाव | नावडे तीर्थ नावडे देव |
वेदशास्त्र नलगे सर्व | तो तमोगुण ||२४||
स्नानसंध्या नेम नसे | स्वधर्मीं भ्रष्टला दिसे |
अकर्तव्य करीतसे | तो तमोगुण ||२५||
जेष्ठ बंधु बाप माये | त्यांचीं वचनें न साहे |
सीघ्रकोपी निघोन जाये | तो तमोगुण ||२६||
उगेंचि खावें उगेंचि असावें | स्तब्ध होऊन बैसावें |
कांहींच स्मरेना स्वभावें | तो तमोगुण ||२७||
चेटकविद्येचा अभ्यास | शस्त्रविद्येचा हव्यास |
मल्लविद्या व्हावी ज्यास | तो तमोगुण ||२८||
केले गळाचे नवस | राडिबेडीचे सायास |
काष्ठयंत्र छेदी जिव्हेस | तो तमोगुण ||२९||
मस्तकीं भदें जाळावें | पोतें आंग हुरपळावें |
स्वयें शस्त्र टोचून घ्यावें | तो तमोगुण ||३०||
देवास सिर वाहावें | कां तें आंग समर्पावें |
पडणीवरून घालून घ्यावे | तो तमोगुण ||३१||
निग्रह करून धरणें | कां तें टांगून घेणें |
देवद्वारीं जीव देणें | तो तमोगुण ||३२||
निराहार उपोषण | पंचाग्नी धूम्रपान |
आपणास घ्यावें पुरून | तो तमोगुण ||३३||
सकाम जें का अनुष्ठान | कां तें वायोनिरोधन |
अथवा राहावें पडोन | तो तमोगुण ||३४||
नखें केश वाढवावे | हस्तचि वर्ते करावे |
अथवा वाक्‍शून्य व्हावें | तो तमोगुण ||३५||
नाना निग्रहें पिडावें | देहदुःखें चर्फडावें |
क्रोधें देवास फोडावें | तो तमोगुण ||३६||
देवाची जो निंदा करी | तो आशाबद्धि अघोरी |
जो संतसंग न धरी | तो तमोगुण ||३७||
ऐसा हा तमोगुण | सांगतां तो असाधारण |
परी त्यागार्थ निरूपण | कांहीं येक ||३८||
ऐसें वर्ते तो तमोगुण | परी हा पतनास
कारण | मोक्षप्राप्तीचें लक्षण | नव्हे येणें ||३९||
केल्या कर्माचें फळ | प्राप्त होईल सकळ |
जन्म दुःखाचें मूळ | तुटेना कीं ||४०||
व्हावया जन्माचें खंडण | पाहिजे तो सत्वगुण |
तेंचि असे निरुपण | पुढिले समासीं ||४१||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
*तमोगुणलक्षणनाम समास सहावा || २.६ ||

— चिंतामणी कारखानीस

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..