नवीन लेखन...

सफारी इन माबुला – भाग २

आल्या आल्याच सुग्रास पंगतीचा बेत होता. खास ‘बिग५’ च्या देखरेखीखाली! जेवणगृहाच्या भिंतीवरून ते पाहुण्यांकडे लक्ष ठेऊन होते.

सजावट विविध प्राण्यांची मुंडकी, कातडी, शिंगे वापरून केलेली होती, उजेडही आवश्यकते इतकाच. आफ्रिकन पदार्थ जेवणात होतेच पण इतरही चविष्ट पदार्थांची रेलचेल होती. पदार्थांच्या चवी थोड्याश्या परिचित वाटत होत्या म्हणून चौकशी केली तर मुख्य आचारी भारतीय असल्याचे समजले. नुसत्या वासानेच ‘घरेलू’ वाटले. हॉटेलचे कर्मचारी प्रत्येक ठिकाणी हसून प्रेमाने स्वागत करत होते.

इथपर्यंत सगळे कसे मस्त होते. पण “पहिली तीन तासांची सहल संध्याकाळी आहे, खोलीत जाऊन थोडावेळ विश्रांती घेऊन सफारीसाठी तयार रहा” असा गाईडचा आदेश ऐकताच माझ्या पोटात गोळाच आला. जेवण अंगावर आले होते, त्यामुळे पाय आपोआप खोलीकडे वळले. सफारीला जायची भीती जास्त का खोलीत एकटीने बसायची भीती जास्त हेच समजत नव्हते. शेवटी बाहेर जाऊन पहाणेच पसंत केले. १०-१२ जीपचा तांडा लॉज समोर उभा होता. ५-७ फूट उंचीच्या, ६ते ८ चाकांच्या, हिरवट रंगाच्या, ९ जणांच्या बसण्याची व्यवस्था असणाऱ्या उघड्या टपाच्या जीपकडे पाहूनच जीव दडपला. वर चढून बसायचं कसं हा प्रश्न फक्त माझ्या मनात आला नाही, तर सगळेच या विचारात दिसले. या जीपमध्ये ९ प्रवासी तीन चढ्या बाकांवर बसतात त्यामुळे कोणत्याही सीटवरून सगळीकडचे दृश्य स्पष्ट दिसते. त्यांचे चालक असे धिप्पाड की, क्षणभर त्यांचीच भीती वाटावी. रंगाने काळेकभिन्न, उंची ६ फुटांपेक्षा जास्त, मजबूत बांधा असणारे असे असले तरी पण त्यांचे विनम्र बोलणे, हसणे, मदतीचा हात पुढे करणे, सारेच प्रसन्न करणारे होते. सगळ्यांनाच जीपमध्ये चढायला चालकाची मदत लागली. आमच्या जीपमध्ये आम्ही फक्त ६ जणच होतो. कसे चढायचे, कुठे पाय ठेवला तर चढणे सोईचे होईल याचा विचार माझ्या मनात चालू असताना जीपच्या चालकाने मला जीपमधल्या सगळ्यात उंच बाकावर कधी टाकले तेच कळले नाही. जीप मध्ये बसल्यावर एका रेंजरने प्रत्येक चालकाजवळ एक एक बंदूक व तीन तीन गोळ्या दिल्या व त्याची नोंद केली. एकंदर रागरंग पाहता मला खोलीत परत पळून जावे असे फार वाटू लागले. तेवढ्यात जीपचा तांडा चालू झाला.लॉजच्या आवारातून गमती देशोदेशी बाहेर पडताच पुरुषभर उंचीचे पिवळे पिवळे गवत सगळीकडे दिसू लागले. थोड्या अंतरापर्यंत एकत्र राहून मग प्रत्येक चालकाने आपला वेगळा मार्ग स्वीकारला. भोवती सर्वत्र गवत व आपण त्यात एकटे ह्या भीतीने काळजाचा ठोकाच चुकला. चालक मात्र त्याच्या ठरलेल्या गतीने पुढे गवतातल्या रस्त्यात जीप दामटवत होता. भन्नाट वारा सुटला होता, वाऱ्यावर डुलणाऱ्या गवताच्याही वरून लांबवरचे दृश्य पहाताना भीतीची जागा उत्सुकतेने व प्रसन्नतेने कधी घेतली कळलेच नाही.

समोर लाल मातीचा कच्चा रस्ता, व आजूबाजूच्या नजरेच्या टप्प्यापर्यंत रानच रान दिसत होते. गवत व झाडे याखेरीज दुसरं काही नव्हतंच. चालक तर मातीच्या खडबडीत रस्त्यांवरून वेगात गाडी हाणत होता, पटकन उजवी डावी वळणे घेत होता. १२००० हेक्टरचे रान, त्यात मातीचे रस्ते. ना कुठे चिन्हे, पाट्या वा खुणा. आपण चुकणार तर नाहीना अशी पाल चालक सोडून बाकी प्रत्येकाच्या मनात चुकचुकली. आपापसात तशी कुजबूजही सुरू झाली. आपोआपच शेजारच्या सीटवरच्या सोबत्याचे हात घट्ट धरले गेले. त्यात अचानक गाडी थांबली. समोर पाहिले तर दूरवर दोन गेंडे उभे होते. इथे गवत थोडे कमी उंच होते त्यामुळे लगेच आम्ही फोटो काढणे सुरू केले. उदी रंगाचे ४-५ फूट उंचीचे २ गेंडे आम्हाला पाहायला आमच्याच दिशेने यायला लागले. त्यांचा आकार व आविर्भाव बघण्यासारखा होता. आमच्या जीपपासून ५-६ फूटांवर थांबून त्यांनी आमचे निरीक्षण सुरू केले. रानातले ते रहिवासी व आम्ही पाहुणे. आमचे नीट निरीक्षण करून ‘अत्यंत निरुपद्रवी’ असल्याचा शिक्का त्यांनी पायाखालची जमीन जोरजोरात उकरून उमटवला व तोंडाने ‘फुर्रर्र’ करून ते आमच्या समोरून दुसऱ्या बाजूला निघून गेले. ते रस्ता ओलांडून जाईपर्यंत आमचा मुक्काम तेथेच. रानाच्या सुरुवातीसच ते दोघे भेटल्याने त्यांची नेमणूक या रानाचे पहारेकरी म्हणून असावी यावर आम्हा सर्वांचे एकमत झाले. गेंडे पूर्णपणे नजरेआड होईपर्यंत आम्ही एकटक बघत होतो. सुरुवात तर छान झाली म्हणून आम्ही खूश! जीप पुढे निघाली. थोडे पुढे जातो तो हरिणांचे व झेब्यांचे कळप मुबलक प्रमाणात भेटले. त्यांचे भरपूर फोटो काढून आम्ही पुढे निघालो. वाटेत बबून, जिराफ, नीलगाई वगैरे मंडळी भेटतच होती. पण अजून हत्ती व जंगलचा राजा दिसले नव्हते. “आता सायंकाळी पाणवठ्यावर सिंह दिसतील, कदाचित लेपर्डही दिसण्याची शक्यता आहे.” असे चालक महाशय सांगत होते. तोच ‘खर्र खट्ट’ असा आवाज करून जीप थांबली. आम्हाला वाटले हत्तीबित्ती आला की काय? आमचे कॅमेरे सरसावले तोच “गाडी पंचर हाय, टायर बदलायला हवा, तवा समदे खाली या” अशी आज्ञा ऐकू आली. सहज सभोवती नजर टाकली तर हाकेच्या अंतरावर हरणं, नीलगाई, झेब्रे व दूरवर गेंडे दिसत होते. जवळच कुठेतरी गजराज व वनराजही असणार होते. हे सगळे मनात आले, अन् खाली उतरायचे कुणाचेच धाडस होईना.

आसपास दुसरी जीप दिसत नव्हती, लॉज तिकडे दूर कुठेतरी राहिलेले. भोवताली फक्त रानगवत, प्राणी अन् टायर फुटलेली जीप. बापरे! ‘नाटककाराच्या शोधात सहा पात्रे’ च्या चालीवर ‘श्वापदांच्या शोधात सहा प्रवासी’ ऐवजी ‘सहा प्रवाशांच्या शोधात श्वापदे’ असे नवीन नाटक जंगलाच्या पार्श्वभूमीवर रंगणार की काय याची भीती वाटायला लागली. माझी तर पाचावर धारण बसली. “बघा, मी म्हणत नव्हते का की….” ह्या माझ्या बडबडीकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नव्हता कारण चालकाची “खाली उतरा व दूर गवतात उभे रहा” अशी घाई चाललीच होती. शेवटी जीव मुठीत धरून सर्वजण उतरले. आता झेब्रे व हरणांची सोबतही खूपच हवीहवीशी वाटू लागली. आम्हाला धीर देण्याच्या उद्देशाने तेही आमच्या जवळ येऊ लागले. त्यांचे फोटो काढण्यात आम्ही रंगून गेलो त्यामुळे खाली उतरताना वाटलेली भीती कशी व केव्हा कमी झाली ते कळलेच नाही.

आजुबाजूला बघण्यासारखे तर खूपच होते. इतकावेळ जीपमधून एकसारख्या दिसणाऱ्या गवताच्याही खूप जाती आहेत, त्यावर छोटीछोटी नाजूकशी विविधरंगी फुलेही आहेत हे समजले. मोठ्या झाडांच्या शेंड्यांवरून गुलाबी, पांढरट दिसणारे फुलांचे झुबके मन आकर्षित करत होते. हे सगळे भरधाव जाणाऱ्या जीपमधून दिसलेच नव्हते. आमचे निरीक्षण चालू होते तोवर जीपमधल्या दोन्ही पुरुष प्रवाश्यांच्या मदतीने चालकाने अर्ध्या तासात जीप ठीकठाक केली. जीपचे बदललेले भले मोठे चाक त्याने एकट्याने हाताने जीपमधे आदळताच जीप जागेवरच थरथरली. जीपला उचलण्यासाठी लावलेला जॅक जीप इतकाच भक्कम होता. तो लावताना त्याचा आकार बघण्याचे कुणालाच सुचले नव्हते तर आता उतरवताना तरी बघू या म्हणून आम्ही जीपजवळ गर्दी केली. ते पाहताच चालकाने ओरडून “जीपपासून १०-१२ फूट लांब जा’ असे ओरडून सांगितले. आम्ही दूर जाताच त्याने जीपला जॅक लावलेला असतानाच जीप जोरात चालू केली, व इतका वेळ उभ्या स्थितीत असणारा जॅक धाडकन मातीत आपटला, खूपच धूळ उडाली, मोठा आवाज झाला, जीप पुढे गेली. चालकाने ती परत आमच्याजवळ आणली, जीपमध्ये चढण्याची खटपट झाली. जॅक लावण्याच्या पद्धतीची, जॅकच्या नवीन प्रकाराची आमच्या ज्ञानात भर पडली व आम्ही पुढे निघालो.

थोड्याच अंतरावर आमची वाट बघत असलेले गजराज भेटले, अगदी दहा फुटावरून दर्शन झाले. नशीब, ते थोडे उशीराने संध्याकाळच्या फेरफटक्यासाठी निघाले होते नाही तर आमची गाठभेट अगदी जवळूनच झाली असती. जीपवर चढल्याने आम्ही आता थोडेतरी त्यांच्या लेव्हलला आलो. आफ्रिकन हत्ती किती मोठा असतो ते आत्तापर्यंत फक्त पुस्तकात वाचले होते. पण इथे समोर आपले प्रशस्त कान हलवत, लांबलचक सोंडेने गवत तोडून डोक्यावर मारत आपल्या बारीक डोळ्यांनी आम्हाला ते बराच वेळ न्याहाळत होते. पुरेसा वेळ फोटो काढायला देऊन सावकाशपणे गजराज हलले. जरी ते आमच्यापासून दहा फुटावर होते, आम्ही जीपमध्ये होतो तरी गजराज दिसेनासे होईतो जीव थोडा धाकधूकच करत होता. पुढे गेल्यावर पाणवठ्यावर सुसर, हिप्पो दिसले. वनराज मात्र थोडक्यात हुकले.इतरांना कदाचित हळहळ वाटली असेल, पण मला मात्र चालकाची खटपट, त्याची ताकद, कुठलेही संकट न येताच आलेली मानसिक धास्ती, झेब्रे, हरणे, गेंडे इत्यादींचा अवतीभवतीचा वावर हे वेगळे पण अद्वितीय अनुभवच संपूर्ण सहलीचे फळ देऊन गेले. बघता बघता रान अंधारात गडप झाले व आमची जीप परत वळली. बिग ५ पैकी तिघे तर भेटले. आता पोटात कावळे कोकलत होते, तरी रानावरून नजर हटत नव्हती. सभोवतीचा अंधार, आकाशात रेंगाळणारा चुकार संधिप्रकाश, त्यात उजळून निघालेले ढग, चंद्राची कोर, दूरवरचे धूसर डोंगर सारे सारे खूपच रम्य दिसत होते.

लॉजवर परतलो तर आफ्रिकन वाईन (आणि सरबताचेही) ग्लास तयार! सकाळच्या ताल वाद्याऐवजी खास आफ्रिकन तंतूवाद्य वाजत होते. खांबाखांबावर मशाली तेवत होत्या. त्यांचा उजेड व धुराचा वास आपण शहरापासून दूर जंगलात आहोत याची जाणीव करून देत होते. चविष्ट खाद्यपदार्थांची रेलचेल असलेला बूफे उघड्यावर मांडला होता. खमंग वासानेच पोट भरून गेलेसे वाटले. बटाट्याची भाजी, वांग्याचे खरपूस भरीत, वेगवेगळ्या उसळी, सलाडचे प्रकार… एवढे सगळे पदार्थ आहेत तर त्याबरोबर पोळी किंवा भाकरी मिळेल तर किती मजा येईल असे मनात येईतो मागून प्रश्न आला, “हॅल्लो सर, लाइक टु हॅव रोटी?” उत्स्फूर्तपणे “वॉव” असा प्रतिसाद आला आणि उरलेले पोटही भरून गेले. ओळीत मांडलेली टेबले, मधे मधे छोट्या छोट्या फायर-प्लेसेस, वाद्यवृंद, झोपड्या… अगदी मस्त माहोल होता. थोडी चौकशी केली तर दुपारच्या जेवणाच्यावेळी थोडक्यात चुकामुक झालेले बल्लवाचार्य भेटले. ते चक्क मुंबापुरीचे पूर्वरहिवासी निघाले. ते आणि आम्ही अगदी एका गावचेच की! मग तर रोटी जास्तच गोड लागली. सगळे पदार्थ नुसते चाखून पाहिले तरी पोट तुडुंब भरले, निद्रादेवी खुणावू लागली व पाय आपोआपच खोलीच्या दिशेने पडू लागले.

खोलीत पंखा होता पण हवेतला गरमा कमी करण्याएवढी ताकद त्याच्यात नव्हती. पलंग, गाद्या, उश्या सगळे छान होते पण थोडीशी डासांची गुणगुण बेचैन करत होती. दिवे नव्हतेच त्यामुळे भींतीवर हलणाऱ्या आमच्याच सावल्या खूप मोठ्या वाटत होत्या, कसेबसे कंदिलाच्या प्रकाशात झोपायचा प्रयत्न करत होतो तोच खोलीमागच्या व्हरांड्यात खुसफूस ऐकू आली. हळूच पडदा करून पाहिले तर एक हरीण आपल्या कुटुंबासह आमच्या खोलीपाशी मुक्कामाला आला होता. आपण कुठेही गेलो आणि कुणी आपल्याला भेटायला आले तर किती छान वाटते ना! तसेच एका हरिणाने सहकुटुंब भेट देऊन आमचे क्षेमकुशल विचारण्याचे सौजन्य दाखवले हे खूप म्हणजे खूपच छान वाटले आणि लगेच मस्त झोपही लागली एवढे मात्र खरे!

दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वा दुसरा फेरफटका होता. परत जीपची सफर. पण आज मात्र भीती अजिबात वाटत नव्हती. उलट कधी एकदा जीपमध्ये शिरतो याची उत्सुकता होती. पहाटेचा मस्त गारवा, चमकते दवबिंदू, अगदी झालेला सूर्योदय बघताबघता आम्ही रानात प्रवेश कधी केला कळलेच नाही. काल रात्रीचे रान ते हेच का असा प्रश्न पडावा एवढे सगळे सकाळच्या वेळी वेगळे दिसत होते. सकाळच्या-पहाटेच्या कोवळ्या उन्हात सगळे गवत कसे सोन्यासारखे लखलखत होते. झाडे ताजीतवानी होऊन वाऱ्यावर डोलत होती.

त्यावर तऱ्हेतऱ्हेचे पक्षी इकडून तिकडे आपले पंख फडफडवत घिरट्या घालत होते. त्यांचा चिवचिवाट वाऱ्याच्या शिळेला साथ देत होता. पक्षांच्या विविध जाती पाहायला मिळाल्या, काल आमच्या नादुरुस्त जीपला सोबत करणारे झेब्रे, हरणे आमची वाट तितक्याच उत्सुकतेने पहात होती. ते मोकळं सोनेरी रान, उडणारे पक्षी आजूबाजूला वावरणारे प्राणी….काहीही विसरणे केवळ अशक्यप्रायच!परत आलो तेव्हाही ओला टॉवेल व सरबताचा ग्लास तयार. या लॉजचे वैशिष्ट्य असे की, कोठेही सुवेनीर शॉप, रेस्टॉरंट, शॉपिंग सेंटर नाही. चहा पाणी, न्याहारी, जेवण सगळे सगळे इथेच. टी.ही. फोनची गरज खरं तर किती कमी असते याची जाणीव झाली. पहाटेचा वेक अप कॉलही प्रत्येक खोलीच्या दारावर हाताची थाप देऊनच दिला गेला. किमान पण सर्व अत्यावश्यक सुखसोयी पुरवणारं हे लॉज एक वेगळाच अनुभव देणारं ठरलं. भीती मनात घेऊन सुरू झालेली सफर खूप आनंद व खूप सारे अनुभव घेऊन मजेत झाली. पण आपल्या अगदी दारात सहकुटुंब आलेल्या हरीणकुटुंबीयांचा पाहुणचार करायचा राहून गेला याची मात्र मनात रुखरुख राहून गेली!!!!!!!!!!

–अनामिका बोरकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..