नवीन लेखन...

सफर सम्राट

दैनिक रोजची पहाट’चे प्रमुख वार्ताहर काका सरधोपट बरोबर दहा वाजता ‘सफर सम्राट’ म्हणजे ज्याला आपण प्रचलित मराठीत ‘किंग ऑफ सफारी म्हणतो, त्या राघोभरारींच्या सोनेरी सफरच्या कार्यालयात म्हणजे ज्याला प्रचलित मराठीत ‘ट्रॅव्हल एजन्सी’ म्हणतो तिथे पोचले. दैनिक ‘रोजची पहाट’च्या पर्यटन विशेषांकासाठी त्यांची मुलाखत घ्यायला. मुलाखतीची वेळ सकाळी सव्वादहाची होती आणि राघोभरारी हे वेळेच्या बाबतीत फार आग्रही असतात असं संपादकांनी काकांना बजावलं होतं. शिवाय सोनेरी सफरने दोन पानी ‘संपूर्ण पानभर’ म्हणजे प्रचलित मराठीत ज्याला आपण ‘फुल पेज’ म्हणतो तशी जाहिरात दिली होती याची जाण ठेवा असा सल्लाही दिला होता. तर काकांनी सोनेरी सफरच्या कार्यालयात बरोबर दहा वाजता येण्याचं प्रयोजन काय यासाठी एवढी प्रस्तावना पुरे आहे.

सोनेरी सफरच्या भव्य कार्यालयाचं भव्य काचेचं दार ढकलून काकांनी आत प्रवेश केला. आत सगळं कसं अगदी चकाचक! लखलखीत उजेड, सर्व भिंती पूर्ण उंचीच्या रंगीबेरंगी छायाचित्रांनी भरलेल्या, त्यात पर्यटकांची पूर्णकृती रंगीत छायाचित्रं, पाण्यात, बर्फात, पावसात, समुद्रकिनारी, डोंगरावर, बोटीवर, विमानात, पंचतारांकित हॉटेलात ताव मारताना, हसणारी, खिदळणारी, अशी जणू नंदनवनातच विहार करताहेत अशी, असं अगदी स्वर्गीय वातावरण दिसत होतं. समोरच संपूर्ण काचेच्या ‘स्वागत मेजावर’ म्हणजे प्रचलित मराठीत ‘रिसेप्शन काऊंटर’ म्हणतो त्यावर एक सुंदर ‘स्वागत सुंदरी’ म्हणजे प्र.म. आपण ‘रिसेप्शनिस्ट’ म्हणतो, बसली होती. ती काकांकडे पाहून गोड गोड हसली. (इथून पुढे मूळ इंग्रजी आणि त्याचा प्रचलित मराठी पर्याय आला तर तो वाचकांनी समजून घ्यावा म्हणजे सारखं सारखं ‘प्रचलित मराठीत’ ही पुनरुक्ती टळेल (एकदाची!)

“या ना आजोबा, सोनेरी सफरमध्ये आपलं स्वागत! आपण कोणत्या पॅकेजसाठी आला आहात? एकटेच का आपली पत्नी पण आहे? का आपलं कुटुंब? का आपला एखादा ग्रुप? कोणतं पॅकेज हवंय आपल्याला? कुठे जायचंय सफरीला? आमच्याकडे सर्व पर्याय आहेत. हा हा पहा एक…

“अहो, मला कुठलंच गाठोडं म्हणजे तुमचं ते पॅकेज नकोय. मी काका सरधोपट. ‘रोजची पहाट’चा वार्ताहर. राघोभरारी साहेबांची मुलाखत घ्यायला आलो आहे.”

“ओह! आय सी! आय अॅम सॉरी!” ती मराठी फारच छान बोलत होती. “तुम्हीच का ते काका सरधोपट? हो, मी इथे तसं लिहूनच ठेवलं आहे तुमचं नाव. सव्वादहाची अपॉइंटमेंट आहे ना? मग जा जा लवकर. साहेब तुमचीच वाट पाहत आहेत. तुम्हाला फक्त अर्धा तास दिला आहे. मग ते भरारी घेणार आहेत.”

“भरारी म्हणजे?”

“म्हणजे न्यूर्यार्कला जाणार आहेत. बाय प्लेन!”

काकांनी तात्काळ राघोभरारींच्या चेंबरकडे भरारी मारली. दारावर टक टक करून म्हणाले, “साहेब, मी येऊ का आत?” मग मराठीत म्हणाले, “मे आय कम इन सर?”

“या या. बसा. कोण आपण? काय सेवा करू आपली? लवकर सांगाल तर बरं. माझी आता एक अपॉइंटमेंट आहे.”

“मी त्यासाठीच आलोय साहेब. मी काका सरधोपट. दैनिक ‘रोजची पहाट’चा वार्ताहर.”

“ओऽह आय सी! काम सुरू करा तर मग.” असं म्हणून राघोबाजींनी एक लठ्ठ चिरूट पेटवला, उठून बाजूच्या भपकेदार सोफ्यावर बसले, पायावर पाय टाकून एक रुबाबदार पोज घेऊन म्हणाले, “हां, विचारा आता.”

काकांनी पॅड-पेन्सिल उचलून पहिला प्रश्न विचारला, “राघोबाजी, आपण हा एवढा प्रचंड व्यवसाय इतक्या थोड्या वेळात इतका भरभराटीला कसा नेलात? एवढी भरारी घेऊन आपण अल्पावधीतच पर्यटनाचे बादशहा झालात याच रहस्य काय?”

राघोबांनी मंद स्मित केलं, पाइपमधून धुराची भेंडोळी सोडली. तोच क्षण पकडून काकांनी आपल्या छोट्या झूम कॅमेऱ्याने त्यांचे चार-पाच पटापट फोटो घेतले. राघोबाजी खूश झाल्याचं दिसलं.

“त्याचं काय आहे काका, याच काय पण कोणत्याही व्यवसायात विश्वास, प्रामाणिकपणा, सचोटी, पारदर्शकता याला मी फार मान देतो. आमच्याकडे येणारे कस्टमर्स एकदा आल्यावर पुन्हा पुन्हा यावेत अशी आम्ही काळजी घेतो.

(मनात एकदा हजारो रूपये खर्च केल्यावर कोण येतोय म्हणा बोंबलायला?)”

“छान, पण या धंद्यात फार टोप्या घालतात म्हणे आजकाल?”

“हो, खरं आहे ते. फार स्पर्धा वाढली त्याचा हा परिणाम, पण आम्ही त्यातले नाही

हां. हां, आता कधीतरी गैरसमज होतात. नाही असं नाही, पण त्याला काही इलाज नसतो काका.”

“म्हणजे?”

“म्हणजे असं पाहा, लोकांना आपल्या अपेक्षा काय आहेत हेच कळत नाही. काय काय पाहायचं? कुठे कुठे जायचं? कोणतं पॅकेज निवडायचं याचा फारच घोळ घालतात. नवरा एक म्हणतो, बायकोचं दुसरंच टुमणं असतं, मुलांचं तिसरंच म्हणणं असतं, तर म्हाताऱ्या आईवडिलांना आपलं कसं होणार? प्रवास झेपणार का? औषधपाणी वेळेवर होणार का? दुपारी वामकुक्षी मिळेल का? याची फिकीर असते. हजार कटकटी असतात. पूर्वी म्हणायचे ना, की घर पाहावं बांधून, तसं आता म्हणावसं वाटतं की, सफर पाहवी करून!”

“पण राघोबाजी, अशी काळजी वाटणं तर स्वाभाविकच आहे. नाही का?”

“हो, आहे ना. कोण नाही म्हणतो? म्हणूनच तर आम्ही मार्गदर्शन करतो. सगळं समजावून देतो. सगळे पर्याय समोर ठेवतो. त्यांच्या सोईसाठी कार्यक्रमात थोडेफार बदलही करतो. अहो काका, शेवटी त्यांची खुशी हीच तर आमची बक्षिशी!”

“पण साहेब, सगळ्यांना खूश करायचं म्हणजे मोठी तारेवरची कसरतच असणार नाही?”

“हो तर. फार कठीण असतं ते काम. अहो, सगळ्यांना लग्न तर धूमधडाक्यात करायचं असतं, पण साखरपुड्याचा खर्चही परवडत नाही म्हणतात!”

“फारच कठीण. मग यातून कसा मार्ग काढता?”

“तेच तर आमच्या धंद्याचं वैशिष्ट्य.”

सफरीवर जाण्यापूर्वी आम्ही एक अर्ज व फॉर्म भरून घेतो. त्यात शंभर एक अटी असतात. कागद उगाचच वाढू नये म्हणून आम्ही त्या खूप बारीक टाइपमध्ये छापतो. आपली वीज बिलं, दूरध्वनी बिलं असतात ना त्यांच्या मागचं तुम्ही कधी वाचलं असेल तर कळेल तुम्हाला. त्यात आम्ही एक कलम टाकतो- ‘आमची सफर छान झाली. राघोभरारी हे खरोखरच सफरीचे सम्राट आहेत. सोनेरी सफरला सफर आयोजनात पर्याय नाही.”

“त्यावर तुम्ही आधीच सह्या घेता?”

“हो, अर्थातच!”

“पण लोक सफरीपूर्वीच सह्या करतात?”

“काका, त्याचं काय आहे अहो, एकतर सफर संपल्यावर लोकांची कधी एकदा घरी जातो अशी घाई असते. आता कुठे वेळ असतो वाचत बसून सह्या करायला? सफा सुरू होण्यापूर्वी त्यांना घाई असते सफर कधी सुरू होतेय याची! म्हणजे दोन्ही वेळा त्यांना संपूर्ण अर्ज वाचायला सवड नसते. शिवाय एकंदरीतच लोकांना मुळात असलं काही वाचायचाच कंटाळा असतो. चांगली शिकली सवरलेली माणसं पण असं करतात. आता त्याला आमचा काय इलाज?”

“वा! वा! हे आपण फारच छान करता. त्यामुळे आपल्या सफरी अगदी शंभर टक्के यशस्वी होत असतील नाही?”

“हो तर. प्रश्नच नाही! त्याचा लेखी पुरावाच ठेवतो आम्ही. आमच्याकडून कधीही कसलीही कसर किंवा तक्रारीला वाव ठेवत नाही. अहो काका, शेवटी आमची पण काही प्रतिष्ठा असते ना?”

“एखादं उदाहरण देऊ शकाल का?”

“एखादंच का? शेकडो देतो की. परवाच दहा कुटुंबांचं एक पॅकेज नेलं होतं. चाळीस-पंचेचाळीसाचा ग्रूप होता. त्यात पंधरा-वीस ज्येष्ठ ! बी.पी., डायबेटीस, हार्ट ट्रबलवाले! लंडनला पोचल्यावर सर्व तरुण मंडळींना बोलावून एक बैठक घेतली. एका चहाच्या कपावर म्हणजे ओव्हर ए कप ऑफ टी! त्यांना ज्येष्ठांची समस्या समजावून दिली.”

“ज्येष्ठांची काय समस्या?”

“काका, आधी पूर्ण ऐकून तर घ्या. मग विचारा.”

“ठीक आहे. सांगा.”

“त्यांना म्हणालो, ‘हे बघा मंडळी, स्थलदर्शनाचा कार्यक्रम म्हणजे प्रोग्रॅम खूप धावपळीचा असतो. ती दगदग ज्येष्ठांना झेपत नाही. त्यामुळे त्यांना झेपेल असा त्यांना खास प्रोग्रॅम देतो. तुमची एका वेगळ्या मिनीबसने सोय करतो. मस्त स्थलदर्शन करा. बिनधास्त शॉपिंग करा. आईचे गुडघे दुखतात का? बाबांचं बी.पी. वाढलं का? थकवा जाणवतोय का? असल्या काही काळज्या करायच्या नाहीत. त्या आम्ही करू. अगदी आमच्या आजीओजोबांसारखी त्यांची काळजी घेऊ. त्यांना हे पटलं.”

“मग सफरीचा चार्ज ज्येष्ठांसाठी वेगळा असेल?”

“छे! छे! तो सगळ्यांना सारखाच. एकदा करार झाला म्हणजे त्यात फेरबदल नाही. शिवाय हा बदल त्यांच्याच सोईसाठी होता ना?”

“मग ज्येष्ठांची काय सोय केली?”

“त्यांची पण केली ना. त्याला आम्ही ‘कट्टा स्पेशल’ असं म्हणतो.”

“कट्टा स्पेशल म्हणजे?”

“म्हणजे दोन वेळ भरपेट गरमागरम जेवण. ते पण पथ्याचं (मनात म्हणजे तेल, तूप, साखर मसाल्यांची बचत) चहा, नाश्ता वेळच्या वेळी. दुपारची वामकुक्षी. शिवाय त्यांच्या दिमतीला आमचे आजोबा-आजी पण होतेच!”

“तुमचे आजोबा-आजी?”

“हो ना. प्रत्येक सफरीवर असतात!”

“काय सांगता काय?” काकांचा जबडाच वासतो.

“अहो, म्हणजे तो सँटाक्लॉज असतो ना. तसे आम्ही पगारी नाटकवाले ठेवले आहेत. ते आजोबा-आजी होतात. भजन, कीर्तन, प्रवचन यांत पटाईत असतात. व.पु., पु.ल. यांच्या कथांचं कथन करतात. कविता वाचन, मराठी नवी जुनी भावगीतं यांचे ‘चांदण्यांचे लेणे’ सारखे मस्त कार्यक्रम म्हणजे प्रोग्रॅम करतात. अगदी धम्माल उडवतात. ज्येष्ठ मंडळी जाम खूश होतात.”

“मग स्थलदर्शन वगैरे नाही का?”

“वा! ते नाही म्हणजे कसं? ते पण असतं ना. कट्ट्यावरच मध्ये जंबो स्क्रीनवर सर्व प्रसिद्ध स्थळाचं दर्शन घडवतो. मध्येच एखादं स्थळ गोठवून म्हणजे ‘फ्रीज’ करून ज्यांना हवं त्यांना त्या पार्श्वभूमीवर फोटो काढून देतो. बसल्या बसल्या काहीही शारीरिक कष्ट न करता त्यांची सफर होते. जाम खूश झाली मंडळी.”

“पण हे परदेशात जाऊन एवढा खर्च करून करायचे तर ते इथेच नाही का करता येणार? तुमच्या कार्यालयामध्ये?”

“नाही. त्याचं काय आहे काका, इथे कुणाला फुरसत नसते. घरच्या काळज्या, जबाबदाऱ्या असतात. सफरीवर तसं नसतं. खाना, पीना, मजा करना. शिवाय प्रवासाचं आणि त्या त्या देशात जायचं पण एक थ्रिल मिळतं ना?”

“वा! वा! राघोबाजी, आपल्या यशस्वितेचं मर्म समजलं, पण मग हे कट्टा स्पेशल आपण त्यांना आधीच का नाही सांगत?”

“असं पाहा काका, आधी सांगितलं तर लोकांना वाटतं, हा काहीतरी पैसे वाचवण्याचा यांचा डाव दिसतोय, पण एकदा जेट विमानाची एक लंबी सफर झाली की ज्येष्ठांची समस्या त्यांना पटते. अहो, शेवटी अनुभवानेच तर शहाणपणा येतो ना?”

“हो, खरं आहे आपलं. राघोबाजी, या क्षेत्रात आपण काही मूलगामी संकल्पना आणल्या आहेत असं ऐकतो. खरं आहे का ते? काय आहेत त्या संकल्पना?”

“फार मूलगामी स्वरूपाच्या आणि या क्षेत्राला एक जबरदस्त कलाटणी देणाऱ्या  आहेत त्या. आपल्या समाजाची अस्मिता, देशप्रेम, मानदंड, प्रादेशिक अस्मिता इत्यादींचा विचार करून मी विविध पॅकेजेस प्रायोगिक तत्त्वावर बनवली आहेत. फार उत्तम प्रतिसाद मिळतोय त्यांना.”

“राघोबाजीसाहेब, हे देशप्रेम, अस्मिता वगैरे सारं फारच अभिनव दिसतं आहे. जरा नीट समजावता का?”

“काका, आपणाकडे पर्यटन म्हणजे फक्त स्थलदर्शन अशी संकल्पना रुजली आहे. पर्यटनाला गेलं म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री अंथरुणाला पाठ टेकेपर्यंत नुसतं वाघ मागे लागल्याप्रमाणे, हे बघ, ते बघ अशा शंभर गोष्टींसाठी पर्यटकांना पळवत असतात. अमका म्हणतो तुम्ही अमुकअमुक बघायलाच हवं. तमका म्हणतो तुम्ही तमुकतमुक बघायलाच हवं. कुणी म्हणतो हे सर्वतर आम्ही दाखवतोच पण आमच्याबरोबर आलात तर आम्ही दोन अगदी ‘तुम्ही बघायलाच हवी’ म्हणजे ‘यू मस्ट सी’ अशी स्थळं अगदी फुकट दाखवतो! (बहुदा रात्री किंवा बसमधून जाता जाता दाखवतात) काय वाट्टेल ते सांगतात. अहो काका, आता असं बघा, सफर ती किती दिवसांची? जेमतेम आठ-पंधरा दिवसांची! त्यात जाण्यायेण्याचे, जेटलॅगचे असे तीन-चार दिवस असतात. तीन-चार दिवस शॉपिंगला द्यावेच लागतात. उरलेल्या दिवसांत यू मस्ट सी! मग ती सफर म्हणजे नुसता एक शिवाशिवीचा खेळ होतो. मला हे सगळं बदलायचंय. या व्यवसायाला एक वेगळाच चेहरामोहरा घ्यायचाय!”

“काय आहे ते आपलं भव्यदिव्य स्वप्न?”

“सांगतो. आता हे पाहा,” असं म्हणून राघोबाजींनी टी पॉयवरचा पेपरवेट उचलला आणि तो हातात फिरवत फिरवत ते विचार करू लागले.

“हा पेपरवेट आहे.” काका.

“अहो, तसं नाही हो. हे पाहा म्हणजे ऐका!”

“असं असं. बरं सांगा, ऐकतो.”

“हं, आता हे पाहा,”

काकांनी पॅडवर पेन्सिल टेकवली आणि म्हणाले, “हे सांगा, ऐकतोय मी.”

“अहो, ऐकतोय नाही आता खरंच पाहा इकडे !”

काकांनी त्यांना दाखवलेल्या दिशेकडे पाहिलं. तिथे भिंतीवर मोठमोठ्या आणि दिमाखदार रंगात नवीन पॅकेजेसची जाहिरात होती.

पॅकेज नं. १. कॅलिफोर्निया गजाली!

पॅकेज नं. २. चला ग सयांनो!

पॅकेज नं.३.अंगाश्शी भर मापटं!

पॅकेज नं.४. ने मजसी ने!

पॅकेज नं.५. भारतीय आजीआजोबा!

“वाचलंत?”

“हो वाचलं, पण हे जरा समजावून सांगता का? फारच नाविन्यपूर्ण वाटतंय!”

“वाटणारच! आता हेच पाहा, पॅकेज नं. १ हा ‘अस्मिता’ पॅकेजचा नमुना!”

“तो कसा?”

“काका, आपण म्हणतो कोकणचा कॅलिफोर्निया करू, पण कोकण रेल्वे होता होता पन्नास वर्षे गेली. आता कोकणचा कॅलिफोर्निया होईस्तोवर कॅलिफोर्नियाचा चंद्रलोक होईल! म्हणून हे पॅकेज!”

“त्यात कसली ‘अस्मिता’ आहे राघोबासाहेब?”

“कोकणी, विशेषत: मालवणी माणसाला वाटतं की, माका मालवण तोच बेस्ट आसा. कुठेही गेलं तरी तो म्हणतो, माझा तोच खरा! अशा ग्रूपसाठी हे पॅकेज. त्याच कॅलिफोर्नियाला जाऊन, गजाली, मालवणी फूड, दशावतार हे सगळं मालवणी रसायन अगदी खच्चून भरलंय!”

“पण पर्यटनाचं काय?”

“काका, मला सांगा, अहो इथे शिवाजी पार्कमध्ये किंवा कुठल्या तरी शाळेच्या टिचभर पटांगणात मालवणी जत्रा भरवण्यापेक्षा तीच जर थेट कॅलिफोर्नियात भरवली, तर मालवणीचा झेंडा अगदी अटकेपार म्हणजे थेट परदेशात नाही का फडकणार? अहो, आमचं हे पॅकेज पुढची पाच वर्षे फुल्ल झालं आहे!”

“काय सांगता काय? कमाल आहे. आता हे दुसरं पॅकेज. त्याची काय खासियत आहे राघोबासाहेब?”

“ते ना? चला ग सयांनो. ते पण असंच खूप पॉप्युलर झालंय बरं का काका. अलीकडे महिलांमध्ये फार जागृती आली आहे. सर्व क्षेत्रांत त्या धडाडी मारतात. अशा महिलांसाठी हे खास! यात फक्त महिलांची टोळी म्हणजे ग्रूप असतो. त्यासाठी आम्ही राघोभरारीची ‘झांसीकी रानी’ ही खास महिला शाखा उघडली आहे.”

“वा! नाव तर झकास आहे. याचं वैशिष्ट्य?”

“यात आम्ही पूर्वरंग आणि अपूर्वरंग अशी दोन पॅकेजेस देतो. पूर्वरंगमध्ये सिंगापूर, जपान, बाली स्पेशल आणि अपूर्वरंगमध्ये अनारसे आणि तूसाँ स्पेशल देतो.”

“म्हणजे?”

“म्हणजे जपानमध्ये संगणक कार्यशाळेमध्ये एक आठवड्याचं प्रशिक्षण शिबिर असतं आणि सिंगापूरमध्ये प्रसिद्ध मॉल्समध्ये एक आठवडा तिथे काऊंटरस्टाफला प्रत्यक्ष मदत करण्याचं प्रशिक्षण असतं. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभव मिळतो. निरीक्षण, व्यापाराचा सखोल अभ्यास होतो. निरीक्षण आणि सफर असा दुहेरी फायदा होतो. शिवाय प्रवासवर्णने तिथल्या व्यापाराची अंतर्गत माहिती, समाजवर्तन या विषयांवर भरपूर लेखन करता येत ते वेगळंच!”

“वा! वा! फार छान! आणि ते अनारसे, तूसाँ हे काय प्रकरण आहे?”

“ते ना? ते अपूर्वरंगमध्ये लंडनला मॅडम अनारसे यांचा भारतीय उद्योगाचा युरोपातला उदय अभ्यासण्यासाठी त्यांच्या हॉटेलमध्ये एक आठवडा प्रत्यक्ष टेबल सर्व्हिस देण्याचा, त्यांच्या कारखान्यात लोणची, पापड बनवण्याचा अनुभव घेता येतो. शिवाय मादाम तूसाँ यांच्या मेणाच्या म्युझियमच्या वर्कशॉपमध्ये शिबीर असतं. तिथून परतलेल्या बऱ्याच ‘सयां’नी इथे आल्यावर त्या अनुभवांच्या जोरावर नवेनवे उद्योग सुरू केले आहेत!”

“वा! वा! आता हे तिसरं पॅकेज-‘अंगाश्शी भर मापटं’-हा काय प्रकार आहे?”

“ते खास ‘कोल्हापुरी’ बाणावाल्यांसाठी. त्यात विदेशात जाऊन विविध मद्यांच्या तन्हा मापटं भरभरून चाखता येतात. तांबडा-पांढरा रस्सा, झणझणीत तिखटाचं जेवण, दिलखूश लावणी ती पण हिमवर्षावात, लावणी सुंदऱ्यांबरोबर शॉपिंग असा खास कार्यक्रम देतो. राजकारणी मंडळीत फार पॉप्युलर झालंय हे पॅकेज! इथे चौफुल्यावर जे उघड उघड जमत नाही ते तिथे खुल्लमखुल्ला करता येतं. शिवाय सफरीचा खर्च परस्पर स्वीस अकाऊंटमधून करण्याची आम्ही सोय करतो!”

“वा! वा! फार छान! पण रावबाजीसाहेब, ते हिमवर्षावात लावणी? माझ्या नाही ध्यानात आलं.”

“ते ना? अहो, लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क, टोकियो इथे जेव्हा हिमवर्षाव होत असतो ना, तेव्हा मोठमोठ्या काचेच्या खिडक्यांच्या हॉलमध्ये बसून हिमवर्षाव पाहत फेसाळलेले मद्य चषक गटागट रिचवत करायची मज्जा!”

“वा! वा! भरारीसाहेब, काय एकेक कल्पना! लाजवाब! आता सांगा, हे ‘ने मजसी ने हा काय प्रकार?”

“हे राष्ट्रभक्तीने पेटलेल्या लोकांसाठी खास! मध्यंतरी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रकरण फार गाजलं ना, त्यावरून सुचली मला ही कल्पना!”

“हो का? काय आहे तिचं वैशिष्ट्य?”

“त्यात अंदमान बेटावर जाऊन, सावरकर स्मारकाची धूळ कपाळी लावून, सागरतीरावर ‘ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला’ हे गीत सगळ्यांनी कोरसमध्ये म्हणायचं आणि आदरांजली वाहायची!”

“वा! फारच छान! पण एवढंच पॅकेज?”

“छे! छे! एवढंच कसं? चांगला पंधरा दिवसांचा कार्यक्रम आहे. त्यात आठ दिवस सेल्युलर जेलमध्ये राहायचं, स्वातंत्र्यवीरांना जसा कोलू लावला होता तसा लावायचा, चक्की पिसायची, जाडीभरडी भाकरी खायची असं अगदी तेव्हाचं थ्रील अनुभवायचं!”

“छान कल्पना आहे, पण साहेब, हे कोलू, जेल, चक्की म्हणजे जरा अतीच वाटतं नाही?”

“अहो, ते सगळं नकली. प्लास्टिकचं हलकं हलकं. जेल कोठडीपण वातानुकूलित. भाकरी जाडीभरडी पण खायला मऊ, गरम आणि खुशखुशीत! शिवाय बरोबर वांग्याचं भरीत, खर्डा असा खमंग बेत! शिवाय जेलच्या मागेच समुद्रकिनाऱ्यावर बोटींग, स्वीमिंग, सी फूड वगैरे पंचतारांकित सोई देतोच!”

“वा! वा! भरारीसाहेब, आपण महान आहात. या क्षेत्रात आपण नक्कीच मोठी क्रांती करणार आहात. बरं पण हे ‘भारतीय आजीआजोबा’ हे काय आहे? हा पण आपला असाच काहीतरी क्रांतिकारक प्रयोग दिसतोय?”

“हो, ते तर आमचं सर्वात मोठं आणि लोकप्रिय पॅकेज आहे. सहा महिन्यांचं आणि तेही फुकट!”

“काय सांगता? सहा महिने? आणि तेही फुकट? साहेब, आपण पर्यटनाचे राजा नसून जादूगारच आहात असं म्हणायला पाहिजे. हे कसं शक्य आहे?”

“काका, अलीकडे बहुतेकांची मुलं, मुली, सुना परदेशी शिकायला जातात, तिकडेच नोकरीला लागतात आणि मग स्थायिकही होतात. सुरुवातीला मजा वाटते पण खरी अडचण येते ती पुढे.”

“ती कोणती?”

“जेव्हा मुलं होतात तेव्हा. तेव्हा आजीआजोबांची आठवण येते. मग आजीआजोबा किंवा फक्त आजी तिकडे जातात. सहा महिने राहतात. बाळंतपण वगैरे करतात आणि परत येतात. तिकडे कायमचं राहणं त्यांना भावत नाही. अशा ‘अनुभवी’ आजीआजोबांसाठी आहे हे आमचं खास पॅकेज!”

“काय खास आहे या पॅकेजमध्ये?”

“आम्ही परदेशातल्या गरजू आणि फक्त परदेशी कुटुंबाचा शोध घेतो. ज्यांना नवजात बाळाचं संगोपन करायला मुलं सांभाळणारी माणसं म्हणजे ज्यांना तिकडे बेबीसीटर्स म्हणतात, ती लागतात.”

“का बरं? फक्त परदेशीच का?”

“परदेशी जोडपी अशा बेबीसीटर्सना भरपूर पैसे देतात तसे आपले लोक देत नाहीत. हे पैसे आम्ही त्यांच्याकडून आधी तीन महिन्यांचे अॅडव्हान्स घेतो. राहिलेल्या तीन महिन्यांचे कॉन्ट्रॅक्ट पुरं झाल्यावरच घेतो. अनुभवी भारतीय आजीआजोबा किंवा फक्त आजी आम्ही त्या कुटुंबात पाहुणे म्हणजे गेस्ट म्हणून पाठवतो. तिथे ते पाहुणे म्हणून राहतात. मुलांचं संगोपन मायेने करतात. आमच्या अटीप्रमाणे यजमान त्यांना वीकएंडला जवळपास फिरवून आणतात. काही आजीआजोबा यजमानांना भारतीय खाद्यपदार्थही हौसेने करून खिलवतात. सहा महिन्यांत कुटुंबाचा लळा लागतो. आजीआजोबांची छान बडदास्त होते. दोघेही खूश! सहा महिन्यांनी परत येतात तेव्हा चांगले टुणटुणीत होऊन! तुमचा विश्वास बसणार नाही काका, पण अहो जेव्हा विमानतळावर लाडक्या आजीआजोबांना निरोप द्यायला हे यजमान जातात ना तेव्हा ते काय म्हणतात माहीत आहे?”

“काय, काय म्हणतात ते?”

“ते म्हणतात, पुढच्या वर्षी लवकर या! आता बोला!”

“वा! वा! वा! राघोबासाहेब, फारच विलक्षण! आपण या व्यवसायाची नस बरोबर पकडली आहे. पर्यटन म्हणजे स्थलदर्शन, हा घिसापिटा फॉम्युला आपण मुळापासून बदलून या क्षेत्राला एक नवी दिशा देत आहात. आपल्या नावाला साजेशीच आपण फार मोठी भरारी घेत आहात! आपल्या नवविचारांनी हे पर्यटन क्षेत्र अशाच उंच उंच भराया घेत राहो अशी सदिच्छा! धन्यवाद!”

“मग मी घेऊ भरारी?”

“कुठे?”

“न्यूयॉर्कला!”

“हो, हो, अवश्य!”

बाहेर पडल्यावर स्वागत सुंदरीने काकांच्या हातात एक पुस्तिका म्हणजे पॅम्प्लेट ठेवलं. खास पत्रकारांसाठी ताजं पॅकेज! ‘उखाळ्या पाखाळ्या सफरी’ म्हणजे प्रचलित मराठीत ‘गॉसिप पॅकेज!

-विनायक रा. अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 88 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..