नवीन लेखन...

‘सातवं’ घर

चाळीस वर्षांपूर्वी सदाशिव पेठेत असताना आमच्या शेजारी संतोष नावाचा मुलगा रहात असे. त्याच्या वडिलांचं गाद्या, उशा, बेडशीट, कुशनचं दुकान होतं. चौदा पंधरा वर्षांचा संतोष शेजारच्या मुलांबरोबर घरी यायचा. सदैव बडबड करणारा संतोष सर्वांचा लाडका होता. गंमतीने आम्ही कधी त्याच्या लग्नाचा विषय काढला तर तो ‘मी लग्न करणारच नाही.’ असं ठासून बोलायचा. मी त्याला म्हणालो, ‘संतोष, तुझं काय सांगावं? उद्या तू आम्हाला शेंडी लावशील आणि लग्न करून मोकळा होशील!’ संतोष गोंधळून गेला. त्याने मला कागद व पेन मागितले. लागलीच त्याने कागदावर ‘मी आयुष्यात कधीही लग्न करणार नाही. – संतोष’ असं लिहून दिलं. मी तो कागद जपून ठेवला.
संतोष मोठा झाला. वडिलांचं दुकान सांभाळू लागला. त्याचं लग्न झाल्याचं समजल्यावर मी त्यानं लिहिलेल्या ‘प्रतिज्ञे’ची फ्रेम करुन त्याला घरी जाऊन सप्रेम भेट म्हणून दिल्यावर त्याच्या पत्नीसमोर, संतोषचा चेहरा ‘फोटो’ काढण्यासारखा झाला होता….
काॅलेजमध्ये असताना रमेशचा एक किरण नावाचा मित्र होता. तो दिसायला अतिशय देखणा होता. सर्वजण त्याला अनिल धवन म्हणायचे. काॅलेजनंतर तो जन्मगावी, बेळगावला गेला. त्याचं पहिलं लग्न काही वर्षच टिकलं. दुसरा संसार दहा वर्षे झाला. पुन्हा बिनसल्यामुळे त्यानं तिसऱ्यांदा आपलं नशीब अजमावलं. आता तिसऱ्या विवाहानंतर त्याचं जीवन सुरळीत चालू आहे.
प्रत्येकाच्या कुंडलीतील ‘सातवं घर’ हे लग्नाबद्दल खूप काही सांगत असतं. तिथं जर शुभ ग्रह असतील तर लग्न, संसार सुखाचा होतो. तेच जर बिघडलेलं असेल तर सुखाची उणीव रहाते. कुणाचं ‘सातवं घर’ कसं असेल हे ज्याच्या त्याच्या जन्म वेळेवर अवलंबून असते.
१९८२ साली माझा मावसभाऊ, सदाशिव हा एअरफोर्समध्ये नोकरीला होता. पुण्यात असताना आम्ही त्याला भेटायला लोहगावला जायचो. त्याला दोन मुली व एक मुलगा. तिन्ही मुलं अभ्यासात हुशार. काही वर्षांनी तो निवृत्त झाला व एक्स सर्व्हिसमन म्हणून सावंतवाडी येथील बॅंक आॅफ इंडियात नोकरीला लागला. आम्ही दोघे दिवाळीच्या सुट्टीत सावंतवाडीला गेलो. तेव्हा ही तिन्ही मुले सहावी ते नववीच्या वर्गात शिकत होती. त्यांच्या प्रगतीपुस्तकावरुनच त्यांचा उज्ज्वल भविष्यकाळ दिसत होता.
मधे बरीच वर्षे गेली. एक दिवस थोरल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका आली. आम्ही फलटणला लग्नाला गेलो. लग्नानंतर ती मुलगी आपल्या पतीबरोबर अमेरिकेला गेली. दोन वर्षांनी धाकटी शिक्षिका झाली होती, तिचे लग्न एका शिक्षकाशीच झाले. दरम्यान महेशचं शिक्षण पूर्ण होऊन तो आयटी मध्ये नोकरी करु लागला होता.
एकदा महेशला सावंतवाडीची आठवण झाली. त्याने गाडी काढली आणि सावंतवाडीला पोहोचला. मित्रांना भेटला. ज्या शाळेतून बाहेर पडून त्याला दहा वर्षे झाली होती, त्या शाळेत गेला. आपल्या दहावीच्या वर्गातील बाकावर बसून भूतकाळात पोहोचला. आपल्या गुरूजनांना भेटला. त्याच्या मुख्याधापकांनाही गहिंवरून आले. त्याने शाळेला मोठ्या रकमेची देणगी दिली. शाळेतील बोर्डावरील हुशार विद्यार्थ्यांमधील स्वतःचे नाव आपल्या मोबाईलमध्ये घेऊन तो शाळेबाहेर पडला.
मावसभावाने महेशसाठी मुली पहायला सुरुवात केली. मात्र महेश नेहमीच लग्नाला नकार देत राहिला. महेशने स्वतःच्या कमाईतून फोरव्हिलर घेतली. वर्षातून एकदा यात्रेसाठी गावी येणाऱ्या महेशकडे, त्याचे आजी आजोबा लग्नासाठी हट्ट धरु लागले तरी महेश तयार होईना. बहिणींनी खोदून खोदून विचारले तरीदेखील याचा नकार ठरलेला.
कंटाळून महेशचे आई वडील मोठ्या मुलीसाठी अमेरिकेला गेले. सहा महिन्यांनी परत आल्यावर महेशसाठी नांदेडसिटीत पाॅश फ्लॅट घेतला. त्याच्यासाठी पुण्यात राहिले. तो बंगलोरला गेल्यावर गांवी गेले. आता शेतीचे काम बघताहेत. आमची भेट झाल्यावर दोघंही आपली खंत बोलून दाखवतात. आम्हाला परमेश्वराने सर्व काही दिलं, फक्त महेशचे एकदा लग्न झालं की, आम्ही आमच्या कर्तव्यातून मोकळे!
खरं पहायला गेलं तर महेशचा काही प्रेमभंग झालेला नाही किंवा या विषयावर त्याला कोणी बोललंही नाहीये. आज त्याच्याकडे उत्तम नोकरी, फ्लॅट, कार सर्व काही आहे, मात्र त्याला लग्न नको आहे. पत्रिका पाहिली तर लग्नाचा योग उशीरा आहे असं दिसतंय. पण किती उशीर याला काही मर्यादा नाही.
एका बाजूला मुलं वयात येण्याच्या आधीच लग्नासाठी उतावीळ होतात. चित्रपट पाहून स्वतःच्या लग्नाची स्वप्नंं पहातात. एखादी मेनका, भल्या भल्या विश्वामित्रांची तपस्या भंग करते. याची मेनका कुठे दडून बसली आहे? कोण जाणे…
आज महेशचं लग्नाचं वय ओलांडून गेलं आहे. लवकरच त्याला चांगली जीवनसाथी मिळो आणि त्याचे ‘दोनाचे चार’ होवो….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२-१०-२०.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..