नवीन लेखन...

एस.डी. उर्फ सचिन देव बर्मन

“महान” या एकाच शब्दात ज्यांचे वर्णन करता येईल असे संगीतकार सचिन देव बर्मन उर्फ एस.डी.बर्मन सर्वार्थाने दादाच होते. त्यांचा जन्म १ आक्टोबर १९०६ रोजी झाला. केवळ १०० हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. पण मेलडी, ओर्केस्ट्रेशन, चाली, शब्दांची आणि गायकांची अचूक निवड या गोष्टींमुळे भारंभार संगीत देणाऱ्या इतर संगीतकारांपेक्षा ते खुप वेगळे होते. मणीपूरच्या राजघराण्यातले असल्याने वागण्या-बोलण्यात एक प्रकारची हुकुमत आणि रुबाब होता. सर्व जिनीयस लोकांचा असतो तसा एक प्रकारचा उर्मट, आढ्यताखोर आणि विक्षीप्तपणाही त्यांच्या वागण्यात होता. पण या सर्व अवगुणांवर त्यांच्या संगीतातल्या विविधतेने मात केली. आणि रसीकांना कायम मोहात पाडेल असे संगीत त्यांनी दिलं. एकाच चित्रपटात नायक / नायीकांसाठी त्यांनी बिनदिक्कत पणे वेगवेगळ्या गायकांचा वापर केला आणि तो यशस्वीही करून दाखवला. त्यांच्या चित्रपटातला देव आनंद एकाच चित्रपटामधे कधी किशोरच्या तर कधी रफी, हेमंतकुमार, तलत यांच्या आवाजात गायचा आणि विशेष म्हणजे त्या त्या ठिकाणी तोच आवाज योग्य वाटायचा. गायकांप्रमाणे त्यांच्या गाण्यातल्या वाद्यांची निवडही अचूक असायची. स्वत: गायक असले तरी आपला आवाज त्यांनी कधीही कुठल्या नायकाला किंवा सहकलाकाराला दिला नाही. त्यांनी गायलेली गाणी ही कायम पार्श्वभुमीवर वाजायची आणि त्या त्या चित्रपटातल्या कथेचा एक हिस्सा बनायची. उदा. “गाईड” मधले “वहॊं कौन है तेरा, मुसाफीर जायेगा कहॊं” असो किंवा “सुजाता” मधलं “सुन मेरे बंधू रे, सुन मेरे मितवा” असो, ही गाणी म्हणजे त्या चित्रपटाच्या कथेचाच एक भाग होती. बर्मनदांची आणखी एक देणगी म्हणजे किशोर कुमार यांच्या आवाजाचा त्यांनी केलेला वापर. “आराधना” मुळे किशोर जरी गायक म्हणून घोडदौड करू लागला असले तरी या आराधनापुर्वी किशोरच्या आवाजातली अनेक अजरामर गीते ही बर्मनदांनीच दिली आहेत. त्यांच्या स्वभावामुळे त्यांचं काही काळ लता आणि नंतर रफीशी पटत नव्हतं.

पण किशोरच्या बाबतीत ही गोष्ट कधीच घडली नाही. एखाद्या गायकाने गायलेले गाणे जर त्यांच्या मर्जीस आले नाही तर ते उघडपणे चारचौघात त्या गायकाला ही गोष्ट सुनवीत असत. “सुजाता” मधलंच तलतचं “जलते है जिसके लिए” हे गाणं याचं उत्तम उदाहरण आहे. अनेक रिर्हसल करूनही शेवटपर्य़ंत मा.तलत यांना हे गाणं जसं बर्मनदांना अभिप्रेत होतं तसं गाता आलं नव्हतं. शेवटी दिग्दर्शक बिमल रॊय यांनी रदबदली करून हा वाद मिटवला. विशेष म्हणजे संगीतकाराला शेवटपर्यंत न रुचलेलं हे गाणं तलतच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांमधलं एक आहे. किशोर कुमार यांच्या प्रमाणेच मन्ना डे यांच्या उत्कर्षाला देखील बर्मनदाच जबाबदार आहेत. आधी काही पौराणीक चित्रपटांची गाणी गाऊन आणि अपयशी ठरून कलकत्त्याला परत जाण्याच्या विचारात असलेल्या मन्नादांना त्यांचं पहिलं लोकप्रिय गीत – उपर गगन विशाल – हे बर्मनदांनीच दिलं. या गाण्याचं वैशीष्ट्य म्हणजे हे गाणं आधी बर्मनदांच्या आवाजात रेकॊर्ड होऊन त्याचं चित्रीकरणही झालं होतं. पण त्याच सुमाराला बर्मनदांचं निर्माता अशोक कुमारशी (चित्रपट – मशाल) बिनसलं.

पण व्यावसायिक करारामुळे बर्मनदांनी चित्रपटाला संगीत तर दिलं पण आपला आवाज वापरायला नकार दिला आणि हे गाणं मन्नादां कडे आलं. सिच्युएशन कुठलीही असो, भाव कुठलाही असो, हिरो-हिरोइन कोणीही असो, मा.एस.डी.बर्मन यांच्याकडे गाण्याचे काम असणे म्हणजे १०० टक्के निश्चिंत! गाणे त्या ठिकाणी चपखल तर बसणारच, ते हिटसुद्धा तेवढेच होणार. जणू काही परिसच. गायक-गायिका असो वा गाणे, बर्मनदांनी ज्याला हात लावला त्याचे सोने झाले.

एस.डी. बर्मन यांचे ३१ ऑक्टोबर १९७५ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2478 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..