नवीन लेखन...

रेशीमगाठी – भाग ३

“देशपांडे साहेब, तुमची बॅग माझ्याकडे आलीय. त्यात तुमचा जेवणाचा डबा होता. त्यावर तुमचं नाव आहे किशोर देशपांडे म्हणून. त्यावरून मी हा टेलिफोन नंबर शोधला. ती बॅग आणि डबा घेऊन तुम्हाला भेटायला येतो साहेब!”

“हे पाहा कुलकर्णी, नाव बरोबर आहे पण माझी बॅग वगैरे काही हरवलेलं नाही. मी कधी अंधेरीला जात नाही आणि डबाही नेत नाही. आता मी फोन ठेवतो. ती बॅग तुम्ही रेल्वे पोलिसांकडे जमा करा आणि परत मला फोन करू नका! समजलं? बाय!”

“काय झालं कुलकर्णी? काय म्हणाला तो?” जोशी.

‘अरे बदमाश दिसतोय रे.म्हणे मी ठाण्याला राहतो. डबाबिबा काही नेत नाही.

आता त्याच्या घरीच जातो! बघतो कसा देत नाही ते!”

“हे पहा कुलकर्णी, असं काही करू नकोस. त्याचा डिरेक्टरीतला पत्ता ठाण्याचाच आहे. तो बहुतेक खरंच सांगतोय. शिवाय समजा त्याने तुझी बॅग उचलली असेल तर त्याला तुझ्या कागदपत्रांचा काय उपयोग? त्यापेक्षा तू असं कर. पेपरमध्ये छोटी जाहिरात दे. अजून इंटरव्हाला वेळ आहे. तू रेल्वेकडेही तक्रार कर. काहीतरी मार्ग मिळेलच.” जोशी.

“अरे केदार, ही जाहिरात बघितलीय का?”

“काय आहे बाबा?”

“अंधेरी लोकलमध्ये एक व्ही.आय.पी. ॲरिस्ट्रोक्रॅट बॅग, तपकिरी रंगाची सापडली आहे. त्यात किशोर देशपांडे असं नाव असणारा डबापण आहे. तशीच बॅग त्याचे गाडीतून अदलाबदल होऊन गेली आहे. त्यात महत्वाचे पेपर्स आहेत. कृपया संपर्क साधावा.योग्य इनाम मिळेल. फोन नंबरही दिला आहे त्यांचा.”

“अंधेरी लोकल? पण बाबा, माझी बॅग तर ठाणे व्ही.टी. लोकलमधून हरवली शिवाय माझ्या डब्यावर केदार देशपांडे नाव असणार. मग हा किशोर देशपांडे कोण?”

“अरे, किशोरकाकांनी तुझ्या वाढदिवसाला तुला प्रेझेंट दिला होता ना तोच डबा मी रोज देत होते तुला!” आई.

“अग,पण माझा डबा आणि बॅग अंधेरी लोकलला कशी जाणार?”

“अरे केदार, अगदी सोपं लॉजिक आहे बघ. तुझी बॅग ठाणे कुर्ला दरम्यान गेली. चोर महाशय दादरला उतरले असावेत. वेस्टर्न रेल्वेने अंधेरी लोकल पकडून उलटे गेले. अंधेरीला लोकल खाली झाली. चर्चगेटचे प्रवासी चढले. त्यातच ते कुलकर्णी महाशयही चढले. त्यांनी त्यांची बॅग फळीवर ठेवली. ती पण कर्मधर्मसंयोगाने तुझ्या बॅगसारखीच! चोर महाशयांना काय आंधळा मागतो एक डोळा असा आनंद झाला असणार! त्यांनी ती उचलली आणि अंधेरीला उतरून गेले! गर्दीमध्ये कुलकर्णीच्या लक्षात ही अदलाबदल झालीच नसणार!” बाबांनी शेरलॉक होम्सच्या तोंडात मारील असा तर्क लढवला, पण तो पटण्यासारखा होता.

“हो बाबा. असंच झालं असणार, मी या जाहिरातवाल्या कुलकर्णीना आत्ताच फोन करतो.” मी फोन फिरवला.

“हॅलो, कोण कुलकर्णी का?”

“हो, कुलकर्णी बोलतोय. आपण?

“मी देशपांडे, ठाण्याहून बोलतोय.”

“ठाण्याहून?”

“हो. अहो. तुम्हीच आजच्या वर्तमानपत्रात छोटी जाहिरात दिली आहे ना? बॅगांची अदलाबदल झाल्याची?”

“हो, मीच दिली आहे.”

“अहो, माझीही बॅग चोरीला गेली आहे. तुम्हाला जो डबा सापडला ना तोही माझाच!”

“काय सांगता? देशपांडे, तुम्ही मस्करी तर करत नाही ना पुन्हा?”

“मस्करी? पुन्हा? अहो, काय बोलताय काय तुम्ही कुलकर्णी?”

‘अहो, परवाच मी तुम्हाला फोन केला होता तेव्हा तुम्ही म्हणालात माझी बॅगबिग काही हरवली नाही. मी डबाही कधी नेत नाही. आणि आता…”

“थांबा थांबा. कुलकर्णी, अहो तुम्ही काय बोलताय? कधी फोन केलात मला?”

“तुम्ही देशपांडेच बोलताय ना? किशोर देशपांडे?”

“किशोर देशपांडे? हां हां आता आलं लक्षात. आहो, ते माझे काका! मी केदार देशपांडे! तो डबा होता ना तो त्यांनीच दिला होता मला प्रेझेंट. म्हणून त्यांचेच नाव होतं डब्यावर!”

“ओह आय सी! पण देशपांडेसाहेब, अहो तुमच्या काकांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ती बॅग दादरच्या लॉस्ट अँड फाऊंड ऑफिसमध्ये जमा केलीय. तुम्हाला ती घ्यायला आता तिकडेच जावं लागेल. सॉरी!”

“ओके. थेंक्स!” मी दादरला चौकशी केली तर दुसराच प्रॉब्लेम आला. त्यांच्याकडे तशा दोन बॅगा आल्या होत्या. एकाच दिवशी हरवलेल्या, एकाच वर्णनाच्या आणि एकाच आद्याक्षरांच्या. तेव्हा दोन्ही मालकांनी एकाच वेळी येऊन ओळख पटवावी असं तिथला कारकून म्हणत होता! मी पुन्हा कुलकणींना फोन लावला.

“हॅलो, कोण कुलकर्णी? मी केदार देशपांडे!”

“हां देशपांडेसाहेब बोला. मिळाली का तुमची बॅग?”

“हो आहे इथे, पण तशा दोन बॅगा आहेत. मला वाटतंदुसरी तुमची असावी.’

“काय? माझीही बॅग सापडली? देशपांडेसाहेब, तुमचे कसे आभार मानू? फार उपकार झालेत माझ्यावर!”

“अहो कुलकर्णी, आधी नीट ऐकून घ्याल का?”

“काय? पुन्हा काही घोळ तर नाही ना झाला?”

“नाही. घोळबिळ काही नाही, पण दोन्ही बॅगा एकसारख्याच असल्यामुळे दोन्ही मालकांनी एकाच वेळी येऊन ओळख पटवून घेऊन जा असं इथला कारकून म्हणतोय!”

“मग मी येतो की संध्याकाळी सात वाजता.”

“छे छे! सात वाजता नाही चालायचं. त्यांची वेळ सकाळी अकरा ते दुपारी विशाल
चारपर्यंतच आहे. ते फक्त दोन दिवस वाट पाहतील. जर कुणी नाही आलं तर बॅगा जातील ग्रँटरोडला त्यांच्या सेंट्रल स्टोअरमध्ये!”

“देशपांडेसाहेब, मोठीच पंचाईत झालीय हो. अहो, आता चार दिवस मला ऑफिस सोडता यायचं नाही. पण मी असं करतो माझी भाची शिल्पा आहे ना तिलाच पाठवतो उद्या बारा वाजता. तिचीच कागदपत्रं आहेत त्या बॅगेत. ती पटवेल ओळख. ते दादरचं ऑफिसही माहिती आहे.”

“अहो, पण तक्रार तुमच्या नावावर आहे ना? मग बॅग तुमच्या भाचीला कशी मिळेल?”

“आमची दोघांचीही नावं दिलीत मी तक्रारीत. शिल्पाची काय काय कागदपत्रं आहेत ते तिलाच माहिती आहे म्हणून तिचंही नाव दिलं होतं मी.”

“मग ठीक आहे. पण मी कसं ओळखणार तिला?”

“तुम्ही बरोबर बारा बाजता त्या क्लार्कच्या इथे थांबा. ती आल्यावर त्याच्याकडेच चौकशी करेल तेव्हा कळेलच.”

“ओके, मग ठेवतो फोन. उद्या ठीक बारा वाजता पाठवा शीतलला.”

“शीतल नाही हो, शिल्पा! शिल्पा जोशी! देशपांडेसाहेब आपण जरा लिहून ठेवता का नाव?”

“हो हो. ठेवतो. शिल्पा कुलकर्णी. ठीक?”

“कुलकर्णी नाही हो, जोशी! शिल्पा जोशी!”

‘ओके ओके, शिल्पा जोशी! मग पाठवा तिला उद्या. बाय!”

शिल्पा नाव तर मोठं छान आहे. कसं असेल बरं हे शिल्प? मी दादरला ठीक पावणेबारा वाजता पोचलो.

– – विनायक अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..