
द्वारकेच्या महालाच्या प्रांगणात वावटळीने रिंगण धरले होते.
धुळीचा उभा खांब हेलकावे खात आकाशापर्यंत पोचत होता. त्यात अडकलेली सुकलेली पाने, झुडपे आपली सुटका करून घेऊन इतस्ततः पडत होती. गाई,गुरे झाडांचा आसरा शोधून गप्प उभी होती.
महालाच्या बाहेर उभे असलेले प्रतिहारी जवळपासचा खांब पाहून त्याच्या आडोश्याला उभे राहिले होते.
आपल्या आसनावर बसून श्रीकृष्ण बाहेरील हे दृष्य पहात होता.
मनातील वावटळीशी नाते सांगणारे ते दृष्य पाहताना त्याची समाधी लागली होती.
डोळे उघडे होते. पण मन मात्र वर्तमानात नव्हते.
खरे तर रिकामे होते. आत दाटली होती एक हुरहूर.
मथुरेच्या बंदिवासात जन्म घेतल्यापासून ते आज यादव कुळाच्या विनाशाची चाहूल लागे पर्यंतचा प्रवास त्याला दिसत होता.
देवतांनी नेमून दिलेले कार्य संपले होते.
आता उरले होते एक रिकामे जगणे.
अवतार कार्य संपल्यावर निर्माण झालेल्या एक गर्द अंधाऱ्या पोकळीतील वांझोटे जगणे.
आता मानव म्हणून साऱ्या संवेदनांना हृदयात जागा मिळाली होती.
त्याच्या कडून जे घडवले गेले ते सारे वारंवार समोर येऊन आता त्यालाच उत्तर मागत होते.
त्यांच्या अवघड प्रश्नांची उत्तरे त्याच्या जवळ नव्हती.
हातून घडलेले सारेच न्याय्य नव्हते.
तसेच ते अन्याय्य देखील नव्हते.
महाभारत युद्धातील विनाश.
अटळ होता का तो? नक्कीच नाही.
कृष्णासारख्या दैवी सामर्थ्यवान व्यक्तीला तो संहार टाळणे सहज शक्य होते. पण, नाही टाळला.
शिष्टाईचा प्रयत्न केला. निष्फळ प्रयत्न.
युद्ध टाळावे हा हेतू दाखविण्या पुरता होता तो. तो संहार टाळणे हे त्या अवतार कार्यात लिहिलेले नव्हते.
भीम ज्या पत्नीला विसरला होता, त्या, आपल्या वनांत, सुखाने जीवन जगत असलेल्या हिडिंबेच्या घटोत्कचाचा रणांगणात बळी दिला.
भगिनीचा पुत्र अभिमन्यूला अर्धे कच्चे ज्ञान देऊन ठेवले आणि त्याचा देखील बळी दिला.
केवळ शाब्दिक अपमानातून शिशुपालाला भर राजसभेत मृत्युदंड दिला.
पण, सखी द्रौपदीच्या वस्त्राला हात घालणाऱ्या दुःशासनाला तश्याच राजसभेत शासन का केले नाही? नुसती वस्त्रे पुरवून काय साधले?
कर्ण.. का नाही त्याला त्याची ओळख योग्य वेळी दिली?
का त्याचे भवितव्य एका स्वार्थी राजपुत्राच्या हातात देऊन टाकले?
पण, त्याला सुख देणे हा हेतू नव्हता ना अवताराचा. मानवी संवेदना त्यावेळी निष्क्रीय होत्या.
सखी द्रौपदी.
स्वयंवरात कृष्णाची उपस्थिती पाहून आनंदित झालेल्या द्रौपदीची, अर्जुनाला पण जिंकायला लावून निराशा केली.
मग दोघांच्याही मनाविरुद्ध जन्मभर बंधू-भगिनीच्या नात्याचे ओझे वहावे लागले.
अर्थात ती तेजस्विनी, तिने त्या नात्याला ‘सखा’ ही नांव दिले आणि तेच मानले.
कंस वध आवश्यक होता का?
जरासंधाला परास्त करणे यादवांना इतके दुष्कर होते का, की मथुरेहून द्वारकेला यावे लागले!
का?
गोकुळ..सारे गोप सखे..
आणि राधा..
कशी असेल ती?
आठवावे तेवढे वेदना देणारे. आठवू नये असे ठरविले तरी हृदयात ठसठसत राहणारे.
शेवटी, अवतार कार्य संपताना मिळालेला गांधारीचा शाप!
तो आता खरा होणार आहे.
कधी-केव्हा-कुठे? आता ते माहीत नाही.
अवतार कार्य संपले! भविष्य आता नाही कळत.
विचारांच्या ताणाने कृष्णाने डोळे घट्ट मिटून घेतले. सागराची गाज आणि वावटळीचा आवाज एक होऊन एक गूढ ध्वनि निर्माण झाला होता. एक प्रकारची ग्लानी आली आणि अस्तित्वाचा विसर पडला.
गवाक्षातून एक वाऱ्याचा झोत आत आला आणि कोणा स्त्रीचे उत्तरीय उडत आत आले आणि थेट कृष्णाच्या अंगावर येऊन पडले. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. कसला गंध हा? गोकुळातील घराघरातून येणारा तोच हा गंध.! त्या शिवाय त्या वस्त्राला एक अजून मधूर स्वर्गीय गंध होता….मनांत खोलवर रुजलेला.. कृष्णाच्या अंगांगावर रोमांच उठले. वयाला न शोभणारी अनुभूति झाली ..
‘राधे… राधे ..’ असे म्हणत कृष्णाने डोळे उघडले.
बाहेरची वावटळ थांबली होती.
भासच होता तो. गेल्या काही दिवसांत असंख्य वेळ झाला तसाच भास.
दिवास्वप्न!
एक दीर्घ निश्वास टाकून तो उठला आणि गवाक्षाजवळ जाऊन उभा राहिला. समोर अथांग सागर पसरला होता. सूर्य अस्ताला चालला होता. अजून एक दिवस संपत आला होता. इतक्यात त्याचे लक्ष महालाच्या प्रवेशद्वाराकडे गेले. एक बैलगाडी आत येत होती. प्रांगणात प्रवेश मिळाला म्हणजे कोणी तरी ओळखीचे आले होते. बैलगाडी सधन व्यक्तीची दिसत होती. बैलांच्या पाठीवरची झूल व रंगीत छप्पर तेच सांगते होते. बैलगाडी खाली येऊन थांबली. गाडीवान उतरून मागे गेला. एक प्रौढत्व संपून चाललेली व्यक्ति बैलगाडीतून उतरली. अंगाने भरभक्कम, पांढुरके होऊ लागलेले लांब केस. वरुन चेहरा दिसला नाही. पण, तशीच पांढुरकी दाढी व मिशी असावी. हातात दंड घेऊन व आपले बोचके पाठीवर टाकून ती व्यक्ति ताठपणाने आत शिरली.
‘वंदन.. महाराज’ प्रतिहारी येऊन उभा राहिला.
‘कोण?’ कृष्णाने विचारले.
‘उत्तरेकडून.. आपले मित्र असे सांगितले त्यांनी. …’
‘येऊ दे..’
प्रतिहारी गेला.
कृष्ण स्वागताला दाराशी येऊन उभा राहिला.
सुदृढ देहाचा, ऊंचापुरा, गौर वर्णीय, गहिऱ्या रंगाच्या डोळ्यांचा एक पुरुष समोर उभा होता. मुखावर गांभीर्य होते. श्रीकृष्णाला पाहून ते निमिषात पुसले गेले आणि ,,,,
कृष्णाने क्षणभरच त्याच्याकडे पहिले आणि
‘अनय’ असे म्हणून पुढे झाला.
अनयने बाहू पसरून त्याला कवेत घेतले. कितीतरी वेळ कृष्णाची मिठी सैल होईना. शेवटी अनयने त्याला सावध केले.
‘कान्हा, कान्हा हे काय? सोड आता?’
ते ऐकून कृष्णाने मिठी सोडली आणि ओशाळून मागे झाला.
‘कृष्णा, किती ही ओढ?’ मग गालात हसत त्याने विचारले.
‘हवे ते सापडले का माझ्या मिठीत?’
कृष्णाने मान खाली घातली. विषय बदलायचा म्हणून तो म्हणाला,
‘कसा झाला प्रवास?’
‘चांगला झाला.’
‘थकला असशील.’
त्याने हाक मारली, ‘प्रतिहारी..’
‘वंदन.’ प्रतिहारी येऊन उभा राहिला.
‘यांची आपल्या विशेष कक्षात व्यवस्था कर. अनय, भोजनगृहात भेटू. बाकी सारे उद्या बोलू.’
‘कृष्णा, मला लगेच परत जायचे आहे.’
‘असा कसा लगेच जाशील? उद्या पाहू! भोजनगृहात भेटू थोड्या वेळाने.’
अनय काही न बोलता प्रतिहारी बरोबर गेला.
कृष्ण अस्वस्थ होता. भोजन करतांना अनय एकटाच बोलत होता. कृष्ण मात्र विचारात मग्न होता.
‘का आला असेल हा अनय? गंभीर दिसत नाही, म्हणजे कुशल असेल सारे? राधा.. तिचा काही संदेश .. नाही तो विचार नको. ती ती चांगलीच असेल.. असलीच पाहिजे..’
भोजन उरकून कृष्ण परत आपल्या शय्यागृहात आला. मंचकावर डोळे मिटून बसला. कितीतरी काळ तो तसाच डोळे मिटून बसला असावा. डोळे उघडले तेव्हा रात्रीचा पहिला प्रहर असावा. तो उठला आणि भारल्या सारखा येरझारा घालू लागला. अचानक काही तरी आठवून, जवळचे दीपदान घेऊन, तो सामान ठेवायच्या कक्षात गेला. तिथे ठेवलेल्या पेट्या एकामागून एक उघडायला सुरुवात केली. किती तरी पेट्या उघडून पाहिल्या. हवे ते न मिळाल्याने तो निराश होऊन बसला. तेव्हा अचानक त्याचे लक्ष एका छोट्या रंगीत पेटीकडे गेले. त्याने उत्साहाने ती पेटी उचलली.
मथुरेहून बाहेर पडताना बरोबर घेतलेली ती पेटी. प्रचंड ओढीने त्याने ती पेटी उघडली. आत रेशमी वस्त्रात गुंडाळलेली बासरी व एक मोरपीसाचा मुकुट होता. त्या दोन्ही वस्तु घेऊन तो बाहेर आला. अंधार पडला होता. चंद्र उगवला होता. त्याने ते रेशमी वस्त्र अंगाभोवती लपेटले. मयूर पिसांचा मुकुट डोक्यावर चढवला आणि हातात बासरी घेऊन हलक्या पावलांनी खाली उतरला.
महालाच्या प्रांगणात टिपूर चांदणे पसरले होते. पुष्करणीच्या काठावर बसून त्याने पाण्यात पाय सोडले. मनाने तो कालिंदीच्या तीरावर पोचला होता. बासरी ओठांना लावून त्याने एक उत्कट धून सुरू केली. डोळे मिटून तो त्यात रंगून गेला.
अनय बासरीच्या आवाजाने जागा झाला. आपल्या कक्षाच्या गवक्षातून बाहेर पहिले. चांदण्याच्या प्रकाशात त्याला कान्हा दिसला. अंगाभोवती उत्तरीय गुंडाळून तो हळूच कृष्णाच्या मागे जाऊन उभा राहिला. अनयला कृष्णाच्या मनातील काहूर जाणवत होते. तो काही न बोलता त्याच्या शेजारी जाऊन बसला. बासरी वाजवताना कृष्णाच्या डोळ्यातून अश्रुधारा बरसत होत्या. ती बासरीची धून अनयच्या परिचयाची होती. इतकी वर्षे जाऊन देखील त्याच्या कानात ती घुमत राहिली होती. हीच ती धून, जी ऐकल्यावर, ती, कावरी बावरी होऊन अनामिक ओढीने यमुनेच्या डोहाकडे धावत सुटायची आणि तो विमनस्कपणे तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात राहायचा. काय असायचे तेव्हा त्याच्या मनांत? असूया? द्वेष? संताप? का पराभूत झाल्याची भावना? इतकी वर्षे झाली तरी त्याला ते कळले नव्हते. साऱ्या गोकुळवासीयांसारखा तो देखील कृष्ण प्रेमाने भारून गेलेला होता. आज सुद्धा त्याला ती भावना आतून जाणवत होती पण अजून देखील ‘ती’ त्या क्षणांची भावना अनामीकच राहिली होती.
अनयने कृष्णाच्या पाठीवर हात ठेवला. पण, तो स्पर्श भावनेच्या पलीकडे गेला होता. कृष्णाच्या अंगावरच्या त्या रेशमी वस्त्राचा स्पर्श मात्र त्याला जाणवला. ओळखीचा स्पर्श. तिची ओढणी होती ती.
त्याला आठवले. नंदराजाच्या घराबाहेर सारे गोकुळ जमले होते. प्रत्येकजण आलिंगन देऊन साश्रू नयनांनी कृष्णाला निरोप देत होता. ती पण आली होती. त्याला पहायचे होते तिला. कदाचित शेवटचे. तो आपल्याकडे पाहील तर कदाचित त्याचा पाय निघणार नाही असे तिला वाटले म्हणून ती अनयच्या सुदृढ देहामागे लपली होती. मग लपत-छपत ती रथाजवळ आली. कोणाचे लक्ष नसताना आपली ओढणी काढून तिने रथातील कृष्णाच्या आसनावर ठेवली आणि हुंदका आवरीत घराकडे धावत निघून गेली. जमलेल्या साऱ्या गोप सख्यांना आलिंगन कृष्णाची दृष्टी राधेचा शोध घेत होती. अनय दिसला पण ती,,,,. तो रथात जाऊन बसू लागला आणि त्याला आपल्या आसनावर ती ओढणी दिसली. ती हातात घेऊन त्याने त्या ओढणीचे चुंबन घेतले आणि मग त्याने ती गळ्याभोवती लपेटली.. हो हीच ती ओढणी.
कृष्णाला अनय येऊन बसल्याची जाणीव झाली. त्याने डोळे पुसले.
‘अनय. तू अजून झोपला नाहीस?’
‘साऱ्या जगताची झोप उडवणारी ही बासरी आसमंतात घुमत असताना मी कसा झोपेन?’
‘अनय, कशी आहे रे ती?’
‘नाही.. ठीक नाही.. तेच सांगायला आलोय..’
‘काय झालंय?’
‘खरं तर वय झालंय.. पण, ते आत्ता.. गेली अनेक सवंत्सरे ती बरी नाहीच..’
‘कधी पासून?’
‘तू विचारवेस हे?’
‘पण, पण, माझे काय चुकले? मी कसा थांबणार होतो?’
‘ते तिला पण माहीत होते आणि साऱ्या गोकुळाला देखील. पण, तरी तू गेल्यावर गोकुळ जसे सुकले तसेच ती देखील. आता गोकुळात आमची शरीरे राहतात. मने केव्हाच तू बरोबर घेऊन आलास!’
‘जे घडले ते माझ्या जन्माने ठरविलेले! प्राक्तन, प्रारब्ध जे काही असेल ते.’
‘पण, त्यासोबत आम्ही देखील जोडले गेलो होतो रे. येतोस?’
‘कुठे?’
‘गोकुळात.’
‘कसे शक्य आहे ते? संपले आहे सारे आता! सारे पाश तुटले आहेत. अंतिम पर्व सुरू झाले आहे.’
‘ती वाट पहात आहे.’
‘मी कल्पना करू शकतो.’
‘..’
‘अनय, मला क्षमा केलीस ना?’
‘तेवढी माझी पात्रता नाही रे!’
‘म्हणजे?’
‘देवाला क्षमा करू शकते का कोणी?’
‘अनय, अरे, ते दैवत्व संपलय आता. दैवत्व असताना जे काही चांगले-वाईट हातून घडले किंवा घडविले गेले ते उरलेल्या या नश्वर मनुष्यत्वाला चिकटून राहिलंय. आतून पोखरतय. म्हणून क्षमा कर म्हणालो.’
‘कृष्णा, तिच्या संबंधात म्हणतोस का?’
‘हो!’
‘मग क्षमा कसली त्यात. तुझी ठेव होती माझ्याकडे. सांभाळली मी. कृष्णा, मी तुझा द्वेष केला नाही कधी आणि तिला दूषणं देखील दिली नाही. मी तिचा पती होतो आणि तेच सौभाग्य म्हणून मिरविले मी. लोकापवादाची पर्वा न करता. तू स्वतःला अपराधी मानू नकोस. काल आल्याबरोबर तू माझ्या अंगावर तिचा स्पर्श शोधत होतास. नाही मिळाला तो तुला. कसा मिळेल? झालाच नाही तिचा स्पर्श कधी माझ्या अंगाला! ती तुझी होती आणि तुझीच राहिली.’
कृष्णाच्या डोळ्यातून अश्रूपात सुरू झाला. हुंदका आवरणे कठिण झाले तेव्हा त्याने अनयच्या खांद्यावर डोके ठेवले. अनयचा खांदा चिंब भिजला. अनयने कृष्णाच्या पाठीवर हलके थोपटले. कृष्ण उठला आणि आपल्या महालाकडे चालू लागला. अचानक थांबला आणि अनयला म्हणाला,
‘मित्रा, तू जाणार ना उद्या?’
‘हो! तू येतोस?’
‘नाही. ते कसे शक्य आहे. युगांत जवळ आला आहे. मला इथेच राहिले पाहिजे. इथेच शेवट होणार आहे साऱ्यांचा. पण, जाताना हे घेऊन जा. तिला दे.’ कृष्णाने ती बासरी आणि मयूर पीसाचा मुकुट अनयच्या हाती दिला.
‘तिला सांग, गोकूळ सोडल्यावर आज प्रथमच ओठाला लावली ही बासरी. तिला सांग, माझी ठेव म्हणून ठेव.’
एवढे बोलून कृष्ण महालाकडे चालू पडला. मागे वळून न पाहता.
-०-०-०-
बाहेरून येणारे बोचरे वारे थांबविण्यासाठी अनयने खिडकी बंद केली आणि परत अंथरूणांत पडलेल्या राधेच्या शेजारी येऊन बसला.
‘थांबलास का अनय. सांग ना! पुढे काय झाले?’ राधेने विचारले.
‘मग काय आम्ही दोघे जेवलो. तो त्याच्या महालात झोपायला गेला. मी त्याला विचारले येतोस का?’
‘नाही म्हणाला असेल ना?’
‘’हो. म्हणाला की युगांत जवळ आलाय. मी द्वारका नाही सोडू शकत. मी सांगितले त्याला तुझ्या बद्दल.’
‘कशाला संगीतलेस रे? वाईट वाटले असेल त्याला. रात्री अचानक बासरीचा आवाज ऐकून तू गेलास.. पुढे काय झाले?
‘राधे राधे, अगं किती वेळा सांगितले मी ते.’
‘असू दे. परत सांग.’
‘मग, मी जवळ गेल्यावर थांबला. पुढे काय ते तुला सांगितले..’ अनय तिचे पांघरुण नीट करत म्हणाला.
‘गारवा पडलाय. पाय उघडे ठेवू नकोस.’
‘असू दे. तू त्याच्या डोळ्यात पाहिलेस?’
‘राधे, कसे सांगू तुला? डोळे दिसलेच नाहीत ग मला त्याचे. सतत वहात होते.’
राधेने आपला हुंदका आवरला.
‘आणि हो! राधे, त्याने त्याची ही बासरी दिलीय माझ्याबरोबर. हा मयूर पिसांचा मुकुट देखील. तुला द्यायला. म्हणाला, ‘गोकुळ सुटल्यापासून वाजवलीच नाही.’
त्या रात्री मात्र माझ्या समोर वाजवली. तीच नेहमीची धून. पण, त्या रात्री फार करुण वाटली ती.’
काही तरी विचार करून राधा उठू लागली. अनयने आधार देऊन तिला बसते केले. राधेने बासरी हातात घेतली आणि तिचा गंध घेतला. मोराच्या पिसांचा मुकुट डोळे भरून पाहिला. म्हणाली,
‘अनय!’
‘काय राधे?’
‘हा मुकुट डोक्यावर घाल तुझ्या..’
‘हे काय काही तरीच राधे? नाही नाही.. ‘ अनय धक्का बसल्या सारखा ओरडला.
‘अनय, शपथ आहे माझी. एकदा, फक्त एकदा ठेव तुझ्या डोक्यावर आणि ही बासरी ओठाला लाव’
अनयच्या डोळ्यातून घळघळा अश्रु वाहू लागले. त्याने थरथरत्या हाताने तो मुकुट आपल्या शिरावर ठेवला. डोळे मिटले आणि बासरी ओठाला लावली. त्याच क्षणी राधेने त्याला गळामिठी मारली आणि हुंदका आवरत म्हणाली,
‘अनय .. अनय..’
‘काय राधे?’
‘अनय पुढच्या जन्मी तू कृष्ण म्हणून ये रे माझ्या जीवनात? येशील ना?’
अनय काही बोलण्यापूर्वीच राधेची मिठी सैल झाली.
अनयने राधेचे अचेतन शरीर अलगद खाली ठेवले. डोक्यावरचा मुकुट काढून तिच्या शेजारी ठेवला. बासरी तिच्या हृदयापाशी ठेवली आणि गोठलेल्या संवेदनांनी तिच्याकडे पहात बसला.
-०-०-०-
प्रदीप ओक


Leave a Reply