नवीन लेखन...

रत्नाकर मतकरी नावाचे गारुड (लेखक – सौरभ महाडिक)

श्री सौरभ महाडिक यांनी लिहिलेला रत्नाकर मतकरी यांच्यावरील अप्रतिम लेख.
लेखन आणि फोटो – सौरभ महाडिक…


१९८४ साल मी ७ वर्षांचा होतो. माझे आजोळ अंधेरी येथील टाटा कंपाउंड. तिथून पार्ल्याचे दीनानाथ नाट्यगृह हे जवळच होते. दर दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी आणि माझा मामेभाऊ तुषार ह्याला माझे आप्पा आजोबा दीनानाथला नाटकं बघायला घेऊन जायचे. दीनानाथला उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये अनेक लहान मुलांची आणि चांगल्या लेखकांनी लिहिलेली आणि चांगल्या कलाकारांनी अभिनित केलेली नाटकं लागायची. त्यावेळी दीनानाथला बाल रंगभूमीवर “सुधा करमरकर, राजू तुलालवार, रत्नाकर मतकरी” ह्यांची नाटकं लागत असत.

१९८४ सालीही मला आठवतेय उन्हाळ्याची सुट्टी पडली आणि मी अंधेरीला माझ्या आजोळी काही दिवसांसाठी गेलो. आप्पांनी दीनानाथला नाटकांची तिकिटे काढली होती. नाटक होते ते “रत्नाकर मतकरी ह्यांचे अलबत्या गलबत्या”. मला आणि तुषारला घेऊन आप्पा दीनानाथला गेले. त्याकाळात मतकरींच्या “अलबत्या गलबत्या” विषयी आणि त्यातल्या कलाकारांविषयी किंवा त्यातल्या कथानकाविषयी, त्याच्या सादरीकरणाविषयी वृत्तपत्रांमधून भरभरून लिहून आले होते. व त्यामुळे आप्पानी आम्हाला हे नाटक खूपच वेगळे आणि छान आहे हे सांगितले होते, त्यामुळे आम्हीही हे नाटक पाहायला उत्सुक होतो.

आम्ही सकाळी दहा च्या दरम्यान दीनानाथला पोहोचलो. दीनानाथ पूर्णपणे लहान मुलांनी आणि त्यांच्या आजीआजोबानी किंवा आईवडिलांनी भरून गेले होते. दीनानाथमध्ये मुलांचा गोंधळ, धावाधाव, मस्ती सुरु होती. थोड्यावेळाने सर्वांना नाट्यगृहात आतमध्ये सोडले, नाटकाविषयी अनाउन्समेंट सुरु झाली आणि एक भारदस्त आवाज चढ उतारांसह नाटकातल्या कलाकारांची आणि पात्रांची माहिती देत होता. त्यात शेवटची अनाउन्समेंट झाली आणि “चेटकीच्या भूमिकेत दिलीप प्रभावळकर”… सभागृहात एकच कल्लोळ झाला. “अलबत्या गलबत्याचे” प्रेक्षकांवरचे गारुडच तसे होते.

तिसरी घंटा होऊन पडदा उघडला, नाटक सुरु झाले. नेपथ्य बघून मुलांनी पुन्हा एकदा कल्लोळ केला. हळू हळू नाटक पुढे जाऊ लागले आणि जेव्हा चेटकीची एंट्री आली तेव्हा आत्ता चेटकी कशी असेल? ती आम्हा मुलांना काही त्रास देईल का? कोणाला उचलून घेऊन जाईल का? हि एक वेगळीच भीती आमच्या बालमनातं लागून राहिली होती. थोड्याच वेळात नाट्यगृहातून लहान मुलांचे ओरडण्याचे, घाबरल्याचे, काही जणांचे हसण्याचे, काही जणांचे चेटकी आली रे आली असे आवाज सुरु झाले, तर चेटकीची एन्ट्री स्टेजवर झाली होती. अशी एंट्री मी माझ्या ७ वर्षांच्या आयुष्यात कधी पहिली नव्हती. त्यामुळे मी आणि तुषार आणि आप्पा हि उत्सुकतेने ते बघत होतो. पूर्ण नाटकच एकंदर खिळवून टाकणारे होते. नाटक बघताना खूपच मज्जा आली.
नाटक बघताना आणखीन एक लक्षात आले होते कि एक थोडीशी वयस्कर व्यक्ती विंगेत उभे राहून नाटक बघत होती. नाटक संपले आणि आप्पा मला आणि तुषारला स्टेजच्या मागे घेऊन गेले आणि त्यांनी आमची ओळख रत्नाकर मतकरी ह्यांच्याशी आणि दिलीप प्रभावळकर ज्यांनी चेटकीची भूमिका केली होती त्यांच्याशी करून दिली. तेव्हा माझ्या लक्षात आले कि मगाशी नाटक सुरु असताना जे विंगेत उभे राहून नाटक पाहत होते तेच “रत्नाकर मतकरी” आहेत. मला आजही आठवतेय कि तुषार आणि मी चेटकीची भूमिका करणारी व्यक्ती हि स्त्री नसून दिलीप प्रभावळकर आहेत हे पाहून खूपच चाट पडलो होतो. तसेच आम्हाला मतकरी काकांनी नाटक कसे वाटले हे विचारले, तेव्हा आम्ही नाटक पाहायला खूप मज्जा आली. असे नाटक पहिल्यांदाच आम्ही पहिले हे आमच्या लहान बुजऱ्या आवाजात सांगितल्याचे मला आजही आठवते.हा माझ्यावर रत्नाकर मतकरी ह्यांचा पहिला इम्पॅक्ट.
त्यानंतर जसजसे मोठे होत गेलो तशी रत्नाकर मतकरी ह्यांची अनेक नाटके, दूरदर्शनवरच्या सिरिअल्स पाहिल्या. तसेच वाचनाची आवड असल्यामुळे रत्नाकर मतकरी ह्यांची अनेक पुस्तकेही वाचली. त्यातही त्यांच्या गूढकथा वाचताना किंवा त्यांची “आरण्यक, लोककथा ७८” सारखी नाटके वाचताना किंवा बघतानाही वेगळा विषय असल्यामुळे मजा यायची. त्यांची दूरदर्शनवरची सिरीयल “गहिरे पाणी” बघतानाही त्यातल्या कथानकामुळे पुढे काय होणार हे शेवटपर्यंत लक्षात यायचे नाही, त्यामुळे उत्सुकता शेवटपर्यंत ताणलेली असायची. तर “चार दिवस प्रेमाचे” हे पाहताना त्यातले कथानक, त्याचे दिग्दर्शन आणि त्यातले संवाद आणि त्यातली गाणी ह्यांची जादू आजही माझ्यावर कायम आहे.

ह्या सर्वांमुळे असेल जेव्हा महाविद्यालयात कला शाखेत ऍडमिशन घेतली तेव्हा मराठी हा विषय माझा मुख्य विषय म्ह्णून होता. त्यामुळे आणि वाचनाची आवड असल्यामुळेही मतकरींच्या अनेक कादंबऱ्या, कथा संग्रह, लहान मुलांची नाटके, एकांकिका ह्या माझ्याकडून वाचल्या गेल्या आणि त्यांनी मनात घर केले, त्यामुळेही रत्नाकर मतकरी ह्यांच्याविषयी एक वेगळे आकर्षण मनात निर्माण झाले.

त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर मी वृत्तपत्र पत्रकारितेत आणि मी कलेच्या क्षेत्रात आलो. मी झी मराठी किंवा इतरही वाहिन्यांच्या कार्यक्रमांच्या प्रसिद्धीसाठी डिझाइन्स करत असल्यामुळे किंवा सेट डिझाइन्स करत असल्यामुळे माझा संपर्क मराठी कलाकारांशी येऊ लागला.
त्यातूनच माझे जाणे येणे हे दादर शिवाजी पार्क येथील जिप्सी हॉटेलच्या नाक्यावर सुरु झाले. तिथे त्यावेळी सुधीर जोशी, संजय मोने, विजय केंकरे, महेश मांजरेकर असे अनेक जण असत. मधून मधून प्रशांत दामले, सुकन्या कुलकर्णी, गिरीश ओक असे अनेक कलाकार तिथे येत असत. जिप्सी हॉटेलचे मालक राहुल लिमये ह्यांच्याशी माझा परिचय असल्यामुळे आणि मी कलेच्या आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरत असल्यामुळे हळू हळू माझा संपर्क ह्या कलाकारांशी येऊ लागला. मग हळू हळू चांगलाच परिचय वाढला, ओळखी वाढल्या. माझे दिवसभराचे काम संपले कि संध्याकाळी जिप्सी च्या नाक्याला भेट द्यायचीच हे सुरु झाले.

तिथे गेल्यावर हे सर्व प्रतिथयश कलाकार वेगवेगळ्या नाटकांविषयी, त्याच्या दिग्दर्शनाविषयी, अनेक लेखकांविषयी चर्चा करत असत. मी आपला त्यांच्यात सहभागी होऊन जे काही ऐकायला मिळेल ते साठवून घेत असे. तेव्हा रत्नाकर मतकरी हे खूप जोरात होते. साधारण १९९८ साल असेल मतकरींविषयी बोलताना अनेकदा विजय केंकरे ज्यांनी मतकरींची अनेक नाटके दिग्दर्शित केली ते किंवा संजय मोने हे नेहमी दबक्या आवाजात किंवा मतकरींविषयी बोलताना पण तेही आदराने म्हणत असत कि “अरे रत्नाकर मतकरींना भेटायला पारशी कॉलनी मधल्या त्यांच्या “राधा निवासमध्ये” जायचे म्हणजे वाघाच्या गुहेत जायला हवे. “तर काही जण म्हणत कि मतकरींचे घर म्हणजे अगदी अलिबाबाची गुहाच आहे. ह्या सर्वांमुळे माझे मतकरींविषयीचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत होते.

त्यातच पुढे असे झाले कि मी वेगवेगळ्या आर्किटेक्टस ना त्यांच्या साईट्स साठी लागणारी आर्टिफॅक्टस आणि पेंटिंग्स प्रोव्हाइड करू लागलो. त्यातूनच माझी ओळख रत्नाकर मतकरींचा मुलगा “गणेश मतकरी आणि गणेशची बायको पल्लवी मतकरी” ह्यांच्याशी झाली. त्यामुळे हळू हळू त्याच्याकडे नेहमी जाणे सुरु झाले. गणेश आणि पल्लवीशी खूपच चांगली मैत्री झाली. त्याच दरम्यान मी प्रसिद्ध फोटोग्राफर विठोबा पांचाळ ह्यांच्याकडे फोटोग्राफी शिकलो होतो, त्यावेळी मी महाराष्ट्र टाइम्स साठीही फोटोग्राफी करत असे आणि तीही सर्व प्रकारची. म्हणजे बातम्यांसाठी लागणारी फोटोग्राफी, तर त्याशिवाय वेगवेगळ्या प्रसिद्ध व्यक्तींची पोर्ट्रेट्सही करू लागलो होतो. शिवाय महाराष्ट्र टाइम्स साठी वाईल्डलाईफ, निसर्ग, पर्यावरण हे बिट्स हि सांभाळत असे आणि त्याविषयी महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहीतही असे.

गणेशकडे जाणेयेणे सुरु झाल्यावर गणेशशी रत्नाकर मतकरी सध्या काय करताहेत?? काय लिहिताहेत?? ह्याविषयीही चर्चा होत असे. त्यातून मतकरींचे काय चाललंय हे कळत असे. त्यातूनच मला वाचण्याची आवड असल्यामुळे दारुचे आयडियल मधून मी मतकरी व इतर अनेक लेखांची पुस्तके घरी आणून वाचत असे. त्याचवेळी मी गणेशला बरेचदा बोलत असे कि अरे मला मतकरी काकांची पोर्ट्रेट्स चित्रित करायचीत. तू जरा मतकरी काकांशी बोलशील का?? गणेश म्हणाला कि हो मी जरूर बोलतो. त्या संदर्भात मला आठवतेय गणेशने माझ्याविषयी मला वाटते २००३, २००४ च्या दरम्यान मतकरींना विचारलेही होते. परंतु तो योग काही कारणांनी आला नाही पुढची काही वर्षे तरी.

हे सर्व करत असतानाच एके दिवशी मला “मॅजेस्टीक प्रकाशनाने” काढलेले “लेखकाचे घर” हे पुस्तक माझ्या बाबांनी भेट म्हणून दिले. मला वाचायला खूपच आवडत असल्यामुळे मी त्या पुस्तकाचा फडशा काही दिवसातच पाडला. त्या पुस्तकात रत्नाकर मतकरी ह्यांची कन्या सुप्रिया मतकरी हिने त्यांच्या पारशी कॉलनी मधल्या “राधा निवास” मधल्या घराविषयी सुंदर लेख लिहिला होता. तो वाचून तर आपण मतकरी ह्यांच्या घराला एकदा भेट द्यायलाच हवी आणि रत्नाकर मतकरींना भेटून त्यांची पोर्ट्रेट्स चित्रित करायलाच हवी हे माझ्या डोक्यात ठाम झाले. त्या शिवाय मतकरी ह्यांच्या घराचे जे वर्णन त्यात केले होते त्यातही अनेक गोष्टी अशा होत्या कि ज्याचा मोह कोणालाही व्हावा.

त्यानंतर काही वर्षांमध्येच “नर्मदा आंदोलनाचा” लढा मेधा पाटकर ह्यांच्या नेतृत्त्वाखाली सुरु झाला त्यामध्येही रत्नाकर मतकरी सहभागी झाले होते. त्यासाठी त्यांनी सरदार सरोवर ज्याठिकाणी उभे राहणार होते, जिथे खऱ्या अर्थाने नर्मदेवरच्या डॅम मुळे तिथली जनता बेघर होणार होती, तिथे जाऊन त्यांनी त्या लढ्यावर आधारित तिथल्या परिस्थितीवर आधारित काही पेंटिंग्स स्वतः बनवली होती. रत्नाकर मतकरी ह्यांच्यामध्ये जे अनेक गुण होते त्यात हेही होते कि रत्नाकर मतकरी ह्यांना तीव्र सामाजिक जाणीव” होतीच, परंतु आपण समाजाचे समाजातल्या सर्व घटकांचे देणे लागतो हि एक दुर्मिळ जाणीव त्यांच्यामध्ये होती.

त्याशिवाय ते जसे लेखक होते, किंवा नाटककर होते वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य निर्माण करत असत, तसेच ते उत्तम चित्रकारही होते. त्यांनी आपल्या स्वतःच्या अनेक पुस्तकांची कव्हर्स हि स्वतः डिझाईन केली होती. किंवा त्यासाठी पेंटींग्सही केली होती.

मधल्या काळात मी माझ्या “चेहऱ्यांमागचे चेहरे” ह्या समाजातल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींवर आधारित माझ्या फोटोग्राफिकली कॉफी टेबल बुक चे काम सुरु केले. ह्यामध्ये मी गुलझार साहेबांपासून ते द्वारकानाथ संझगिरींपासून ते बाबा आढाव, सतीश चाफेकर, विठोबा पांचाळ, अंगद म्हसकर, मंदार फणसे अशा अनेक क्षेत्रांतल्या मान्यवर लोकांना भेटून त्यांची पोर्ट्रेट्स माझ्या नजरेतून चित्रित करून त्यांच्यावर ते का वेगळे आहेत व त्यांच्या समाजातल्या वावरण्यापेक्षा किंवा त्यांच्या सामाजिक इमेज पेक्षा त्यांची वैयक्तिक आयुष्यातली इमेज हि कशी आहे हे माझ्या लेखणीच्या माध्यमातून लिहिणार होतो.

ह्या माझ्या कॉफी टेबल बुक साठी मी गणेशकडे आग्रह धरला कि मला मतकरी काकांना भेटायचे आहे आणि त्यांना भेटून त्यांच्याबरोबर वेळ घालवून त्यांची पोर्ट्रेट्स हि चित्रित करायची आहेत. हे गणेशला सांगितल्यावर गणेशने मतकरी काकांना माझ्याबद्दल, माझ्या एकंदरच कामाबद्दल आणि माझ्या प्रोजेक्टबद्दल सांगितले. मतकरी काका गणेशला म्हणाले अरे मी तयार आहे. तू सौरभला कधीही घरी बोलावं. मला त्याला भेटायला आवडेल आणि त्याला हवे तसे शूटही त्याच्याबरोबर करायला आवडेल.

मग मी मतकरींच्या घरी जाऊन पोहोचलो. राधा निवास ह्या बिल्डिंगमध्ये पोहोचल्यावर मला वाटते मी निदान पहिली १० मिनिटे तरी बिल्डिंगच्या खाली आजूबाजूला भटकलो असेन आणि सुप्रिया मतकरींनी तिच्या लेखात लिहिलेले मतकरींचे घर हे बाहेरून तरी तसेच दिसते का हे अनुभवण्याचा प्रयत्न केला. हे करण्या आधी जेव्हा मी दादर टी टी जवळ पोहोचलो तेव्हाही संजय मोने आणि विजय केंकरे ह्यांनी सांगितलेले मतकरींचे घर म्हणजे वाघाची गुहा आहे हेही माझ्या मनात तरळून गेले. हि सर्व घालमेल माझ्या मनात सुरु असतानाच मी मतकरींच्या पहिल्या मजल्यावरच्या घराच्या दरवाजात जाऊन पोहोचलो आणि घराची बेल वाजवली. एक छान मधुर बेल वाजली आणि दरवाजा उघडला.

दरवाजात दस्तुरखुद्द रत्नाकर मतकरीच उभे होते. हाफ पॅन्ट आणि पांढऱ्या रंगाचे टी शर्ट त्यांनी घातले होते आणि हसतमुख नजरेने माझ्याकडे बघत मला म्हणाले सौरभ महाडिक ना? मी म्हंटले हो, तर म्हणाले मी आणि गणेश तुझीच वाट बघत होतो. घर व्यवस्थित मिळाले ना? मी म्हंटले हो अगदी व्यवस्थित मिळाले. फक्त तुमच्या घराचे वर्णन खूप जणांकडून ऐकल्यामुळे तुमचे राधा निवास हे बाहेरून तसेच आहे हे अनुभवण्यासाठी जरा तुमच्या बिल्डिंगमध्ये मी आजूबाजूला भटकलो हे सांगताच मतकरी काका मोकळेपणाने हसले..

मला हाताला धरून ते अगदी आपलेपणाने त्यांच्या घराच्या हॉलमध्ये घेऊन गेले. मी त्यांच्या अगदी साध्या परंतु छान मांडणीच्या सोफ्यावर बसलो आणि नकळतच मी घर अनेकांनी सांगितल्याप्रमाणे आहे का हे शोधायला लागलो. तर खरंच घर हे तसेच होते. घरात सर्व ठिकाणी पुस्तकांची कपाटे, मिळालेल्या पुरस्कारांची मांडणी, समोरच मोठा टेलिव्हिजन सेट आणि बाजूला आणखीन माणसं आली तर बसायला छान छोट्या खुर्च्या, जुन्या पद्धतीच्या फरशा घरात लावलेल्या आणि घराला छान पांढरा रंग दिलेला, तर भिंतीवर त्यांच्या आरण्यक ह्या नाटकातले काही फोटो लावलेले तेही उपलब्ध प्रकाशात काढलेले. समोरच माधव मनोहर म्हणजेच मतकरींचे सासरे आणि प्रसिद्ध समीक्षक ह्यांचे एक सुंदर पेंटिंग ठेवलेले तसेच काही आणखीनही पेंटिंग्स मांडून ठेवली होती.

हे सर्व मनात मी साठवेपर्यंत मतकरी काकांनी प्रतिभाकाकींना “प्रतिभा अगं सौरभ आलाय पाणी घेऊन ये अशी हाक मारली”. थोड्याच वेळात त्यांच्याशीही माझी त्यांनी ओळख करून दिली तीही जणू माझी खूप वर्षांची ओळख असल्यासारखी अगदी आपुलकीने.

पाणी झाल्यावर मतकरी काकांनी मला विचारले काय घेशील चहा कि कॉफी काय आवडते तुला? मी म्हंटले कॉफी तसे त्यांनी काकींना सांगितले. कॉफी येईपर्यंत आमच्या गप्पा सुरु झाल्या. गणेशने माझ्याबद्दल सांगितले होतेच परंतु आता काकांनीही मला जाणून घ्यायला सुरुवात केली. माझे प्रोजेक्ट काय आहे? मी आजवर काय काय केलं आहे हे कळल्यावर आणि मीही अनेक वर्षे वेगवेगळ्या वृत्तपत्रांसाठी लिहिलंय, शिवाय मी कलाकार म्हणूनही अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलंय हे त्यांना कळल्यावर त्यांनी आणखीन मोकळेपणाने बोलायला सुरुवात केली. मी त्यांना माझे प्रोजेक्ट समजावून सांगितले.
मग मला म्हणाले अरे तुझे काही काम दाखवशील का? मी माझ्या मोबाईलवर मी आधी काढलेले काही फोटो त्यांना दाखवले. ते पाहिल्यावर त्यांनी मला विचारले अरे हे सर्व फोटो अव्हेलेबल लाईट मध्ये काढलेले आहेत आणि मला हे प्रचंड आवडते. तू माझेही फोटो अव्हेलेबल लाइटमध्ये काढणार आहेस का? तर मी म्हणालो कि होय मला अव्हेलेबल लाईट फोटोग्राफी करणे खूप आवडते कारण त्याची एक वेगळीच मजा असते. हे सांगितल्यावर ते खुश झाले आणि मला म्हणाले कि अरे मी माझ्या बऱ्याचशा मालिकांचे, फिल्म्सचे चित्रीकरण अव्हेलेबल लाइटमध्येच केलेले आहे. शिवाय माझ्या घरात हे “आरण्यक” ह्या नाटकाचे फोटो दिसताहेत तेही अव्हेलेबल लाइटमध्येच काढलेले आहेत.

त्यांना मी माझ्या पुस्तकाचा कन्सेप्ट समजावून सांगितला आणि त्यांना म्हंटले कि आपण तुमचे पहिले शूट हे बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात करूयात. तिथे दुपारनंतर खूप सुंदर प्रकाश असतो आपण साधारण ३ ते ४ तासात तुमचे शूट पूर्ण करूयात. ते ऐकून अगदी लहान मुलाच्या उत्साहाने मला म्हणाले “तू माझे शूट करायचे म्हणतो आहेस पण मी आत्ता सत्तरीच्या पुढे आहे माझे फोटो तुला हवे तसे मिळतील ना??” त्यावर मी त्यांना म्हंटले कि मतकरी काका तुम्ही आयुष्यभर नाटक, फिल्म्स अशा दृश्य स्वरूपाच्या कला माध्यमात काम केलेले असल्यामुळे आणि तुम्ही उत्तम कलाकार आणि दिग्दर्शक आणि उत्तम माणूस असल्यामुळे मला वाटत नाही कि तुमचे फोटो चित्रित करताना काही अडचण येईल. त्यावर ते म्हणाले तू म्हणशील त्या दिवशी आणि म्हणशील त्या तारखेला आपण शूट करूयात. मग आम्ही तारीख आणि वेळ ठरवली.

ते सर्व ठरल्यावर मला म्हणाले चल माझ्याबरोबर, मग मला घेऊन त्यांच्या बेडरूममध्ये गेले. तिथे जाताना मला त्यांनी आधी त्यांचे सर्व घरही फिरवून दाखवले. मतकरी स्वतः फिरून घर दाखवताहेत म्हंटल्यावर तर मी खुश झालो होतो. बेडरूममध्ये गेल्यावर मला म्हणाले बेडवर बस मी तुला माझा वॉर्डरोब दाखवतो तुला. मी शूटसाठी काय घालायला हवे हे सांग. म्हणजे मी येण्यापूर्वी कपडे व्यवस्थित इस्त्री वगैरेकरून घेऊन येईन. मग जवळपास आम्ही अर्धातास वेगवेगळी कॉम्बिनेशन्स करून ते शूटच्या दिवशी काय घालणार हे ठरवले.

ते झाल्यावर मला म्हणाले कि आत्ता जेवूनच घरी जा. मी प्रतिभाला सांगितलेलंच आहे कि सौरभसाठीही जेवण बनव असे. हा त्यांचा आपुलकीचा आग्रह म्हंटल्यावर मी हो म्हणालो. मग आमच्या आणखीन काही गप्पा झाल्यावर मला मतकरी काका त्यांच्या किचन मध्ये घेऊन गेले घराच्या एका बाजूला एक छान छोटेसे बाल्कनी असलेले किचन होते. तिथे एक छान सुंदर डायनिंग टेबल मांडलेले होते त्यावर अनेक चटण्या, लोणचे, जामच्या बरण्या व्यवस्थित मांडून ठेवलेल्या होत्या. मला बसायला त्यांनी खुर्ची दिली आणि मग ते माझ्या समोरच्या खुर्चीवर बसले. तोपर्यंत गणेशला फिल्म शो ला जायचे असल्यामुळे गणेश निघून गेला होता.

काकींनी ताटे घेतली त्यात व्यवस्थित जेवण वाढले, आणि मग मतकरी काका मला म्हणाले आज छान कबाबांची भाजी केलीय, आणि पोळ्या आणि इतरही जेवण आहे. आपण छान जेउयात. मी व मतकरी काका मग जेवतानाही छान गप्पा मारत होतो. जेवण झाल्यावर मतकरी काकांनी मला स्वतः पेल्यामध्ये हिंग घातलेले ताक दिले. जेवण झाल्यावर मतकरी काकांनी मला विचारले “सौरभ आमचे साधे जेवण तुला आवडले का? मटण कबाबांची भाजी कशी होती?” मी उडालोच कि अरे मला कळले कसे नाही कि मी नॉनव्हेज खाल्ले? मी एकदम म्हंटले काय मटण कबाब होते ते? तर मतकरी काका म्हणाले होय, का तू नॉनव्हेज खात नाहीस का? मी म्हंटले होय. तसे मतकरी काका खळाळून हसत म्हणाले आज तू खाल्लेस ना मग ह्यापुढेही खात जा? प्रतिभा खूप छान बनवते. परंतु आता ह्यापुढे तुझ्यासाठी मी प्रतिभाला शाकाहारी जेवणही बनवायला सांगत जाईन.

नंतर थोड्यावेळाने मी निघालो परत एकदा मतकरी काका मला दरवाजापर्यंत सोडायला आले. अगदी आत्मीयतेने म्हणाले कि आता आपण शूटसाठी भेटू. मी मतकरी काकांना भेटलो ह्या आनंदातच घरी आलो. घरी येताना माझ्या मनावर मतकरी काका, मतकरी काकांचे घर, त्यांचे वागणे बोलणे, त्यांचा प्रेमळ आतिथ्यशील स्वभाव ह्याची एक वेगळीच मोहिनी होती.

घरी आल्यावर मी शूटसाठीची सर्व तयारी सुरु केली माझा असिस्टंट जयदीप ला मी फोन करून म्हंटले कि अरे रत्नाकर मतकरींचे आपल्याला येत्या २ दिवसात शूट करायचंय तेव्हा घरी जरा येऊन जा.

दुसऱ्या दिवशी तो आल्यावर सर्व कॅमेरे, लेन्सेस आणि इतर गोष्टींची तयारी केली. शूटचा दिवस उजाडला आणि मी सकाळीच गणेशला आणि मतकरी काकांना फोन करून पुन्हा एकदा आठवण करून दिली. दोघांनीही आम्ही दुपारी अडीचपर्यंत पोहोचतोय हे सांगितले. त्याप्रमाणे दुपारी २ वाजताच मतकरी काका आणि गणेश नॅशनल पार्कच्या गेटवर भेटले. आम्ही नॅशनल पार्कमध्ये गेलो. आतमध्ये जाताना मतकरी काका आजूबाजूला बघत होते आणि त्यांच्या नॅशनल पार्कविषयीच्या आठवणी मला सांगत होते. थोड्यावेळाने आम्ही लोकेशनवर पोहोचलो. मतकरी काकांनी कपडे बदलले आणि आम्ही शूटसाठी तयार झालो.

आता मला थोडे टेन्शन आले होते कि आपण एवढा मोठा साहित्यिक आणि नाटककार, कलाकार दिग्दर्शकाला चित्रित करणार आहोत तेव्हा आजचे शूट व्यवस्थित होईल ना? परंतु मनात देवाचे नाव घेतले आणि मतकरी काकांना लोकेशन दाखवून उभे केले आणि शूट सुरु केलं. पहिले काही शॉट्स मतकरी काका थोडे कॉन्शस होते. परंतु मी माझ्या पद्धतीप्रमाणे त्यांच्याशी त्यांच्या कामाविषयी, लेखनाविषयी, फिल्म्सविषयी, त्यांच्या आवडत्या फोटोग्राफर्सविषयी बोलणे सुरु केले आणि मतकरी काका खुलले आणि पहिल्या ३ ४ शॉट्स नंतर मतकरी काकांचे हवे तसे फोटो मिळायला लागले.
मध्ये मध्ये मतकरी काका विचारत होते अरे सौरभ तुला हवे तसे एक्सप्रेशन्स मिळताहेत ना? मग साधारण ५० एक शॉट्स नंतर मतकरी काकांना काही फोटो मी कॅमेऱ्यामध्ये दाखवले आणि ते पाहून ते खुश झाले. संध्याकाळी गोल्डन लाइटमध्ये फोटो काढल्यामुळे पोर्ट्रेट्स खूपच छान मिळाली होती त्यामुळे मी खुश होतो. थोड्यावेळाने शूट संपले आणि चहा घेता घेता मतकरी काकांना मी म्हंटले कि इथे बोरिवलीतच १० मिनिटांच्या अंतरावर माझे गुरु आणि प्रसिद्ध शिल्पकार आणि फोटोग्राफर विठोबा पांचाळ राहतात. ते सध्या कोकणातल्या केशवसुत स्मारकासाठी एका अगदी आगळ्यावेगळ्या शिल्पाचे निर्माण त्यांच्या घरीच करताहेत. तुम्हाला वेळ असेलतर आपण त्यांच्याकडे जाऊयात का?? तर मला म्हणाले अरे विठोबा पांचाळ ना त्यांचे काम मी पाहिलेले आहे मला त्यांना भेटायला आवडेल.

आम्ही विठोबा काकांकडे गेलो तेही रत्नाकर मतकरींसारखा प्रख्यात साहित्यिक, दिग्दर्शक आपल्या घरी आला हे पाहून खुश झाले. चहा वगैरे झाल्यावर मतकरी काकांनी विठोबांनी घडवलेले शिल्प पाहिले आणि ते अत्यंत खुश झाले. त्यांनी मग विठोबांना ते कसे उभारले? मटेरियल कुठले वापरलंय? वगैरे सर्व चौकशी केली.

हे सर्व झाल्यावर त्यांनी आज सौरभने माझे तुमच्या स्टाईलने फोटो काढले हे विठोबांना सांगितले त्यावर विठोबाकाकांनी मला फोटो दाखव हे सांगितले. फोटो पाहिल्यावर विठोबाकाकाही खूष झाले आणि त्यांची पहिली प्रतिक्रिया आली कि अरे फोटो छान जमलेत. हे ऐकल्यावर मी आणि मतकरी दोघांच्याही चेहऱ्यावर स्मित उमटले.

काही दिवसांनी मी मतकरी काकांना माझ्या लॅपटॉपवर त्यांची चित्रित केलेली पोर्ट्रेट्स दाखवली. ती पाहून त्यांनी प्रतिभाकाकींना हाक मारली “प्रतिभा हे बघ सौरभने माझे छान फोटो काढलेत.” मतकरी काका आणि प्रतिभाकाकी दोघेही मी काढलेले फोटो पाहून मनापासून माझे कौतुक करत होते. त्यांनी मला त्यांचा इमेल आय डी दिला आणि मला म्हणाले आता ह्यापुढे माझ्या प्रकाशित होणाऱ्या सर्व पुस्तकांवर तू माझे काढलेले फोटो मी प्रकाशित करणार. हे ऐकून माझी स्वारी मनातच खुश झाली.

हे मतकरींचे पहिले शूट झाल्यावर आमचे नेहमी फोनवर बोलणे, भेटणे सुरु झाले. नंतर नंतर तर आमच्यात अलिखित करारच झाला कि प्रत्येक आठवड्यात एकदातरी मतकरी काका मला सकाळी साडेदहाच्या दरम्यान कॉल करायचे आणि आम्ही त्या आठवड्यात एकमेकांना काय करणार? किंवा काय नवीन लिहितोय किंवा मी कोणाचे नवीन शूट करतोय किंवा मी कुठे टूरवर जातोय हे सांगायचो. मग जवळपास प्रत्येक आठवड्यात आम्ही शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी सकाळी ११ च्या दरम्यान मतकरींच्या राधा निवासमध्ये भेटायला लागलो.

अशाच एका भेटीत मतकरी काका मला म्हणाले अरे सौरभ तू एवढी वर्षे वृत्तपत्रासाठी, मासिकांसाठी लिहितोस तर तुझे लिखाण मला वाचायला दे. मला वाचायला आवडेल. मी हो म्हंटले आणि पुढच्या भेटीत माझे लिखाण मतकरींना देण्यासाठी घेऊन गेलो तर मतकरी काका मला म्हणाले अरे तूच वाचून दाखव. मी ठीक आहे म्हंटले पण माझ्या मनात टेन्शन आले कि मतकरींपुढे आपल्याला वाचायला जमेल ना? मी वाचायला सुरुवात केली आणि मतकरींनी मी वाचत असतानाच कसे वाचायचे, कुठे थांबायचे, कुठे कुठल्या शब्दांवर जोर द्यायचा हे समजावून सांगितले. पुढे जेव्हा जेव्हा मी नवीन लिखाण करायचो आणि मतकरींकडे जायचो तेव्हा मी माझे लिखाण त्यांना नेहमी वाचून दाखवायचो तो शिरस्ता आमच्यात अगदी शेवटपर्यंत सुरु राहिला. जसे मी वाचायचो तसेच मतकरीही त्यांनी लिहिलेले लेख, काहीवेळा कविता मला वाचून दाखवायचे.

एके दिवशी मतकरींना म्हणालो कि मतकरी काका तुमच्याकडे “अलबत्या गलबत्या” चे त्यावेळच्या पहिल्या संचातले काही केलेले शूट आहे का? मला आमच्या छोट्या आद्याला ते दाखवायला आवडेल. मला म्हणाले शूट नाहीय केलेले, परंतु त्यावेळच्या नाटकाचे रेकॉर्डिंग माझ्याकडे उपलब्ध आहे ते मी तुला देऊ शकतो. थोड्याच दिवसात त्यांनी प्रतिभाकाकींच्या मागे लागून ते रेकॉर्डिंग मला मिळवून दिले. मी ते आद्याला ऐकवलेही. काही दिवसांनी मला मतकरींनी पुन्हा विचारले कि अरे आपल्या गुड्डूने ते रेकॉर्डिंग ऐकले का? तिला ते कसे वाटले?? मला तिच्याशी बोलायला दे. मला तिच्याशी बोलायला आवडेल. त्याच दिवशी मी गुड्डूला त्यांच्याशी बोलायला दिले गुड्डूनेही त्यांना “मला ते रेकॉर्डिंग ऐकताना खूप मज्जा आली” हे तिच्या बोबड्या बोलांमध्ये सांगितले. ते ऐकून काका खुश झाले आणि तिला म्हणाले कि तू इथे घरी ये मग मी तुला खूप गोष्टी सांगेन. मतकरी काकांनी अगदी पहिल्यापासून नाटककार म्हणून लहान मुलांमध्ये काम केल्यामुळे त्यांना लहान मुलांचा प्रचंड ओढा होता आणि लहान मुलांशी कसे बोलायचे, त्यांना कसे आपलेसे करायचे हे त्यांना खूप छान जमायचे. पुढे त्यांनी गुड्डूला २ ३ वेळा फोनवर गोष्टीही सांगितल्या त्या गोष्टी ऐकून गुड्डू माझ्या मागे लागली होती कि मला मतकरी आजोबांकडे जायचंय. नंतर मतकरी काकांचे झी मराठी वाहिनीने अलबत्या गलबत्या हे पुन्हा एकदा रंगमंचावर आणले तेही मी आद्याला दाखवले ते पाहिल्यावर गुड्डू खूप खुश झाली. गुड्डूच्या मनात मात्र मतकरी काकांनी एक वेगळेच घर केले ते आजही कायम आहे.

मतकरींच्या घरी मी त्यानंतरही ३ वेळा त्यांची पोर्ट्रेट्स शूट केली. कारण मतकरींचे घर हे खूप मोठे आणि घराला भरपूर मोठ्या खिडक्या होत्या आणि त्या खिडक्यांमधून छान सकाळचा कोवळा सोनेरी प्रकाश घरात येत असे. त्या प्रकाशात मतकरी काकांचे फोटो काढणे म्हणजे एक पर्वणीच होती. हे सर्व काढलेले फोटो पुढे मतकरी काकांनी त्यांच्या निदान पंचवीस एक पुस्तकांवर वापरलेही. मतकरी काकांचे एक वैशिष्ट्य होते कि ते जेव्हा मला एखाद्या प्रकाशकाला फोटो पाठवायला सांगायचे तेव्हा त्या प्रकाशकाला आवर्जून सांगायचे कि सौरभ महाडिक ह्याने काढलेले हे फोटो आहेत तेव्हा त्याला पुस्तकामध्ये क्रेडिट हे मिळायलाच हवे. त्याचे नाव हे पुस्तकात प्रकाशित व्हायलाच हवे हे ते आवर्जून सांगत. त्या पुस्तकाची कॉपी मला मिळेल हेही ते आवर्जून बघत असत.

मला एके दिवशी मतकरी काकांचा नेहमीप्रमाणे फोन आला आणि मला मतकरी काका म्हणाले अरे तू विठोबा पांचाळ, गौतम राजाध्यक्ष अशा मोठ्या लोकांकडून फोटोग्राफी शिकला आहेस, त्यांचे मार्गदर्शन तुला लाभले आहे तर माझ्या “रत्नाकर मतकरी फोटो बायोग्राफी” ह्या पुस्तकाचे फोटोंचे संपादन आणि पुस्तकाचे संपादन तू करावंसं असे मला वाटतंय. तू घरी ये म्हणजे आपण ते काम सुरु करूयात. मी मतकरींकडे गेलो. मतकरींनी आधीच जवळपास हजार एक फोटो त्यांचे अगदी त्यांच्या लहानपणापासूनचे शोधून ठेवले होते आणि मला म्हणाले कि ह्यातून तुला फोटो बायोग्राफीसाठी फोटो निवडायचे आहेत, तुझा शब्द हा शेवटचा असेल. हे ऐकल्यावर आणि मतकरींनी माझ्यावर टाकलेला विश्वास बघून मी उडालोच, परंतु पुढे काही महिने मी मतकरी काका, सुप्रिया मतकरी आम्ही तिघांनी बसून मतकरींच्या फोटो बायोग्राफीसाठी फोटो निवडले. हे करत असतानाही त्यांना एखादा फोटो घ्यावासा वाटला तर मला आवर्जून ते विचारत असत. मतकरींचे एक होते कि “त्यांनी एकदा एखाद्यावर विश्वास टाकला आणि त्याच्यावर एखादे काम सोपवले कि ते त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत असत.”

पुढे एकदा मी मतकरी काकांना म्हणालो काका माझे पहिले वाईल्डलाईफ मधल्या व निसर्गातल्या माझ्या भटकंतीवर आधारित माझे पुस्तक नवचैतन्य प्रकाशनचे मराठे काढू इच्छित आहेत. हे ऐकल्यावर मतकरींनी प्रतिभाकाकीला हाक मारली कि प्रतिभा सौरभचे पहिले पुस्तक येतंय तर त्याला प्रकाशनव्यवसायाविषयी, प्रकाशनाविषयी, त्यातल्या टर्म्स विषयी आपण माहिती द्यायला हवी. त्याला कोणत्याही प्रकाशकाने फसवायला नको हेही त्यांनी प्रतिभाकाकींना सांगितले आणि मग मला प्रकाशनातल्या सर्व गोष्टी अगदी सविस्तरपणे समजावून सांगितल्या. माझ्या आयुष्यातल्या मी लिहिलेल्या ह्या पहिल्यावहिल्या पुस्तकाला नावही मतकरी काकांनी “अरण्यकांड” असे सुचवले होते.

पुढे पुढे माझे मतकरींकडे जाणेयेणे वाढले कधीकधी तर आम्ही आठवड्यातून २ ३ वेळाही भेटत असू. माझ्याकडे आलेल्या नवीन कॉफी टेबल बूक्सविषयी, नवीन फोटोग्राफी च्या पुस्तकांविषयीही आम्ही भेटल्यावर बोलत असू. झी मराठीने पुढे मतकरींची काही नाटकं पुनरुज्जीवित केली आणि रंगभूमीवर आणली ती करतानाही मला आजही आठवतेय कि “आरण्यक” च्या तालमींना त्यांनी मला २ ३ वेळा बोलावले होते व त्या नाटकाच्या नवीन सेट्स साठीही माझ्याकडून त्यांनी माझ्या सूचना घेतल्या होत्या. तर यशवंतमध्ये आरण्यक च्या रंगीत तालमीच्या वेळी मला फोन करून म्हणाले होते कि सौरभ अरे आरण्यक एवढ्या वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर येतंय तेव्हा माझ्या नाटकाचे तू अव्हेलेबल लाइटमध्ये पहिल्या प्रयोगाचे फोटो काढावेसे अशी माझी इच्छा आहे. त्यावर मी काय बोलणार? मतकरींनी सांगितल्यावर मी आणि माझे मित्र विनायक मिशाळ आम्ही दोघांनी आरण्यकच्या नवीन प्रयोगाचे सर्व डॉक्युमेंटेशन आम्ही केले होते.

पुढे मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा चीफ व्हाईट हाऊस फोटोग्राफर ह्या पोस्ट साठी अप्लाय केला आणि माझे इंटरव्यू हे ऑनलाईन होणार हे कळल्यावरही आणि मी एशिया खंडातील पहिलाच त्या इंटरव्यू साठी सिलेक्ट झालोय हे कळल्यावर माझ्याशी बोलून त्याची त्यांनी सर्व माहिती घेतली होती. शिवाय जेव्हा मी ७ राउंड्स पैकी ६ राउंड्स क्लिअर केल्यात हे कळल्यावर त्याचे महत्त्व आणि वेगळेपण ओळखून त्यांनी घरी बोलवून माझे कौतुक केले होते.
बरेचदा मी मतकरी काकांकडे घरी जायचो. मग कधी कधी ते त्यांच्या टेलिव्हिजन सेटवर त्यांनी दिग्दर्शित केलेल्या मालिका, किंवा फिल्म्स मला दाखवत त्याच्याविषयी, त्याच्या संवादांविषयी, पटकथेविषयी, शॉट डिव्हीजन विषयी आमच्यात सखोल चर्चा होत असे. शिवाय मला बरेचदा एखादा शॉट कसा घेतला हे ते समजावूनही सांगत असत.

हे सर्व करत असतानाच त्यांना माझी फोटोग्राफी आवडत होती. मी वाईल्डलाईफ फोटोग्राफी मध्येही २६ वर्षे काढलीत हे त्यांना माहित होते, त्यामुळे बरेचदा मी रणथंभोर किंवा बांधवगढ अशा ठिकाणी जाऊन आलो कि त्यांचा फोन यायचा आणि मला म्हणायचे अरे ते काढलेले सर्व फोटो घेऊन ये मला पाहायला आवडतील. मग मी त्यांना फोटो दाखवताना ते फोटो कसे काढले? त्या फोटोसाठी किती वेळ लागला? त्या फोटोचा एक्झिफ डेटा काय?? असे सर्व ते मला विचारत असत व ते जाणून घेण्यात त्यांना प्रचंड इंटरेस्ट होता. २०१८ मध्ये मी रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात जवळपास महिनाभर राहून ४० एक सफारी करून एक मोठे शूट केले. ते केल्यावरही त्यांनी मला घरी बोलावून ते शूट कसे झाले. त्यात काय काय नवीन मिळाले. शूट करताना काही अडचणी आल्या का? काही नवीन टेकनिक मी वापरले का? किंवा नवीन कॅमेरे, लेन्सेस मी वापरल्या का हेही त्यांनी मला विचारले होते.

ह्याच दौऱ्यावर असताना मला त्यांचा फोन आला आणि मला म्हणाले अरे मी २ नवीन फिल्म्स लिहिल्यात. मला वाटतंय कि माझ्या फिल्म्सची लोकेशन्स आणि सर्व शूटिंग, सर्व फोटोग्राफी तू तुझ्या नजरेतून करावे असे मला वाटतंय. हे ऐकल्यावर मी एका बाजूला प्रचंड खुश झालो होतो कि रत्नाकर मतकरींसारखा एवढा मोठा दिग्दर्शक, साहित्यिक, नाटककार, फिल्म मेकर माझ्यावर विश्वास टाकतो आणि मला ते काम सर्व माझ्यावर सोपवतो. परंतु मतकरींचा ऑरा आणि दरारा एवढा मोठा होता आणि कामाविषयीचे ज्ञान एवढे मोठे विस्तृत होते कि मला त्याचे टेन्शनही आले. परंतु त्यावर मला मतकरी पुढे म्हणालेही अरे तू मुंबईत आलास कि आपण व्यवस्थित चर्चा करू आणि ठरवू परंतु हे सर्व काम हे तूच करायचे आहेस.
पुढे काम सुरु झाले आमच्या मतकरी काकांच्या घरी मीटिंग्सही व्हायच्या, आम्ही काही लोकेशन्सही पाहून आलो होतो. मी काही लोकेशन्सही फायनल केली होती ती लोकेशन्स मतकरींना खूप आवडली होती.

मी मुंबईत बोरिवलीमध्ये राहत असल्यामुळे मतकरी काका जर वसई किंवा इतर ठिकाणी माझ्या बाजूला कुठल्या कार्यक्रमाला जाणार असले तर मला आठवडाभर आधी फोन करून सांगून ठेवायचे, कि सौरभ ह्या ह्या दिवशी मी तुझ्या बोरिवलीच्या पुढे कार्यक्रमाला जाणार आहे. तू मला हवा आहेस मी कार घेऊन येतो तुला घरून पीक अप करतो. आपण कार्यक्रमाला एकत्र जाऊ. जाताना आपली छान चर्चा होईल. मला आजही आठवतेय, आम्ही प्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर ह्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला वसई ला गेलो होतो. दुपारच्या वेळी मला मतकरी काकांनी घरून पीक अप केले आणि आम्ही २ तासांचा प्रवास करून वसईला गेलो. त्या २ तासांमध्ये आम्ही असंख्य वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या होत्या. ह्या आमच्या गप्पाना विषयांची कधीच कमतरता भासली नाही. त्यांनी माझी वीणा गवाणकरांशी आपुलकीने ओळखही करून दिली होती.

मला आठवतेय २०१९ मध्ये त्यांचा ८० वा वाढदिवस होता त्यांना कार्यक्रम करायचा नव्हता परंतु घरातल्या सर्वानीच तो कार्यक्रम आपण करूया असा आग्रह धरला तेव्हाही त्यांनी मला कार्यक्रमाला येण्यासाठी स्वतः अगदी आग्रहाने फोन करून निमंत्रण दिले होते.

रत्नाकर मतकरींची सामाजिक जाणीव हि नेहमीच एक आगळीवेगळी गोष्ट राहिलीय. त्यातही जेव्हा समाजातल्या खाली मागे राहिलेल्या घटकांचा विषय यायचा तेव्हा त्या घटकाला पुढे आणण्यासाठी मतकरी हे नेहमीच पुढे असत. मतकरींनी ठाण्यामध्ये संजय मंगला गोपाळ ह्यांना हाताशी धरून “वंचितांचा रंगमंच हि चळवळ” सुरु केली होती. त्यात ते ठाण्यातल्या झोपडपट्ट्यांमध्ये किंवा चाळींमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी दर शनिवारी ठाण्यात जाऊन स्वतः नाटकाचे प्रशिक्षण देत असत. त्याच्या माध्यमातून त्या गरीब मुलांचे सक्षमीकरण करण्याकडे त्यांचा भर होता. त्या मुलांच्या आईवडिलांना घेऊन त्यांचीही नाटकं त्यांनी बसवली होती किंवा ह्या मुलांसाठीही त्यांनी नाट्य जल्लोष ठाण्यात सुरु केला होता. असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम मतकरी काकांच्या सुपीक कल्पनेतून बाहेर येत असत.

विठोबा पांचाळ ह्यांना भेटल्यानंतर ते माझ्या आणि विठोबांच्या मागे लागले होते कि जे जे कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक वेगळा कार्यक्रम करूयात. त्याची संकल्पना अशी होती कि त्यामध्ये मतकरी काका मॉडेल म्हणून बसणार होते व विठोबा पांचाळ हे त्यांचे अर्धाकृती शिल्प सर्वांसमोर घडवणार होते व मी माझ्या कॅमेऱ्याने मतकरींची पोर्ट्रेट्स सर्वांसमोर चित्रित करणार होतो. मतकरी काका जे जे च्या डीन बरोबरही ह्या कार्यक्रमाविषयी बोलले होते. परंतु हा कार्क्रम विठोबा पांचाळ गेल्यामुळे झाला नाही त्याची त्यांच्या मनात प्रचंड हळहळ होती. मतकरी काका मला नेहमीच एक गोष्ट सांगत असत “सौरभ एखादी गोष्ट, एखादी संकल्पना मनात आली कि ती लगेच प्रत्यक्षात आणली पाहिजे, वेळ निघून गेली कि ते काम तसेच राहते आणि मग ती गोष्ट केवळ आपल्या मनात आठवण बनून राहते” माझ्या पुस्तकांच्या बाबतही ते माझ्या नेहमी मागे असत, किती लिहून झालेय? “चेहऱ्यांमागच्या चेहरे” साठीही मी ज्या ज्या जणांची नावे त्यांच्यासमोर घेतली त्या सर्वांशी त्यांचे संबंध चांगले असल्यामुळे त्यांना शूटसाठी तयार करण्यासाठीही ते प्रत्यक्षात बोलले होते. दिलीप प्रभावळकरांशी तर ते २ वेळा बोलले होते परंतु ते वेळ देण्यास तयार नाहीत म्हंटल्यावर त्यांच्यावर रागावलेही होते.

२०१९ ची गोष्ट मी रणथंभोरला असतानाच त्यांनी गणेशला सांगितले कि गणेश आपल्या सर्व कुटुंबाचे फोटो सौरभकडून काढून घायला हवेत. तू सौरभशी बोल आणि त्याला सांग कि मी सांगितलंय असे. गणेशने मला फोन केला आणि म्हणाला कि बाबाना वाटतंय कि आमच्या सर्व कुटुंबाचे फॅमिली फोटो तू फोटोग्राफ करावेत. मी हो म्हणालो. मी मुंबईत आलो कि आपण लगेच शूट करू त्याप्रमाणे मतकरींचे फॅमिली फोटो सुप्रिया मतकरींच्या विक्रोळीतल्या मोठ्या घरी मी फोटोग्राफ केले ते माझे मतकरींबरोबरचे शेवटचे शूट. ते फोटोही मतकरी काकांना खूप आवडले होते.

त्यानंतरही माझे मतकरींच्या राधा निवासमध्ये जाणेयेणे सुरु होते परंतु मतकरींची तब्येत थोडी नरम होती. एकदा मला मी गेल्यावर ते म्हणाले कि अरे हि पुस्तके आणि मी लिहिलेल्या पुस्तकांची हस्तलिखिते ज्यांना हवी असतील, जे जपून ठेवणार असतील त्यांना मला द्यायचीत. एखाद्या वाचनालयाला, एखाद्या संग्राहकाला हवी असतील तर मला सांग. मी माझा मित्र आणि प्रसिद्ध संग्राहक आणि ग्राफॉलॉजिस्ट सतीश चाफेकरांना हे सांगितले. सतीशकाका मला म्हणाला अरे मला मतकरींची हस्तलिखिते हवी आहेत. आपण मतकरींकडे जाऊयात. मी मतकरींना हे सांगितले त्यांनी सतीश चाफेकरांना घरी घेऊन ये असे सांगितले. चाफेकरांना मतकरींनी त्यांच्या २ नाटकांची हस्तलिखिते त्यावर सह्या आणि मेसेज लिहून दिली.
त्यानंतर मतकरींचा फोन पावसाळ्यानंतर बरेच महिने बंद होता आणि मोबाईलही नवीन घेतल्यामुळे आणि तो स्मार्टफोन असल्यामुळे त्यावर माझा फोन सेव्ह केलेला नसल्याने त्यांना मला फोन करता आला नव्हता. मी बरेचदा फोन करायचो परंतु मतकरी तो उचलत नव्हते. मी काहीवेळा प्रतिभाकाकीनाही त्यांच्या मोबाईलवर फोन केले पण त्या आरण्यक च्या दौऱ्यावर असल्याने मला मतकरींशी काही बोलता आले नाही. त्यामुळे शेवटी मी गणेशला बोललो कि अरे गणेश बाबा कसे आहेत? बाबा माझ्यावर कशामुळे रागावले आहेत का? माझा फोनच घेत नाही आहेत. तेव्हा मला गणेश म्हणाला कि नाही बाबांची तब्येत थोडी मध्ये बरी नव्हती परंतु बाबा गांधींवर नाटक लिहिताहेत त्यामुळे त्यामध्ये बिझी असतील. त्यामुळे आणि फोन नवीन असल्यामुळे ते तुझा फोन घेऊ शकले नसतील. तू घरातला आहेस तुला घरी जायला कोणी अडवलंय. कधीही घरी जा आणि बाबाना भेट. त्यानंतरच्या आठवड्यात गणेश घरी गेला आणि मतकरी काकांना सौरभ तुमच्यावर चिडलाय हे सांगितले तेव्हा त्यांनी मला समोरून कॉल केला आणि म्हणाले अरे मला बरे नव्हते आणि नवीन फोन वापरता येत नसल्याने आणि लँड लाईन बंद असल्याने तुझ्याशी बोलता आले नाही राग मानू नकोस. तू सरळ घरी यायचस ना. घरी का आला नाहीस मला भेटायला?? आता रत्नाकर मतकरीच असे म्हणताहेत हे म्हंटल्यावर मी काय बोलणार.

मी शनिवारी त्यांच्याकडे घरी गेलो तर नेहमीप्रमाणे दरवाजा उघडल्या उघडल्या माझ्या डोक्यावर हात ठेवून मला म्हणाले असे आपल्या माणसांवर कोणी चिडते का? तुझे घर आहे कधीही सरळ उठून घरी यायचे होतेस ना??? माझ्या डोळ्यात त्यांच्या ह्या वाक्याने पाणी आले.. मतकरींचा असा स्वभाव हा खूप साधा सरळ होता, मनात कुठलेही किल्मिष ते ठेवत नसत.

मला आठवतेय २०१६ साल असेल त्यांच्या घरी सांगली किंवा साताऱ्याहून एक व्यक्ती आले होते आणि मतकरी त्यांना काही रकमेचा चेक देत होते. ते गेल्यावर मी त्यांना विचारले तर म्हणाले अरे त्याना कॅन्सर झालाय ऑपरेशनसाठी मदत हवी होती. माणूस अगदी खरा आहे माझ्याकडून थोडी मी करू शकलो तेवढी मदत केली एवढंच. खरेच मतकरी हे एक अजब न समजणारे रसायन होते.

पुढे काही दिवसातच २०२० च्या सुरुवातीलाच भारतात कोरोना येणार अशी कुणकुण लागली. मी माझ्या नेहमीप्रमाणे टूर्सवर होतो. मध्ये मध्ये मतकरींशी भेटणे, फोनवर बोलणे हे सुरु होतेच. त्यातच कोरोनामुळे पूर्ण भारतभर बंद करण्याची वेळ आली तरीही माझे आणि रत्नाकर मतकरींचे फोनवर बोलणे सुरु होते. “आपल्या देशात कोरोना घालवण्यासाठी जे काही उपद्व्याप केले गेले, थाळ्या वाजवा, दिवे लावा असे हे बघून अजिबात अंधश्रद्धा न मानणारे मतकरी हे खूप व्यथित झाले होते, चिडले होते.” त्यांचे ठाम मत होते कि अशा गोष्टींनी तुम्ही लोकांना भुलवू शकता, परंतु ह्या महामारीला पळवून लावू शकत नाही. हि महामारी घालवण्यासाठी तुही विज्ञानाचाच आधार घायला हवा. आणि सखोल संशोधनातूनच आणि स्वयंशिस्तीमधूनच कोरोना हा जाऊ शकेल. हे सर्व त्यांनी मला फोन करून सांगितले होते.

त्या नंतर काही दिवसातच मतकरींना घरातच अस्वस्थ वाटू लागले, थोडे थकल्यासारखे वाटू लागले म्ह्णून आधी गोदरेज हॉस्पिटल येथे नेण्यात आले मग ते कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांना सेवन हिल्समध्ये ऍडमिट करण्यात आले. त्यातच मतकरी काका हे जग सोडून गेले…

परंतु आजही मला हा लेख लिहितानाही वाटतंय कि अचानक मतकरी काकांचा फोन येईल मला म्हणतील सौरभ अरे तुझ्याकडे ते नवीन कॉफी टेबल बुक आलय ना ते घेऊन घरी ये, किंवा अरे त्या आपल्या फिल्मसाठी एखादा चांगला प्रोड्युसर शोध रे. “मला वाटते मतकरींचे मोठेपण ह्यातच होते कि त्यांनी आयुष्यभर ज्या ज्या गोष्टी कराव्याशा वाटल्या त्या ताबडतोब हातात घेऊन पूर्ण केल्या. ते मला नेहमीच म्हणत असत कि सौरभ जेव्हा आपल्या हातात सर्व असते तेव्हाच गोष्टी पूर्ण करायला हव्यात. ती वेळ निघून गेली कि काहीच पूर्ण होतं नाही आणि सर्व गोष्टी अपुऱ्या राहतात.” शिवाय मतकरी काकांच्या सामाजिक जाणिवा, कलाविषयक जाणिवा खूप मोठ्या होत्या, व कलेशी आणि समाजाशी असलेली बांधिलकी प्रचंड मोठी होती. त्यांनी जर ठरवले असते आणि आपल्या राजकारण्यांच्या वळचणीला गेले असते तर त्यांना पद्मश्री, पद्मभूषण सारखे पुरस्कार किंवा नाट्यसंमेलनाचे किंवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सहज मिळू शकले असते. परंतु सत्तालोलुप आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या कोणत्याही राजकारण्यांच्या वळचणीला मी जाणार नाही किंवा त्याच्या हस्ते मी पुरस्कार स्वीकारणार नाही हि त्यांची ठाम भूमिका असल्यामुळे त्यांना हे मानसन्मान कधीच मिळाले नाहीत.
परंतु मतकरी काकांची एकंदर कारकीर्द पाहिली आणि त्यांच्या कलाकृतींना, साहित्याला मिळणारे लोकांचे भरभरून प्रेम पहिले कि वाटते रत्नाकर मतकरी हे ह्या सर्वांपेक्षा खूपच वरचे होते. त्यांची श्रेणी खूप वरची होती. माझ्या आयुष्यात रत्नाकर मतकरींचे येणे आणि त्यांचा सहवास लाभणे आणि त्यांच्या विचारांनी माझे आयुष्य समृद्ध होणे हा एखादा सुवर्णकांचन योगच असावा. माझ्या ह्या रत्नाकर मतकरी नावाच्या सर्वांगांनी समृद्ध मित्राला माझा सलाम. मतकरी तुमचे माझ्या मनावरचे गारूड हे आयुष्यभर असेच राहणार आहे ते कधीच कमी होणार नाही…

— सौरभ महाडिक…
१७/५/२०२१

फोटो.. सौरभ महाडिक

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

1 Comment on रत्नाकर मतकरी नावाचे गारुड (लेखक – सौरभ महाडिक)

  1. सुंदर लेख …न उलगडलेले
    रत्नाकर मतकरी उलगडून दाखवणारा आणि सौरव महाडिक यांच्या बद्दल ही बरंच सांगणारा..जणू ह्यांना आम्हीच स्वतः बोलत- भेटत आहोत असे वाटत होते.छान..
    संतोष सेलूकर
    परभणी

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..