नवीन लेखन...

रम्य ते बालपण : चित्तरंजन भट

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मध्ये चित्तरंजन भट  यांनी लिहिलेला हा लेख


बाबांचा एक शेर आहे

नाही म्हणावयाला आता असे करू या
प्राणात चंद्र ठेवू हाती उन्हे धरू या

पुण्याच्या पंतांच्या गोटात ही गझल त्यांनी लिहिली होती बाबांनी पहिल्यांदा. हा शेर ऐकवला तेव्हा खालची ओळ वेगळी होती. ऐकवल्यावर उपस्थितांपैकी काहींनी आपले मत दिले. तिथे मीही उपस्थित होतो. तेव्हा मीही आगाऊपणा केला आणि माझे मत दिले आणि “प्राणात चंद्र पेरू” असा पर्याय सुचवला. तो बाबांना आवडला होता. मात्र नंतर ‘प्राणात चंद्र ठेवू’ ही ओळ अंतीम झाली. महत्त्वाचा मुद्दा असा की माझ्यासारख्या दहा-अकरा वर्षांच्या मुलाने सुचविलेल्या बदलाचाही त्यांनी विचार केला. बदल कुणीही सुचवला तरीही त्याचा बाबा मेरीटवर विचार करत. कुणी सुचवला आहे हे त्यांच्या लेखी महत्त्वाचे नसे. शब्दांच्या नेमक्या वापरावर बाबांचा भर होता आणि लहानपणापासून त्यांनी माझ्यावरही ते संस्कार केले.

त्या काळी पंतांच्या गोटात गझल लिहिणाऱ्यांचा आणि गझल ऐकणाऱ्यांचा सारखा राबता असायचा. म. भा. चव्हाण, प्रदीप निफाडकर, दीपक करंदीकर, राजेंद्र शहा ते प्रा.डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी असे अनेक गझलवाले तेव्हा पंताच्या गोटात येतजात असत. त्यातील बहुतेक तरुण होते आणि बहुतेक तरुणांना मी ‘अरेतुरे’च म्हणत असे. ते बाबांना ‘दादा’ म्हणत असत. अजूनही गझलकारांच्या त्या पिढीतल्या बहुतेकांना ‘अरेतुरे’च म्हणतो. यामागे हे बालपणीचे कारण आहे. दुसरे काही नाही.

नागपुरात आमच्या घरीही बाबांना भेटायला खूप लोक येत असत. बहुतेक माणसे साधीसुधीच असायची. बरेचदा नावाजलेली माणसेही यायची. बाबांच्या खोलीत मग गप्पांची, हास्यविनोदाची सत्रं चालायची. चहाच्या खेपा व्हायच्या आणि आई थकून जायची. विशेषतः हिवाळी अधिवेशनाच्या काळात अनेक मंत्रीमंत्री आणि आमदारही बाबांना खास भेटायला येत असत. उल्हास पवार, सुशीलकुमार शिंदे तर नेहमीचेच.

‘अनघा प्रकाशन’चे नालेकाकाही दरवर्षी त्या काळात आमच्याकडे येत असत. असे कुणी भेटायला आले की सहसा मी खोलीत घुसत नसे. म्हणजे मला मुभा नव्हती असे नाही. एकंदरच मी तेव्हा संकोची स्वभावाचा होतो. थोडा बुजराच होतो. पण मधूनच मी त्या गप्पांचा कानोसा घेत असे.

बरेचदा मग गझल ऐकवायची फर्माईश व्हायची आणि मग बाबा आपल्या पहाडी आवाजात आजूबाजूच्यांना विसरून गझला सादर करीत असत. तो काळ अद्भुत होता. आमचे घरही गझलमय झाले होते. पुढे एक छोटा कॅसेट रेकॉर्डर घरी आला आणि मग फरीदा खानम. मेहदी हसन इत्यादींशी माझी ओळख झाली. इतरांना कठीण उर्दू शब्दांचा अर्थ सांगत त्यांच्या गझला ऐकवणे हा बाबांचा आवडता छंद होता. पुढे टू-इन-वन आल्यावर बाबा या सगळ्यांच्या निवडक गझला वेगळ्या कॅसेटवर रेकॉर्ड करून ठेवत असत. ‘मख्खन’, ‘खुशबू’ अशा टायटल त्या कॅसेट्सना लाभत असे. रंगीबेरंगी शाईचा वापर करत कॅसेटवर माहिती ते लिहून ठेवत असत. आपल्या मित्रांना, भेटीस येणाऱ्यांना बरेचदा या कॅसेट्स गिफ्टही देत असत.

पुढे या गझला ऐकून ऐकून गझलेचीही आवड मला निर्माण झाली. मीही तेव्हा गझला ‘लिहायला’ सुरुवात केली. मी तेव्हा आठवी-नववीत असेन. काय लिहितो आहोत याचे फारसे भान अर्थातच तेव्हा नव्हते. आपण वृत्तात लिहू शकतो. रदीफ आणि काफिया (यमक आणि अन्त्ययमक) सांभाळू शकतो याचा त्यात आनंद जास्त असायचा. मला आठवतं ‘अनघा’च्या दिवाळी अंकात माझी एक ‘कुमारवयीन’ गझल छापूनही आली होती.

माझ्या बाबांना चांगलेचुंगलं खाण्याची आवड होती आणि त्यांच्याकडून अनुवंशाने माझ्याकडेही ही आवड आली. अमरावतीला बाबांचा एक आवडता चाटवाला होता. ‘नानकराम दहीवडेवाला’ त्याचे नाव. त्याच्यासारखे मुलायम आणि जाळीदार दहीवडे जगात मिळत नाहीत असे बाबांचे म्हणणे होते. बाबा ते वडे नागपुरात असताना ‘मिस’ करत. एकदा मला नागपूरच्या आनंद टॉकीजजवळ एका राजस्थानी चाटवाल्याकडे असेच वडे गवसल्यावर त्यांना मी ते खाऊ घातले. तेव्हा ते प्रचंड खूष झाले होते. त्यानंतर मूड झाला की मग मी कडीचा डबा घेऊन तिथे जात असे आणि चार-पाच प्लेट वडे घेऊन येत असे. आम्ही जेवायला बसलो की आमच्या छान गप्पा रंगत असत. खूप विषय जेवता-जेवता चघळले जायचे. ‘ह्या जगात साध्या वरणासारखी कुठलीच गोष्ट नाही’ असे त्यांचे मत होते. बाबांच्या आवडीनिवडी तशा साध्याच होत्या. तमालपत्र आणि धने टाकून मोहरीच्या तेलाची फोडणी दिलेले पातळ वरण त्यांना खूप आवडायचे. बाबांना टमाटे आणि वांगी अजिबात आवडत नसत. या दोन भाज्यांशी त्यांचे हाडवैर होते. ‘टमाटा मटणातले दुर्गुण झाकण्याचे काम करतो म्हणून मटणात टमाटा सहन करू नये,’ असे ते मला निक्षून सांगत असत. सांगूनही मटणात टमाटा सापडला तर ते मटण परत गेलेच म्हणून समजा. ‘आपण हॉटेलात पैसे देऊन आपले कष्टाचे जेवत असतो. हॉटेलवाले आपल्यावर जेवायला घालून उपकार करत नसतात,’ हे त्यांचे मत मला पटलेले आहे आणि मी इतरांनाही पटवत असतो. मध्यंतरी नागपूरच्या एका बऱ्यापैकी प्रसिद्धशा बल्लवाचार्याने ‘सुरेश भटांना वांग्याचे भरीत आवडत असे. मी स्वतः त्यांना आपल्या हाताने बनवून खिलवत असे’ वगैरे फेकले होते. त्याला माफी नाही.

-चित्तरंजन भट

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..