राजकारणाचे मोदीकरण !

गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये पाच महापालिकांमध्ये भाजपला दोन तृतियांश मिळाले तर एका महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळाले. त्यात 80 टक्के मते भाजपच्या पारड्यात पडली तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतरांना 20 टक्के मतांवरच समाधान मानावे लागले. भाजपच्या या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जात असून गुजरातमध्ये राजकारणाचेच मोदीकरण झाल्याचे पहायला मिळत आहे.काँग्रेस आणि इतर कथित धर्मनिरपेक्ष शक्तींनी नरेंद्र मोदींवर कितीही टीका केली तरी गुजरातमधील जनतेने आपल्या मनात मोदींचे स्थान काय आहे हे वेळोवेळी दाखवून दिले आहे. गुजरातमधील सहा महापालिकांच्या निवडणुकांमध्ये अलीकडेच भाजपला एकतर्फी विजय मिळाल्याने मोदींचे स्थान पुन्हा अधोरेखित झाले. गेल्या काही वर्षांमध्ये मोदींची मुस्लिमविरोधी अशी प्रतिमा निर्माण झाली. जहाल हिंदुत्ववादी म्हणून त्यांची निर्भत्सना करण्याचा प्रयत्न केला. पण, मोदींनी गुजरातमध्ये केलेली विकासकामे नजरेआड करून चालणार नाहीत. मोदी कुशल प्रशासक आहेत हे त्यांच्या कट्टर विरोधकांनाही मान्य करावे लागेल. ‘माझ्या जीवनात ध्येयाला सर्वाधिक महत्त्व आहे. जीवनातील निश्चित ध्येयांव्यतिरिक्त माझ्या कोणत्याही महत्त्वाकांक्षा नाहीत. काम हेच माझे तत्त्व आहे. मी महापालिकेचा अध्यक्ष असतो तरी मुख्यमंत्र्याएवढेच काम केले असते’ असे मोदी यांचे म्हणणे आहे. ते केवळ हे बोलून थांबले नाहीत तर स्वत:चे विचार सत्यात उतरवून दाखवले. गुजरातमधील सुरतपासून कोणत्याही शहरात फेरफटका मारला तरी मोदींनी केलेल्या विकासकामांची झलक पहायला मिळते. या कामांमधूनच त्यांनी लोकप्रियता मिळवली असून त्यांच्यावर विरोधकांच्या अपप्रचाराचा कोणताही परिणाम झालेला नाही.पश्चिम बंगालमध्ये डाव्या आघाडीने गेली तीन दशके आपले वर्चस्व दाखवून दिले आणि आता या डाव्या आघाडीची सत्ता जाणार तरी कशी, आणि घालवणार तरी कोण, या प्रश्नाने सर्वांनाच अस्वस्थ केले. या प्रश्नाला ममता बॅनर्जी हे उत्तर मिळाले खरे, पण सतत 30 वर्षे एका राज्यात सत्ता उपभोगून डाव्या आघाडीने निश्चितच विक्रम केला होता. थोडी फार तशीच अवस्था गुजरातमध्ये भाजपाच्या बाबतीत निर्माण झाली आहे. गेल्या दहा वर्षांपासून नरेंद्र मोदी यांनी सातत्याने निवडणुका जिंकून आपण गुजरातला भाजपाचा भक्कम बालेकिल्ला बनवू शकतो, हे सिद्ध करून दाखवले आहे. तूर्तास तरी गुजरातेत नरेंद्र मोदींना प्रतिस्पर्धी नाही. प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्ष फार काही करू शकत नाही. त्यामुळे मोदींची वाटचाल त्यांच्या पक्षातल्याच फुटीर नेत्यांकडून रोखली जाऊ शकेल, असे मध्यंतरी बोलले जायला लागले होते. परंतु, अनेक मातब्बर नेते पक्षातून फुटून गेले तरी मोदी यांच्या स्थानाला धक्का लागला नाही. केशुसिंग पटेल किंवा पक्षांतर्गत इतर तगडे विरोधकही त्यांच्यापुढे आव्हान निर्माण करू शकलेले नाहीत.गेल्या वर्षीही पक्षातून काही नेते फुटून बाहेर पडले मात्र त्यांचाही मोदींच्या स्थानावर काहीच परिणाम झाला नाही. आता तर राज्याच्या सहा महापालिकांच्या निवडणुकांमध्ये मोदींनी आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. अहमदाबाद, सुरत, भावनगर, बडोदरा, जामनगर आणि राजकोट या सहा महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपाने जबरदस्त यश मिळवले आहे. यातली जामनगर महापालिका वगळता पाच महापालिकांमध्ये भाजपाला दोन तृतियांश बहुमत मिळाले असून जामनगर महापालिकेत एकट्या भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या सहाही महापालिकांमध्ये काँग’ेसचे अक्षरश: पानिपत झाले आहे. सहाही महापालिकांच्या निवडणुकांचे तपशीलवार मतदानाचे आकडे उपलब्ध झाले असून
भारतीय जनता पार्टीने त्यातली 80 टक्के मते प्राप्त केली आहेत. उर्वरीत 20 टक्क्यांमध्ये काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, अन्य छोटे-मोठे पक्ष आणि सारे अपक्ष गुंडाळले गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी यांना बदनाम करून खलनायक ठरवण्याची पद्धतशीर मोहीम काही तथाकथित सेक्युलर नेते, विचारवंत आणि काँग्रेसच्या पुढार्‍यांनी चालवली आहे. तरीही नरेंद्र मोदी यांच्या जनमानसातील प्रतिमेला कसलाही धक्का पोचलेला नाही, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे.मागील विधानसभा निवडणुकांपासून नरेंद्र मोदी यांच्यामागे अनेक प्रकारच्या चौकशांचे शुक्लकाष्ठ लावून देण्यात आले आहे. सोहराबुद्दीन हत्याकांड आणि 2002 च्या गुजरात दंगलीतील काही खटले असे काही रंगवण्यात येत आहेत की, त्यातून नरेंद्र मोदी संपून गेले पाहिजेत. या प्रयत्नांमुळे मोदींची लोकप्रियता बरीच घटल्याचा लोकांचा समज झाला होता. मात्र, आणंद जिल्ह्यातील कचलाल विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय झाला आणि विरोधकांचा भ्रमनिरास झाला. तसा विचार केला तर सत्ताधारी भाजपने राज्यातली एखादी विधानसभेची पोटनिवडणूक जिंकावी यात नवल काही नाही. परंतु, कचलाल हा विधानसभा मतदारसंघ वैशिष्ट्यपूर्ण होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत या मतदारसंघातून काँग्रेसशिवाय अन्य कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकला नव्हता. मोदींच्या विरोधात मोठ्या प्रमाणात अपप्रचार सुरू असूनसुद्धा भाजपचा उमेदवार विजयी झाला ही गोष्ट गुजरातच्या राजकारणात महत्त्वाची मानली गेली.कचलाल मतदारसंघातील संकेत खरे असल्याचे आता महापालिकांच्या निवडणुकातून दिसून आले आहे. नरेंद्र मोदी यांना सातत्याने मुस्लीमविरोधी ठरवून राजकारण केले जात असतानाच भाजपाने 12 मुस्लीम उमेदवार उभे केले. यातला एक उमेदवार विजयी झाला आणि 11 पराभूत झाले. परंतु, मोदींची आणि भाजपची मुस्लिमविरोधी प्रतिमा ठळक केली गेली असतानाही भारतीय जनता पार्टीला गुजरातमध्ये 12 उमेदवार मिळाले ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता गुजरातेत भाजपा आणि काँग्रेस यांची नव्याने शक्तीपरीक्षा झाली आहे. राज्यातील 14 जिल्हा परिषदा, 203 तालुका पंचायती, 53 नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल बाहेर येत आहेत. या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा भाजपाची शक्ती दिसून येणार की राज्यात काँग्रेसला काही स्थान आहे हे या निवडणुकांच्या निकालांचे विश्लेषण होताच सिद्ध होणार आहे. मात्र, सहा महापालिकांच्या निवडणुकीतील मतदानाच्या आकड्यांवरून तरी गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष आपला आधार गमावत असल्याचे दिसत आहे. काँग्रेसने देशभरात केलेल्या जनकल्याणाच्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचू न शकल्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला, असे विश्लेषण आता काँग्रेसचे नेते करत आहेत. परंतु, काँग्रेसचा पराभव मोदी यांच्या झपाट्यामुळे झालेला आहे. गुजरातमधील राजकारणाच्या या टप्प्याला ‘मोदीपर्व’ म्हटले जात असून एक नवी राजकीय क्रांती तेथे पहायला मिळत आहे.

कुशल प्रशासक नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्रिपद पटकावले तेंव्हा राज्याची आर्थिक स्थिती खालावलेली होती. मोठ्या प्रमाणावर निधीची चणचण जाणवत असताना प्रशासकीय खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात आली. या टप्प्यात मोदी यांनी उचललेल्या क्रांतीकारी पावलांमुळे गुजरातचे दरडोई उत्पन्न दहा टक्क्यांवर गेले. देशातील कोणत्याही राज्याच्या दरडोई उत्पन्नाच्या दरापेक्षा हा दर अधिक होता. गुजरातचा विकास करण्यासाठी मोदी यांनी ठोस योजना मांडून प्रभावी अंमलबजावणी केली. या योजनांमध्ये पंचामृत योजना,सुजलाम सुफलाम, कृषी महोत्सव, चिरंजिवी योजना, मातृवंदना, बेटी बचाव,  कर्मयोगी अभियान, कन्या कलावाणी योजना आणि बालभोग यांसारख्या कल्याणकारी योजनांचा समावेश होता. या योजनांमधून त्यांनी सर्व क्षेत्रांमध्ये विकास घडवून आणला. दहशतवादाच्या मुद्यावरही नरद्र मोदींनी नेहमीच विस्तृत भूमिका मांडली. त्यांनी दहशतवादविरोधी कायद्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा सतत पाठपुरावा केला. मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गुजरातच्या किनारपट्टीच्या भागातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली.

— अरविंद जोशी
(अद्वैत फीचर्स)

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..