नवीन लेखन...

पुरुष – प्रकृती

आज स्त्री मुक्ती, स्त्री सबलिकरण, स्त्री एक अबला अशा प्रकारच्या अनेक विषयांवर लेखन, चर्चासत्र, भाषणं, प्रतिक्रिया सतत होत येत असतात. अनेकदा आपले मुद्दे पटवून देण्यासाठी इतर वेळी नास्तिक असलेली काही मंडळी अगदी देवी देवतांची उदाहरणं देऊ लागतात. उद्देश हा की पुराणकाळापासून स्त्रियांवर होत असलेला अन्याय असमानता दाखवून देणं. आता स्त्रियांवर अन्याय झाला नाही, होत नाही असं म्हणण्याचं धारिष्टय मी अज्जीबात करणार नाहीय. अनेकदा या अन्यायाने माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा ओलांडून पशुत्वाकडे वाटचाल केलेली आपण पहिली आहे आणि अगदी आजही पहात ऐकत आहोत. स्त्री एक उपभोग्य वस्तू ही तिच्याबद्दलची भावना तिने कित्येक वर्ष सहन केली, आजही करतेय.
मध्यंतरी एका fb समूहावर एका स्त्री लेखिकेने एका बलात्कारीत मुलीवरची कथा पोस्ट केली होती. त्यावर एक प्रतिक्रिया म्हणून मी म्हटलं होतं की आज स्वसंरक्षणासाठी मुलींना शालेय स्तरापासून ज्युडो कराटे शिक्षण अनिवार्य करायला हवं. आणि हे माझं ठाम मत आहे. पण त्यावर त्या लेखिकेने म्हटलं की ‘याला काय अर्थ आहे. पुरुषांची मानसिकता आधी बदलायला हवी. ते सोडून तुम्ही स्त्रियांनी काय करायला हवं ते सांगताय.’
म्हटलं, अगदी बरोबर आहे. ते तर व्हायलाच हवय. परंतू ते होईपर्यंत मुलींनी अत्याचार सहन करतच रहायचं का? किंवा कुणा लिंगपिसाटाला, कामांध विकृताला शरण जायचं का? त्यांचं हे ही म्हणणं होतं की हे प्रयत्न कौटुंबिक स्तरावरूनच व्हायला हवेत. म्हणजे त्यासाठी कुटुंब व्यवस्था टिकायला हवी. ते होण्यासाठी एकमेकांना समजून घ्यायला हवं. स्त्री पुरुष दोघांनीही आपापले इगो बाजुला ठेवून आणि लहान लहान गोष्टींचा issue न करता एकत्र यायला हवं तरच आजचं घटस्फ़ोटांचं प्रमाण कमी होईल. मानसिकता सकारात्मक होण्यासाठी प्रयत्न होतायत, होत नाहीयत आणि पुरुषांच्या मानसिकतेमध्ये किती बदल झालाय हे आजही कुणीच ठामपणे सांगू शकत नाही. पण तो बदल संपूर्णतः होईपर्यंत निरपराध मुलींचा बळी का जावा? स्वसंरक्षणाच्या शिक्षणामुळे 100%सगळं आलबेल होईल असं अजिबातच नाही. पण कुठेतरी प्रतिकाराची जरब बसू शकेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
आता एखाद्या परिस्थितीकडे आपण कसं पहातो यावरही बरचसं अवलंबून असतं. संसार म्हटला की कुठे कमी कुठे जास्त हे होतंच असतं. संसारात स्त्रियांना निर्णय घेण्याचा अधिकारच नसतो असं आज तरी मी म्हणणार नाही. मग कुणी असंही म्हणेल, की हे शहरांपुरतं झालं. गावपातळीवर आजही तीच परिस्थिती आहे. ही परिस्थिती संपूर्णपणे बदलायला हवी हे ही बरोबर, पण मग मी म्हणेन की स्त्रियांना व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे नेमकं हवय तरी काय? त्यामध्ये गावातल्या एका घरातील सुनेला तिच्या सासूने तिला भाऊ नाही म्हणून दिवाळीला माहेरी जाऊ दिलं नाही. आता तिच्या नवऱ्याने पुढे होऊन पत्नीला साथ द्यायला हवी होती हे सुद्धा बरोबर. पण आपल्या मुलाला लहानपणापासून आपल्या जरबेत ठेवणारी आई ही स्त्रीच आहे. लेकाची मानसिकता तशी कारण्यामागे एका स्त्रीचाच हात आहे. स्त्री असून तिला आपल्या सुनेची वेदना का समजू नये. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीशी या प्रकारे वागू शकते याला अनेक कारणं असू शकतात. मुद्दा हा आहे की प्रत्येक गोष्टीमधून मार्ग काढण्याऐवजी त्यातली फक्त पुरुषप्रधानता शोधत आपण नकारात्मक vibes पसरवत रहायचंय का? आज शहरात स्त्री स्वातंत्र्याबद्दल बोलणाऱ्या, स्त्रियांच्या सबलीकरणासाठी प्रयत्नशील असणाऱ्या किती स्त्रिया गावापातळीवर जाऊन आणि गावातल्या परिस्थितीचा अभ्यास करून हा विषय तिथे योग्य प्रकारे पसरवातायत? तर फारच थोड्या स्त्रिया, संस्था हे मनापासून करताना दिसतात. अगदी लहानपणापासून मुलांना (मुलग्यांना )घरातल्या कामांपासून दूर ठेवणाऱ्या, प्रत्येक वेळी त्यांना पाठीशी घालणाऱ्या, त्यांचे आवाजवी लाड पुरवणाऱ्या, त्यांचे अपराध प्रत्येक वेळी पोटात घालणाऱ्या आई, बहीण या रूपात स्त्रियाच असतात. आणि तीच आई मुलींना सतत घरातल्या गोष्टी, कामं शिकून घेण्यासाठी मागे लागत असते. फार कमी घरांत मुलगा मुलगी हा भेद न करता अगदी दोघांचही एकाच मानसिकतेने संगोपन केलं जातं. हे मुलाचं काम किंवा हे मुलीचं हे मानणं चुकीचं आहे हे अगदी मान्य. वेळेला पुढे होऊन ती गोष्ट निभावून नेणं हे दोघांचही काम आहे. तरीही काही गोष्टी स्त्रियांनाच उत्तम जमतात, हे माझं मत आहे. उदा. स्वयंपाक. अनेक उत्तम शेफ पुरुष आहेतही तरीही स्त्रीच्या हाताला एक उपजत चव असते. यावरही म्हटलं जाईल,की असं काही नसतं, हे बायकोला खुश करून तिच्याकडून काम करून घेण्याचे बहाणे आहेत पुरुषांचे. प्रत्येक गोष्टीत आपण तिरकसपणेच पहायचं, असं ठरवलं तर मात्र काहीच चांगलं घडणार नाही. याशिवाय अनेक अशी कामं असतात जी पुरुष निश्चितपणे करू शकतात. आणि आजच्या धावपळीच्या युगात जिथे नवरा बायको दोघंही आपापल्या नोकरी, व्यवसायात व्यस्त असतात तिथे उभयंतांनी आपापला वाटा उचलणं गरजेचंच असतं. मी आज अशाही सुशिक्षित मुली पाहिल्यायत ज्या नोकरी करत नाहीत (अर्थात त्यांच्या मनाने )आणि घरातही काही कामं करत नाहीत. स्वयंपाकाच्या दृष्टीनेही सगळा आनंद असतो. जोडीदाराणे विचारलंच तर,
“मी तुला लग्नापूर्वी सांगितलं होतं मला काही येत नाही” हे म्हणून मोकळ्या होतात. प्रेमाविवाह केवळ प्रियकर तिच्या शहरात यायला तयार नाही आणि मी माझं शहर सोडून तिकडे येणार नाही यासाठी रखडलेले मी पाहिलेयत. आणि अगदी तो किंवा ती झाली याला राजी, तरीही पुढे अशा काही घटना घडू शकतात की त्याला /तिला आपल्या मूळ शहरात परतावं लागलं तर मग काय? घटस्फ़ोट? की, मी तुला आधीच सांगितलं होतं असं म्हणून सगळं संपवायचं? संसारात ऍडजस्टमेन्ट ही दोघांनीही करणं गरजेचं असतं. स्त्री म्हणेल, हे मला पटत नाही तर पुरुष म्हणेल ते मला पटत नाही. हे मी करणार नाही, ते मी ही करणार नाही, तू म्हणतोस म्हणून मी कां करायचं? तर तू म्हणतेस म्हणून मी तसं वागायचं?
मग संसार पुढे जायचा कसा? कुणाचं बरोबर हे ठरवणार कोण? आणि कोणी नमतं घ्यायचं किंवा समजून घ्यायचं हे कोण ठरवणार?
लग्नसंस्था आणि कुटुंबव्यवस्था यांना आज चक्क कोर्टाचं स्वरूप येऊ लागलंय. प्रत्येक गोष्टीत स्त्री स्वातंत्र्य, स्त्रियांची गळचेपी, स्त्रियांचे अधिकार, स्त्री एक अबला असं म्हणून अनेक छान, सुरळीत एकमेकांच्या सहकार्याने चाललेल्या संसारानाही काडी लागू शकते आणि त्यात ही ठिणगी पडून संसार उध्वस्त होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत पुरुषप्रधानतेचं स्तोम माजवत न रहाता काही सकारात्मक विचार, लेख, अनुभव मांडावे जे स्त्री पुरुष दोघांनाही समानतेच्या पातळीवर उपयोगी पडतील.
कित्येक घरांमध्ये पुरुषांचं काहीही चालत नाही. संपूर्ण घरावर स्त्रीचा अधिकार असतो. वर्चस्व कुणाचं हा मुद्दाच नाही. स्त्री किंवा पुरुष यांनी आपलं वर्चस्व सिद्ध करण्यापेक्षा पुढच्या पिढीवर समानतेचे सकारात्मक संस्कार करणं जास्त महत्वाचं. मध्यंतरी एका स्त्री लेखिकेने आजच्या पिढीतील मुलींच्या पेहरावावर एक लेख लिहिलेला वाचनात आला. आजच्या पिढीतील मुलींचं म्हणणं असं आहे का? की आम्ही काहीही, कसेही आणि कितीही लहान, उघडे कपडे घातले तरी कुणी काही बोलायचं नाही. आमच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर बाधा येते. परंतू स्त्री आणि पुरुष, दोघांनीही आपले झाकून ठेवण्याचे अवयव सर्वांसमोर उघडे टाकायला सुरवात केली तर त्याला काय अर्थ राहिला. पुरुष नाही का वरचा भाग उघडा टाकत? मग आम्हीही तसं केलं तर एव्हढा गदारोळ करण्याची काय जरुरी आहे? माझ्या मुलाला तो लहान असताना मी शाळेत सोडायला जात असे. अनेक पुरुष पालक तोकडी हाफ पॅन्ट आणि गंजीसदृश बिनबाह्याचा शर्ट घालून शाळेत येत असत. हे प्रमाण इतकं वाढू लागलं की अखेर शाळेला जाहीर घोषित करावं लागलं की पालकांनी शाळेत व्यवस्थित पूर्ण कपडयात यायला हवं. आता कुणी म्हणू लागलं की आमच्या दृष्टीने हे व्यवस्थितच कपडे आहेत तर त्यावर काय बोलणार?
लग्नामध्ये वरपूजा नावाचा एक विधी असतो. यामध्ये जावयाचे सासरा पाय धुवून त्याची पाद्यपूजा करतो. या विधिला तो कितीही महत्वाचा असला तरी आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ व्यक्ती हे करणार आहे या भूमिकेतून तो करून घेण्यासाठी जावयाने स्पष्ट नकार द्यायला हवा. या ठिकाणी मुलाकडचे वरचढ आणि मुलीकडचे कनिष्ठ हा मुद्दाच नाही किंवा नसायला हवा. माझी पत्नी गोव्याची आहे. म्हणजे तिचं मूळ गाव गोवा. गोव्यात मुलीच्या लग्नात तिच्या अंगावर भरपूर दागिने, जावयाला घरातलं संपूर्ण फर्निचर ते अगदी गाद्या उशा, स्टील कपाट असा संपूर्ण साज देण्याची प्रथा आहे. आता यामध्ये ज्यांच्या घरांत एकपेक्षा जास्त लेकी असतील त्या बापाचं या देण्यामध्ये कंबरडं मोडून जातं अथवा तो कर्जबाजारी होऊ शकतो. परंतू ज्यांची आर्थिक स्थिती उत्तम असते आणि घरात एकच लेक असते ते हा सगळा मानपान आनंदाने करतात. अनेकदा लेकी सुद्धा हे सगळं व्यवस्थित बापकडून वसुल करून घेतात. माझ्या पत्नीने तिच्या वडिलांना स्पष्ट सांगितलं होतं, की हे सगळं तू प्रथेनुसार काहीही द्यायचं नाही. अर्थात त्यांना ते तितकंसं आवडलेलं नव्हतं. त्यांनी आपल्या मोठ्या लेकीच्या लग्नात हे सगळं दिलेलं होतं. त्यातून त्यांना जावई सुद्धा असा मिळाला की मी सुद्धा वर उल्लेखलेला जावयाचा मान काहीही घेतला नाही. त्यामुळे ते फारच हिरमुसले झाले. आज अनेक मुलींना आणि मुलांनाही आपलं लग्न संपूर्ण विधियुक्त करायला आवडतं. मुलाकडची बाजू वरचढ आणि मुलीकडची बाजू खालची हे आज अजिबातच संपलंय असं नाही म्हणणार मी, पण याचं प्रमाण मात्र निश्चितच कमी झालंय.
आज स्त्री ही अगदी प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. आज असं कोणतंही क्षेत्र उरलेलं नाही ज्यामध्ये तिचा सहभाग नाही. परंतू स्त्री स्वातंत्र्याचा अनेकदा अतिरेक होऊन लग्नसंस्था, कुटुंबसंस्था क्षणात तोडून आजची पिढी वेगळी होतेय. अनेकदा त्याची कारणं, कदाचित नीट विचार केला असता तर इतक्या टोकाला जावं अशी नव्हती हे लक्षात आलं असतं. पण त्यावेळी खूप उशीर झालेला असतो. पुरुषांची मानसिकता बदलायला हवीच, परंतू स्त्री सबलिकरणाच्या, स्वातंत्र्याच्या हात धुवून मागे न लागता, प्रत्येक स्त्रीने आणि पुरुषानेही सकारात्मक विचार करावा आणि थोडं थोडं मागे जाऊन पुन्हा एक सुरवात करावी. प्रत्येक गोष्टीत पुरुषप्रधानता शोधत बसण्यापेक्षा आणि स्त्रीला अबला संबोधत राहण्यापेक्षा निसर्गनियमानुसार स्त्री पुरुषांना मिळालेल्या कमी जास्त गोष्टींचा विचार करून एकमेकांच्या साथीने पुढे जात रहावं, हेच श्रेयस्कर नाही का???
मध्यंतरी एका समूहावर दोन लेख वाचनात आले. त्यामध्ये या विषयाकडे पहाण्याचा नेमका आशय समावलेला होता.
नाते सांभाळायचे असेल तर..चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी … आणि नाते टिकवावयाचे असेल तर ..नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी ….
माणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो.. तर प्रत्येक माणूस आप-आपल्यापरीनं निसर्गाची ‘एकमेव अप्रतीम कलाकृती’ असतो..
कधीही कोणाची कोणाशी तुलना करू नये..अगदी स्वतःचीही..!! त्याचं नि माझं मैत्र आहे. त्याचं म्हणजे नवऱ्याच.
मैत्री आणि मैत्र यात एका ‘इ’काराचा फरक दिसत असला तरी अर्थाच्या दृष्टीने अधिक सखोलता आहे. मैत्री होत असते, ठरवून करता येत नाही आणि मैत्र सहानुभूवाने आपोआप जाणवायला लागतं. ज्ञानेश्वरांनी पसायदानात ‘भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे’, असं म्हटलं आहे आवर्जून.
सहवासातून, विचारांतून, एकमेकांच्या हृदयात जाऊ लागतो त्यावेळी मैत्र फुलतं. पती-पत्नीचं मैत्र असलं की संसार कसा नेटका, फुलून आलेला, बहरलेला दिसतो.
अखेर पुरुष आणि प्रकृती यांच्या संयोगातूनच सृष्टीचा हा पसारा निर्माण होत असतो. या विषयावर लिहिण्यासारखं खूप काही आहे, पण सध्या इथेच थांबतो.
या लेखावर वाचकांच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.
प्रासादिक म्हणे,
— प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..