नवीन लेखन...

प्राईसलेस

सकाळी कल्याणला जाण्यासाठी गाडीचा दरवाजा उघडल्याबरोबर मोगऱ्याचा सुगंध दरवळू लागला. एखाद्या महागड्या ब्रँडेड स्ट्रॉंग कार परफ्युमचा सुगंध सुद्धा फुललेल्या मोगऱ्याच्या सुगंधा पुढे फिका पडला असता. काल जव्हारहुन येताना रस्त्यावर मोगऱ्याचे गजरे विकताना लहान मुलं दिसत होती. जव्हार तालुक्यातील केशर आंबे रस्त्यावर विकायला बसलेले एक वृद्ध आणि त्यांच्या जवळ उभी असलेली दहा ते अकरा वर्षाची लहान पोरगी. जेमतेम दहा वर्षाच्या मुलीच्या हातात मोगऱ्याच्या कळ्यांपासून बनवलेले डझनभर गजरे होते. रस्त्यावरून जाणाऱ्या गाडयांना हातातील गजरे हलवून दाखवणाऱ्या त्या लहान मुलीला, बाय गजरे कसे दिले विचारले आणि तिने दहाला एक सांगताच वीस रुपयात दोन गजरे विकत घेतले. न उमललेल्या मोगऱ्याच्या कळ्यांपासून बनवलेल्या डझनभर गजऱ्यातून फक्त दोन गजरे घेतल्याने देखील त्या लहान मुलीच्या चेहऱ्यावर लहानसे हसू उमलले. गजरे बनवलेल्या कळ्या फुलल्या नसल्याने हवा तसा मोगऱ्याचा सुगंध येत नव्हता, कळ्या उद्या पर्यंत पूर्ण उमलल्यानंतर भरपूर सुगंध दरवळेल असे आईने सांगितले त्यामुळे दोन्ही गजरे गाडीच्या रियर व्ह्युव्ह मिरर ला बांधून टाकले.

बाजूच्या काकांकडे असलेल्या केशर आंब्याचा भाव विचारला किलोला 80 रुपये सांगितल्यावर त्यांना वाटले आम्ही घासाघीस करू पण त्यांना दोन किलो आंबे वजन करायला सांगितले, त्यांच्या कडे असलेल्या वजन काट्यात वजन करण्यासाठी अर्धा किलोची दोन मापं होती दोन वेळा त्यांनी एक एक किलो आंबे वजन करून दिले. दोन्ही वेळेला आंब्यांचे पारडे जास्त खाली जाईल याची काळजी घेताना एखाद दुसरा आंबा वजन झाले असताना सुद्धा टाकला. एक एक किलोचे दोन वेळा वजन करून झाल्यावर दोन किलोचे 160 रुपये दिल्यावर त्या काकांनी पिशवीत आणखीन एक आंबा टाकला, बोलले दोन किलो घेणारे सगळेजण दीडशे रुपयेच काढतात आणि काका बस झाले ना एवढे, राहू द्या दहा रुपये कमी एकदम दोन किलो घेतले ना.

परतीच्या वाटेला लागण्यापूर्वी सकाळी साडेपाच वाजता जव्हारला जायला निघालो तेव्हापासून अर्धा रस्ता भर मुसळधार पाऊस पडत होता. वाडा सोडल्यानंतर रस्त्याला दोन्ही बाजूला झाडांची गर्दी, आणि जिकडे तिकडे मागील दोन तीन दिवस पाऊस पडत असल्याने गवताचे कोवळे कोवळे अंकुर बाहेर पडले होते. नजर जाईल तिकडे पोपटी आणि हिरवट संमिश्र रंगाची झालर लाल, तांबड्या आणि काळ्या जमिनीवर पसरली होती. सगळ्या झाडांची पाने स्वच्छ धुवून निघाली होती. सकाळच्या कोवळ्या उन्हात निसर्ग आपल्या हिरव्या गार मनमोहक रंगांची उधळण करीत होता. काळा डांबरी रस्ता सुद्धा स्वच्छ धुवून निघाला होता. नागमोडी वळणे घेत घेत जव्हार शहरापासून पाच सहा किलोमीटर अंतरावरील घाट रस्ता चढून सपाट पठारावरून आमची गाडी आली वेगाने धावत होती.

सकाळचे साडे सात वाजून गेले होते, जव्हार शहरात प्रवेश करण्यापूर्वी शहरा बाहेर धुक्याचे गूढ आवरण पसरले होते. कोरोना च्या लॉकडाऊन मुळे माझ्या कारखान्यात कामाला असलेल्या पवन ला आणायला त्याच्या गावी चाललो होतो. दोन महिने गावात राहून तो सुद्धा पुन्हा कामावर यायला उत्सुक होता. त्याला आणायला येतोय सांगितले तर सकाळी लवकर उठून तो त्याच्या बाबाला घेऊन आंबे गोळा करायला गेला होता. त्याच्या बाबाने आम्हाला देण्यासाठी म्हणून पहाटेच त्यांच्या गावाजवळील बंधाऱ्यात जाळे टाकून दोन किलोचा कटला मासा पकडला होता. आदल्या दिवशी रात्री त्यांना आम्हाला त्यांच्या कडील दोन तीन कोंबडे पाहिजे असा फोनवर निरोप दिला होता. रात्री उशिरा निरोप मिळाल्याने त्यांना त्यांच्या वाडीवर एकही कोंबडा मिळाला नाही. आंबे आणि मासा आणल्यावर ते पुन्हा दुसऱ्या वाडीवर कोंबडे शोधायला गेले. आम्ही साडेआठ वाजता त्यांच्या वाडीवर पोचलो. पोचण्याच्या अगोदर जव्हार शहरातून फोन केला असता त्यांनी गावाच्या बाहेर एक किलोमीटर अंतरावर एका फाट्यावर गाडी थांबवायला सांगितली होती. आम्ही पोचतोय तोच पवन सायकलवर मागे एका लहान पोराला डबल सीट घेऊन आम्हाला रस्त्यात गाठायला आला होता. आम्हाला बघून त्याच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद स्पष्ट दिसत होता. लॉक डाऊन झाल्यापासून अर्धा मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील गर्मी आणि त्यांच्या वाडीवर असलेले पाण्याची टंचाई आणि लांब बंधाऱ्यातुन आणावे लागणारे पाणी यामुळे त्याला गावात नकोसे झाले होते. गावाबाहेर असलेल्या लाईटच्या टर्न्सफॉर्मर जवळ त्याने गाडी पुढे घ्यायला सांगितली आणि तो गावात गेला. दहा मिनिटात त्याची आई डोक्यावर टोपली आणि हातात एक पिशवी घेऊन आली. तिने टोपलीभर आंबे आणले होते, अळू नावाची चिकूसारखी दिसणारी पण आकाराने गोल आणि चवीला आंबट असणारी फळं आणली होती. हातातल्या पिशवीत जिवंत कटला मासा होता. कोरोना मुळे गाडी गावात दारापाशी न नेता गावाबाहेर थांबवली कारण आम्ही बाहेरून आणि कल्याण सारख्या कोरोना बाधित शहरातून आलो म्हणून गावातील कोणी आमच्याशी वाद घालू नये याचसाठी. माझी मुलं ज्यांच्याकडे कामं करतात त्यांना घरी नेऊन पाहुणचार सुद्धा करता येऊ नये यासाठी तिने दोन तीन वेळा माझ्या आईजवळ दिलगिरी व्यक्त केली. साडे आठ वाजून गेल्याने गावातली लहान लहान पोरं घोळक्याने बाहेर पडत होती. पाच सहा वर्षाची पोरं हातात वाडगे घेऊन मूग काढून झालेल्या माळ जमिनीवर, मुगाचे पीक काढतांना गळलेले आणि पडलेले आणि पावसात रुजून मोड आलेले एक एक मूग टिपून घेत होते. त्यांच्या पेक्षा मोठी मुले काठीला दोरीने बांधलेली आणि त्यांच्या त्यांनीच टिन पत्र्याने बनवलेल्या गाड्या फिरवत होती. खडखड आवाज करणाऱ्या त्या खेळण्यातल्या गाडयांना हातातील काठीने फिरवणाऱ्या त्या सेल्फ मेड गाड्या ह्या मॅजिक कार प्रमाणेच वाटत होत्या. थोड्या वेळात पवनचा बाबा आला त्याला कोंबडा मिळाला नाही म्हणून तो नाराज होता. जायची घाई नसेल आणि आणखीन उशीर लागला तर चालेल का असे विचारून तो पुन्हा एकदा कोंबडा आणण्यासाठी निघाला यावेळी त्याने मला आणि पवनला सोबत घेतले. पवनच्या बाबा अनवाणी भरभरा चालू लागला.

पवन ची वाडी एका टेकडीवर वसलेली होती आजूबाजूला लहान लहान टेकड्या, आणि त्यामधून जाणारा सिंगल डांबरी रस्ता. पवनच्या बाबाने दुसऱ्या वाडीवर असलेल्या एका घराजवळ संपूर्ण टेकडी उतरून नेले. तांबड्या रंगाचा एक डौलदार कोंबडा होता. त्या कोंबड्याला त्याने काही वेळापूर्वी एकट्याने प्रयत्न केला होता पण आम्ही येणार म्हणून काहीवेळ प्रयत्न करून सुद्धा कोंबडा हाती न आल्याने उशीर होईल म्हणून तो टेकडी चढून वर आला होता. आता पुन्हा एकदा पवन ला सोबत घेऊन त्याने कोंबडा पकडायला सुरवात केली. कोंबडा सुद्धा त्याच रानात वाढलेला आणि चरलेला त्यामुळे तुरु तुरु पळत होता , दोघ जण त्याच्या मागे पकडायला धावत होते पण कोंबडा काही हाती लागत नव्हता. पवन आणि त्याचा बाबा अनवाणी पायाने कोंबड्याच्या मागे धावत होते. अर्धा तास पकडा पकडी सुरु होती दोन तीन वेळा हाताशी येऊन सुद्धा कोंबडा निसटून जात होता. न थांबता आणि न थकता कोंबडा आणि त्याच्या मागे दोघे बाप लेक नुसते धाव धावत होते. शेवटी कोंबडा थकला आणि एका वेलींच्या जाळीत जाऊन अडकला. पवन आणि त्याचा बाबा दोघेही ही एवढी पळापळ होऊन सुद्धा हसत होते, धावणे पळणे, थकून भागून दमून जाणे अशा कोणत्याही गोष्टीचा त्यांच्याकडे पाहिल्यावर लवलेश जाणवत नव्हता.

कोंबड्याच्या मागे पळून पळून शेवटी तो हाती लागला यामुळे त्यांना खूपच आनंद झाला. कोंबड्याचे पैसे देऊ केले असता त्यांनी घ्यायला स्पष्ट नकार दिला उलट उशीर झाल्याने आणि तीन ऐवजी एकच कोंबडा मिळाल्याने त्यांना अपराधी वाटत होते. पुढील वेळेला दोन दिवस अगोदरच कळवण्यासाठी ते वारंवार सांगत होते.
आम्ही पवन ला आमच्याकडे पेपर डिश च्या कारखान्यात कामासाठी आणण्यासाठी गेलो होतो, पण आमच्याकडे कामाला असणाऱ्या पवनच्या आई बाबाच्या आदरातिथ्याने अत्यंत भारावल्या सारखे झाले. ग्रामीण भागात राहून अत्यंत हलाखीचे जीवन तसेच लाईट, पाणी व इतर मूलभूत सोयी सुविधा यांची कमतरता असूनही आनंदात आणि मजेत स्वतःच्या जागा आणि जमिनीवर निघतील ते तुटपुंजे पीक काढून त्यात वर्षभर घर चालवणारे अत्यंत काटक आणि तेवढेच कणखर माणसं बघून शहरातील भंपकपणासाठी, सोयी सुविधांसाठी आणि जिवाच्या आकांताने धावपळ करणारी माणसं क्षुद्र वाटायला लगतात. गाव खेड्यात राहणाऱ्या स्वतःचे सगळं असूनही परीस्थितीने गरीब पण मनाने श्रीमंत असलेल्या लोकांनी जे काही दिले ते प्राईसलेसच.

© प्रथम रामदास म्हात्रे

मरीन इंजिनियर,

B. E. (Mech. ), DIM.

कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 184 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..