प्रिटोरिया – माझा सर्वोत्तम काळ – भाग २

साउथ आफ्रिकेत मी एकूण १७ वर्षे राहिलो, अनेक लोकांशी ओळखी झाल्या, काही मोडल्या तरीही माझा प्रिटोरियामधील काळ हा सर्वोत्तम,असेच म्हणायला हवे. एकतर राहायला सुंदर घर मिळाले होते, बरेचसे भारतीय (माझ्यासारखे नोकरीसाठी आलेले) आजूबाजूला राहात होते, त्यामुळे गाठीभेटी (जरी नैमित्तिक असल्या तरी!!) होत असत. इथेच, मी पहिल्यांदा सिम्फनी संगीताची मैफिल प्रत्यक्ष ऐकली आणि त्याच भारावलेल्या अवस्थेत घरी येउन, बेथोवन,मोझार्ट यांच्या सीडीज रात्रभर ऐकत रात्र काढली!! मराठी माणसे बरीच भेटली, काहींनी निराशा केली, इतकी की, त्यांना परत भेटताना मनात निराशाच ठेऊन भेटलो.  त्याचे असे झाले, पहिल्याच भेटीत “माझे मराठी वाईट आहे आणि म्हणून मी हिंदीतच बोलणार” असा अत्याग्रह दिसला!!
वास्तविक मराठी बोलता येत नव्हते असे नसून, बोलायला “लाज” वाटायची!! फार नाही पण, ३ गृहस्थ असे भेटले. तसे माझे इथे ३ ग्रुप झाले होते. १] खुद्द माझ्या कंपनीत, हेतल, महेंद्र, विजय, कधीमधी भारतातून येणारा रिचर्ड तसेच आमचा सीइओ विजय नाक्रा!! २] मकरंद, बंटी,सुहास, वैभव (हे नंतर भारतात परतले), अशोक आणि राजेश., ३] माझे महाराष्ट्र मंडळ – तिथे राजीव तेरवाडकर, प्रशांत, विनय, आदित्य, कौस्तुभ इत्यादी. मकरंदशी माझी आधीपासूनच ओळख होती आणि त्याने लगेच मला त्याच्या ग्रुपमध्ये सामील करून घेतले. इथला खरा संस्मरणीय काळ  म्हणजे,भारताचा २००७ सालचा T20 world cup विजय!!
मकरंदचा चुलत भाऊ अविनाश, याची मुंबईत चांगली CA Practice चालू आहे आणि त्यात, भारतीय संघाचा त्यावेळचा व्यवस्थापक लालचंद राजपूत, हा अविनाशचा चांगला मित्र, पर्यायाने मकरंदचा!! जेंव्हा, भारताने, साउथ आफ्रिकेवर अविश्वसनीय विजय मिळवला आणि डर्बन इथे सेमी फायनल साठी ऑस्ट्रेलियाशी गाठ पडली, हे नक्की झाल्यावर, मकरंदचा मला फोन  आला, त्याला ४ पासेस मिळाले आहेत, तेंव्हा विमानाचे तिकीट काढ. डर्बनला जायचे आहे. शनिवारी Match होती, सुदैवाने बंटी कामानिमित्त डर्बन इथे होता, त्याने लालचंदकडून पासेस मिळवले आणि सकाळच्या फ्लाईटने, मी, मकरंद आणि वैभव डर्बन इथे गेलो. Match संध्याकाळची असल्याने, दुपारी मॉलमध्ये खाऊन घेतले आणि स्टेडीयममध्ये शिरलो!! अक्षरश: तुफान गर्दी!! जिकडे तिकडे भारतीय झेंडे फडकत होते. अर्थात, डर्बन इथे भारतीय वंशाचे लोक लाखोंच्या संख्येने राहतात, त्यामुळे ते सगळे स्टेडीयमवर!! साउथ आफ्रिकेतील Matches मी पूर्वी टीव्हीवरून पाहिलेल्या असल्याने, मनात थोडी उत्सुकता होती.
वैभवने येतानाच बियरचा टमरेल घेतला होता आणि त्यात, त्या Match मध्ये युवराज आणि धोनी सुसाटले!! बियरला “चव” लाभली, त्याला तोड नाही!! घसा फाटेस्तोवर ओरडून घेतले आणि जेंव्हा फायनलमध्ये, जोहान्सबर्ग इथे भारत/पाकिस्तान भेटणार हे नक्की झाले तेंव्हा मनात जी excitement दाटली, तिला तोड नाही!! वास्तविक, वैभव दुसऱ्या  दिवशी, रविवारी भारतात परतणार होता, त्याने तिकीट Cancel केले!! त्याच  रात्री,बंटीने डर्बन – जोहान्सबर्ग अशी गाडी हाकली!! भारताचा विजय, पोटात भरपूर बियर, प्रवास कसा झाला, हे वेगळे  नकोच!! रविवारी पहाटे ३  वाजता,आम्ही मकरंदच्या घरी पोहोचलो, म्हणजे त्याच्या complex मध्ये!! म्हणजे रात्रभर बंटी एकटाच गाडी चालवत होता!! धन्य आहे!! माझी गाडी तिथेच होती, तशीच गाडी चालवायला घेतली!! भल्या पहाटे, पहिल्यांदाच जोहान्सबर्ग शहर बघत, जवळपास ७० किलोमीटर गाडी चालवून प्रिटोरिया मधील माझ्या घरी आलो, ते फक्त बिछान्यावर पाठ टेकण्यासाठीच!!
रविवार सगळा झोपून काढला. रात्री मकरंदचा फोन आला, लालचंदबरोबर जेवायला जात आहोत, येतोस का? एकटा राहिल्याचा, हा फायदा!! परत गाडी आता ८० किलोमीटर चालवली आणि त्याच्याबरोबर “पार्टी” (हाच शब्द योग्य!!) करून, परत रात्री १२ वाजेपर्यंत परतलो!! सोमवारी, इथे सुटी होती, एव्हाना, मी डर्बन इथे Match पाहायला गेलो  होतो,हि बातमी पसरली होती आणि त्यामुळे “मला पास मिळेल का?” असे फोन आले!! अर्थात, मी काय करणार, माझ्या हातात काहीच नव्हते!! तसा, मी मकरंदला फोनवर विचारले पण तो  हताश होता.
सोमवार दुपार!! मकरंदला गाडी पार्क करायला जागा मिळाली नाही, इतकी तुडुंब गर्दी!! शेवटी, स्टेडीयमपासून १५ मिनिटे लांब गाडी पार्क करावी  लागली, मकरंदचा मुलगा,करण  आमच्याबरोबर होता. कसेबसे आत शिरलो. स्टेडीयममध्ये खऱ्याअर्थी माणूस शिरायला जागा  नव्हती, सगळीकडे, भारत आणि पाकिस्तानचे झेंडे फडकत होते, मध्येच तुरळक काही गोरे दिसत होते. Match शेवटपर्यंत रंगतदार झाली आणि अखेर भारत ज्या क्षणी जिंकला, तो क्षण मी मनात कायमचा जपून ठेवला आहे!! मला तर १९८३ ची फार आठवण आली, त्यानंतर डायरेक्ट २००७!!  रात्री, आम्ही देखील एका पबमध्ये विजय साजरा केला!! दुसऱ्या दिवशी ऑफिसमधील इतर मित्रांना बातमी सांगितली आणि त्यांचे चेहरे विस्फारले, त्याची चव वेगळीच!!
मागील लेखात महाराष्ट्र मंडळाची “गाथा” सांगितली होती. माझ्या अंदाजाने, अजूनही तशीच परिस्थिती आहे. प्रत्यक्ष बोलताना, “आपले मंडळ” अशी भाषा करायची पण प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी पाठ दाखवायची!! मला तर अशा लोकांचा फार रागच यायचा. त्यावर्षी राजीव तेरवाडकरच्या घरी होळीचा कार्यक्रम ठेवला होता, सगळ्यांना दोन महिने आधी कल्पना दिली होती आणि त्यादृष्टीने “होकार” मिळवले होते. राजीवच्या घरी, होळीचे सामान आणले होते, जेवणाचे Contract बाहेरच दिले होते, साधारण ७० ते ८० जण येतील असा अंदाज होता पण अखेर प्रत्यक्षात केवळ ५० व्यक्ती आल्या!! यात, मंडळाची Management धरून!! यथासांग “होळी”  पेटवली,भारताप्रमाणे पूजा केली, नंतर “बोंबा” मारल्या, संगीताचा कार्यक्रम झाला ( मी देखील तबल्यावर जवळपास १५ वर्षांनी हात “साफ” केला!!) आणि अर्थात जेवणाचा कार्यक्रम!!
मला इतर देशांतील मंडळांची अवस्था माहित नाही, म्हणजे अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणावर मंडळाचे कार्य चालते, तसेच इंग्लंड इथे देखील परंतु साउथ आफ्रिकेत अजूनतरी मंडळाने “बाळसे” धरलेले नाही!!
याचे मुख्य कारण, लोकांची मनोवृत्ती!! एकतर बहुतेक सगळे प्रथमच भारतातून, इथे आलेले. साउथ आफ्रिका म्हणजे, युरोपचा छोटा अविष्कार!! म्हणजे, हवामान, Infrastructure, राहणीमान अशा गाष्टींचे फार अप्रूप वाटते!! काहींच्या ते “डोक्यात” जाते!! त्यामुळे, आपण भारतीय आहोत आणि आपणदेखील कधीतरी का होईना, भारतात जाणार आहोत, हे विसरून “ताठ्यात” वागायला लागतात!! मराठी बोलणे देखील  नाकारणे,हा त्याच वृत्तीचा भाग. इथे मला गुजराती लोकांचा हेवा वाटतो. डर्बन इथे trading business अधिक करून, गुजराती आणि मुसलमान लोकांच्या हातात आहे, जे केवळ भारतीय वंशाचे आहेत, म्हणजे त्यांची चौथी किंवा पाचवी पिढी इथे रहात आहे, भारताशी तसा काहीही संबंध उरलेला नाही!! तरीही या नहुतेक गुजराती लोकांच्या घरात तसेच वातावरण असते, म्हणजे बहुसंख्य गुजराती शाकाहारी, घरात तशीच देवपूजा, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, गुजराती बोलायला लागले तर पत्ता लागणार नाही, की ही व्यक्ती इथल्या चौथ्या पिढीची आहे म्हणून!! इतके अस्खलित गुजराती बोलतात आणि मुख्य म्हणजे त्यांची मुले देखील तेच “वळण” गिरवतात!!
याउलट माझ्यासारखे नोकरीनिमित्ताने आलेले भारतीय!! ३,४ महिन्यात “साउथ आफ्रिकन” संस्कृती आवाक्यात घेतात. यांच्या मुलांचे मात्र कधीकधी हाल होतात. एकतर ही माणसे, त्यांच्या भारतातील कंपनीतर्फे आलेली असतात, त्यामुळे जोपर्यंत Contract आहे, तोपर्यंत नोकरी!! मुले तशी इथे लगेच settle होतात, पण परत जायची वेळ येते, तेंव्हा प्रश्न उद्भवतो!! इथल्यासारखे राहणीमान, भारतात शक्यच नसते आणि मग मनाची कुचंबणा होते, अगदी माझ्याबाबतीत देखील सुरवातीला हा बदल स्वीकारणे फार अवघड गेले, जरी मी इथे एकटाच राहात होतो, दरवर्षी कमीतकमी महिनाभर सुटीवर येत होतो तरीही!!
इथे Sandton नावाचा भाग आहे, जोहान्सबर्ग मधील अति अलिशान भाग!!  इथेच श्रीमंतीची रेलचेल दिसते आणि त्याचेच प्रतिबिंब इथल्या  मॉल्समध्ये दिसते. अर्थात, सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत चाललेला आहे, इतका की रस्त्यावरून संध्याकाळचे पायी चालणे दुरापास्त झाले आहे. असो, इथल्या भारतीय लोकांनी मात्र माझ्यासारख्या एकट्या राहणाऱ्या माणसाचे आयुष्य मात्र सुखाचे केले, हे मान्यच करायला हवे.मी, सेंच्युरीयन भागात राहात होतो, तिथे माझ्या complex समोर, एक आयरिश पब होता/आहे, तिथे संध्याकाळी बियरचा एक “पिंट” घेऊन बसले म्हणजे अगदी मुंबईतील इराण्याच्या हॉटेलप्रमाणे तासंतास बसत येते, विशेषत: सोमवार ते गुरुवार, संध्याकाळी फारशी वर्दळ नसते, तेंव्हा तिथे बसून शांतपणे “समाधी” लावणे, हा सुंदर अनुभव होता. माझ्या कितीतरी संध्याकाळ या पबमध्ये गेल्या आहेत, इतक्या की पुढेपुढे, तिथला वेटर (पुरुष/स्त्री, जे कुणी तिथे असेल ते!!) मी आलो, कि लगेच “पिंट” घेऊनच यायचे!! जून/जुलै मधील गारठलेल्या संध्याकाळी बियर  पिणे, हा अनुभव शब्दात मांडणे अवघड आहे!! अखेर मी देखील नोकरदार माणूस, कंपनी जशी चालेल,त्याप्रमाणात तिथला रहिवास!! कधीतरी स्वप्नाची अखेर ही ठरलेलीच!!
– अनिल गोविलकरAbout अनिल गोविलकर 69 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सिंधूदुर्गाच्या संरंक्षणासाठी बांधलेला किल्ले पद्मगड

सिंधुदुर्गाचे महत्त्वाचे भौगोलिक स्थान ओळखून शिवरायांनी याच्या संरक्षणासाठी मालवणच्या सागरतीरावर ...

डोंबिवलीतील ग्रंथालय व वाचनालये

सुशिक्षितांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंबिवलीत अनेक समृद्ध ग्रंथालये आणि ...

बिनखांबी गणेश मंदिर, कोल्हापुर

कोल्हापुर शहराच्या महाद्वार रस्त्यावर हे मंदिर आहे. याला बिनखांबी गणेश ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवतीचा किल्ला

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे असलेला निवतीचा हा किल्ला पर्यटकापासून बराच दूर आहे ...

Loading…