नवीन लेखन...

संस्कारांची जपणूक

 

रमाबाई आज नेहमीपेक्षा जरा लवकरच उठल्या होत्या; कारण आज त्यांना खूप कामं होती. घरातील आवरून वृध्दाश्रममधील मैत्रिणींना भेटायला जायचे होते. झाडलोट, सडारांगोळी, आंघोळ करून, देवपूजा उरकून स्वयंपाक घरात चहा नाश्ताची तयारी करण्यासाठी त्या आल्या. सगळी तयारी झाल्यावर संदीप आणि सानिका अजून कसे उठले नाहीत असा मनात विचार करत त्या मुलगा व सूनेच्या खोलीकडे वळल्या.

दारावर टकटक करणार इतक्यात आतील आवाज ऐकताच त्या तिथंच स्तब्ध उभ्या राहिल्या. संदीप सानिकाला समजावणीच्या स्वरात म्हणत होता, ‘अगं, सानिका थोडे दिवस थांब ना.. नंतर सोडू या ना आईला तिकडे…’

यावर सानिकाचा आवाज, ‘ते काही नाही.. आज आई या घरातून गेल्याच पाहिजेत..’

पुढचं काहीही संभाषण न ऐकता रमाबाई देवाच्या समोर येऊन हात जोडून बसल्या.. ‘परमेश्वरा, मला अजून थोडी सहनशक्ती दे..’ इतकंच म्हणून देवाला नमस्कार करून पुन्हा स्वयंपाकघरात आल्या.

संदीप, सानिका दोघंही तयार होऊन आले नाश्ता करायला. संकेत कालच त्याच्या आजीकडे गेला होता. आईच्या कर्तव्याचे काटेकोरपणे पालन करत रमाबाईंनी दोघांना नाश्ता दिला. संदीपने औपचारिकपणे, ‘आई तुझी प्लेट..?’ एवढंच विचारलं..

‘माझा उपवास आहे,’ असं म्हणत त्यांनी चहासाठी आधण ठेवलं. आज आईचा उपवास नसतो हे माहीत असूनही दोघं काहीच बोलले नाहीत.

चहा नाश्ता झाल्यावर रमाबाई दोघांना म्हणाल्या, ‘संकेतला आणायला कधी जाणार आहात..?’ त्यावर संदीप म्हणाला, ‘दोन-तीन दिवसांनी असं म्हणून दोघंही निघून गेले.

रमाबाईंना हुरहूर लागली होती.. असं काय घडलं आहे.. आज माझी दोन्ही लेकरं न सांगता, नमस्कार न करता गेले आहेत.. असंख्य विचार मनात येत होते. पण त्यांनी ठरवले होते की, आज डोळ्यातून पाण्याचा थेंब काढायचा नाही.

त्या पुढील कामासाठी वळल्या इतक्यात संदीपचा फोन आला, ‘आई, आम्हां दोघांनाही कंपनीच्या कामानिमित्त बाहेर जावं लागत आहे, तेव्हा तू तुझी बॅग भरून ठेव. माझा मित्र सुरेश येतोय, तो तुला तुझ्या मैत्रिणीकडे सोडेल.’ पुढचं काहीच बोलू न देता त्यानं फोन ठेवला.

रमाबाई मटकन खाली बसल्या. सकाळचे दोघांचे संभाषण आणि त्यानंतरचे त्यांचे वागणे पाहून.. मनात विचारांचे काहूर माजले होते.. पण एकीकडे काळजातील विश्वास ठाम होता.. माझा माझ्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे. तरीही असो.. जे आपल्याला योग्य असेल तेच तर ईश्वर आपल्याला देत असतो.. जे मिळेल ते मजेत स्वीकारायचं. अशी मनाची समजूत काढून त्यांनी आपली बॅग भरून ठेवली. सोबत मुलगा, सून आणि लाडका नातू यांची फोटोफ्रेम घ्यायला विसरल्या नाहीत.

इतक्यात सुरेश आला, ‘काकी, चला मी न्यायला आलोय तुम्हाला.’

‘अरे सुरेश, चहा तरी घे ना..’ रमाबाईंचा आग्रह. पण सुरेश घाई असल्याने नको म्हणाला.

रमाबाई मुकपणे गाडीत येऊन बसल्या. सुरेशने घराला कुलूप लावून बॅग गाडीत ठेऊन गाडी सुरू केली. ‘सुरेश, ती दोघं तिकडच्या तिकडं गेली का रे..?’ काळजीयुक्त स्वरात म्हणाल्या रमाबाई. सुरेशने पण ‘हो’ म्हटले.

ज्या घराने अनेक चढ-उतार दाखवून ठाम राहायला शिकविले त्या घराला सोडून जाताना असंख्य वेदना होत होत्या.. पण.. त्या सहन करण्यापलिकडे आपल्या हातात काहीच नाही.. हेही तितकंच खरं होतं. त्यामुळे रमाबाई कमालीच्या शांत होत्या. इतक्यात, सुंदर निसर्गसृष्टी, हिरवीगार वनराई, मनमोहक रस्ता अशा नयनरम्य वळणावर गाडी थांबली होती.

मनमोहक छोटेखानी सुंदरसे घर, घराच्या भोवताली सुंदर बाग, बागेत रमाबाईंच्या आवडीची सुहासिक पिवळी जर्द शेवंती फुलली होती, बाजूलाच देशी गुलाबाचे सुगंधित गुलाबगुच्छ जणू रमाबाईंच्या स्वागतास झुकले होते. अंगणातील कमानीवर मोगऱ्याचा वेल मदमस्त होऊन पहुडला होता भरभरून सुगंध देण्यासाठी. परीसदारी अडुळसा, आलं, गवती चहा, अशी आयुर्वेदिक झाडे होती. घराच्या समोर शेणानं सारवलेलं सुबक अंगण.. त्याच्या कोपऱ्यात सुकुमार तुळशीवृंदावनातील हिरवीगार बहरलेली तुळस, घराचं पावित्र्य टिकवून होती.

सुरेशने कारचा दरवाजा उघडला आणि म्हणाला, ‘काकी चला.’

त्या म्हणाल्या, ‘इथं का उतरायचंय..? कुणाचं घर आहे हे… किती सुंदर आहे ना..’

सुरेश काहीच न बोलता त्यांना हाताला धरून चालू लागला. अंगणात फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या..

‘अरे, थांब या पायघड्या कुणासाठी आपल्याला माहीत नाही.. आपण कसं त्या वरून जायचं..!’

सुरेश त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्यांना हाताला धरून त्या पायघड्या वरूनच चालायला लागला..  कारण त्या पायघड्या काकींसाठीच आहेत.. हे आताच तो त्यांना सांगू शकत नव्हता..

दारात येताच सुरेश म्हणाला, ‘काकी जरा डोळे बंद करा ना..’

‘आता का रे.. काय करतोयस तू.. ठिक आहे बाबा केले बंद डोळे.’ असं म्हणून त्या डोळे बंद करून उभ्या राहिल्या. इतक्यात त्यांच्या कानावर आवाज पडला, ‘आई गं, तुझ्या घरात तुझे स्वागत आहे.. आजी.. गं वेलकम युवर होम..’

डोळे न उघडताच त्यांच्या तोंडून आवाज आला, संदीप, सानिका, संकेत..  डोळे उघडून पाहतात तर, समोर खरोखरच संदीप, सानिका, सानिकाची आई आणि लाडका नातू सगळे त्यांची वाट पाहत उभे होते. संदीप व सानिकाने पुढे येऊन त्यांचे पाय धुतले आणि त्यांना औक्षण केले..

हे सगळं पाहून रमाबाई भारावून गेल्या. ओसरीवरील फुलांनी सजविलेल्या झोपाळ्यावर संदीपने आईला बसवले आणि म्हणाला, ‘आई, आता फक्त तू विश्रांती घ्यायची आहेस.. या तुझ्या घरात..’

इतक्यात रमाबाईंच्या वृध्दाश्रमातील मैत्रिणी पण समोर दिसताच रमाबाईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले… ‘अच्छा.. हे सारं करायचं होतं म्हणूनच सकाळपासून तुम्ही सगळे माझ्याशी कसे तुटक तुटक वागत होतात का..’

‘आई, वाढदिवसाच्या खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा सगळेच एका सुरात म्हणाले..’

रमाबाई बोलल्या, ‘अरे बाळांनो, किती करताय रे हे माझ्यासाठी.. भरून पावले मी..’

संदीप आईला निक्षून म्हणाला, ‘आई, तू आता असं बोलून आम्हाला लाजवू नकोस.. मला समजायला लागल्यापासून मी पाहात आलोय, तुझ्या वाट्याला कष्टाशिवाय काहीच आलं नाही.. आजी-आजोबांचं आजारपण, बाबांचं अपघाती जाणं, त्यांनंतर संपूर्ण कुटुंब सांभाळून घेतलंस.. जवळ काहीही नसतांना केवळ जिद्द आणि प्रयत्नांच्या जोरावर मला इंजिनिअर बनवलंस.. एवढंच नाही तर, सुनेला ही नोकरी करू देऊन स्वत: अजूनही घर सांभाळतेस आहेस.. त्यामुळे आता हे सारं बास.. आता तू फक्त थांबायचं आहेस.. तुझ्या स्वप्नातील या घरात (जे गहाण पडलं होतं) तिथं राहून तू तुझ्या मनाला जपत.. मनासारखं राहायचं आहेस..’

सानिका ही म्हणाली, ‘आई, आम्ही ही तुमच्या सोबत राहणार आहोत.. आता फक्त तुम्ही निवांत राहायचं आहे.’

सानिकाची आई रमाबाईंच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या, ‘विहीणबाई बाई.. ऐका ओ मुलांचे.. खूप सोसलंय तुम्ही.. आता थांबा..’

रमाबाईंना काय बोलावं ते सुचेना.. डोळ्यांतुन अश्रूधारा वाहतच होत्या.. पण त्या आनंदाच्या होत्या..

एवढ्यात स़दीप आईचा हात हातात घेऊन म्हणाला,

’आई गं, नको करू विचार कसला
खूप कष्ट सोसलेस तू जीवनभर..
आता फक्त आनंदित राहून
घे विसावा या वळणावर..!’

 

-वीणा व्होरा

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा  दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..