नवीन लेखन...

प्रेमरंगी रंगताना

त्यानं दिलेल्या उपम्याची चव अजून जिभेवर रेंगाळत होती . तिला वाटलं , अजून थोडा उपमा हवा होता पोट भरण्यासाठी नाही , केवळ चवीसाठी .

तिनं इकडे तिकडे पाहिलं .
ट्रेनमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती .
बहुतेक सगळ्यांच्या हातात त्यानं दिलेल्या उपम्याच्या डिश दिसत होत्या .
आणि सगळे चवीनं खात होते .

” उपमा विकणारा गेला का पुढच्या डब्यात ? ”
तिनं कुणाला तरी विचारलं . ज्याला विचारलं त्यानं पुढच्या डब्याकडे बोट दाखवलं . आणि तो खाण्यात मग्न झाला . ती गर्दीतून वाट काढत पुढच्या निघाली . पण तिला फार पुढं जावं लागलं नाही . दाराजवळच्या छोट्याशा जागेत तो उभा होता . पायाजवळ स्टीलच्या मोठ्या डब्यांच्या दोन पिशव्या ठेवल्या होत्या .
” संपला का उपमा ? ”
” जवळ जवळ संपला आहे . तुम्हाला आवडला का ? ”
” हो . चव खूपच चांगली …”
तिचं वाक्य पूर्ण होण्याआधी तो खाली वाकला आणि डब्यातला उरलेला उपमा एका डिशमध्ये भरून दिला .
” घ्या .”
” किती पैसे झाले ? मघाशी पण तुम्ही घ्यायला विसरलात . आता दोन्ही डिशचे किती झाले सांगा .”

तो हसला . ” उपमा आवडला आणि त्यामुळं पुन्हा तुम्ही मागून घेतला , यात सारं काही भरून पावलं . पैसे नकोत . ” तो गोड वाटावं असं हसला .” आणि हो , इतर प्रवाशांसारखं तुम्ही बारीक शेव हवी , हॉट अँड स्वीट सॉस हवं , चमचा थोडा मोठा हवा , खोबरं , कोथिंबीर जरा जास्तच मारायला हवी होती , असं काही म्हटलं नाही . याचं कौतुक वाटलं . पदार्थाची मूळ चव घालवण्यात एवढा इंटरेस्ट का असतो लोकांना , हेच कळत नाही . मूळचं चविष्ट जेवण आणि जीवन लोक बेचव का करतात , हे त्यांचं त्यांनाच ठाऊक . तुम्ही खाऊन घ्या , नाहीतर थंडगार होईल उपमा . ”

त्यानं तिच्याकडे न पाहता बोलणं संपवलं . ती त्याच्याकडे पाहत बोगीतल्या आपल्या सीटकडे वळली .
ती उपमा खात होती . आणि त्याचं बोलणं आठवत होती . त्याची ती वाक्यं कुठेतरी ऐकल्यासारखी वाटली तिला . अचानक तिला ठसका लागला . ठसक्यानं ती बेजार झाली आणि सैरभैर झाली .

त्याचं उभं राहणं , चेक्सचा इन केलेला शर्ट , चेहऱ्यावरचे मिश्किल भाव , लाघवी, आर्जवी बोलणं , बोलण्यातला आत्मविश्वास आणि चंदनाचा मंद , रेंगाळणारा गंध .

ती गोंधळली . हे सगळं आपल्या परिचयाचं का वाटतंय ? की आपल्या मनाचे खेळ ?

असे कितीतरी विक्रेते ट्रेनमध्ये वस्तू विकत असतात . पदार्थ विकतात . त्यातलाच हा एक . पण बाकीचे लक्षात राहत नाहीत आणि हा त्याच्या व्यक्तिमत्त्वासह परिचयाचा असावा असं का वाटतंय ? ती बावरली .
हळवी झाली . शरीरात कुठंतरी जलतरंगाची धून लहरत जातेय , हे तिच्या लक्षात आलं .

तिला पुन्हा ठसका लागला .
— आपल्याला जलतरंगच का आठवला ? अन्य कुठल्या वाद्याची आठवण का नाही झाली ?
तिनं कपाळावर हात मारून घेतला . अन्य वाद्य कसं आठवणार ? जलतरंगच !

दोघांची आवड एकच होती . जलतरंग !

विचारायचा तो कधीतरी … ” काय ऐकायला आवडेल तुला ? “ती खूप गोड हसायची . म्हणायची ,
” मी भैरवी सांगितली तर वाजवणार आहेस ? “” जो राग तुला आवडत नाही , त्याचा विचार मी कशाला करू ? त्यापेक्षा हंसध्वनी …”त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधी तिचा चेहरा होकार द्यायचा .
आणि मग सुरू व्हायची मैफल . कधी भूप , कधी पुरिया , कधी एखादी बंदिश …

पाय दुमडून ती बसायची आणि हाताच्या मुठीवर हनुवटी ठेवून ऐकत राहायची .नादात गुंतून जायची .
भान हरपून . त्याला डोळ्यात साठवत . भान आलं की तिच्या डोळ्यातून पाणी यायचं .तो आपल्याच नादात , कैफात बुडून गेलेला असायचा . भान यायचं तेव्हा त्याच्या लक्षात यायचं , तिच्या गालावरून आसवं ओघळतायत .मग तो मुद्दाम बाऊल तिच्या गालाजवळ न्यायचा .तिला भान यायचं .
मग ती खुदकन हसायची . म्हणायची ; ” असं नको करू , बाऊल भरला तर नाद आणि लय बिघडेल .”
” तुझ्या आसवांनी बाऊल भरला तर कदाचित स्वरात आर्तता आणि आद्रता येईल . “मग दोघंही हसायची . अगदी दिलखुलास . अशा किती तरी मैफली ऐकल्या आपण . कधी किनाऱ्यावर .
कधी कातळावर . कधी गावाबाहेरच्या मंदिराच्या पायऱ्यांवर . तर कधी चक्क उन्हाळ्यात , झाडांच्या थंडगार सावलीत . दिवस फुलपाखरांच्या पंखांवरच्या नक्षीदार रंगसंगतीने भरलेले होते . क्षितिजाच्या आसपास दिसणारी स्वप्नं मोहून टाकणारी होती . विरहाच्या रात्री संपत नव्हत्या आणि दिवसाच्या आठवणी जपल्या जात होत्या . भेटण्यासाठी रोजचे बहाणे आणि भेटायच्या जागा बदलून झाल्या होत्या .

पण पृथ्वी गोलाकार होती आणि त्यावरचे शहर अतिशय लहान होते . बभ्रा व्हायचा तो झालाच . अगदी सिनेमा स्टाईलने .ती , तिचे वडील , दोन भाऊ आणि वातावरण इमोशनल करून टाकणारी तिची आई …

सगळ्यांनी मिळून त्याला घेरलं . त्याची लायकी , शिक्षण , कुटुंबाचे समाजातील स्थान , आर्थिक परिस्थिती याबद्दल प्रचंड चर्चा झाल्यावर त्याने तिचा नाद सोडावा म्हणून मग आर्जवे , आमिषे आणि नंतर मारझोड …

सगळं तिच्यासमोर .

तिला स्वत:ची लाज वाटली . आपल्यासमोर तो मार खात होता . पण त्याच्या चेहऱ्यावर निश्चय स्पष्ट दिसत होता . आणि आपण काही बोलू शकत नव्हतो , याची तिला लाज वाटली . हाताला झटका देवून त्याच्याकडे जाण्याचा तिनं एकदा प्रयत्न केला , पण दुसऱ्या क्षणी आईने मारलेली थोबाडीत , तिला दिवस तारे दाखवून गेली . तिने त्याच्याकडे पाहिले . तो शांत हसत होता . तिला वाटलं , तो हसत नाहीय , तो धीर देतोय आपल्याला . तुझ्यासाठी मी सहन करतोय , असंच जणू तो सांगत होता .
त्या विचारानं ती सावरली . पण क्षणभरच . पुढच्या क्षणी त्याच्या हातातले जलतरंगाचे बाउल्स तिच्या भावाने हिसकावून घेतले आणि जवळच्या दगडावर आपटून फोडून टाकले . आता मात्र तो कळवळला आतून उद्ध्वस्त झाला . कोलमडला . खाली वाकून बाउल्सचे तुकडे गोळा केले . पिशवीत भरले . आणि जाण्यासाठी पाऊल उचलले .एक क्षण तो थांबला .तिच्याकडे आर्ततेने पाहिले .” माझ्यासाठी एकदाच हास सखे , मी आयुष्यभर जपून ठेवीन .”

तिला वाटलं , त्याच्याबरोबर पळून जावं , किमान हसावं . पण सगळ्यांच्या नजरा बघून ती हादरली आणि मान खाली घातली . तो न बोलता निघाला .पाय ओढत . कुणीतरी ढकलून दिल्यासारखा . सगळे पाठी वळले . आणि निघाले . त्यानं वळून बघितलं आणि तो परत आला . तिनं सहज म्हणून पाठी पाहिलं तर तो तिला दिसला .मघाशी ती जिथे उभी होती , तिथली माती त्यानं हाती घेतली . आणि झपाट्यानं पाठी वळून घरी निघाला . तिच्या डोळ्यातील आसवं महापुरासारखी वाहू लागली …

” आरव ”
ती भान विसरून ओरडली . बोगीतले प्रवासी दचकून तिच्याकडे पाहू लागले . तिनं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि घाईघाईनं तो उभा होता तिकडे आली . त्याचं लक्ष नव्हतं .
” आरव ”
तिनं हळूच हाक मारली . ” अखेर ओळखलंस तू अन्वी.” ” काय उत्तर देऊ ? ” आरव हसला .
” काहीच उत्तर देऊ नकोस . खूप उशीर झालाय .” ” कुठं होतास इतके दिवस ? ” ” सांगितलं असतं पण पुढच्या स्टेशनला मला उतरायचं आहे . आणि दोन तीन मिनिटात सांगून होणार नाही . त्यापेक्षा …”

त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच ती बोगीतल्या आपल्या सीट कडे धावली .

स्टेशन आलं तसा तो उतरला . आणि डबे घेऊन चालू लागला . पार्किंगमध्ये बाईक होती . स्टार्ट करताना तो बघत राहिला . समोरून अन्वी येत होती . सॅक पाठीवर घेण्याचंही भान नव्हतं . सॅक हातात धरून ती येत होती .

” तू आणि इथं ? ”
” नको ना काही विचारू . मला यायचंय तुझ्याबरोबर . ” ती म्हणाली . ” येऊ ना ? ” तिच्या आर्जवी शब्दांनी तो विरघळला . ” तुझ्या घरी आलेलं चालेल ना रे तुझ्या बायकोला , मुलांना ? ” त्यानं खांदे उडवले . ‘ काय माहित ‘ अशा अर्थानं . ” थांब ना . मला ऐकायचं आहे तुझ्याबद्दल . ”

त्यानं बाईक स्टँडला लावली . ” सांगण्यासारखं काहीच नाही सखे . सर्वार्थानं संपून गेलो होतो मी . पण जगलो . मरायचं नाही ठरवलंच होतं . काय काय उद्योग केले माझं मलाच आठवत नाही . दुखऱ्या शरिरानं आणि मनानं मी घरी आलो . आत्ता थोड्या वेळापूर्वी तू उपमा खाल्लास ना , तो माझा उद्योग . मला पदार्थ चांगले करता येतात , त्यामुळं ट्रेन मध्ये माझ्या पदार्थाना विशेषतः उपम्याला जास्त मागणी असते . रोज नवीन गिऱ्हाईके असली तरी उपमा खपतो . बस , त्यावर चाललंय सगळं . बस . हीच माझी कथा .” त्यानं बोलणं संपवलं . बाईक स्टार्ट केली . ” बस . जाऊ या माझ्या घरी .” ” तुझ्या घरी ? आपल्या घरी असं नाही का म्हणता येणार ? ” ती मनातल्या मनात पुटपुटली .आणि बाईकवर बसली
तो न बोलता बाईक चालवत होता . अर्ध्या तासाने त्याने बाईक थांबवली . ती खाली उतरली .

” आलोच मी . ” म्हणत तो गेट उघडुन आत गेला . काहीतरी काम असावं , म्हणून तो गेला असावा ,असा कयास तिनं बांधला .

समोरच्या बंगल्याकडे बघत राहिली . बंगला नव्हताच तो मिनी राजवाडा वाटत होता . खूप विस्तीर्ण होतं आवार . आणि छानशी बाग पण होती . पलीकडे बी एम डब्ल्यू उभी होती . कुणाकडे हा गेलाय . आणि किती वेळ . बोलायचं आहे आपल्याला . तिच्या मनाची घालमेल झाली .

” मॅडम , तुम्हाला आत बोलावलं आहे . ” तो नोकर सांगत होता . संपन्न वास्तू न्याहाळणारी अन्वी भानावर आली . आणि त्या नोकराच्या मागून आत गेली . आणि पाहत राहिली . समोर आरव उभा होता त्याच्या पाठी कितीतरी नोकर हसत उभे होते . ” सखे , अगं आत तरी ये . ” तो पुढं झाला . आणि हातातली चांदीची डबी तिच्या हातात दिली .

” हे काय आहे ? ” ” त्यात माती आहे . खूप वर्षापूर्वीची . आपण शेवटचे भेटलो , तेव्हा तुझ्या पायाखाली होती ती . मी जपून आणली होती . त्या मातीनं मला जगण्यासाठी प्रेरणा दिली आणि बळ सुध्दा दिलं . पदार्थ करता येत होतेच , त्याचं ब्रॅण्डिंग केलं . पण ट्रेन मधल्या पदार्थांची आठवण ठेवली . त्या पदार्थांच्या विक्रीने मला हात दिला , त्याची आठवण आणि कृतज्ञता म्हणून अजूनही रोज मी पदार्थ विकायला जातो , जे मी स्वतः बनवलेले असतात . त्या सगळ्यातून मी खूप कमावलं . हा बंगला बांधला , बाहेरची कार पाहिलीस ना , ती पण घेतली .” ” पण साहेब अजून त्या गाडीत बसले पण नाहीत .”
मघाचा नोकर म्हणाला . ” ती गाडी रोज फक्त आजूबाजूच्या गरीब वस्तीतील मुलामुलींना फिरवून आणण्यासाठी वापरतात साहेब . म्हणजे साहेब नाही बसत गाडीत , मीच चालवतो .” ड्रायव्हर म्हणाला.
सगळे हसले . ” आरव तुझी बायको, मुलं कुठायत ? ” आता सगळेच हसायला लागले . ती गोंधळली .

” मॅडम , एक गंमत दाखवायची आहे तुम्हाला . साहेबांनी या वास्तूचं नाव रंगवून घेतलंय , पण ते मखमली कापडानं झाकून ठेवलं आहे . साहेब म्हणाले , या बंगल्याची मालकीण येईल तेव्हा कापड दूर होईल .” ती उत्सुकतेनं नावाच्या पाटीकडे गेली . कापड दूर केलं . आणि बघत राहिली . त्यावर तिचं नाव होतं . ‘ अन्वी ‘

” म्हणजे ? हे काय ? माझं नाव कसं दिलं ” तिनं विचारलं ” इतकी वर्षं मी , हे घर , ही नावाची पाटी वाट पाहत होती तुझी . ” ” आणि आम्हीपण वाट पाहत होतो .” सगळे एका सुरात ओरडले . ” या जन्मात केव्हा तरी तू भेटशील याची खात्री होती , पण भेटशील तेव्हा तुला चकित करण्याचा हेतू होता . तू भेटेपर्यंत कोणतीही भौतिक सुखं घ्यायची नाही हे ठरवलं होतं . अगदी व्रतस्थ राहिलो . या सगळ्यांना सांभाळत राहिलो . गोरगरिबांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करत राहिलो . बस . तू भेटलीस , आयुष्याचं सार्थक झालं .” त्यानं तिचा हात हाती घेतला . ” आपण एकत्र राहू शकतो ना अन्वी ? ” ” नाही .” तो तिच्याकडे पहात राहिला . सगळे नोकर अचंबित झाले . त्याचा चेहरा पडला . ती पुढं झाली .
” अशी कशी तुझ्याबरोबर राहू ? मला कित्येक दिवसात हंसध्वनी ऐकायला नाही मिळाला जलतरंगावर . ”

सगळे हसू लागले .तो तिला घेऊन आत आला आणि जलतरंगाचे सूर वातावरण भरून टाकू लागले . खूप दिवसांनी वस्तू आता सुखावली होती .

( काल्पनिक )
— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
९४२३८७५८०६

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 122 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..