नवीन लेखन...

प्रवास… एक प्रेम कथा

रिक्षातून प्रवास करत असताना प्रतिभाने विजयचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, तू तिचा नाद सोडत का नाहीस ? ती कोठे ?  तू कोठे ?? नाही म्हणायला ती सुंदर आहे पण इतकीही नाही की तू तिच्या प्रेमात पडावं ! तू किती हुशार ! उद्या जग तुझी दखल घेईल !  हे तिच्या गावातही नसेल. ती तुला भाव देत नसतानाही तू तिच्या प्रेमात का पडून आहेस ? ते मला माहित नाही. पण मला एक सांग तू तिच्या प्रेमात पडण्यापूर्वी जर मी तुझ्या आयुष्यात आले असते तर तू माझ्या प्रेमात पडला असतास ? त्यावर तो म्हणाला, नाही ! त्यावर प्रतिभाने का ? असा प्रश्न विचारताच तो मला , या प्रश्नाचं उत्तर अजून मलाही मिळालेले नाही. ते मिळेल तेव्हा तुला नक्की सांगेन…काहीतरी आहे अगम्य, गूढ आणि अनाकलनीय…जे माझ्याही बुद्धी पलीकडील आहे…खरं पाहता मला हवं हवंस वाटणार सारच तुझ्याकडे आहे…तू हुशार आहेस, सुंदर आहेस, कलाकार आहेस, तुला स्वतःची अशी स्वतंत्र ओळखही आहे…तू माझ्या क्षेत्रात माझी खऱ्या अर्थाने साथीदारही होऊ शकतेस तरीही…काहीतरी…हरवलंय…ते सापडत नाही ते सापडल तर खुप प्रश्न सुटतील…त्यावर प्रतिभा म्हणाली, तू काय बोलतोयस ? मला काही कळत नाही ! हे काय आहे ? अगम्य गूढ आणि अनाकलनीय…तू कधीपासून या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवायला लागलास ? जितका मी तुला ओळखते त्यावरून तर मला वाटते तू हळवा वगैरे नाहीस…तू नेहमी वास्तवात जगतोस मग फक्त याच बाबतीत तू भूतकाळात का रमतोयस ? तुझ तीच्यावर प्रेम आहे पण तिचं कोठे आहे ?? ती तर तिच्याच मस्तीत आनंदाने जीवन जगत आहे आणि तू का येथे तिच्या आठवणीत विनाकारण झुरतोयस ?  जर ती तुझ्यासारखी असती  तर मी तिच्या प्रेमात पडलो नसतो. ती वेगळी आहे तुमच्यापेक्षा ! तुम्हाला जसे माझ्याबद्दल आकर्षण वाटते, माझे कौतुक वाटते , तसे तिला कधीच वाटले नाही . तुमच्या तुलनेत तिला अशिक्षितच म्हणावे लागेल. ती एक सामान्य अतिशय सामान्य तरुणी आहे स्वतःला आपल्या रूढी- परंपरा यात गुंतवून घेतलेली कधी – कधी तिला आधुनिक दिसण्याची / वागण्याची हुकी येते पण त्यामुळे ती बावळट दिसते. पण तिचा तो बावळटपणाही मला आवडतो. नाही वाचत ती कधीच रोजच वर्तमानपत्र ना तिला जगाची खबर आहे. ना वाचलेत तिने भाराभर पुस्तके आपल्यासारखी…ती लुटत असते फक्त जगण्यातील आनंद जो आपल्याला कधीच लुटता येत नाही. चार लोक समोर वेड्यासारखी वेडीवाकडी नाचत असताना आपल्यालाही वाटते त्यांच्यातील एक होऊन नाचावे पण आपण नाचतो का ? तर नाही !! आपण कोणाला मनसोक्त शिव्या घालू शकतो ? तर नाही ! आम्हाला हवी असतात आमच्या आजूबाजूला फक्त आणि फक्त बुद्धीने विचार करणारी लोक ! कोणाच्या भावनांशी आमचा काहीच संबंध नसतो कारण आमच्या अचाट बुद्धीने आम्हाला शिकवलेलं असत दुसऱ्यांच्या भावनांचंही भांडवल करायला. ती रमते सेल्फीत त्यातही तिने सुंदरच दिसावं असा तिचा अट्टहास नसतो…पण आपण ?  आपले फोटो वर्तमान पत्रात छापून येतात. पण तो छापून आलेला फोटोही आपण स्वतःहून कोणाला दाखवत नाही कारण आपला अहंकार  आडवा येतो . मी हा ! हू ! व्यतिरिक्त कधीच तिच्याशी काही बोललो नाही ते ही प्रेमाने बोललो नसणार ! माझ्यातील प्रेमळ माणूस मी कधी कोठे दिसून दिला ? माझा जो विनोदी स्वभाव तुला माहीत आहे तो तिला कोठे माहीत आहे. तिला वाटत मी एक पाषाण हृदयी माणूस आहे, मला भावनाच नाहीत कोणत्याच ?? ती  माझ्या प्रेमात पडली नाही याचा अर्थ ती दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात असायला हवी होती पण त्याबद्दल मला काही माहीत नाही. त्यावर प्रतिभा विजयला म्हणाली , तिचे जर दुसऱ्या कोणावर प्रेम असेल तर तू काय करशील त्यावर विजय विनोदाने म्हणाला , तू कशाला आहेस ? त्यावर प्रतिभाने गंभीर चेहरा करताच विजय म्हणाला…मी काही तिचे शारीरिक सौंदर्य पाहून तिच्या प्रेमात पडलो नाही. शरीराने ती माझी व्हावी म्हणून मी फार प्रयत्न करणार नव्हतोच आणि करणार नाही…प्रेम ही मिळविण्याची नाही तर देण्याची गोष्ट आहे…मला खरं प्रेमात पडणं काय असत ते तिच्यामुळे कळलं नाहीतर प्रेमाच्या बाबतीत मी माझ्याच कवी कल्पनेत रमलो होतो पण तिने वास्तवातील प्रेमाशी माझी ओळख करून दिली..

तिने तुझी वास्तवातील प्रेमाशी ओळख करून दिली असं तू म्हणतोस , म्हणजे माझ्या तुझ्यावरील प्रेमाला काहीच किंमत नाही का ? माझं तुझ्यावरील प्रेम खरं नाही का ? त्यावर विजय प्रतिभाला म्हणाला, प्रतिभा ! तू माझ्या आयुष्यात आलेली माझी सर्वात आवडती स्त्री आहेस. या जगातील तू एकमेव स्त्री आहेस जीच्यासमोर मी माझं ह्रदय मोकळं करतो नव्हे अक्षरशः खोलून ठेवतो. तुझं माझ्या आयुष्यातील स्थान तिच्यापेक्षाही महत्वाचं आहे पण तिच्या आणि माझ्यात काहीतरी विचित्र नातं आहे ते नक्की कोणतं आहे ? तेच मला कळत नाही. तिच्या डोळ्यातही मला आमच्या नात्याचं चित्र कधीच स्पष्ट दिसलं नाही. तिच्या मनात तिच्या माझ्या नात्याचं चित्र कोणतंही असू शकत. पण माझ्या मनात  एकच चित्र आहे जे मी रेखाटले नाही, त्याला रेखाटणारा तो विधाता आहे. मला सतत जाणवत राहील की तिच्या डोळ्यात एक , ओठावर एक आणि मनात भलतंच काही तरी सुरू  आहे. जेव्हा मी तिला पहिल्यादा पाहिले म्हणजे आमची नजरानजर झाली त्या दिवसापासून माझे आयुष्य बदलले ! माझ्या आयुष्याची सर्व गणिते बदलली. त्यापूर्वीचा मी म्हणजे रोमिओ होतो…फक्त त्या अर्थाने नाही तर सर्वार्थाने ! या विश्वात असंख्य अनाकलनीय गोष्टी आहे ज्याची उकल सामान्य माणसाला कधीच होत नाही ती उकल ज्यांना होते त्यांच्या काही विशिष्ट गुण असतात. माझ्या दुर्दैवाने ते माझ्यात आहेत. माझ्याबाबतीलल्या आशा अनेक गोष्टी आहेत त्या तुलाच काय या जगात कोणालाच माहीत नाहीत. अनेक गूढ गोष्टी मला माहित आहेत. माझं तिच्या प्रेमात पडणं फक्त प्रेमात पडणं नाही तर कोणतीतरी अज्ञात शक्ती मला तिच्याकडे खेचून नेतेय असा मला आभास होतो. त्यावर प्रतिभा म्हणाली , तू हे जे काही अगम्य आणि गूढ बोलतोयस ते मला कळत नाही पण तुला भविष्याची चाहूल लागते हे मला माहित आहे. मला सांग तुझे तिच्यावर कितीही प्रेम असले तरी तिचे तुझ्यावर प्रेम आहे याची मला खात्री वाटत नाही कारण तू तुझी पायरी सोडून भले कितीही खाली आलास तरी तिच्यात तिची पायरी सोडून वर तुझ्या पायरीवर येण्याची हिंमत असेल असे मला नाही वाटतं ! अरे जिथे माझ्या सारख्या इतक्या शिकलेल्या, सामाजिक जाण आणि भान असण्याबरोबरच स्वतःची ओळख असणाऱ्या स्त्रीलाही तुझ्यासोबत फक्त बोलण्यासाठीही विचार करावा लागतो , तुझी जवळची मैत्रीण असतानाही ! तिथे ती सामान्य मुलगी काय टिकाव धरणार ? तू जस तीच  वर्णन केलंस त्यावरून तरी ती फार फार एका श्रीमंत नवऱ्याच्या पैशावर जीवन जगणारी एक बांडगुळ होऊ शकते. त्यापलीकडे तिला काही ओळख असणार नाही. हे तुलाही चांगले माहीत आहे. ती तुझ्या विचारांना तुझ्या तत्वांना कधीच न्याय देऊ शकणार नाही तिच्यात ती क्षमता कधीच निर्माण होणार नाही. तिला जर तुझ्याबद्दल काही वाटत असत तर तस ती बोलली असती.

प्रतिभाच बोलणं मध्येच थांबवत विजय प्रतिभाच्या हातात मोबाईल देत म्हणाला, प्रतिभा हा संवाद जरा वाच आणि सांग बरं कसा आहे ! तिने वाचायला सुरुवात केली…तुझा रंग बदलला…त्याचा अर्थ  मला कळतो…तू न बोलूनही बरंच काही बोलून जातेस…ज्याच्या आयुष्यात आपल्यापेक्षाही काहीतरी महत्वाचे आहे…त्याच्यामागे वेळ वाया घालविण्यात काहीच अर्थ नसतो…तुझा वेळ कोणासाठी आहे हे कळलंय मला आता…तो माझ्यासाठी कधीच नव्हता मी मध्ये आलो होतो तुझ्या वेळेच्या…तुला  कधीच वाटलं नाही माझी सकाळ शुभ व्हावी…मी जगवायचो रात्र  तुझ्यासाठी …पण तुझी रात्र माझ्यासाठी नव्हती कधीच….तो संवाद वाचून झाल्यावर प्रतिभा म्हणाली, हल्ली तुझ्या शब्दांची धार वाढली आहे या संवादात कोठेही प्रेम दिसत नाही तर तिरस्कार दिसतोय प्रेमापोटीचा ! तू नको पडायला हवं होतंस तिच्या प्रेमात ! पूर्वी कसा तू काल्पनिक गोड- गोड प्रेमकथा लिहायचास त्या वाचताना आपणही कोणाच्यातरी प्रेमात पडावं असं अगदी सहज वाटून जायचं पण आताचे हे तुझे संवाद वाचून प्रेमाबद्दल तिरस्कार निर्माण होतो की काय असं वाटतं. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तशा प्रेमालाही दोन बाजू असतात पण मला तुझी प्रेमाची एकच बाजू आवडते…तू पूर्वीसारखा लोकांना कथेतून सकारात्मकता वाटताना मला अधिक जवळचा वाटतोस. हे बघ ती तुझ्या प्रेमात असेल नसेल, पडेल नाही पडणार पण तू कशाला तिच्या प्रेमात इतका वावहत गेलास मला आठवत तू म्हणाला होतास, तुला लोकांना फक्त आणि फक्त आनंद देणाऱ्या कथा लिहायला आवडतात मग हे काय ? तुझ्या कथेचा प्रवास किती चुकीच्या दिशेने सुरू झालेला आहे हा प्रवास असाच सुरू राहीला तर प्रेम ओखणारे तुझे शब्द आग ओखु लागतील आणि त्या आगीत फक्त तू नाहीस तर तुझ्यातील लेखकही होरपलेले. तिला कोणीच ओळखत नाही तिची स्वतःची ओळख नाही तू तुझी ओळख निर्माण करण्यासाठी सारं आयुष्य नव्हे तर धन – संपत्तीही खर्च केलीस. अरे तू त्या एका स्त्री च्या प्रेमात पडला आहेस पण तुझ्या कथेवर प्रेम करणाऱ्या हजारो स्त्रिया आहेत ज्या तुझ्या कथेत प्रेम शोधतात , प्रेम अनुभवतात आणि जगतातही… तू म्हणतेयस ते फार काही चुकीचं नाही पण वाचकांना वास्तवाचीही ओळख करून देणे हे ही लेखकाचे काम आहे. मी ही प्रेमाची फक्त एकच गोड बाजू अनुभवली होती. दुसरी कडू बाजू अनुभवल्यावर मला जे अनुभव मिळाले ते वाचकाला द्यायला नको का ? मी तिच्या प्रेमात पडल्यामुळे असं होतंय असं जर वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे. मी तिच्या प्रेमात पडणं ही घडवून आणलेली घटना नाही तर घडलेली घटना आहे. माझं तिच्या प्रेमात पडणं हे सहज झालेलं नाही त्यापूर्वी अनेक घटनांची मालिका घडून गेलेली आहे. ती फक्त या घटनांचा एक भाग आहे भविष्यातही यापुढे बरच काही घडणार आहे. अनेकांचं आयुष्य बदलणार आहे. तू माझ्या आयुष्यात तिच्या जागी नाहीस कारण या घटनांशी तुझा कधीच सबंध आला नाही. ती माझ्या आयुष्यात एका जन्माचा प्रवास करून आली आहे. नियतीने फक्त आमच्यासाठी कित्येकांच्या आयुष्याची गणिते बदलली त्यातील काही गणिते तर मी फुसूही शकत होतो पण मी ते करू शकलो नाही. माझ्याच काय तिच्याही आयुष्यात कोणतीच घटना विनाकारण घडलेली नाही. तिला याचे ज्ञान नाही म्हणून ती रमलेय भौतिक जगातील सुख दुःखे अनुभवण्यात. मला भविष्य माहीत असतानाही मी तिला त्याची कल्पना नाही करून देऊ शकत कारण कदाचित ते समजून घेण्याची क्षमता तिच्यात नाही. भविष्यात घडणाऱ्या गोष्टी तिच्यासाठी भौतिक अर्थाने दुःख दायक आहेत पण  अध्यात्मिक दृष्टीने पाहता तिचा आणि माझा जन्म मुक्तीच्या मार्गावर एकत्र जाण्यासाठी झालेला आहे.. आम्ही गत जन्मातील संचित सोबत घेऊन जन्माला आलो आहोत. गत जन्मीच्या काही स्मृती आणि सवयी आमच्या सोबत आहेत. तिला सुदैवाने त्या स्मरत नाहीत. तश्या मलाही स्मरत नाही पण अभ्यासाने त्याचे संकेत मला मिळता आहेत. प्रतिभा तुला हे माझं सार बोलणं फारच विचित्र वाटत असेल पण माझे गुरूजी  जे फार मोठे ज्योतिषी  आहेत त्यांनी मला माझे भविष्य सांगितले होते.  त्यावेळी मला ते तितकेसे पटले नव्हते. म्हणून मी स्वतः ज्योतिष्य शास्त्राचा अभ्यास केला आणि मला त्यांनी स्पष्टपणे न सांगितलेल्या गोष्टीही कळल्या. मला तिला टाळून आयुष्यात पुढे जाताच येणार नाही कारण माझ भविष्य तिच्या हातात आहे. ती गत जन्मात तिला माझ्याकडून तिच्या हक्काचं न मिळालेलं प्रेम घ्यायला पुन्हा जन्माला आली आहे आणि नियतीने फक्त तिच्यासाठी मला पुन्हा जन्म घ्यायला भाग पाडले असा माझा समज होता पण तो समज म्हणजे माझा भ्रम होता. माझा कल्पनाविलास होता. आताच तिचं लग्न ठरल्याचा संदेश आला. आणि माझ्या भ्रमाचा आणि तिच्यावरील प्रेमाचा भोपळा फुटला…त्यावर प्रतिभा म्हणाली , हे तू इतक्या सहज कसं काय सांगू शकतोस ? त्यावर विजय म्हणाला , हे ऐकून प्रतिभा तुला आनंद नाही झाला ? त्यावर प्रतिभा म्हणाली , खरं सांगायचं तर मला खूप आनंद झाला आहे. पण तरीही तुझ्या आनंदात माझा आनंद आहे. त्यावर विजय म्हणाला, समज असं नसतं झालं तर ? त्यावर प्रतिभा लगेच म्हणाली, माझा माझ्या लेखकावर पूर्ण विश्वास आहे. झाली का ? कथा लिहून ? जग तुला लेखक म्हणून ओळखते ! पण मी तुला विजय म्हणून ओळखते, विजय कसा आहे हे फक्त मला माहित आहे कारण माझा जन्म झाला आहे तो फक्त आणि फक्त तुझ्यासाठी ! जो त्रास तुला होतो तो त्रास मलाही होतो. आपल्या चेहऱ्यावरील खुणा सारख्या आहेत. आपल्या आवडी – निवडी सारख्या आहेत इतकेच नव्हे तर तुझ्या आणि माझ्या कुंडलीतील ग्रहही एकमेकांच्या रिकाम्या जागा भरून काढतात. तुझा आणि माझा जन्म एकाच महादशेत झाला आहे. इतकंच नव्हे तर मला तुझा आणि माझा गत जन्मही माहीत आहे . गत जन्मातील कोणतं अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी आपला जन्म झाला आहे ते ही मला माहित आहे. या कार्याच्या पूर्ततेसाठी आपल्याला आणखी एका व्यक्तीची मदत होईल. हे ही मला माहित आहे. तुला ज्योतिष्य शिकण्याची हुकी आली आणि तू शिकलास ! लगेच  ते कथेत उपयोगात आणण्याचा प्रयत्न केलास पण मला त्याचीही गरज नाही पडली कारण माझ्या गतजन्मातील सर्व स्मृती तेव्हाच जागृत झाल्या होत्या जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हाच माझ्या साऱ्या स्मृती जागृत झाल्या होत्या. म्हणूनच मी तूझ इतर मुलींच्या प्रेमात पडणं, त्यांच्या प्रेमात वाहवत जाणं फार मनावर न घेता तुझी फक्त मैत्रीण बनून राहिले. पण आता आपल्या गतजन्मीच्या प्रेमाला पूर्णत्वाला नेण्याची वेळ जवळ आली आहे. त्यावर विजय म्हणाला, तुला वाटतं तसं कधीच माझं कोणावर प्रेम नव्हतं मला नेहमीच प्रतीक्षा होती तू माझ्यावरील तुझं प्रेम व्यक्त करण्याची…त्यावर प्रतिभा म्हणाली, आता आपला मैत्रीचा प्रवास नव्हे तर प्रेमाचा प्रवास संपला आहे. आता आपला जबाबदारी आणि कर्तव्याचा प्रवास सुरु होणार आहे. तरीही मी म्हणते माझे तुझ्यावर याच जन्मीचे प्रेम नाही तर जन्मोजन्मीचे प्रेम आहे…

लेखक – निलेश दत्ताराम बामणे

२०२, बी – विंग, ओमकार टॉवर, जलधारा एस.आर. ए.,गणेश मंदिर जवळ, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – ४००० ०६५.
मो. ८६९२९२३३१०

Avatar
About निलेश बामणे 312 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..