नवीन लेखन...

प्रतिकृती (कथा)-भाग-६

साधारण दहा-पंधरा मिनिटांचा अवधी गेला असावा. कुपीच्या तळाशी पायांची बोटं पूर्ण वाढलेली दिसू लागली. हळूहळू सगळं पाऊल आणि नंतर वरवर वाढत वाढत गुडघ्यापर्यंत पूर्ण पाय! मग वरवर जात जात मांड्या, कंबर पोट, हात, छाती असा क्रमाक्रमाने संपूर्ण आमदार प्रकट झाला! ही प्रक्रिया सुमारे सहा तास चालली होती. पण आम्हाला त्याची अजिबात जाणीव झाली नाही! ते अद्भुत दृश्य कल्पनेपेक्षाही अचाट होतं. आमदाराची आकृती पूर्ण होताच मी दादाचा हात हातात घेतला आणि झटकन ओढून त्याला उठवलं. आम्ही घाईघाईने बाजूला लावलेल्या पडद्यामागे गेलो. दादाला तिथे उभं करून मी अत्यंत काळजीपूर्वक परंतु त्वरेने कुपी काढून घेतली. कुपीसाठी अत्यंत हलकं पण पारदर्शक काचेसारखं आवरण बनवलं हेतं. त्याची घडी करून ते बाजूला ठेवून दिलं. आता आमदारसाहेब डोळे मिटलेल्या अवस्थेत तिथे उभे होते! कुठल्याही क्षणी ते डोळे उघडतील, त्यापूर्वी मला पडद्यामागे जाणं भाग होतं.

मी जेमतेम पडद्यामागे जातो ना जातो तोच आमदाराने डोळे उघडलेच! प्रथम त्याला आपण कुठे आहोत हेच समजेना. नंतर आपण कपडे न घालताच इथे उभे आहोत हे लक्षात येताच तो जाम चपापला. पटकन् इकडे तिकडे पाहिलं पण कुणी पाहत नाही हे समजताच त्याला बरं वाटलं. दादाने समोरच त्याच्यासाठी कपडे ठेवले होते. ते त्याने पटकन अंगावर घातले. आपण इथे कुठे आहोत ते न समजल्यामुळे तो भांबावून गेला होता. माझ्या प्रयोगाप्रमाणे हे महाशय चोवीस तास जिवंत राहणार होते. म्हणजे रात्री दहापर्यंत त्यांना परत आणणं भाग होतं.

दादा पडद्याबाहेर आला. मी आलो नाही. कारण माझं अस्तित्व या प्रयोगात कुठेही दिसता कामा नये असं आमचं आधीच ठरलं होतं. पडद्यामागच्या दाराने मी घरात येऊन बसलो. दादाला पाहून आमदार चाट पडला. त्याच्या पळून जाण्याचं बेंड फुटल्यामुळे त्याला काही सूचेना. दादा म्हणाला, “अरे आमदारसाहेब, इथे आमच्या घरी काय करताय तुम्ही? तिकडे मुख्यमंत्री तुमची वाट पाहताहेत केव्हाची! चला, चला आपल्याला लगेच निघायला पाहिजे!” आमदार मूग गिळून गप्प बसला. त्याला काय सांगावं याचा काही अंदाज लागेना. दादा त्याला गाडीत टाकून तसाच निघाला ते थेट मुंबईला विधानमंडळातच! वाटेत आमदाराला दादाने चांगलं पढवलं. “शक्यतो तोंडच उघडू नका. काय सांगायचं ते मी उद्या पत्रकारपरिषदेत सांगेन असं सांगा. बाकी मी पाहून घेतो. तुम्ही बिलकूल घाबरू नका.”

इकडे विधानभवन परिसरात सगळं वातावरण उत्सुकतेने भारलेलं! सगळ्या परिसराला पोलिसांचा वेढा! बाहेर दोन्ही पक्षांचे पाठीराखे विजयोत्सव साजरा करण्यासाठी जय्यत तयार!

सभागृहात सगळी मंडळी आपापल्या जागेवर विराजमान! मुख्यमंत्र्यांचं लक्ष सारखं दाराकडे! थोरात कबूल केल्याप्रमाणे नाही आले तर? एकच आमदार कमी होता, तिथे थोरातही न आले तर एकाच नाही तर दोन मतांनी सरकारचे बारा वाजणार!

तिकडे विरोधी पक्षनेत्याचा चेहरा आनंदाने नुसता फुलून गेला होता! आता आपण मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसायला थोडाच वेळ उरला या समाधानात ते अध्यक्षांची उत्सुकतेने वाट पाहत होते! केव्हा अध्यक्ष येतील आणि विश्वासदर्शक ठराव मतदानास टाकतील असं त्यांना होऊन गेलं होतं.

अध्यक्ष आले. आपल्या आसनावर बसले. सगळ्या सभागृहावर नजर फिरवली आणि म्हणाले, “आता मी विश्वासदर्शक ठराव मांडतो…

एवढं बोलतात ना बोलतात तोच दादाने आमदाराला घेऊन सभागृहात प्रवेश केला! क्षणभर सगळीकडे सन्नाटा पसरला. विरोधी पक्षनेता तर एखादं भूत बघावं तसं त्या आमदाराकडे बघायला लागला! दादाने आणि आमदाराने दोन बोटं दाखवून खूण केली आणि सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने आणि बाकांच्या दणदणाटाने दुमदुमून गेलं. विश्वासदर्शक ठराव पास झाला. मुख्यमंत्र्यांनी दादाला आणि आमदाराला सभागृहातच घट्ट मिठी मारली.

विरोधी पक्षनेता आमदाराजवळ येऊन तो खराच आहे ना, हे अगदी निरखून निरखून पाहत होता. आमदाराने त्याच्याशी हस्तांदोलनही केलं. हे सर्व आम्ही दूरदर्शनवर घरी पाहत होतो. माझी तर हसूनहसून मुरकुंडीच वळली! दादाने ठरल्याप्रमाणे मतदानाचं काम होताच आमदाराला गुपचूप लोकांच्या गराड्यातून बाहेर काढलं. पत्रकारांना उद्या पत्रकारपरिषदेत आमदार मुलाखत देतील असं सांगून पिटाळलं आणि थेट घर गाठलं.

घरी आमदारांना मस्त पार्टी झाली. आमदारांनी आराम केला आणि रात्री दहा वाजता दादाने त्यांना माझी प्रयोगशाळा दाखवायल आणलं! आमदार आत आले. आम्ही दरवाजा बंद केला आणि इकडे आमदार साहेबांनीही डोळे मिटले! डोक्यापासून क्रमाक्रमाने ते जसे निर्माण झाले तसेच सहा तासांनी ते अंतर्धान पावले! खाली राहिला फक्त एक थेंब! लाल रक्ताचा! तिकडे पळवून नेलेला आमदार त्याच्या हॉटेलच्या खोलीत दूरदर्शन पाहत होता. आपण स्वत: मतदानाला हजर आहोत हे पाहून त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो काहीही बोलण्यापलीकडे पोचला! दादाला यथावकाश कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. घरात आनंदीआनंद झाला.

मी माझं संशोधन अधिक झटून केलं. माझी प्रगती आता मानवी क्लोन-प्रतिकृती दोन वर्षापर्यंत राहू शकेल या टप्प्यावर पोचली आहे.

मी माझी प्रतिकृती तयार करून तिला विद्यापीठात पाठवलं आहे. तिने तिकडे दोन वर्ष माझं कार्य चालू ठेवलं आहे. अजून एक महिन्याने दोन वर्ष पूर्ण होतील. तोपर्यंत प्रयोग पूर्णावस्थेस पोचून जागतिक मान्यता मिळेल. त्याआधी मी गुपचूप तिकडे जाणार आहे कारण माझ्या प्रतिकृतीची जागा मला घ्यायला नको का?

-विनायक रा. अत्रे
(‘कथागुच्छ’ या कथासंग्रहातून)

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..