प्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे?

आज एप्रिल ५, २०१८. दुपारी जेवणानंतर सहज एक चक्कर लावायला बाहेर पडलो.  बाहेर भयंकर तापलेले होते, उन मी -मी म्हणत होते. जसा बाहेर पडलो होतो, तसाच २ मिनिटात पुन्हा परतलो. आज तापमान ४१ डिग्रीच्या वर होते. आताच तर उन्हाळ्याची सुरुवात झाली, पुढें काय होणार, कल्पना करताच अंगावर शहारे आले. नागपूरचा उन्हाळा आता दिल्लीत पोहचला,असे वाटले. शाळेतले दिवस आठवले. एप्रिल महिन्यातले पहिले पंधरा दिवस वार्षिक परीक्षेचे. मी जुन्या दिल्लीत राहायचो, शाळा पहाडगंज येथे घरापासून ३ किमी दूर. आम्ही जुन्या दिल्लीतली सर्व विद्यार्थी पाईच चालत शाळेत जात असू. सकाळी साडे सहाला घरातून निघाल्यावर सव्वा सात पर्यंत शाळेत पोहचत असू. सकाळी थंडी राहायची. अर्धे  स्वेटर घालावे लागे. आज कुणाला हे सांगेल तर विश्वास होणार नाही. आजोबा खोटे बोलतात हेच वाटेल. त्या वेळी घरात पंखे नसायचे. वाड्यातील सर्व लोक गच्चीवर झोपायचे. मे महिन्यात हि पहिल्या दोन आठवड्यात, रात्री १२ वाजता नंतर अंगावर पांघरूण घेण्याची गरज भासायची. सकाळी मस्त वातावरण राहायचे, सूर्य मध्यावर येताच गर्मी वाढायची. दुपारचे तापमान ४० डिग्री वर पोहचले कि समजायचे आता धुळीची आंधी येणार आणि ५-७ मिनिटे पाऊस हि. त्या नंतर संध्याकाळ पुन्हा वातावरण मस्त व्हायचें. संध्याकाळी कंपनी बागेत फिरण्यात मस्त मजा यायची.  विकासासाठी ब्रिटीश काळात बांधलेली हि सुंदर बाग रस्ते, कार पार्किंग व मेट्रो साठी नष्ट झाली.

अजून एप्रिलची नुकतीच सुरुवात झाली आणि सूर्यदेव आग ओकतो आहे. असेच राहिले तर पाण्या अभावी पक्षी तडफडून मारतील. हरीयाणातून येणार्या कालव्याच्या पाण्याची वाटेतच वाफ होईल. दोन्ही राज्यात पाण्यासाठी भांडणे व पाणी कपात सुरु होईल. पाण्याच्या टेंकर समोर रांगा लागतील. पाण्यासाठी माऱ्यामाऱ्या होतील. काहींचा जीव हि जाईल. एप्रिल मध्ये हि परिस्थिती आहे तर मे जून मध्ये काय परिस्थिती निर्माण होईल, कल्पना करवत नाही. असे चालणार नाही, मनात येईल तसे वागणार्या सूर्यदेवाला  जाब विचारायलाच  पाहिजे.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

अरे तू देव आहेस ना? मग माणसासारखे वाटेल तसा का वागतो आहे. जूनचा उन्हाळा एप्रिल मध्ये का? काही तरी दया कर आम्हा दिल्लीकरांवर.  सूर्यदेवाने आकाशातूनच उत्तर दिले, विपक्षी दलान्सारखा काहीचाबाही आरोप लाऊ नको. मी कधीच आपल्या कामात चूक करत नाही.  जेवढी आग ५० वर्ष आधी ओकत होतो, तेवढीच आज हि. मी उत्तर दिले, आत्ताच गुगल केले आहे, गेल्या ५० वर्षांत दिल्लीचे सरासरी तापमान २ डिग्री सेल्सिअसच्या हि वर वाढले आहे.  एवढे जास्त तापमान का?

सूर्यदेवाने मलाच प्रतिप्रश्न केला, आधी तू सांग ५० वर्ष आधी दिल्लीत पाण्याचे तलाव किती होते, तू जिथे राहतो त्या बिंदापूरच्या तलावाचे काय झाले, पाणी आहे का आज त्यात? खरंच दिल्लीत ५00च्या वर तलाव होते आणि ५ लाख जनसंख्या.  मी १९८८ मध्ये जनकपुरीच्या जवळ बिंदापूर येथे राहायला आलो. गावापासून १ किमी दूर मोठा तलाव होता. छोटे से शिवमंदिर, स्त्रियांच्या आंघोळीसाठी एक घाट, भरपूर झाडे असलेले जंगल व तलावच्या दक्षिण दिशेला एक स्मशानघाट. नेहमी पोहणारी बदके, पाण्यावर फिरक्या मारणारे अनेक पक्षी,  तलावात मासे पकडणारे हौशी लोक, हिवाळ्यात येणारे विदेशी पक्षी. हिवाळ्यात तर सकाळी व संध्याकाळी शेकडोंच्या संख्येने आकाशात विहार करणारी विदेशी बदके बघून मन प्रसन्न व्हायचे. मोर तर भरपूर होते कधी-कधी घराच्या अंगणात हि यायचे. २० एक वर्षांपूर्वी विकास आला.मंदिर आणि स्मशानघाट भोवती भिंती बांधल्या. तलावाला हि चौहू बाजूनी बांधून काढले. एक प्राथमिक शाळा, एक वृद्धाश्रम, प्रसूतीगृह, औषधालय आणि उरलेल्या जागी एक छोटासा पार्क. जंगल संपले आणि तलावाचा पाणी पुरवठा हि. वाढत्या जनसंख्येमुळे पाण्याची पातळी हि खाली गेली. आता १५० फुटावर पाणी लागते ते हि खारे. दोन चार वर्षांत तलाव वाळून गेला आणि पक्षी हि अदृश्य झाले. असेच दिल्लीच्या ५०० तलावांच्या बाबतीत झाले.

मला मौन पाहून, सूर्यदेवाने पुन्हा विचारले, दिल्लीतल्या झाडांचे काय झाले. तुझ्या आंगणातलली झाडे कुठे गेली. घरात समोर आंगण होते, सदाफुलीचे  आणि एक पेरूचे झाड हि होते अलाहाबादी मोठे व गोड पेरू झाडाला लागायचे. पण इतरांनी पूर्ण प्लॉट कवर करून घर वाढवले, मीही तोच कित्ता गिरविला. दोन्ही झाडे शहीद झाली. पूर्ण प्लॉट कवर केला. दिल्लीतल्या ९० टक्के लोकांनी हेच केले. कोठीवाल्यांनी झाडांचा कचरा कारवर  पडतो म्हणून झाडे कापून टाकली.  पूर्वी चांदणी चौक व करोल बाग मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पिंपळाची भली मोठी  झाडे होती. दुकानदारांनी दुकाने वाढविली, झाडे अदृश्य झाली. मोठे-मोठे बगीचे  मेट्रोसाठी, रस्त्यांच्या रुंदीकरण व कार पार्किंगसाठी अदृश्य झाले. कुदसिया बाग, यमुना काठावरचे बगीचे, कंपनी बागांचे फक्त अवशेष उरले. अधिकांश छोट्या-छोट्या बगीच्यांचे रूपांतरण कार पार्क मध्ये झाले. अदृश्य झाले मोर,कोकिळा, चिमण्या, फुलपाखरू. उरले फक्त कबूतर आणि कावळे.

मला मौन पाहून सूर्यदेव म्हणाले, तुम्ही झाडे तोडली, हिरवळ नष्ट केली, तेवढ्यावर हि थांबले नाही. लाखो गाड्या व फेक्ट्रीज आकाशात गरमागरम धूर फेकतात.  घरातले एसी ही उष्णता  वाढवितात. आत्ता तूच उत्तर दे, या उन्हाळ्यासाठी मी जवाबदार कि तुम्ही दिल्लीकर जवाबदार आहात. माझ्या जवळ उत्तर नव्हते, मुकाट्याने मान खाली घालून पुन्हा आपल्या कशात परतलो. एसी सुरु केला. एसीने खोली थंड झाली, पण एसी मात्र बाहेर गरम वारे सोडत होता. मनात चिलबिचल सुरु झाली. अशीच उष्णता वाढत राहिली तर  देशांतर्गत पाण्यासाठी युद्ध हि होतील. देशाचे तुकडे -तुकडे होण्याची संभावना नाकारता येणार नाही.  मनात विचारांचे काहूर माजले.शेवटी राहता आले नाही. उठून एसी बंद केला.

टीप: दिल्ल्लीचें सरासरी तापमान गेल्या ५० वर्षांत २ डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त वाढले आहे.

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..