नवीन लेखन...

कोकणातील बंदरे

दाभोळ, जयगड, रत्नागिरी, रनपार, मुसाकाझी, विजयदुर्ग, देवगड, मालवण अशा सर्वच बंदरातून या प्रवासी आगबोटी येता जाता थांबत होत्या आणि प्रवाशांची बंदरांवर वर्दळही होती. त्याकाळी किनारपट्टीवरील लहान लहान खाड्यांमधून गलबते व मचवे गर्दी करून असत. रेशनवरील तांदूळ, गहु, जोंधळा अशा अन्नधान्यातून मीठ, लाकूड, मंगलोरी कौले अशा सर्व स्तरावरील मालवाहतूक लहान-मोठ्या बंदरांतून गलबतांद्वारे मोठ्या  प्रमाणात होत असे.


सुमारे 720 किलोमीटर लांबीचा सागर किनारा, त्यावरील लहान मोठी बंदरे आणि सामावलेल्या खाड्या हे सारे कोकणाला लाभलेले निसर्गदत्त वरदान होय. गोव्याला लाभलेल्या मांडवी आणि झुआरी या दोन नद्यांच्या आधारे सारे गोवा  राज्य पर्यटन आणि खनिज वाहतूक क्षेत्रात जगभर प्रसिद्ध पावले. उत्तरेकडे गुजरातमध्ये देखील अनेक लहान-मोठी बंदरे उदयास आली व तेथील समुद्री व्यवसाय विस्तारला. कोकण किनाऱ्यावरील बंदरांचा मात्र म्हणावा तसा विकास झालेला दिसून येत नाही. मुंबई आणि गोवादरम्यानच्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांपैकी रायगड  जिल्ह्याला मुंबईची  जवळीक लाभलेली आहे. शिवाय रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांची भौगोलिक परिस्थिती देखील रायगडपेक्षा वेगळी आहे. म्हणूनच खरेखुरे तळकोकण असलेल्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंदराचा विचार या लेखासाठी करणे योग्य ठरेल.

रत्नागिरी जिल्ह्यातील साखरी-वेळास, केळशी, हर्णे, दाभोळ, पालशेत, बोरया, जयगड, तिवरे, भगवती, मांडवी, रनपार-पावस, मुसाकाझी, तुळसुंदे तर सिंधुदुर्गातील विजयदुर्ग, देवगड, आचरा, मालवण, निवती, वेंगुर्ला व रेडी अशा बंदरांची भलीमोठी नामावली घेता येईल. सुमारे 60 वर्षांपूर्वी  म्हणजे सन 1960 ते 1970 च्या  कालावधीत कोकण किनाऱ्यावरील लहान-मोठी सर्वच बंदरे गजबजलेली होती. रोहिदास, रत्नागिरी, अ‍ॅन्थनी, चंपावती अशा वाफेवरील इंजिनाच्या बोटी आणि त्यानंतर कोकण सेवक, कोकणशक्ती, रोहिणी अशा डिझेल इंजिनावरील प्रवासी आगबोटी कोकणच्या किनाऱ्यावर कार्यरत होत्या. तेव्हाच्या एकत्रित रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तरी दाभोळ, जयगड, रत्नागिरी, रनपार, मुसाकाझी, विजयदुर्ग, देवगड, मालवण अशा सर्वच बंदरातून या प्रवासी आगबोटी येता जाता थांबत होत्या आणि प्रवाशांची बंदरांवर वर्दळही होती. त्याकाळी किनारपट्टीवरील लहान लहान खाड्यांमधून गलबते व मचवे गर्दी करून असत. रेशनवरील तांदूळ, गहु, जोंधळा अशा अन्नधान्यातून मीठ, लाकूड, मंगलोरी कौले अशा सर्व स्तरावरील मालवाहतूक लहान-मोठ्या बंदरांतून गलबतांद्वारे मोठ्या  प्रमाणात होत असे.

साधारणतः 1980 नंतरच्या कालखंडात कोकणात गावोगावी रस्ते झाले व वाहतूक सुविधा निर्माण झाल्या. साहजिकच काळाच्या ओघात मुंबई-गोवामधील सागरी प्रवासी सेवा बंद पडली. कोकणातील  लहान लहान बंदरांमधील पूर्वीची मालवाहतूक देखील थंडावली. एकेकाळी गजबजलेली बंदरे ओस पडली. बंदरावरील धक्के आणि  अन्य सुविधा मोडकळीस आल्या. सन 1980 नंतर सुमारे 20/25 वर्षाचा कालावधी म्हणजे कोकणातील बंदरे नामशेष झाल्यागत होती. आज सर्व क्षेत्रात खासगीकरणाचे वारे वाहत असल्याने शासन स्वतः काही कोकण किनाऱ्यावरील लहान बंदरे विकसित करण्याची शक्यता नाही. गेली काही वर्षे कोकण किनाऱ्यावर विविध बंदर विकासाच्या घोषणा आपण ऐकल्या. तथापि, जाहीर झालेल्या अनेक योजनांचा आरंभ देखील झालेला दिसत नाही. तर त्या योजना पूर्णत्वास जाणे दूर राहिले. दाभोळ खाडीत होऊ घातलेले तिंबलो  शिपयार्ड प्रकल्प आणि गोव्याच्या प्रभाकर सावंतांचा जहाज बांधणी प्रकल्प शिवाय राजापूर तालुक्यातील तुळसुंदे किनाऱ्यावरील सेफ अ‍ॅण्ड शुअर कंपनीचा जहाज दुरुस्ती प्रकल्प आणि वेत्ये-आडिवरे जवळचा राजापूर शिपयार्ड हा जहाज बांधणी प्रकल्प असे सारे प्रकल्प थोडेफार भूसंपादन झाल्यावर प्रकल्प उभारणीच्या आरंभकाळातच बंद पडले व रद्द झाल्यात जमा झाले. आंबोळगड किनाऱ्यावर होऊ घातलेल्या आयलॉग बंदर प्रकल्पाची जाहीर जनसुनावणी योग्य नियोजनाअभावी आणि स्थानिक विरोधामुळे तीन ते चार वेळा रद्द झाली. नाणारच्या  प्रस्तावित इंधन तेल रिफायनरी सारख्या मोठ्या प्रकल्पाला विरोध झालेला आपण पाहतो आहोतच. रत्नागिरी जिल्ह्यात होऊ घातलेले हे सारे प्रकल्प एव्हाना पूर्ण होऊन कार्यरत झाले असते तर रत्नागिरी जिल्ह्याचे अर्थकारण आमूलाग्र बदललेले दिसले असते. अनेक वर्षे उत्तम चाललेली रत्नागिरी आणि दाभोळ येथील भारती शिपयार्ड कंपनी बंद पडली. गतकाळात येथे बांधलेली जहाजे साता समुद्रापार गेली हे अभिमानास्पद आहे. आज तेथे लहान मोठ्या अनेक जहाजांचे अर्धवट बांधकाम झालेले सांगाडे आणि यंत्रसामग्री अशी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता अक्षरशः गंजत धूळ खात पडलेली आहे. ही कंपनी पुन्हा चालू होणे काळाची गरज आहे.

आधुनिकतेच्या वाटेवर उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाले. साहजिकच बंदरांवरील कामकाजाचे स्वरूप बदलले. बंदर  क्षेत्रात फार मोठा कायापालट झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथील जिंदाल बंदर प्रकल्प आणि चौगुले उद्योगाचे आंग्रे पोर्ट व लावगण डॉकयार्ड तसेच पावस-रनपार येथील फिनोलेक्स कंपनीचे बंदर ही सर्व खासगीकरणातून विकसित झालेली बंदरे आपण पाहतो. जिंदाल, चौगुले, फिनोलेक्स अशा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी मोठी  भांडवली गुंतवणूक केल्यामुळे वर उल्लेखिलेली त्यांची बंदरे भव्यदिव्य प्रमाणात विकसित झाली हे  वास्तव सत्य आहे. दुसरीकडे लहान उद्योजकांना बंदराच्या छोट्या प्रमाणातील विकासासाठी आवश्यक असलेल्या 20/25 कोटी रुपयांचा भांडवली खर्च करणे शक्य नसते ही देखील वस्तुस्थिती आहे. मंडणगड तालुक्यातील साखरी येथे एक लहानसा धक्का बांधून गेल्या काही वर्षात तेथून मोठ्या प्रमाणात बॉक्साईट खनिज निर्यात झाली. या धक्क्यापाशी ओहोटीचे वेळी अगदी दोन-चार फूट देखील पाणी उपलब्ध असत नाही म्हणून भरतीच्या वेळा साधूनच या ठिकाणाहून बार्जेसची वाहतूक करण्यात येते. असे असूनही येथून चांगल्या प्रकारे खनिज निर्यात होते हे कौतुकास्पद आहे. रत्नागिरी नजिकच्या भगवती बंदरात देखील अल्ट्राटेक सिमेंटचा कच्चा माल गेली अनेक वर्षे येत आहे. मध्यंतरीच्या काळात विजयदुर्ग बंदरातून उसमळी निर्यात झाली. सिंधुदुर्गातील रेडी बंदरातून लोहखनिज मोठ्या प्रमाणात निर्यात झाले.

जयगड खाडीत गुहागरता लुक्यातील काताळे गावच्या किनाऱ्यावर मरीन सिंडिकेटचा छोटेखानी बंदर प्रकल्प धिम्या गतीने साकारतो आहे. ‘कोकणवासीयांचा कोकणातील स्वतःचा बंदर  प्रकल्प’ असे नामभिधान घेतलेला हा प्रकल्प स्थानिक कोकणवासीयांनी म्हणजेच रत्नागिरी परिसरातील तंत्रज्ञ व व्यावसायिक भूमिपुत्रांनी व भूमीकन्यांनी उभा केला आहे हे विशेष होय. पुरेशा सुविधा उपलब्ध नसतानाही मरीन सिंडिकेट परिवाराने आजवर श्रमपूर्वक काम केले. तराफ्यावर  तरंगते पाईप सोडून त्याद्वारे लहान जहाजांना उसमळी चढविण्याचे यशस्वी काम झाले. प्रथम कन्व्हेअर बेल्ट आणि त्यानंतर  कार्गो रॅम्प बांधून त्याद्वारे जहाजांवर बॉक्साईट आणि लँटराईट खनिज चढवण्यात आले. भारत सरकारच्या वतीने आता या प्रकल्पाला पर्यावरण आणि सीआरझेड मान्यता मिळाली असून येथे लवकरच मालवाहतूक, जहाज दुरुस्ती आणि जुनी जहाजे तोडण्याची सुविधा अशी कामे चालतील. जुनी जहाजे तोडण्याचे काम गुजरातमध्ये अलंग येथे मोठ्या प्रमाणावर  चालते.  मुंबईत पोर्ट ट्रस्टच्या दारुखाना विभागात पूर्वापार चालत आलेले जुनी जहाजे तोडण्याचे काम आता बंद करण्यात आले आहे. साहजिकच मरीन सिंडिकेटचा कोकणातील जहाज तोडणी सुविधा प्रकल्प भविष्यात यशदायी ठरणारा आहे. या प्रकल्पाद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. जहाजांच्या  तळाचे काम करण्यासाठी सुकी गोदी अथवा तरंगती गोदी आवश्यक असते. भारतात आजवर सहा/सात जुन्या तरंगत्या गोद्या परदेशातून आणण्यात आल्या. तथापि, मरीन सिंडिकेटच्या वतीने कोकणातील स्थानिक तंत्रज्ञानी आणि कारागिरांनी भारतातील पहिली तरंगती गोदी 2016 सालात अन्य एका कंपनीला येथे बांधून दिली. त्यानंतर मरीन सिंडिकेट परिवाराने जयगड खाडीत ही तरंगती गोदी जहाजांच्या तळाच्या दुरुस्ती कामासाठी यशस्वीपणे वापरली. पश्चिम किनाऱ्यावर भरकटलेली, अर्धवट बुडालेली एकूण सात जहाजेदेखील मरीन सिंडिकेटने आजवर वाचविली आहेत.

कोकणातील किनारट्टीवरील पाण्याची उपलब्ध खोली, लगतच असलेले 70/80 मीटर्स उंचीचे डोंगर, बंदराकडे जाण्या-येण्याचा चढ-उताराचा जोड रस्ता, नैर्ऋत्य पावसाळी वाऱ्यांपासूनचे संरक्षण, महामार्गापासून बंदरापर्यंतचे अंतर तसेच नजिकचे रेल्वेस्थानक आणि माल उतरविण्याची सोय, परिसरातील संभाव्य मालवाहतूक अशा अनेक गोष्टींचा सारासार विचार करून विशेषतः बंदराच्या नैसर्गिक मर्यादा, क्षमता व आवाका ध्यानात घेऊन लहान व मध्यम स्वरूपाच्या बंदर विकासाचे नियोजन करणे अधिक व्यवहार्य आहे. बंदर विकास म्हणजे हजारो कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता हा विचार चुकीचा आहे. येथील बंदरांच्या मर्यादा, आवाका आणि समस्या विचारात घेऊन सुयोग्य नियोजन केले तर कोकणातील लहान बंदरांना आवश्यक असणाऱ्या सोई सुविधा व विकासासाठी अगदी15/20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला तरी त्याद्वारे ही लहान बंदरे नवे रूप साकारतील व परिसरातील व्यापार, उद्योग उदिम भरभराटीस येईल. अर्थकारणात सुधारणा होईल, रोजगारात वाढ होईल.

व्यापारी बंदरांखेरीज जिल्ह्यातील मच्छीमारी बंदरांचा देखील विचार करणे गरजेचे आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे, जयगड, रत्नागिरी नजिकचे मिरकरवाडा, साखरी नाटे अशी बंदरे महत्त्वाची आहेत. आजघडीला येथे नियोजनाअभावी सोई सुविधा उपलब्ध नाहीत. समुद्रातून  आलेल्या मासेमारी  बोटी लावण्यासाठी पुरेसे सुरक्षित धक्के नाहीत. बोटीवरून ताजे मासे उतरवून घेणे, स्थानिक  मासे विक्री तसेच प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यापर्यंतची वाहतूक व्यवस्था, शीतगृहांची व बर्फाची सोय, बोटींना करावयाचा पाणीपुरवठा व डिझेल पुरवठा, बोटींना आवश्यक भासणारी दुरुस्ती व्यवस्था,  शासकीय परवाने, बोटीवरील कर्मचाऱ्यांसाठी ओळखपत्रे अशी येथील कामकाजाची व व्यवसायाची शृंखला असते. आज जिल्ह्यातील वर उल्लेख केलेल्या सर्वच मच्छीमारी बंदरातून नियोजनाचा अभाव आहे. मच्छीमारी बोटींच्या बंदराकडे येण्याजाण्याचे मार्ग हेरले गेले असल्याने ड्रेजिंगची आवश्यकता आहे. खरे म्हणजे कोट्यवधी रुपयांची उलाढाल साधणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारी बंदरांचे सुयोग्य व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरेल. त्यासाठी थोडाफार निधी उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे.

रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीचा विचार करताना जलपर्यटनाचा देखील विचार होणे गरेजेचे आहे. उत्तरेकडे दापोली तालक्यातील कर्दे, केळशी, मुरुड, सालदूर, लाडघर, गुहागरचा रमणीय किनारा, गणपतीपुळे, आरे-वारे, भाट्ये अशा किनाऱ्यावर लहान लहान  बोटीतून प्रत्येकी चार-सहा पर्यटकांना घेऊन जलपर्यटन चाललेले आपण पहातो. उघड्या समुद्रातील हे जलपर्यटन अचानक उसळलेल्या लाटा, जोरदार वारे व पाण्याचा प्रवाह या कारणांनी अनेकदा धोकादायक ठरते. वापरण्यात येणाऱ्या लहान बोटींमध्ये आवश्यक सुरक्षा साधनांची देखील वानवा असते. अनेकदा पर्यटकांचा अतिउत्साह देखील अपघातांना निमंत्रण देणारा ठरतो. अशा सर्व वस्तुस्थितीचा विचार करून गोव्याच्या धर्तीवर येथे जलपर्यटनाच्या योजना राबविणे गरजेचे आहे. उघड्या समुद्रातील धोकादायक जलपर्यटनापेक्षा येथील निसर्गरम्य खाडीमध्ये जलपर्यटन व्हावयास हवे. जिल्ह्यातील दाभोळ, जयगड, भाट्ये येथील खाड्या अशा जलपर्यटनास योग्य ठरतात. कॅटामरान पद्धतीच्या सुमारे 60 ते 100 प्रवासी क्षमतेच्या कमी पाण्यात फिरणाऱ्या पर्यटक बोटी सुयोग्य ठरतील. समुद्रमुखापासून खाडीमध्ये मैल-दीड मैल आत संथ पाण्यामध्ये या बोटी प्रवाशांना घेऊन फिरत राहतील. बोटीवर नाश्ता, जेवणाची देखील सोय असावी. पर्यटकांच्या मनोरंजनसाठी बोटीवर वाद्यवृंद, स्थानिक लोककला, लोकनृत्य व गाणी तसेच बोटींना दिव्यांची रोषणाई व सजावट देखील असावी. केवळ दिवसाचे वेळी नव्हे तर चांदण्या रात्रीच्या जलपर्यटनासाठी देखील रीघ लागेल. अशा बोटींना बंदर प्रशासनाकडून आवश्यक सर्व परवाने प्राप्त असतील, तसेच बोटचा कर्मचारी वर्ग प्रशिक्षित असेल. बोटीवर पुरेशी सुरक्षा साधने देखील असतील. अशाप्रकारे रत्नागिरी जिल्ह्याच्या निसर्गरम्य खाड्यामधून सुरक्षित जलपर्यटनाची सोय झाल्यास जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना जलपर्यटनाची पर्वणी लाभेल आणि परिसराला अर्थप्राप्तीचा मार्ग गवसेल.

कोकणाला लाभलेला सागर किनारा व त्यावरील व्यापारी बंदरे, मच्छीमारी बंदरे आणि विलोभनीय खाड्यांची पर्यटन स्थाने यांचा सुनियोजित विकास झाल्यास कोकणाची अर्थव्यवस्था बळकट होईल, रोजगार वाढेल. कोकणचा विकास साधण्याची क्षमता येथील सागर  किनारा, बंदरे व खाड्यांमध्ये निश्चितच सामावलेली आहे हे निर्विवाद!

–दिलीप भटकर

(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..