नवीन लेखन...

पापी !

भारताच्या निकोबार बेटा पासून पूर्वेस दूर हे काळू बेट आहे. हे इतके लहान आणि नगण्य आहे कि जगाच्या भुगोलांच्या पुस्तकांनी आणि नकाशांनी याची दाखल सुद्धा घेतलेली नव्हती !  सॅटेलाईटच्या उजेडात हे जगाच्या नकाशावर आत्ताअवतरले आहे ! भारतीय आणि चीनी लोक मात्र  ‘अक्षय तारुण्य ‘  देणाऱ्या वनस्पतीच्या शोधात येथे यायचे !

आणि अश्याच काही भारतीय  लोकांना घेवून हि समशेरची ‘रुद्रा’ नामक बोट काळू बेटावर चार दिवसा खाली आली होती. आज संध्याकाळी ‘रुद्रा ‘ परतीच्या प्रवासाला निघणार होती .

०००

समशेरचा  डावा डोळा ‘आळशी ‘ होता . त्याला त्याने चामड्याच्या चकती लावून झाकले होते .  शिवाय त्याचा एक पाय लाकडाचा होता .त्या मुळे तो खलाशी कमी अन समुद्रीचाचा अधिक वाटायचा !  त्याने या काळू बेटाच्या  अनेक वाऱ्या केल्या होत्या . भारता पासूनचा प्रवास  दोनच दिवसांचा होता . पण  प्रचंड खडतर !आणि असणारच कि ! कारण त्याकाळी कुठे आजच्या सारखी GPSची सोय होती . कुठे कुठे ते ‘कट -कट ‘वाले ‘तारा ‘यंत्रे धडपडत होती इतकेच ! सागरी प्रवासाची सारी मदार असायची ती , आकाशातले सूर्य -चंद्र -तारे , बोटी खालचा सागर , हातातल होकायंत्र आणि खलाशाचा  अनुभव , यावरच  !

000

उन्ह उतरू लागली तशी एक एक प्रवासी बोटीवर दाखल होवू लागला . दया त्यांना किनाऱ्या पासून बोटी पर्यंत एका छोट्याशा नावेतून अणून सोडत होता . काम संपल्यावर तो ती हलकी छोटीसी नाव बोटीत बांधून ठेवी ,कारण मुक्कामी  ती पुन्हा बोटी पासून किनाऱ्यापर्यंतच्या वाहतुकी साठी वापरता येत असे . प्रथम आला तो अघोरीबाबा आणि त्याचे चार शिष्य . काळ्या कफन्या आणि डोक्याला काळी फडके ! हा त्यांचा युनिफोर्म !फक्त बाबा ला पांढरी दाढी होती  आणि गळ्यात कसल्या कसल्या माळा त्याने घातल्या होत्या . त्यात एक रुद्राक्षाची होती . बाकी सगळ्यांचे डोळे तांबडे लाल ,तारवटलेले होते . सदैव गांजाच्या तारेत असायची मंडळी ! आत्ताही तेच होते ! या बेटावर सरड्याच्या आकाराची माकडे होती . त्यांच्या कवट्याची माला याला करून गळ्यात घालाची होती . त्याच्या साठी हा कलकत्त्याच्या बोळी तून इतक्या लांब आला होता !

” समशेरा , येताना बोटीच्या बुडातली केबिन दिलतीस ,आता वरची दे ! ” बाबा हातातली  पिळदार काठी आपटत म्हणाला .
” बाबा ,दोन नंबरात तुमचा डेरा टाका . झकास ऐस पैस आहे . ”
बाबा कंपनी दोन नंबरात गेले . एक नंबरात व्यापारी होता ,पूर्व पाकिस्तानातला (आत्ताचा बांगलादेश ) . हा येथील आदिवासीन कडून प्रवाळ आणि मोती घ्यायचा . त्याने ज्यास्त पैसे भरून एक नंबर केबिन घेतली होती . त्याच्या सोबत त्याचे दोन हरकामी  नौकर कम हमाल होते . त्यांना घेवून दयाने एक खेप केली .
“दया , अजून कोण राहलय ?”
“मालक , तो शिकारी पोतभर काय तरी घेवून किनाऱ्यावर उभा हाय , नावात जागा नव्हती . तेला आनतो मग आले सगळे ! ”
दयाने शिकारी बोटीत आणून सोडला . त्याने घुबडाचा अनेक जोड्या मारून आणल्या होत्या . पायरी खाली ‘जोडी ‘पुरली कि घरात लक्ष्मी वास करते अशी काही भारताच्या ग्रामीण भागात अंधश्रद्धा होती . पैशासाठी कोण काय करेल सांगता येत नाही !

ooo

सूर्यबिंब क्षितिजाला टेकले होते . समशेरने मनातल्या मनात उजळणी केली . सर्व तयारी झाली होती . सर्व प्रवासी ,साहित्या , गोडे पाणी , आलू ,कांदे ,उकडलेली अंडी ,सगळी सगळी तयारी झाली होती . ‘ आता निघावे ‘ असा त्याच्या मनाने कौल दिला .
” दया , आले का सगळे ?”
“हा ! आलेत ! ”
“मग ?निघायचं का ?”
” हा ,चला कि ! ”
” मग हाण एक भोंगा ! नांगर घ्या उचलून ! ती नाव बोटीत बांधून टाका ! पण थांब !”समशेर थबकला .
“काय झाल ,मालक ?”
” दया , आपल्या रिवाजा प्रमाणे ,एकदा किनाऱ्यावर नजर टाक , कोणी आडल ,नडल ऐनवेळेचा प्रवासी असेल तर घे त्याला ! ” समशेरने हा नियम त्याच्या पहिल्या सागरी सफरी पासून पाळला होता ! असे केल्याने प्रवास निर्विघ्न पार पडतो असे त्याचे ठाम मत होते .
दयाने आपल्याडोळ्यावर अडवा हात धरून किनाऱ्यावर किलकिल्या नजरेने अदमास घेतला . आणि खरेच कोणी तरी बोटीकडे हातवारे करून थांबण्याचा इशारा करत होते !
” मालक , कोणतर —-”
” जा घेवून ये कोण असेल त्याला ! मग निघू ! ”

दया सपा -सपा वल्हे मारत नाव किनाऱ्याकडे दामटली आणि हा -हा म्हणता तो किनाऱ्यावरील ‘प्रवासी ‘घेऊन आला .

समशेरने आपल्या उजव्या डोळ्याने निरखून पहिले . तो प्रवासी म्हणजे एक तरुण भिकारीण  होती ! वय असेल चोवीस पंचेवीस ! कपड्यांची लक्तर झालेली ,  कपड्या सगट सगळीच धुळीत माखलेली ! तिची सगळी लाज सुद्धा त्या वस्त्राने झाकली जात नव्हती , नको तिथं भोक पडली होती ! चेहरा रेखीव होता पण केसांच्या झिपऱ्या , कैक वर्ष त्यांना तेलाचे बोट लागले नसावे . साक्षात दारिद्र ! पण ते इथे सम्पत नव्हते ! तिने पोटाशी फाटक्या दुपट्यात लहान मुलं धरले होते ! दोन गोष्टी मात्र या दशेच्या विरुद्ध तिच्या जवळ होत्या . एक निसर्गाने दिलेली तारुण्याची दौलत ! आणि भेदक, करारी ,तलवारीच्या पात्याची धार असलेली नजर !

“नाव काय तुझं ?”
तिने बोलता येत नसल्याची खूण केली ! बापरे मुकी !
“हे मुलं कोणाचं ? का चोरून आणलाय ?”
मानेने नकार देत , मुलं छातीशी धरत ‘ चोरलेले नाही ,माझेच ‘ म्हणून सांगितले .
“कोठे जाणार ?”

कपाळाला बोट लावत ‘भारतात ‘म्हणून सांगितले . तिचा अवतार पाहून ‘ प्रवासाला पैसे आहेत का ?’ हा प्रश्न समशेरने विचारला नाही .
समशेरच्या उजव्या डोळ्यात कसले भाव आहेत काळात नव्हते, पण दया मात्र अधाश्या सारखा तिच्या उघड्या पाठीकडे पाहत होता !
“दया , हिला त्या शिडाच्या खांबाखाली जो आडोसा आहे तिथे बसावं . माझ्या सुकाणूखाली शिळ्या भाकरीची पिशवी आहे . त्यातली एक भाकरी , दोन उकडलेली अंडी अन वडगाभर पाणी दे . ”

मायला मालक आज डाव साधणार असं दिसतंय ! दयाच्या मनात विचार चमकून गेला !

०००

मोठ्ठा भोंगा वाजवून ,भकाभका धूर ओकत ‘रुद्रा ‘ समुद्राच्या आधीन झाली . दोन नंबर केबिन मधला विरासनात  ध्यानस्थ ताठ बसलेल्या बाबाने आपले डोळे खाड्कन उघडले .
” कवड्या , बोटीत काहीतरी अभद्र शिरल्याचा संकेत मिळत आहेत ! ”
कवड्या , बाबाचा लाडका शिष्य , कारण तो  बाबाला उलटून बोलत नसे . कवड्याने  डोळे उघडण्याचा प्रयत्न केला ,पण उघडेनात . बेटावरचा गांच्या जबर दिसतोय ! बाबा सकाळी बघू ! कवड्या तारे बरळला .

ooo

डेकच्या खांबाजवळ ती लेकराला छातीशी धरून पाठमोरी बसलेली समशेरला सुकाणूच्या जागेवरून दिसत होती . बहुदा दूध पाजत असावी . तो चटकन उठला.  पायाजवळचे फाटके पोते घेऊन तो तिच्या कडे निघाला . दुरूनच ते पोते त्याने तिच्या कडे भिरकावले . हे दृश्य तो एक नम्बरमधला व्यापारआपल्या खिडकीतून पहात होता . ‘ती ‘ बोटीत आल्या पासून त्याची नजर तिच्यावर होतीच . तिचा अवतार पाहून ‘कशाला हे कंगाल ध्यान बोटीत घेतलस ?’ म्हणून त्याने समशेर जवळ निषेध व्यक्त केला होता . पण आता मात्र त्याचे मत बदले होते . ‘ हाती आली तर वाळवंटी देशात ‘गुलाम ‘ म्हणून विकता येणार होते , ओंजळभर सोन्याची नाणी देणारा ‘माल ‘ आहे ! बहुदा ज्यास्तच ! ‘  त्याचे मन त्याला सुचवू पाहत होते !

000

रात्र वाढत होती . अचानक वाऱ्याचा वेग वाढला होता .  समशेरने विजेरीच्या प्रकाशात होकायंत्रावर बोटीची दिशा तपासून पहिली . बोट योग्य दिशेने मार्गस्थ असल्याची खात्री करून घेतली . बळकट दोरखंडाने सुकाणूचे ते लाकडी चक्र खुंट्याला बांधून टाकले . आता बोट आहे त्या दिशेलाच वाटचाल करणार होती . बोटीभर फिरून त्याने सगळे ठीक -ठाक असल्याची खात्री करून घेतली . सगळेजण झोपले होते . दया , ते व्यापाऱ्याचे नौकर त्या अघोरी बाबाच्या केबिन मध्ये गांज्याच्या तारेत अर्धवट जागे होते . काहीतरी बडबडत होते . विषय मात्र त्या जवान भिकारणीचा होता ! फक्त तो बाबा वज्रासनात ताठ डोळे मिटून बसला होता . झोपला का जागा काळात नव्हते ! समशरने त्या शिडाच्या कोपऱ्यात नजर  टाकली . ती शरीराचा मुटकुळा करून लेकराला पोटाशी घेऊन त्याने फेकलेल्या फाटक्या पोत्यावर पडली होती ! समशेर स्वतः शीच हसला . सुकाणूच्या बाजूला मघाशी दयाने आणून ठेवलेल्या दारूच्या बाटलीचे झाकण उघडून ती तोंडाला लावली . एक घोट दारूचा आणि एक घास टणक उकडलेल्या अंड्याचा घेत निवांत बसला . डोक्यात दारू अन पोटात अंडी स्थिरावल्यावर ,त्याने तो तंबाखूच्या पानांचा  गुंडाळ्या चिरूट पेटवला . राहून राहून त्याची नजर त्या खंबा कडे जात होती . समशेरचे डोळे जडावत होते . रात्र संपत आली होती . त्याचे  तासा -दोन तासांच्या झोपेत भागात असे .

000

पहाटेच्या गार वाऱ्यात समशेरचा डोळा लागला होता . सगळी बोट साखर झोपेत होती . तो आघोरी त्या शिडाच्या खांबाजवळ उभा होता ! त्याने हळूच तिच्या उघड्या दंडाला हात घातला . तिने तो खाडकन झिडकारला ! जणूअंगावर जेणाऱ्या सापावर  एखाद्या तलवारीचा घाव घालावा  तसा ! दूरवर कडाडून एक वीज चमकली ! त्या प्रकाशात त्याला तिच्या नजरेतील विखार जाणवला ! तसेच हाती  कोयता घेवून येणारा समशेर पण डोळ्याच्या कोपऱ्यातून जाणवला ! वेळ चुकीची होती ! झटक्यात आघोरी परत फिरला . तोच त्याच्या टाळूवर एक टपोरा पावसाचा थेंब आदळला ! तो त्याचा साठी अपशकून होता . त्याने वर नजर फेकली . उंच शिडाच्या खांबावरच  एक घुबड आपल्या लाल पिवळ्या डोळ्यांनी  अघोऱ्याला निखारीत होते ! अघोऱ्याचा अंगावर सरसरून काटा आला !

०००

आजची सकाळ सूर्यनारायणा ऐवजी  काळ्या  कुट्ट ढगांचा तांडा घेऊन अली होती . हा काळ पावसास अनुकूल नव्हता तरी पावसाचे सावट पसरले होते . मधूनच एखादा थंडगार टपोरा थेंब तुटत होता . वारा वेडा वाकडा भिरभिर होता . समशेर गंभीर झाला होता ,पण त्याच्या अनुभवाने त्याला येणाऱ्या प्रसंगाला तोंड देण्याचे शिकवले होते . बोटीचे बॉईलर्स धीमी करून शमशेरने बोटीची चारी शिडे उघडण्यास दयाला आदेश दिले . काही मिनिटातच ‘रुद्रा ‘ वारा प्याल्या सारखी सुसाट निघाली ! निसर्ग क्षणा -क्षणाला बेभान होत होता .

०००

बोटीवरील प्रत्येक जीव मनातून हादरला होता . स्थिर होता तो फक्त पद्मासनातला अघोरी बाबा ! त्याच्या केबिन मध्ये तो शिकारी ,व्यापारी ,सगळेच जमले होते .खवळलेल्या निसर्गावर मानवी उपाय कोणाच्याच हाती दिसत नव्हता . अघोरी बाबांच्या  दैवी उपायाने काही करता येणार होते  . समशेर आणि ती भिकारीण सोडून सर्व जण आशेने त्या अघोऱ्या कडे पहात होते . सगळेच घाबरलेले आणि आपल्यावर विसंबून असल्याचे पाहून तो अघोरी मनातून सुखावला .

“बोटीवरील सर्व जीवांनो , या बोटीवर काही तरी अभद्र घडणार असल्याचे संकेत मला काल रात्री पासूनच मिळत होते ! ते काय ? आणि त्यावर उपाय काय ? यासाठी मी रात्रभर ध्यानस्थ होतो ! यावर एकच उपाय मला दिसतोय !”
” कोणता ?”
” काळ्या वेताळाला आवाहन करावे लागेल . ”
“करा की ”
” त्यासाठी मला एक ‘माध्यम ‘लागेल . ते मी तुमच्यातूनच निवडणार आहे . ”

त्याने एक हळदीचे आणि एक कुंकवाचे वर्तुळ काढले . आपल्या  काळ्या चामडी पिशवीतून चार टपोऱ्या कवड्या काढल्या . दोन उग्र वासाच्या उदबत्या पेटवल्या . प्रत्येक वर्तुळात एक एक पिवळे धमक लिंबू ठेवले . कुंकवाच्या वर्तुळात त्या चार कवड्या पालथ्या ठेवून त्यांची कसल्या कसल्या तेलाने ,पूजा केली . मग दीर्घ श्वास घेऊन क्षणभर डोळे मिटून काही मंत्र पुट्पुले . कवड्या दोन्ही हातात चांगल्या घोळून कुंकवाच्या वर्तुळात दान टाकले . तीन पडले!(म्हणजे तीन कवड्या उताण्या आणि एक पालथी . )
” आता एक एक जण या हळदीच्या वर्तुळात दान टाका . ज्याचे दान तीन पडेल तो ‘माध्यम ‘ त्यांन माझ्या सोबत पुढील विधीत सामील व्हायचंय  ! मगच आपल्याला संकटाचे निदान अन उपाय समजेल ! ”

०००

समशेरने कमरेची दुर्बीण उजव्या डोळ्याला लावून साधारण उत्तरेला पहिले . तेथे तो धुरकट डोंगर दिसायला हवा होता तो दिसत नव्हता ! मघाशी सगळी शीड उघडण्याचा निर्णय चुकीचा ठरला होता एक शीड वाऱ्याने फाडून टाकले होते ! बाकी किती वेळ टिकतील सांगता येत नव्हते ! लाटांची उंची धोकादायक नसली तरी वाढलीच होती . बोट चांगलीच घुसळत होती . हेलकावे खात होती . कापड फाटल्याचा आवाज झाला तसे चमकून समशेरने शीड कडे नजर वळवली . ते मामुली कापड वाऱ्याचे लोट थोपवण्यास असमर्थ असल्याचे जग जाहीर करत होते . त्याची लक्तर दूरवर उडत होती . हवेचा जोर वाढतच होता . समशेरने पुन्हा दुर्बीण डोळ्याला टेकवली . डोंगर दिसत नव्हता ,दिसत होत्या त्या फक्त खवळलेल्या समुद्राच्या लाटा ! त्याने होकायंत्र काढले . त्याच्या सुया कमालीच्या स्थिर होत्या ! निर्जीव झाल्या सारख्या ! हातातल्या होकायंत्रा सकट तो गर्रकन मागे वळला . त्या यंत्रात तसूभरही फरक नव्हता ! म्हणजे ? बोट ज्या दिशेला जात होती ती दिशा निर्धारित प्रवासाची नव्हती ! त्याने सुकाणूच्या चक्रा कडे पहिले , त्याने खुंट्याला बांधलेला दोरखंड तुटून लोंबत  होता ! त्याची खात्रीच पटली , बोट भरकटली होती !
” दया !” त्याने खच्चून आवाज दिला !

०००

आता दयाची पाळी होती . त्याने हळदीच्या रिंगणात कवड्याचे दान टाकले . तीन पडले ! तो माध्यम म्हणून निवडला गेला . समशेर धावत अघोऱ्याच्या केबिन मध्ये आला .
“आपली बोट भरकटलीय !”
पण त्याच्या कडे कोणाचेच लक्ष्य नव्हते ! सारेजण घुमणाऱ्या दया कडे पहात होते !
समशेर  ‘मूर्ख कुठले , संकटात जादू टोण्याच्या मागे लागलेत !’ असे काही बडबडत पुन्हा डेक कडे निघून गेला .
लाटा पुरुषभर उंचावल्या होत्या . वादळी वाऱ्याने कहर केला होता . त्यात पावसाने भर घातली होती ! तिरप्या तारप्या  पावसाच्या सारी ‘रुद्रा ‘ला झोडपून काढत होत्या !

०००

अघोऱ्याने राखेची फुंकर घुमणाऱ्या  दयावर मारली .
” तू कोण ?”
” मी काळा वेताळ “दया बरळला .
“वेताळाचा विजय असो ! हे तुफान कसलं ? बोटीला काही दगा -फटका आहे का ?”
“बोट धोक्यात ! जलसमाधी ! ”
“का ?”
“बोटीत पापी !”
“कोण ?”
“हुडका ! ”
“कसा ?”
नंतर दया फक्त घुमत राहिला . वेताळाचा संचार संपला तसा त्याने अंग टाकून दिले .
” बोटीत कोणी तरी पापी आहे ! त्यामुळे हे संकट बोटीवर आलंय ! त्या पाप्याला समुद्रात फेकून दिलेतर बाकीच्यांचे जीव आणि बोट वाचेल !”अघोरी अधिकार वाणीने म्हणाला . सगळ्यांनी माना डोलावल्या .
” चला तर मग डेकवर ”
सर्वजण डेक वर आले . पाऊस पडतच होता . सोबतीला विजांचा गडगडाट वाढला होता. अघोऱ्याने त्या भिकारणी कडे हिणकस नजरेने पहिले .’थांब तुलाच समुद्रात फेकून देतो ! माझी इच्छा झिडकारणारा  पापींचं !’
ती भिकारीण कावऱ्या -बावऱ्या नजरेने अंग आकसून पाहत होती . कस होणार माझ्या बाळाचं ? मला काहीही झालेतर चाललं  पण -पण हे चिमुकलं वाचाल पाहिजे ! याला अजून खूप जगायचं आहे ! आत्ताच तर यान डोळे उघडलेत अजून जग पाहायचाय !
” ती छोटी नाव दोर बांधून या खवळलेल्या सागरात सोडू . त्यात प्रत्येकाने जाऊन उभे राहायचे . काय प्रार्थना करायची ती करायची .  माझ्या या चौपन्न मण्याच्या माळेचे  एक जपावर्तन झाले कि पहिल्याला वर बोटीत घेवू  आणि दुसरा पाठवू . जो कोणी पापी असेल त्याला हा सागर आपल्या पोटात घेईलच ! ”
अघोऱ्याच्या प्रस्तावाला सर्वानी मूक समंती दिली .
दयाने त्या अघोऱ्याच्या इशाऱ्या सरशी ती नाव दोरखंडाला बांधून त्या उसळत्या सागरात टाकली
“चला या एक एक पुढे.  ”
“बाबा , तुमच्या पासूनच सुरवात करा ! तुमच्या नंतर मी जातो . “तो व्यापारी चाचरत म्हणाला .
क्षणभर अघोऱ्याने विचार केला .
“ठीक . मीच जातो प्रथम ! हि माळ तुम्ही घ्या . ‘ओम नमो शिवाय ‘चा जप एक माळ करा . नंतर मला बोटीत ओढून घ्या . ”
दोर धरून अघोरी त्या हेलकावणाऱ्या नावेत उतरला . त्याने हात जोडले आणि डोळे मिटले .
‘देवाधी देवा महादेवा , तुझ्या परमभक्त वेताळाचा मी दास !मी अनेकांना गुप्त धन मिळवून दिलंय ! अनेकांच्या भल्या बुऱ्या इच्छा पूर्ण केल्यात ! ती पुण्याई माझ्या पाठीशी उभी राहू दे !” सणकून एक वीज चमकून गेली !

जप संपला . अघोरी बोटीत परतला .! अघोऱ्याला सुद्धा मनातल्या मनात आश्चर्य वाटले ! मी पुण्यात्मा !

नंतर तो व्यापारी ,दया , शिकारी , बाबाचे सगळे शिष्य सगळेच ‘पुण्यवान ‘ होऊन परतले होते !. राहिले होते ते समशेर आणि ती भिकारीण !

” समशेर तू नाहीतर हि भिकारीण या पैकी एक जण पापी आहे ! चल या परीक्षेसाठी तयार हो ! “तो अघोरी कठोर आवाजात म्हणाला .
” आबे हॅट ! काय वेड लागलाय तुम्हाला ? समुद्र बेभान झालाय ! पाऊस , विजांचे थैमान चाललंय ! मला काही झालं तर हि बोट अन तुम्हाला किनारी कोण नेणार ? त्याहूनहि महत्वाचे म्हणजे ,अश्या बिकट  प्रसंगी मी माझ्या ‘रुद्राला ‘ एकटी नाही सोडणार ! आणि आता राहिली ती भिकारीण , अरे निर्लज्जानो ती फक्त शुल्लक भिकारीण नाही ! ती एका बाळाची आई पण आहे ! मी तीला  बोटीवर घेतल्या पासून तुमचा तिच्या देहावर डोळा आहे ! तुमच्यातल्या कोणालाही तिच्या हातातलं मुलं  दिसत नाही ? तिला पण नका देवू संकटाच्या तोंडी !  ” समशेर जीव तोडून ओरडला . त्याच्या हातातलं सुकाणूच चाक त्याच्या बाहुबलाची परीक्षा घेत होते . तो त्या पावसाच्या थैमानातही बोटीला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत होता !

“अरे भेकडा , बोटीतील वीस जीवांचा प्रश्न आहे ! आम्ही सर्वजण या परिक्षत उत्तीर्ण झालो आहोत ! आम्ही पुण्यवान आहोत ! कसली ना कसली पुण्याई आमच्या पाठीशी उभी आहे ,हे आम्ही सिद्धच केलय ! तुम्हालाही या परीक्षेला सामोरे जावे लागेल ! ”
अघोऱ्याने आपल्या शिष्याला खूण  केली . त्याने त्या असह्य भिकारणीला फरफटत बोटीच्या कठड्या कडे आणले . त्याही परिस्थितीत तिने ते छोटे बाळ आपल्या पासून वेगळे केले नव्हते . तिने ते बाळ पोटाशी घट्ट बांधले आणि दोर धरून त्या नावेत उतरू लागली .
” तिला काही झाले तर मी हि बोट भर वादळात सोडून समुद्रात उडी घेईन ! त्या नंतर तुम्ही आणि तुमचे नशीब !” समशेर ओरडला . पण त्याचा आवाज विजेच्या कडकडात विरून गेला .

तीचे  कसे बसे पाय त्या नावेत टेकले .

पावसाचा आणि हवेचा जोर प्रचंड झाला . संपूर्ण बोटी भोवती जणू विजांच्या लोळांनी फेरच धरला होता . लाटातर शिडाच्या खांबाशी स्पर्धा करत होत्या !

सगळ्यांचे डोळे दिपवणाऱ्या लखलखत्या विजेने त्या छोट्या नावेकडे झेप घेतली !

” शेवटी हि करंटी भिकारीण आणि तीच ते अभद्र पोरच पापी निघाले !पहा , पहा हा सागर आणि आकाश एकत्र हीचा  बळी घेणार हे मात्र नक्की ! हिच्या मुळे  आपण सर्वाना जलसमाधी मिळणार होती ! पाप्याला आणि त्याच्या पापाला देव आणि निसर्ग कधीच क्षमा करत नाही हेच सत्य आहे !” बोटीवर कोणीतरी म्हणत होते .

त्या लखलखत्या विजेच्या लोळाने त्या छोट्या नावे कडे झेप घेतली . ती त्या नावेत आपल्या बाळाला छातीशी धरून डोळे गच्च मिटून बसली होती .  त्या लहानग्या जीवाला ‘भिऊ नकोस मी आहेना तुझ्या सोबत ‘सांगत असावी !

विजेच्या लोळाने आगीचा भपका उडाला . भिकारणीच्या नावेची बोटीशी असलेली नाळ -तो दोरखंड -जाळून गेला . नाव उघड्या समुद्रात वेडीवाकडी लोटली गेली .

ज्या क्षणी नाव बोटी पासून वेगळी झाली ,त्या क्षणी बोटी भोवती फेर धरून नाचणाऱ्या विजां बोटीत शिरल्या ! पहिल्या विजेने त्या अघोऱ्याच्या टाळूचा ,जेथे टपोरा पावसाचा थेंब  पडला होता तेथे , वेध घेतला ! आपल्या देहाचा कधी कोळसा झाला हे त्या अघोऱ्याला कळलेही नाही ! तसल्या भयानक वादळात आत्ता पर्यंत बसलेले ते घुबड समाधानाने उडून गेले !
एका लाटेच्या तडाख्यात बोटीचे फळकुटे खवळलेल्या पाण्यात विखुरली !

०००

एका अज्ञात किनारी ते छोटं मुलं भुकेनं रडत होत . ती तरुण भिकारीण हलकेच आपले डोळे उघडत होती . आपण आणि आपलं बाळ जिवंत असल्या बद्दल आश्चर्य करत होती ! सकाळच्या कोवळ्या उन्हात तिच्या केसातून निखळणारे पाण्याचे थेंब मोत्या सारखे चमकत होते ! जणू सागरच मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता ! आणि सांगत होता कि

“पाप्याला आणि त्याच्या पापाला देव आणि निसर्ग कधीच क्षमा करत नाही हेच सत्य आहे ! ”

( आधारित )

— सु र कुलकर्णी

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहात आहे . पुन्हा भेटूच . Bye .

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..