पाणी पाणी

माझा जन्म नागपूर मधील १९४२ च्या प्रचंड उन्हाळयातला. मी बहुदा पाणी पाणी म्हणून पहिले रडणे सुरू केले असावे. जन्मत: दुधापेक्षा मला पाणी जास्त प्रिय आणि यामुळेच पाण्याने सतत माझा पिच्छा पुरवला आहे.

माझे बालपण चाळीतून चालू झाले, घरात दोन नळ होते पण त्यातून पाणी आल्याचे मी कधी पाहिले नव्हते. पुस्तकातल्या चित्रात केवढा पाण्याचा झोत दाखवीत. सार्वजनिक मोरीतील नळाला रात्री २ तास करंगळीच्या धारे इतके पाणी येत असे. तेथील झुंबड व बाचाबाची नित्याची होती. पाणी भरणे व ते विविध भांडयात साठविणे हा आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा महत्वाचा घटक म्हणजे बालपणापासून हेच पहिले संस्कार होते.

आमच्या घरी गोदुबाई आजी राहात. त्या फुलपात्री, परातीपासून जे म्हणून हाती मिळे त्यात काठोकाठ पाणी भरून ठेवत. मी असंख्य वेळा स्वयंपाक घरात पाणी पिण्यासाठी लुडबुडत असे. त्यावेळी पाणी घेताना सांडले की त्या असे काही आकांड तांडव करीत की जणू त्यांच्या पैशाच्या बटव्यातच हात घातला असे त्याना वाटे.

पैशापेक्षा पाण्याचे महत्व ज्यास्त होते. शहरात कुठेही आग लागली की अग्नीशामक दलाचे बंब कर्कश घंटानाद करत जात, पण त्यांचे आगमन म्हणजे चाळीतील पुरूषाना ती पर्वणीच असे. सगळे प्रथम मिळेल त्या नळाकडे धाव घेत अगदी मध्यरात्री २ वाजता सुध्दा कारण त्यावेळी प्रत्येक नळाला धोधाटे पाणी. आग शमली की नळांचा रूसवा सुरू तो पुढील येणाऱ्या आगीपर्यंत.

पाणी साठविण्यासाठी पत्र्याच्या व पितळयांच्या पिंपांचे आगमन झाले. पाणी बादल्यानी भरण्याएैवजी लांब रबरी नळया व तोटया आल्या पण त्यांचे व नळाचे काही जमत नसे. अर्धे पाणी वाया जात असे. मग दोऱ्या व लोखंडी तोटया या सर्वांची मोट बांधून पिंपात पाणी पडू लागे. त्याचवेळी बिनाका गीतमाला गाणी चालू असत, मग पाण्याकडे लक्ष देणार कोण. पिंप वाहु लागत मग काय आरडा ओरड, भांडणे, आई बापांचा उध्दार व मग काय नळ तुमच्या बापाचा आहे काय हे सगळे चढया आवाजात. तोपर्यंत नळाची धार करंगळी येवढी होत पुढील काही क्षणात राम म्हणत असे.

मे महिना उजाडला की पाण्याचा रूसवा वाढत जाई. आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहाणारे. नळाच्या धारेचे १५ मिनिटे रूसवा फुगव्याचे नाटक मग खेळ बंदच. आता सर्वांची धाव तळमजल्याकडे. प्रचंड झोंबाझोंबी. घरातील पुरूष व आम्ही तरूण मुले रात्री २ ते ४ मध्ये ६३ पायऱ्या वर चढून पाण्याने भरलेली बादली वर आणत असू. त्यात जिन्यात सांडलेले पाणी, मिणमिणते दिवे व लोकांच्या वर खाली खेपा घालणाऱ्या झुंडीच्या झुंडी, पाणी भरण्याचा जुलुस. त्यात नातेवाईक मंडळी सुटटी करता डेरेदाखल झालेली असत. त्यानाही कार्यक्रमात भाग घ्यावा लागेच व त्यांना पळविण्याचा हा हुकमी एक्का होता. घामाघुम झालेले सर्व वीर नंतर शांतपणे गच्चीत झोपी जात. हे रहाटगाडगे दर मे महिन्यात असेच चालत असे. त्यात एक मजा होती. जोश होता आणि सांघिकतेची भावना होती.

गिरगावात मांगलवाडीत रात्री ३ वाजता भराभर लहान मुलांना झोपेतून उठवत, आंघोळी घालत व परत झोपवून टाकत. पाण्याला प्रेशर नाही हे ठराविक मासलेवाईक उत्तर म्युनसिपल ऑफीस मधून तयार असे. आमच्या चाळीला मोठी गच्ची, त्यावर दोन बाजूस मिळून मोठाल्या १६ टाक्या पाणी साठविण्याकरता उत्तम सोयी करून
उभारलेल्या, पण त्यात पाण्याचा एक थेंबही पडलेला आम्ही कधीही पाहिलेला नव्हता. त्यांचा उपयोग लपाछपी खेळण्यास व मोठी माणसे गच्चीत फिरण्यासाठी.

एकदा मे महिन्यात कल्याणला मावशीकडे सुटटीचा राहाण्यास गेलो होतो. त्यांच्या घरी विहीर. त्यात तळ गाठलेले पाणी, ते मध्यरात्री थोडे वाढे. मोठा वाडा असलेले घर, त्यात बिऱ्हाडकरू, प्रत्येकजण चोरून हळु आवाजात रहाट चालवत व काय दोन तीन बादल्या पाणी मिळवीत. पण त्याच्याकरता जे डावपेच खेळत ते मला प्रथम कळतच नसत. मग एक दिवस पाण्याच्या टँकरचा ट्रक रस्त्यावर आला. मी तर चाळीतला पाणी भरण्यातला तरबेज गडी. धावलो सुसाट हंडा घेउन आणि लावला पहिला नंबर. मावशीकडचे सगळे चाटच पडले. चांगली पिंपची पिंप भरून टाकली. माझी कॉलर एकदम कडक. उगाच नाही मुंबईत पाणी भरलेले होते. करता करता चाळीत राहाण्याची २० वर्षे पाणी भरता भरता निघून गेली. पंपाचा रूसवा तसाच होता.

शेवटी आमचे वडील कंटाळले व प्लाझा सिनेमाजवळील नवीन अद्ययावत मकरंद सहनिवासात जागा घेतली. पहिला मजला व २४ तास पाणी. ज्या पिंपानी २० वर्षे साथ दिली त्यांना माळयावर स्थान मिळाले.

सुखाचा काळ चालू होता व मला कर्जत मध्ये बंगला बांधण्याची खुमखुमी आली. बंगला तयार झाला पण पाण्याचा रूसवा नशिबी होताच. घरासमोरील टेकडीवर भली मोठी सिमेंटची टाकी तयार पण पाईप लाइन नव्हतीच. सरकारी कारभार…. पाणी येणार या आशेने जमिनीखाली भला मोठा हौद बांधून घेतला. जणु माझ्या घराकरता ग्रामपंचायत वाटच बघत होती. कित्येक महिने तो कोरडा हौद बघून माझे डोळे पाणवत. मे महिना आला की पुढल्या वर्षी पाणी येणार अशी आश्वासने मिळत. त्या आशेवर वर्षे घालवत होतो आणि पावसाळयात नदीला पूर येई व घर पाण्याखाली जात असे. शेवटी पाणी माझ्या कच्छपी लागले होते. पुढे आमचा नोकर वासुदेव नदीवरून एकेक हंडा भरून आणून हौद भरत असे. तळपत्या उन्हात ३ ते ४ तास घाम गाळत त्यांची अवस्था बघून माझ्या डोळयात पाणी येई आणि हे सर्व पाण्यासाठी.

घरात भरून ठेवलेले पाणी मी पैशापेक्षा ज्यास्त जपत असे. पाणी पुरवावे कसे या विवंचनेत माझे कर्जत घरी जाणे कमी होत असे. नातेवाईक व मित्रमंडळी घरी राहायला आली की त्यांच्या पाठी मी ते नळ वापरू लागले की सावली सारखा उभा राही की तो नळ लवकर बंद करेल का नाही या विचारात नकळत माझा हात नळावर पडत असे. एकेक थेंब मला मोलाचा होता. एकदा तर माझ्या मेहुणीने पाण्याचे कॅन गाडीत घालून आणले होते. दरवेळी मी आल्यागेल्यांना लोचटासारखी पाण्याच्या संकटाची रेकॉर्ड ऐकवीत असे पण पाणी काही मला दाद देत नव्हते. माझ्या घराच्या शेजारीच माझा नोकर वासुदेवचे घर. त्याने त्याच्या घरात बोअरवेल खणण्याचा प्रयत्न केला. पाणी लागणार असे वाटू लागले. माझ्या डोळयासमोर धो धो पाण्याचा झोत दिसु लागला पण ते लागलेले पाणी औट घटकेचे होते ,पाणी येण्याचे थांबले ते कायमचेच. त्याचे 5000 रू. पाण्यात गेले तेंव्हां हा प्रयोग आपल्या घरात करायचा नाही हे पक्के ठरले.

पावसाळयात गच्चीतून धो धो पाणी नळातून खाली पडे ते साठविण्याचा मला छंदच लागला, अनेक पिंपे बादल्या जे मिळेल त्यात पाणी भरण्याचा कार्यक्रम मी भर पावसात एकटयानेच उरकत
असे. चार महिने तर चार महिने तरी पाणी पुरत असे. कडक उन्हाळा आला की कर्जत जाणे बंद कारण पाण्याबरोबर वीजेचाही रूसवा असे. पाण्याचा हौद नुसत्या उन्हाच्या माऱ्याने तडा जाऊन निकामी झाला. पाणी पाणी म्हणत त्याने कायमचा निरोप घेतला. आता घर पाण्याअभावी माझ्या कंठाशी आले होते. शेवटी घर विकले, व समोरच्या टेकडीवरच्या रिकाम्या टाक्याला दंडवत घातला. १७ वर्षे पाण्याशिवाय रोज दर्शन दिले. पाण्याचा नळ मला माझ्या घराजवळ कधीच दिसला नाही.

म्हणतात ना एखाद्याच्या नशिबी पैसा नसतो, माझ्या नशिबी पाणी नव्हते. आता पाणी या विषयात पडायचे नाही असे ठरविले आणि तोच ज्या सहनिवासाच्या पाणी पुरवठयाचे आम्ही कौतुकाचे गोडवे गायचो तेथील पाणी सुध्दा आमच्याशी वैर करण्यास दंड थोपटून उभे राहिले. पाण्याला प्रेशर नाही हेच ब्रिदवाक्य म्युनसिपल ऑफीस मधून पुन्हा एैकावयास मिळाले आणि मग मात्र माझ्यात पाणी संचारू लागले. एका संध्याकाळी मी चक्क बागेतून १ जिना चढून पाण्याची बादली आणली. मला अशा अवस्थेत बघून शेजारी अचंबित. आता माझ्यातले पाणी भरण्याचे जुने रक्त सळसळून उठले होते. दुसऱ्या दिवशी पाण्याचा पूर्ण ठणठणाट, लोक खाली उतरून चर्चा. अनेक तऱ्हेचे तोडगे अगदी थेट मुख्यमंत्र्यांना भेटायलाच पाहिजे इतपर्यंत मजल गेली. पाणी सोडण्याचे व्हाल्ह जागोजागी असतात तेथे रात्रीचे खेटे घालण्यास सुरवात झाली. मासलेवाईक टोलवाटोलवीची उत्तरे मिळत होती पण पाण्याचा पत्ता नव्हता.

दुसऱ्या दिवशी एक जेष्ठ पाणी अधिकारी सहनिवासाची पाइप लाइन तपासण्यासाठी आले. मी डॉक्टर आहे हे कळल्यावर माझ्याच भाषेत त्यानी सल्ला देण्यास सुरवात केली. हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या कशा ब्लाक होतात तेंव्हा अॅंजिओग्राफी करून ब्लॉक शोधतात तसेच तुमच्या पाइप लाइन तपासा आणि मग बायपास सर्जरी करतात तसे पाईप बदलायचे. अगदी सोपा उपाय आहे. बॉल परत आमच्याच कुंपणात येउन पडला. दुसऱ्या दिवसापासून सर्व तपासण्या सुरू झाल्या. तोपर्यंत पाण्याची सोय टँकर मार्फत मोठया मुश्कीलीने झाली. येवढी मोठाली टँकरची धुडे सहनिवासात शिरताना त्यानी गटारांची झाकणे, भिंतींचे कोपरे तोडण्यास सुरवात केली. पाण्यापुढे सर्व माफ होते. दोन तीन टँकरचे पाणी टाक्यांत पडल्यावर त्या टाक्यात थोडीफार पाण्याची हालचाल दिसू लागली. टँकरचे पाणी घाण तेंव्हां उकळणे क्रमप्राप्तच होते. अॅक्वागार्ड कंपनीचे फावलेच. भराभर सहनिवासच्या ऑर्डर्स मिळाल्या. पुढे ४ दिवस अंबेडकर भीम मुंबईत आले आणि पाण्याचा दिलासा देउन गेले. भीम परतले आणि पाण्याची रडकथा परत चालू झाली. आमची नातवंडे सकाळी तोंड धुताना अखंड वेळ जोराने नळ सोडतात तेंव्हां चटकन हात नळ बंद करण्याकडे वळतात कारण पाण्याच्या स्मृती कायम आहेत.

पुढचे महायुध्द तेलाचे का पाण्याचे यावर चर्चा घडत असतात पण माझ्या जीवनात पाण्याचे युध्द कायम आहे. तेव्हां शेवटी राम राम म्हण्ण्याऐवजी पाणी पाणी म्हणतच वैकूंठाचा रस्ता गाठावा लागणार. नाहीतरी गंगेचे पाणी गडव्यातून शेवटी ओततातच ना मुखात.

— डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 50 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..