नवीन लेखन...

पांढरा शर्ट खाकी पँट

माझे बाबा फौजदार असूनही तिसरी पर्यंत मला गावातल्या झेड पी च्या शाळेत घातले होते. जेव्हा त्यांची बदली मनमाड पोलिस स्टेशनमध्ये झाली तेव्हा आम्ही सगळे बाबांसोबत तिकडे शिफ्ट झालो मग वर्ष दोन वर्षांत बाबांची जिथं बदली होईल तिकडे आमचे बिऱ्हाड शिफ्ट व्हायला लागले. चौथीला मनमाड, पाचवीला मालेगांव, मग सहावीला एक महिना अलिबाग आणि उरलेले वर्ष श्रीवर्धन. श्रीवर्धनहून नवी मुंबईतील नेरूळ येथील सेंट झेवियर्स या शाळेत सातवी ते दहावी. तिसरी पर्यंतची पांढरा शर्ट आणि खाकी पँट हा युनिफॉर्म पुन्हा मालेगांव आणि श्रीवर्धनला घालायला मिळाला होता.
नेरूळच्या शाळेचे नाव सेंट झेवियर्स असले तरी माझे माध्यम हे मराठीच होते. सातवी पासून दहावी पर्यंत सेंट झेवियर्स मध्ये पांढरा शर्ट आणि ग्रे कलरची फुल पँट आणि टाय, शूज असा युनिफॉर्म होता. सहावी पर्यंत झेड पी आणि दुसऱ्या मराठी शाळांमध्ये युनिफॉर्म बद्दल एव्हढी विशेष सक्ती नव्हती. शूजच पाहिजेत, शर्ट पँट ला कडक इस्त्री पाहिजे असा कोणी आग्रह धरलेला किंवा आईवडिलांना शाळेत बोलावून तुमच्या मुलाच्या युनिफॉर्म कडे लक्ष द्या वगैरे असे सल्ले किंवा उपदेश शाळेकडून दिले गेले नव्हते. त्यामुळे माझ्या वेळी शाळेत जाऊन शिकून स्मार्ट व्हायचे दिवस होते आता आईबापानी मुलाला स्मार्ट दिसतील असे सजवायचे आणि मगच शाळेत शिकायला पाठवण्याचे दिवस आलेत की काय असा प्रश्न माझ्या मित्राने त्याच्या सोबत घडलेला किस्सा सांगितल्यावर वाटायला लागले.
माझ्या मित्राचा फोन आला , वैतागलेल्या सुरात तो सांगत होता, तो जहाजावरुन येऊन आठ दिवस झाले होते त्याचा मुलगा सिनिअर के जी ला होता, त्यादिवशी त्याच्या मुलाच्या शाळेत टीचर्स आणि पॅरेंट्स मीटिंग होती. शाळेच्या प्रिन्सिपॉल मॅडमने सांगितले की मुलांचा युनिफॉर्म नेहमी स्वच्छ आणि कडक इस्त्री केलेलाच पाहिजे. जर तुमची मुलं स्मार्ट दिसली नाही तर आमच्या शाळेचे नाव खराब होईल. तुमच्या मुलाचा युनिफॉर्म ही आमच्या शाळेची ओळख आहे.
माझा मित्र म्हणाला साला काय जमाना आला आहे, शाळेत विद्यार्थ्यांवर केले जाणारे संस्कार, शाळेत शिकून विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश, त्यांच्या आयुष्यात त्यांनी डॉक्टर, इंजिनियर, उद्योजक, अधिकारी बनून मिळवलेल्या नोकऱ्या, पदे आणि व्यावसायिक यश याच्याने शाळेचे नाव उज्वल झाले पाहिजे की कपडे घालुन आणि स्मार्ट दिसून उज्वल झाले पाहिजे.
सी बी एस ई पॅटर्न आणि कॉन्व्हेन्ट शाळा असल्याने सिनिअर के जी साठी त्याने वर्षभरासाठी लाख भर रुपये फी भरली होती. त्यानंतर बस सर्व्हिस पाहिजे असेल तर शाळेचीच बस सर्व्हिस घेण्याची सक्ती, स्टडी मटेरियल युनिफॉर्म च्या नावाने आणखीन हजारो रुपये, शाळा आठवड्यातून तीन दिवस पण युनिफॉर्म मात्र तीन वेगवेगळ्या प्रकारचे. त्याची ऐपत होती त्याला काही वाटले नाही परंतु शिक्षक पालक सभेला गेल्यावर शाळेची ओळख, नाव खराब होणे हे सर्व ऐकल्यावर त्याची सटकली होती. सिनियर के जी चे पोरगं माझे जेमेतम पाच वर्षांचा त्याला कितीही कडक इस्त्री घालून पाठवले तरी तो शाळेत कपड्यांची इस्त्री सांभाळणार आहे का. त्याच्यात टीव्ही वर वॉशिंग पावडर वाले दाग अच्छे होते हैं आणि कपडे गंदे झाले तरी हरकत नाही म्हणुन कौतुक करणाऱ्या आया सगळं किती विरोधाभास दाखवले जाते. मुलांवर याचा होणारा परिणाम हा विषय वेगळा आहे पण हल्ली हे चाललंय काय.
खरचं हल्ली शिक्षण क्षेत्रात हे सगळं चाललंय काय असा प्रश्न पडतो. आमच्या वेळेला शाळेत जायला ना बस होती ना रिक्षा, गावतल्या शेजारच्या मोठ्या मुलांच्या मागे मेंढरांसारख शाळेत जायचे आणि यायचे. शाळेत न्यायला आणायला कोणी नसल्याने दप्तराचे ओझे पण स्वतःलाच वाहावे लागायचे. लहान मुलाची सॅक एका खांद्यावर अडकवून शाळेत किंवा इव्हन स्कूल बस पर्यंत सुद्धा सोडायला जाणारे मम्मा डॅडा बघितले की हसू येते.
मला अजूनही आठवतं पाचवीत मालेगावच्या शाळेत शाळा निरीक्षक शाळा तपासायला आले होते. तेव्हा त्यांनी विचारले विद्यार्थी मित्रांनो चला सांगा तुमचा गणवेश पांढरा शर्ट आणि खाकी पँट असा का बरे आहे. मी सांगू मी सांगू करत काही जणांनी हात वर केले. हं तु सांग रे बाळा करत सरांनी काही जणांना बोलायला सांगीतले. विद्यार्थ्यांपैकी कोणी म्हणाले सर आम्ही मातीत खेळतो, खेळताना पडल्यावर, कुठेही बसल्यावर पँट ला मातीचे डाग दिसून मळकी दिसू नये म्हणून खाकी पँट. एकाने सांगितले सर पांढरा रंग हा प्रकाश परावर्तित करतो त्यामुळे पांढरा शर्ट घातल्यावर उन्हाचा आणि गर्मीचा त्रास होऊ नये यासाठी गणवेशात पांढऱ्या शर्ट चा समावेश केला असेल. हात वर न केलेल्या एका विद्यार्थ्याला निरीक्षकांनी उभं केले आणि त्याला विचारले तू सांग बाळा, त्यावर त्याने उत्तर दिले सर सगळे घालतात म्हणून मी पण घालतो यावर सगळेच जण हसायला लागले.
निरीक्षक विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरांनी समाधानी दिसत होते, पाचवीतील च पोरं ती तसे बघीतले तर त्यांच्या आकलन शक्ती नुसार त्यांनी योग्य उत्तरे दिली होती.
निरीक्षक मग हसत हसत म्हणाले विद्यार्थी मित्रांनो शाळेचा गणवेश हा एकसारखा आणि सगळ्यांना अनिवार्य असण्याचे कारण म्हणजे शाळेत आल्यावर तुम्ही सगळे विद्येची देवता सरस्वती हीची लेकरं असता. तिच्या समोर तुम्ही एकसमान आणि एकसारखी असता, कोणी गरीब,श्रीमंत, उच नीच किंवा या जातीतली आणि त्या धर्मातली अशी नसतात. शाळेत जर गणवेश नसता तर श्रीमंत मुलं नीटनेटके आणि भरजरी कपडे घालून आले असते, गरिबाचे कपडे साधारण, कोणी त्यांच्या धर्मानुसार पेहराव केले असते.
किती साध्या आणि सोप्या शब्दांत निरीक्षकांनी युनिफॉर्म चे महत्व पटवून दिले होते.
पुर्वी शहरांमध्ये एखाद दोन शाळा मोठया असायच्या पण आता ढीगभर शाळा निघायला लागल्या. त्यातून सुरु झालं मार्केटिंग कारण शाळा चालवायला म्हणण्यापेक्षा शाळेतून नफा कमविण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी वाढविणे गरजेचे झाले. एका मुलामागे किती पैसे काढायचे याची गणितं मांडू जाऊ लागली. पुस्तकांचे कमिशन यामध्ये युनिफॉर्म चे कमिशन जिथून मिळेल तिथून पैसै लाटायला सुरुवात होऊ लागली. काही शाळा तर चार पाच वर्षांत युनिफॉर्मच चेंज करतात तसे करण्यामागे एक मोठं धक्कादायक कारण असल्याचे ऐकण्यात आले. काही विद्यार्थ्यांना एका वर्षी घेतलेला युनिफॉर्म दोन तीन वर्ष वापरता येतो किंवा त्यांच्या लहान भावंडांना नंतर वापरता येऊ शकतो, पण मार्केटिंग मध्ये युनिफॉर्म देणारे दुकानदार कसे मागे राहतील. या दुकानदारांची एक लॉबी असते शाळा किंवा संस्था चालकांना गाठून ते शाळेसाठी किंवा संस्थेसाठी लाखो रुपये डोनेशन देतात ज्यामुळे चार पाच वर्षांनी युनिफॉर्म बदलला जातो, त्याच्याने काय होते ज्या दुकानदारांची वर्षाला सरासरी हजार युनिफॉर्म विक्री होण्या ऐवजी दीड पट विक्री होते. शाळा पण ठराविक दुकानदारांकडूनच युनिफॉर्म घ्या असे सुचविते, शूज एकाच कंपनीचे, टाय , बेल्ट आणि काय काय. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पहिला होता त्यामध्ये एक पालक दुकानदाराशी हुज्जत घालत होती, तुम्ही जो शर्ट तीनशे रुपयांना विकता तसाच मी तुम्हाला दीडशे रुपयांना आणून देते. दीडशे ऐवजी दोनशे घेतले तरी हरकत नाही तूम्ही सरळ सरळ दुप्पट मार्जिन काढता आहात. त्यांच्या मर्जिन मध्ये कोणा कोणाला कमिशन जातं असावं याची त्यांना कल्पना नसावी म्हणूनच त्यांना राग आवरणे शक्य झाले नाही आणि त्यांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला.
खाजगी शाळा जाऊ द्यात आता तर झेड पी च्या सरकारी, अनुदानित आणि संस्थांच्या शाळांमध्येही कलरफुल आणि वंडरफुल युनिफॉर्म यायला लागले आहेत. शिक्षणाच्या नावाने बाजार सुरू आहे नुसता.
शैक्षणिक मुल्ये, संस्कार, निती , शैक्षणिक क्रांती हे सगळं पांढऱ्या शर्ट आणि खाकी पँट सारखं काळाच्या पडद्या आड जाऊ लागले आहे आणि ह्याला जबाबदार अशा शाळांचे चोचले पुरविणारी पांढरा शर्ट आणि खाकी पँट घालून शिकलेली तुमची आणि आमची पिढीच आहे.
— प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर
B.E.( mech), DIM, DME .
कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..