पानामागून पाने गळावीत तसे दिवस गळत जातात. मनात पाय रुतवून ..ओल्या खुणा ठेवून. नवी पालवी फुटते पुन्हा, पुन्हा दिवसही येतच राहतात, तशी माणसेही येतात आणि जातात…तीही एक पानगळअसते. कोणी कोणासाठी थांबायचं? कशाशी एकनिष्ठ राहायचं? झाडांनी गळालेल्या पानांशी की नव्या पालवीने झाडाशी? एका ऋतूत किती बदल होतात! तेव्हा नुकत्याच झालेल्या ओळखी आता दृढावलेल्या, तर तेव्हा दृढ आलेले संबंध आता मात्र दुरावलेले. हे सगळे अपरिहार्य आहे का? उजाडलेलं निष्पर्ण झाड नव्या पालवीतून पुन्हा बहरतं, हसत राहतं. माणसाला झाडासारख जमतं का? नाही जमत खरं तर, पण तरी जमल्यासारखं दाखवावं लागतं. निखार्यावर फुलं ठेवावी लागतात.. मनातल्या जखमा… प्रतारणेच्या, उपेक्षेच्या, विश्वासघाताच्या मनातच लपवाव्या लागतात. हसावंच लागतं. वर म्हणावंही लागतं,
‘ कित्ती आनंदात आहे मी!’.
दिवसांप्रमाणे माणसालाही बदलावंच लागतं का? पण मग सर्वांनाच ते सहजतेने का जमत नाही? असं का होतं?
‘असं का?’ हा कधीच उत्तर न मिळणारा प्रश्न मनात घोळत घोळत पानगळीकडे बघावंच लागतं. मान फिरवता येत नाही, डोळे मिटता येत नाहीत. ‘का?’,याला उत्तर नाही. ‘का नाही?’, यालाही उत्तर नाही.पानगळ.. नुसती पानगळ! अपरिहार्य पानगळ! हातात काहीच नसतं. फक्त नजर असते आणि मन असतं. हसणारं आणि रडणारं. बहुतेकांचं रडणारंच. पानगळ.. अश्रू…पालवी…हसू…. , पुन्हा पानगळ! पुन्हा पुन्हा तेच पण सवय लागत नाही माणसाला, झाडासारखी.नाही स्थितप्रज्ञ होता येत त्याच्यासारखं. नाही राहता येत एकाकी, निरपेक्ष त्याच्यासारखं.
शिशिरातल्या पानगळीचा नंतर होतो पाचोळा. माणसाचाही तर पाचोळाच होतो. पाचोळा करणाराही कधीतरी तेथेच येणार असतो. सगळेच वेगवेगळे तरीही सारखे.नशीब वेगळे पण परिणती एकच. जवळ जवळ दिसणाऱ्या दोन पर्वत शिखरांमध्ये दूरवरुन न दिसणारी अशी खोल दरी असते. तशीच एक दरी दोन मनांमध्ये असते. हे कळूनही त्या दोन शिखरांना जोडणारा मैत्रीचा, प्रेमाचा पूल भाबडा माणूस बांधू पाहतो, स्वतःवर विश्वास टाकून. हा विश्वास मात्र कधी त्या भोळ्या जीवाला वंचित करून जाईल याचा नेम नाही. या विश्वासावर फार काळ विश्वास टाकता येत नाही.
पानगळ होतच राहते पानांची, भावनांची, विश्वासाची, नात्यांची आणि जीवांचीही.
आराधना कुलकर्णी
Leave a Reply