नवीन लेखन...

ऑन टाईम डिलिव्हरी

आजकाल कोणतीही वस्तु विकत घेण्यासाठी घराबाहेर पडून बाजारात जावेच लागते असे काही नाही. आजच्या डिजिटल युगात टाचणी पासुन फ्रिज पर्यन्त जवळपास सर्व गोष्टी ऑनलाईन घरी मागवणे शक्य झाले आहे. अगदी हॉटेल मध्ये जाऊन जेवण्याची जरी इच्छा झाली तरी ऑनलाईन जेवणच घरी मागवणे शक्य आहे आज. हॉटेल मध्ये जाऊन आपला नंबर लागण्याची वाट बघत बसण्यापेक्षा बरेचशे लोक आज घरून फूड मागवण्याला प्राधान्य देत आहेत. ऑनलाईन फूड ऑर्डर करा आणि एक तासाच्या आत फूड घरी. ऑनलाइन ग्राहक वाढवण्यासाठी फूड ऑर्डर घेणाऱ्या कंपन्या आणि हॉटेल मालक ग्राहकांना कूपन च्या रूपाने वेगवेगळ्या सवलती देखील देतात. ऑनलाइन फुड ऑर्डर केल्यानंतर “ऑन टाईम डिलिव्हरी” चे वचन देखील देतात. घरबसल्या फूड ऑर्डर केल्यावर घर ते हॉटेल मधील अंतरानुसार किती वेळेत फूड डिलिव्हर केले जाईल हे आपल्याला सांगितले जाते. सांगितलेल्या वेळेत फूड डिलिव्हर करण्यासाठी फूड कंपन्या सतत प्रयत्नशील असतात. वेळेत फूड मिळण्याची हीच अपेक्षा बहुतांश ग्राहक देखील बाळगतात. उच्च ग्राहक सेवेची अपेक्षा मग ती कंपनी कडून असो किंवा फूड मागवणाऱ्या ग्राहकाकडून असो चुकीची नाहीये पण फूड डिलिव्हर करणाऱ्या डिलिव्हरी बॉय वर कळत नकळत एक दबाव निर्माण करते. फूड डिलिव्हरी करताना उशीर झाला तर संबंधित ग्राहकाकडून तक्रार केली जाईल का अशी भिती डिलिव्हरी बॉय च्या मनात असते. ग्राहकाकडून जर अशी तक्रार केली गेली तर त्या डिलिव्हरी बॉयला त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागते. उशीर झाल्यामुळे सर्वच नाही पण काही कंपन्यांकडून डिलिव्हरी बॉयला दंड देखील आकारला जातो. डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारे बहुतांश तरुण हे गरीब कुटुंबातील असतात. फूड डिलिव्हरी करून त्यांना मिळणारे मासिक उत्पन्न हे फारच तोकडे असते. मासिक उत्पन्न वाढावे म्हणून काही तरुण त्यांना असलेल्या दररोजच्या डिलिव्हरी टार्गेट पेक्षा जास्त वेळ काम करून वाढीव भत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे डिलिव्हरी बॉय कडून फूड डिलिव्हर करताना जाणीवपूर्वक उशीर केला जाण्याची शक्यता तशी कमीच असते. फूड डिलिव्हरी करताना जर कधी उशीर होतच असेल तर त्यामागे विविध कारणे असु शकतात. डिलिव्हरी बॉय कधी वाहतूक कोंडीत सापडतो, ज्या घराच्या पत्यावर फूड डिलिव्हर करायचे असते तो पत्ता माहीत असतोच असे नाही, कधी वेळेत घराजवळ येवूनही आपला फोन लागत नाही, बरेच ठिकाणी रस्ता खराब असतो, पावसाळ्याच्या दिवसात अचानक पाऊस आला तर थांबावे लागते. अशा अनेक समस्या असल्या तरीही त्या डिलिव्हरी बॉय ला त्या दिवशीचे टार्गेट पूर्ण करायचे असते. टार्गेट पूर्ण नाही झाले तर अपेक्षित उत्पन्न होत नाही, वाढीव भत्ता मिळत नाही. सध्या डिजिटल युग एवढे प्रगत झाले आहे की डिलिव्हरी बॉय कोणत्या मार्गाने फूड घेऊन येत आहे हे आपण घरी बसल्या गुगल मॅप वरून समजून घेऊ शकतो. त्यामुळे जर कधी फूड डिलिव्हरी ला उशीर होतच असेल तर वर नमूद केलेल्या कारणांचा आधी सारासार विचार व्हावा आणि मगच ग्राहकाकडून त्याची तक्रार केली जावी किंवा संबंधित जॉब देणाऱ्या कंपनी कढून जाब विचारला जावा. ऑन टाईम डिलिव्हरी द्वारे उच्च ग्राहक सेवेची अपेक्षा बाळगताना डिलिव्हरी बॉय वर नकळत निर्माण होणारा दबाव एखाद्या अपघाताला निमंत्रण देणारा नसावा. असे कोणतेही कार्यक्षेत्र नसते जिथे कामाचा आणि टार्गेट पूर्ण करण्याचा दबाव नसतो. पण असा कोणताही दबाव जो आपल्या सुरक्षिततेला धोका निर्माण करू शकतो किंवा अपघाताला निमंत्रण देण्याची शक्यता निर्माण करू शकतो त्या दबावाचा नक्कीच स्वीकार होऊ शकत नाही. फूड डिलिव्हर करणारा तरुण हा बाईक चालवत असतो. त्याला घराचा पत्ता माहीत नसेल तर बरेच वेळेस बाईक आणि गुगल मॅप वर एकसाथ लक्ष केंद्रित करावे लागते. त्यामुळे लक्ष विचलित होण्याच्या संभावना वाढतात. अशा वेळेस ऑन टाईम डिलिव्हरी चा दबाव वाढला तर छोट्या मोठ्या अपघाताची शक्यता अगदीच नाकारता येत नाही. त्यामुळे उच्च ग्राहक सेवेची अपेक्षा ठेवताना ऑन टाईम डिलिव्हरी च्या अपेक्षे सोबतच थोडा मानवतेचा दृष्टिकोन सुद्धा ठेवायला काही हरकत नाही. अपघाताची शक्यता गृहीत धरून फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या डिलिव्हरी बॉय चे अपघात विमा जरूर काढून देतात पण अपघात झाल्यावर मलमपट्टी करत बसण्यापेक्षा अपघाताची शक्यता निर्माण करणाऱ्या अपेक्षेला काहीसा आवर घालने अपेक्षित आहे. अपघात होणे आणि अपघाताला निमंत्रण देणे या दोन गोष्टींमधील फरक कंपनी आणि ग्राहक समजून घेऊ लागले तर ऑन टाईम डिलिव्हरी च्या अपेक्षेकडे आपोआप मानवतेच्या दृष्टीकोनातून बघायला सुरुवात होईल. जशी आपली कोणी तरी घरी वाट बघत असते तसेच डिलिव्हरी बॉय ला देखील कुटुंब असते आणि त्यांची देखील कोणी तरी वाट बघत असते.

लेखक : राहुल बोर्डे

मेलrahulgb009@gmail.com

2 Comments on ऑन टाईम डिलिव्हरी

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..