नवीन लेखन...

भारतीय रेल्वेच्या त्या ऐतिहासिक दिनी…

१८५३ साली मुंबईत सुरू झालेल्या भारतातल्या पहिल्या रेल्वेने १६ एप्रिल २००३ रोजी दिडशेव्या वर्षात पदार्पण केले त्यानिमित्त रेल्वे मंत्रालयाने मुंबईत एक महत्त्वाचा सोहळा आयोजित केला होता. रेल्वेला तिच्या गुणदोषांसह स्वीकारून आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनवलेल्या मुंबईकरांनी त्या दिवशी मध्य रेल्वेची ठाण्यापर्यंतची सगळी स्टेशन्स व्यापून टाकली आणि रेल्वेवरील आपलं निस्सिम प्रेम व्यक्त केलं होतं.

१६ एप्रिल १८५३ च्या त्या ऐतिहासिक दिवशी ज्या प्रकारच्या वाफेच्या इंजिनाने १४ डब्यांची गाडी बोरिबंदरहून ठाण्यापर्यंत गेली, त्याच प्रकारचं वाफेचं इंजिन लावून, तशाच प्रकारचे जुने दुर्मिळ डबे जोडून नेमक्या त्याच वेळी म्हणजे दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी गाडी सोडण्याचं ठरवण्यात आलं. त्याप्रमाणे दुपारी अडीच वाजता सुरू कार्यक्रमाला झालेल्या तत्कालीन राज्यपाल डॉ. पी.सी. अलेक्झांडर, रेल्वेमंत्री नितीशकुमार, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, वेदप्रकाश गोयल, राम नाईक, दिग्विजय सिंग ओ. राजगोपाल, जयवंतीबेन मेहता व मुंबईचे महापौर महादेव देवळे उपस्थित होते.

दुपारी अडीच वाजता हा कार्यक्रम मुंबई स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर ७ व ८ वर आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने खास तिकिटाचं प्रकाशन प्रमोद महाजन यांनी केलं. या प्रसंगी तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर, मनोहर जोशी, राम नाईक, जयवंतीबेन मेहता, छगन भुजबळ इत्यादींची भाषणं झाली झाली.

रेल्वेमंत्री नितीश कुमार म्हणाले, की जुने ऐतिहासिक डबे आणि अत्याधुनिक जर्मन डबे यांचा संगम साधलेली गाडी धावत असल्याने आजचा दिवस, १६ एप्रिल २००२ महत्त्वाचा आहे.

तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर आपल्या भाषणात म्हणाले, आपल्याला या कार्यक्रमाला राजभवनाहून बग्गीने आणण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार होता, मात्र दीडशे वर्षांपूर्वी सुरू झालेल्या रेल्वेच्या प्रारंभाला तात्कालीन गव्हर्नर फॉकलंड हे कबूल करूनही आले नव्हते. तेव्हाही त्यांच्यासाठी बग्गीच ठेवली होती. मला इतिहासाची पुनरावृत्ती करायची नव्हती म्हणून बग्गीतून येण्यास नकार दिला.

ठीक ३.३५ वाजता दीडशे वर्षांचा इतिहास जागवणारी ही गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनसमधून निघाली, तेव्हा उपस्थितांचा निरोप घेता घेता तिची गतीही काहीशी मंदावत होती. त्यानंतर सुरू झाला अलोट जनसागराचा उत्साह. छत्रपती शिवाजी टर्मिनस सोडल्यानंतर मस्जिदबंदर, सॅण्डहर्स्ट रोड, भायखळा आदी स्टेशन्सच्या दुतर्फा असंख्य मुंबईकर या गाडीकडे कौतुकाने पाहत होते. या प्रवासाची आठवण म्हणून रेल्वेमंत्री नितीशकुमार यांनी सर्व सन्माननीय नेत्यांना वाफेवर चालणाऱ्या इंजिनाची एक देखणी प्रतिकृती भेट म्हणून दिली.

दीडशे वर्षांपूर्वीच्या भारतीय रेल्वेच्या पहिल्या प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी तात्कालीन कंपनी सरकारने साष्टी बेटावरील आणि ठाण्यातील सरकारी कचेऱ्या बंद ठेवल्या होत्या. योगायोग असा की १६ एप्रिल २००२ रोजी केंद्र सरकारच्या खाजगीकरणाच्या व कामगारविषयक धोरणाचा निषेध करण्यासाठी सार्वजनिक उद्योगातील कामगार संघटनानी बंद पाळला होता. ती संधी साधून असंख्य कामगार कर्मचारीही या सोहळ्यात सहभागी झाले होते.

जसं एकेक स्टेशन मागे पडू लागलं तशी उत्साही जनतेची गर्दी एवढी  वाढली, की रेल्वेचे इतर मार्ग गर्दीने व्यापून गेले. अनेक उत्साही लोकांनी रुळावरच ठाण मांडल्याने एरवी आपल्या कर्णकर्कश भोंग्याने लोकांना मार्गापासून दूर पिटाळणाऱ्या उपनगरी गाड्याही मंदावल्या.

दादर स्टेशनवर तर मध्य रेल्वेचे सहाही प्लॅटफॉर्म गर्दीने ओसंडून वाहत होते. माटुंगा आणि शीवमध्ये असणाऱ्या वल्लभ संगीत विद्यालयाचे विद्यार्थी, रेल्वे वसाहतीमधल्या महिला आणि मुलं, धारावी झोपडपट्टीतील हजारो लोक होते. कुर्ला स्टेशनजवळ कसाईवाड्याला जोडणारा पूल, कुर्ला स्टेशन, घाटकोपर, विक्रोळी, कांजुर-मार्ग, भांडूप, मुलुंड या साऱ्या ठिकाणी गर्दीचा महापूर लोटला होता.

ठाणे स्टेशनमध्ये तर उत्साही मंडळींनी प्लॅटफॉर्मवरील छतही व्यापून टाकलं होतं. तेव्हा रेल्वे सुरक्षादल व पोलिस यांची धावपळ उडाली होती. प्लॅटफॉर्म नंबर आठच्या मागील बाजूस असणाऱ्या तलावात आनंद भारती समाज संस्थेतर्फे पारंपरिक कोळी वेषात काही कोळी बांधव व भगिनी होडीत उभे राहून या रेल्वेच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते.

साडेचार वाजण्याच्या सुमारास दुरून कुठेतरी गाडीच्या शिट्टीचा व इंजिनाचा आवाज आला. साधारणपणे कोपरी उड्डाणपुलाच्या इथून हवेत काळ्या धुराचे लोट येताना दिसले आणि ती ऐतिहासिक गाडी आता काही क्षणातच ठाणे स्टेशनवर येणार याची खात्री झाली. बरोबर ४.४५ वाजता गाडी धाडधाड आवाज करत ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर सात वर आली. तसं उपस्थितांच्या टाळ्या, शिट्टया, आनंदाच्या व उत्साहाच्या आरोळ्या याने सारा परिसर दणाणून गेला.

५.४० वाजता सुरू झालेल्या या गाडीच्या परतीच्या प्रवासात जुनं दुर्मिळ वाफेचं इंजिन व डबे काढून घेण्यात आले आणि जर्मनीहून आयात केलेल्या आधुनिक डब्यासह डिझेल इंजिनने ही गाडी बरोबर ६.३० वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये आली आणि हा सोहळा पूर्ण झाला.

— टिम मराठीसृष्टी 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..