नवीन लेखन...

नृसिंहभान देवस्थान

चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १८०० दुपारी ४ च्या सुमारास वटवृक्षाखाली (सध्याचे वटवृक्ष देवस्थान) परब्रह्म श्री स्वामी महाराजांनी आपल्या सगुणदेहाचे महानिर्वाण केले. श्रीमहाराजांची समाधी कोठे करावी, या प्रश्नावर अनेकांचे वाद झाले. अखेर कारभारी रा. नानासाहेब बर्वे यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटविण्यात आला. श्रीस्वामी महाराजांचे भक्त चाळप्पा यानी त्यांच्या घराजवळील श्रींनी स्थापन केलेल्या देवस्थानाच्या गर्भगृहात श्रींची समाधी बांधण्याकरीता ब्रह्मगुहा तयार केली होती. तेथेच श्रींचा देह ठेवावा, असे ठरले. काही प्रमुख मंडळींच्या सहाय्याने सर्व तयारी करण्यात आली. रामा सुताराने तयार केलेल्या एका लाकडी विमानात श्री महाराजांचा देह ठेवून वटवृक्ष स्थानापासून चोळप्पांच्या घराकडे मिरवणूक निघाली. सनईच्या मधुर आवाजात, चौघड्याच्या तालबद्ध निनादात, टाळ-मृदुंगाच्या ठेक्यात आणि भजनी मंडळींच्या जयघोषात केळीचे खांब व फुलाच्या माळांनी सुशोभित केलेले हे विमान चोळप्पांच्या घराजवळ आणण्यात आले. श्री महाराजांनी देह ठेवण्याअगोदर सुमारे ६ महिन्यांपूर्वीच भक्त चोळप्पा गतायु झाले होते. त्यांच्या मुलांनी गर्भगृह आणि त्यातील ब्रह्मगुहा फुलांनी सुशोभित केली होती. शास्त्रोक्त अभिषेक करून नामघोषाच्या गगनभेदी स्वरांत जड अंत:करणाने श्रीमहाराजांना ब्रह्मगुहेत ठेवून समाधीची शिळा बंद करण्यात आली आणि त्या नंतर “नृसिंहभान देवस्थान” म्हणून प्रसिद्ध असलेल्या या स्थानास “श्री स्वामी समर्थ महाराजांचा समाधी मठ” असे ओळखले जावू लागले. या मठाच्या लगतच श्रीमहाराजांचे लाडके भक्त श्री चोळप्पा नाईक यांच्या वंशजांची घरे आहेत. अक्कलकोटाला येण्यापूर्वी चोळप्पा नाईकास श्री स्वामी महाराजांनी इ. स. १८३४ मध्ये कर्नाटकातील देवनिंबर्गी येथे दृष्टांत दिला होता. मूळचे खेडमणूरचे हे नाईक. कुटुंबाचा सराफीय व्यवसाय होता. खेड मणूरात ते नामवंत ब्राह्मण सराफ म्हणून पविद्ध होते. देवनिबर्गी येथे घडलेल्या दृष्टांतानुसार ते अक्कलकोटास आले. त्यावेळी तेथील स्थायिक सराफांनी यांना संथानात प्रवेश नाकारला. त्यामुळे चोळप्पा गावाच्या वेशीबाहेर एक घर बांधून राहिले. गावातील सावकाराने त्यांच्यावर बहिष्कार टाकल्याने त्यांचा व्यवसाय बंद पडला होता.

काही वर्षांनी श्री महाराज अक्कलकोटी आले. तेव्हा चोळप्पांच्या घराकडे बोट दाखवित “तेथे माझा गणगोत्री राहतो” असे संबोधले. त्यानुसार एका मुसलमान रियासिलदाराने त्यांना चोळप्पांच्या घरी नेले. अगदी पहिल्या भेटीतच श्रीस्वामी महाराजांनी चोळप्पांना दृष्टान्ताचे स्मरण करविले. त्यानंतर श्रीस्वामी महाराज जणू श्रीचोळप्पांच्या कुटुंबातील एक सदस्यच झाले. परंतु घरातील मंडळींची मात्र या अनंतानी कठोर परीक्षा घेतली. कधी मुला-बाळांमध्ये डघडे-नागडे झोपावे, तर कधी सोवळ्यातील अन्नाला ओवळ्याने शिवावे. कधी कोणा महार, यौवनास माजघरात आणावे, तर कधी स्वयंपाक घरात जाऊन चुलीतच दीर्घशंकेस बसावे. असा अनेक प्रकारे चोळप्पांच्या कुटुंबाला ते त्रास देत. चोळप्पावर मात्र त्याचा काडीमात्र परिणाम होत नसे. यतिस्वरूपातील प्रत्यक्ष परब्रह्माला त्यानी कधीच ओळखले होते.

व्यवसाय, रोजगारबंद पडल्यामुळे चोळप्पांनी परिस्थिती दारिद्र्याची होती. परंतु श्रीमहाराजांच्या सेवेत त कोठलयाच प्रकारे कमतरता होऊ देत नसत. घरातील भांडेकुंडी गहाण ठेवून ते श्रीमहाराजांना जेवू घालीत. श्रीमहाराजांची देखील त्यांच्यावर फार प्रीती होती. चोळप्पांना ते कौतुकाने “जैना” हाक मारीत. अक्कलकोटाचे श्रीमंत मालोजी राजे श्रींचे भक्त होते. चोळप्पांची परिस्थिती पाहून त्यांनी नित्याचा शिधा व मासिक ५ रुपयाची इतर खर्चाप्रीत्यर्थ नेमणूक केली. चोळप्पा ओढाताण करून श्रींची सेवा करीत. श्रीमंतांच्या नेमणूकीमुळे चोळप्पांची विवंचना कमी झाली, तर श्रीमहाराज तेथील वास्तव्य कमी करून गावात स्वच्छंदेपणे फिरू लागले. कोठेही बसत गावातील पोराबाळांबरोबर गोट्या खेळत. जातीधर्माचा भेद न करता अगदी महारवाड्यापासून ते राजवाड्यापर्यंत ज्यांच्या मनी शुद्ध भाव त्याच्याकडे ते जेवत. श्री स्वामी महाराज कोठेही असीले तरी चोळप्पा त्यांच्या सेवेत राहत. परिस्थितीमुळे द्रव्यलोभ असला तरी श्री स्वामी निष्ठा निर्विवाद होती. एके दिवशी असेच एका झाडाखाली बसले श्री स्वामींची स्वारी सपासप चालू लागली सर्व सेवेकरी श्री पाठी धावू लागले. त्यात चोळप्पादेखील होते. काही अंतरावर जाऊन श्री महाराज निवडुंगाच्या रानात शिरले. हे पाहता सर्व सेवेकरी तेथेच थांबले. चोळप्पा मात्र श्री महाराजांच्या पाठी कशाचीही पर्वा नकरता चालत होते. निवडुंगाचे काटे घुसल्यामुळे त्यांचा पाय रक्तबंबाळ झाला होता. तरी त्यांना त्याचे भान नव्हते. अखेर काही वेळाने श्री महाराज थांबले आणि रानाबाहेरील थांबलेल्या लोकांकडे पाहात पोट धरून हसू लागले. स्वार्थापोटी सेवा करणाऱ्यांची वाट मध्येच खुंटते. असेच जणू श्रीमहाराजांनी त्यांच्या हास्यांतून दर्शविले असावे. पुढे चोळप्पांच्या घरातील सर्वाना श्री महाराज ब्रह्मसमान भासू लागले. अक्कलकोटच नव्हे तर आजूबाजूच्या गावातदेखील श्रीमहाराजांची प्रसिद्धी झाली. शेकडो कोसावरून श्री महाराजांच्या दर्शनास भक्तगण येऊ लागले. असे चालेले असता एके दिवशी माघ शुद्ध पंचमी (वसंतपंचमी) शके १७९० इ. स. १८६८ रोजी श्री महाराजांनी चोळप्पांच्या घरालगत श्रीनरसिंहभान देवस्थानाच्या बांधकामास प्रारंभ करण्यास आपल्या सेवकांना आज्ञा दिली. सुरूवातीस या देवालयाचे काम काहीसे मंदगतीने चालले होते. चोळप्पाचे जामात श्रीपाद भट यांनी निधी गोळा करण्यास प्रामुख्याने भाग घेतला होता. श्री महाराजांच्या सेवेत असल्यामुळे चोळप्पांना मात्र या कार्याकरीता कोठेही फिरणे शक्य नव्हते. तरी श्रींचे चोळप्पावर फार प्रेम होते. चोळाप्पा नजरेआड जाताच “जैना” म्हणून हाक मारून त्यांची विचारपूस करीत.

श्री महाराजांच्या सानिध्यात असता चोळप्पा श्री च्या काही लीलेस साक्षी होते. अक्कलकोटातील सस्थानाकरीता इंग्रजांनी सरदार माधवराव विधूरकर यांना रिजंट नेमले होते. सरदार माधवराव श्रीमहाराजांचे निस्सिम भक्त होते. श्रीमहाराज कधीकधी त्यांच्या घरी जात. तेव्हा माधवरावांना श्रींच्या विशेष सेवेचा लाभ होत असे. एकदा माधवरावांच्या मांडीवर पांढऱ्या कोडासारखे डाग उमटले. हा त्वचारोग सर्वांगावर पसरेल याची त्यांना धास्ती वाटू लागली. सर्व उपाय करून थकले आणि अखेर एके दिवशी त्यांनी बोटातील पांढऱ्याशुभ्र टपोऱ्या हिऱ्याची अंगठी फेकून देण्यास सांगितली. एवढी मौल्यवान अंगठी फेकण्याऐवजी त्यांनी ती श्री महाराजांना अर्पण केली. श्रींनी ती चोळप्पांना दिली. चोळप्पांनी ती राजवाड्यात नेऊन विकून टाकली.

असेच एकदा मारवाडी तरूणास श्रीमहाराजांनी महारवाड्यातील हाडांच्या ढिगाऱ्यातून “पाहिजे तेवढे घे” असे सांगितले. मारवाड्याने श्रीच्या आज्ञेनुसार कचरतच काही हाडे उपरण्यात बांधली. स्वगावी जाऊन पाहतो, तर त्या हाडाचे चोख सोने झाले होते. त्यातील ५ तोळे सोने त्याने पुन्हा अक्कलकोटी येऊन श्रींचरणी अर्पण केले. ते देखील श्री महाराजांनी चोळप्पाकडे सरकविले. अशा वेळोवेळी झालेल्या श्रीकृपेने व इतरांच्या साहाय्याने चोळप्पांनी हे स्थान उध्दरीले.

एके दिवशी श्रीमहाराजांनी सेवेतील श्री. बाळकृष्ण ग्रामजोशींना “येथे आता आम्हास दैवते स्थापन करायची आहेत” असे सांगितले. बाळकृष्ण बुवानी लागलीच पंचांग पाहून मुहूर्त काढला. माघ शंक्ल दशमी मंगळवार रोजी रोहिणी नक्षत्रावर येथे कंडमंडपास प्रारंभ झाला. या शुभकार्यासाठी वैदिक, श्रोती, याज्ञीक अशा अनेक विद्वान ब्राह्मणांना बाळकृष्ण बुवांनी बोलावले होते. अक्कलकोटचे रामाचार्य जामखिंडीकर, मुरगोडचे सुप्रसिद्ध शिवावतार श्री. चिदंबर, दिक्षित यांचे सुपुत्र श्री प्रभाकर ऊर्फ अण्णा शेषभट अग्निहोत्री, बागोबाडीकर, दंवनिबर्गीचे शंकरशात्री, शेषभट इंडीकर आदी अनेक विद्वान दैवतांच्या स्थापनेकरीता श्रीमहाराजांच्या सेवेत हजर होते. पाच दिवस चा विद्वानांनी येथे विविध मंत्रांचा घोष केला आणि माघ पौर्णिमा रविवारी पुण्य नक्षत्राच्या प्रथम प्रहरी आयुष्यमानी योगावर देवतांची स्थापना करण्यात आली. अक्कलकोटातील खंडोबा मंदिरातील तीन मुखवटे श्रीमहाराजांनी आपल्याबरोबर खेळण्यास घेतले होते. मुसलमान रियसिलदाराने श्रींना चोळप्पांकडे आणले. तेव्हा हे मुखवटे त्यांच्याबरोबर होते. सोलापुरात धर्मराय थोबडेच्या एका सिद्धेश्वर भक्ताने श्रीमहाराजांना काळ्या पाषाणात कोरलेली शिवलिंग आणि पुढे एका प्रसंगी तशाच काळ्या पाषाणाच्या पादुका अर्पण केल्या होत्या. श्रीमहाराजांनी खंडोबा मंदिरातील ते मुखवटे गर्भगृहातील मध्यभागी एका कोनाड्यात स्थापिले. यापुढे काळ्या पाषाणाच्या त्या पादुका स्थापन करवील्या पादुकाच्या उजव्या बाजूला थाटात स्थापन झालेल्या या नरसिंहभान देवस्थानात श्रीमहाराजांची समाधी कशी झाली हे पाहण्यासारखे आहे.

या देवस्थानाचे काय चालले असता एके दिवशी श्रीस्वामी महाराज आपल्या भक्त मंडळीसह येथून चालले होते. भक्त चोळप्पास श्री महाराज कायम आपल्याकडेच राहावे असे वाटत असे म्हणून भावनांच्या आहारी जाऊन श्री स्वामी महाराज देहस्वरूपी नादत असताना चोळप्पानी येथील गर्भगृहात श्रींची समाधी बांधण्याकरीता महागुहा खोदण्यास घेतली. चोळप्पाचे हे खोदकाम चालले असता अंतज्ञानी श्रीमहाराजांनी त्यास “काय रे जैना काय करतोस? ” असा प्रश्न विचारला आणि चोळप्पा काही बोलणार तोच “चोळ्या! यात अगोदर तुला घालीन मग मी जाईन बरे” असे म्हटले आणि पुढे चालू लागले. ओशाळलेल्या चोळप्पाना त्यावेळी काय वाटले असावे ते तेच जाणोत पुढे आश्वन शुद्ध नवमी शके १७९९ रोजी श्रीमहाराजांचे भक्त श्रेष्ठ चोळप्पा मरण पावले. चोळप्पाच्या निधनानंतर सुमारे ६ महिन्यानीच महाराजांनी अवतारसमाप्ती केली श्रींची समाधी कोठे बांधावी हा मोठा वाद निर्माण झाला. कोणाच्या मते राजरा मठ. तर कोणाच्या मते वडाखाली किंवा जोशीबुवा स्थापित मठ असा वादविवाद झाला. मोठ्या प्रमाणात मतभेद झाले. अखेर चोळप्पा हयात नसताना देखील त्यांनी तयार केलेल्या ब्रह्मगुहेत श्रीचा देह ठेवण्यात आला. यावरून चोळप्पांवरील श्रीस्वामी महाराजांचे प्रेम दिसून येते. आता तर या स्थानास कोण “समाधिमठ” तर कोणी “चोळप्पांचा मठ” असे म्हणतात.

श्रीस्वामी महाराजांच्या या समाधी स्थानावर अनेक मान्यवर नतमस्तक झाले आहेत. कोल्हापूरजवळील संकेश्वर पिठाचे जगतगुरु श्रीशंकराचार्य अक्कलकोटात आले असता त्यांनी श्रीच्या समाधीचे दर्शन घेतल्याची श्रींच्या ग्रंथात नोद आहे. सुरुवातीस हे स्थान केवळ गर्भगुहेपुरते मर्यादित होते. नंतर त्यापुढे दीड दोनशे माणसे बसतील असे सभामंडप बांधण्यात आले. श्रीस्वामी महाराजांचे भक्त चोळप्पा याचे वंशज येथील व्यवस्था आळीपाळीने पाहतात. श्रीस्वामी महाराजांच्या वापरातील काही वस्तूंचे आपल्याला याच्याकडे दर्शन घडते.

चोळप्पा घराण्याकडे आज श्रीस्वामी महाराजांच्या तीन पादुका आहेत. त्यातील चर्मपादुका चोळप्पा वंशज के. दिनकररावांकडे होत्या त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुबाने त्या पुण्यातील एका मठात ठेवल्या आहेत. श्रीस्वामींच्या सेवेत भक्त चोळप्पा नेहमीच असत. श्रीमहाराज कोठेही जावेत. चोळप्पा त्यांच्या मागे जात असेच एकदा श्रीमहाराज सपासप पावले टाकीत चालले असता चोळप्पा त्यांच्या मागे धावत होते. अचानक एके ठिकाणी श्रीमहाराज थांबले व चोळप्पावर शिव्यांचा भडीमार आम्हा करीत म्हणाले, संन्याशापाठी तू काय करतोस? चालता हो! प्रपंच कर” हे ऐकून
चोळप्पांना गहिवरून आले. ते म्हणाले, “महाराज! घरदार सोडीन पण आपले चरण सोडणर नाही.” पुढे ते काही बोलणार इतक्यात श्रीमहाराजांनी आपल्या चरणांतील चर्म पादुका काढून त्यांच्यावर हाणल्या आणि त्यास हाकलून दिले. त्याच या परब्रह्माच्या चर्मपादुका होय.

चोळप्पाच्या घरात श्रीमहाराजांच्या पादुकांची एक चांदीची जोडी आहे. त्या सदैव श्रीच्या गर्भगृहात खंडोबाच्या मुखवट्यावरील, उपरण्याच्या पाठी ठेवल्या आहेत. एके दिवशी परगावचा एक जहागिरदार श्रींच्या नवस फेडण्याकरीता अक्कलकोटी आला होता. श्रींना दंडवत घालून श्रीचरणी त्याने एकावन्न रौप्यमुद्रा वाहिल्या. त्यावर सिद्धिविनायकाची संगमरवरी मूर्ती स्थापन करविली. श्रींनी या दैवतांना नानाविध नामदेखील दिले होते. शिवलिंगास “आम्रकोटेश्वर” पादुकांस “नृसिहभानपद” तर सिद्धिविनायकास “मयुरेश्वर” असे श्रीमहाराज म्हणत श्रींच्या उपस्थितीतच सर्व विद्वानानो वेदमंत्राचा घोषात व स्तोत्र पठणाच्या स्वरात या दैवतांची स्थापना केली. त्या वेळी या परिसरात ठिकठिकाणी भक्तमंडळी वाजंत्री तोरणे वाजवीत होते. ठिकठिकाणी मृदुंग आणि टाळांच्या गजरात नामस्मरण चालले होते. नगारे, तुताऱ्या, ढोलकी व वीणेच्या स्वर दुमदुमत होता. श्रीमंत भोसल्यांनी या सोहळ्यात भाग घेतला होता. “वाब्रह्म श्रीस्वामी समर्थ महाराज की जय” असा जयजयकार होत होता. हे सर्व चालले असता श्रीस्वामी महाराज गर्भगृहात भक्त चोळप्पानी केलेल्या ब्रह्मगुहेत जाऊन बसले होते. काही वेळाने ते बाहेर आले तेव्हा सर्व वाद्यवाजंत्री काही क्षणापुरती स्थिर झाली आणि एकाच स्वरात श्रीनामाचा जयजयकार गगनभेदी स्वरात दुमदुमू लागला. काही वेळाने पुन्हा डंका वाजू लागला. श्रींच्या जयघोषात निषाणे फडकू लागली. धराज, पताका, डोलत होती. त्यादिवशी संपूर्ण अक्कलकोट नगरी या सोहळ्यामुळे पुण्यनगरीसम भासत होती. अक्कलकोटच्या राजघराण्यासहित कारभारी, सरदार, मानकरी आदी अनेक मान्यवरांनी त्या दिवशी या सोहळ्यास हजेरी लावली. तेव्हा या लक्षवधी भक्तांना श्रीस्वामींनी उभे राहून दोन्ही हात वर करून आशिर्वाद दिले. या माझ्या स्थानावर जे आपली सेवा रूजू करतील त्यांना कोटी गुणांनी फलप्राप्ती होईल. त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. या देवतांच्या पूजनाने त्यांना अखंड पुरुषार्थ प्राप्त होईल, “असे म्हणून श्रीमहाराज आपल्या मंचकावर जाऊन बसले. ”

पुर्णब्रह्माच्या या पूर्ण स्वरूपाची जाण असलेली काही मंडळी तेथे बसली होती. तेथील अण्णा दिक्षीत आणि रामाचार्यानी श्रीमहाराजांना दंडवत घातला आणि विचारले, “महाराज! आपण साक्षात पूर्णब्रह्म आहात तरी ही दैवते का म्हणून स्थापन केलीत?” विद्वानांच्या या प्रश्नास श्रीसमर्थ महाराजांनी धीरगंभीरपणे उत्तर दिले ते म्हणाले, “आपल्या आश्रमस्थानी जर कोणी अतिथी आले तर त्यांचे आदरातिथ्य करून त्यांना आपण उत्तमासनावर बसविले पाहिजे, हे तुमच्यासारख्या विद्वान मंडळींना माहीत नाही काय?” श्रींची ब्रह्मकहाणी एकूण सर्वांनी श्रीपुढे हात जोडले त्यावर श्रीमहाराज पुढे म्हणाले, “हा माझा पुत्र आम्रकोटेश्वर यांची जननी जगदंबाबाई तिचा स्वामी मायाविशिष्ट जगतसूत्रधारी असा आमचा हा गोतावळा भारी आहे. परंतु आम्ही त्याहूनही भिन्न आहोत. साधुसज्जनांच्या रक्षणासाठी परमार्थ प्राप्त व्हावा म्हणून आम्ही युगायुगी अवतार घेतो.” असे म्हणून श्रीमहाराज म्हणाले, “या चोळप्पा घरी आम्हाला जे मिळेल त्यातलेच आम्ही या देवांना जेवू घालू.”

श्रींची विधाने सर्व पंडीत हात जोडून ऐकत होते. नंतर भोजनासाठी पाने मांडण्यात आली. पानांभोवती विविधरंगी रांगोळ्या काढण्यात आल्या. मीठ, चटणी, कोशींबीर, रसयुक्त भाज्या, वडे, पापड, कुरड्या लोणची असे पदार्थ वाढण्यात आले. शिवाय दही, दुध आणि नानाविध पंचपक्वान्ने होतीच. असा हा महाप्रसाद घेऊन सर्व तृप्त झाले. माघ शुद्ध दशमीपासून माघ पद्य द्वितीयेपर्यंत हा भोजन समारंभ चालला होता. हजारो भाग्यवंत लोकांना त्याचा लाभ मिळाला. अशा महाराजांनी त्यास त्याच्या पादुका करुन आणण्यास सांगितले. काही दिवसांतच जहागिरदाराने सुंदर रौप्य पादुका करुन महाराजांना अर्पण केल्या. त्या पादुका पाहून श्रीमहाराजांची स्वारी प्रसन्न झाली. त्यावर आपले चरण सरकवत श्रीमहाराज पोट धरून हसु लागले. काहीवेळ ते तसेच हसत होते. चोळप्पा व इतर सेवेकरी जवळच बसले होते. काही वेळाने श्रीमहाराजांनी आपले दोन्ही चरण चोळप्पांच्या ओंजळीत ठेवले. अशप्रकारे या रौप्य पादुका चोळप्पांकडे आल्या.

तिसऱ्या पादुका काही वर्षापूर्वीच चोळप्पा वंशज श्री. अण्णू पूजारींना मिळाल्या. समाधी गर्भगृहावरील माळ्यावरचा श्रींचा मेणा खाली उतरविला असता त्यात श्रीमहाराजांच्या रक्तचंदनी पादुका त्यांना मिळाल्या, असे ते म्हणतात. श्रीस्वामी महाराजांच्या भ्रमंतीकरीता हा मेणा मिलि वापरला जात असे. तेव्हा श्रीमहाराजांना कोठेही अनवाणी फिरावे लागू नये, म्हणून खडावांची एक जोड मेण्यातच ठेवली जात असे. श्रीमहाराजांनी देह ठेवल्यानंतर शंभर वर्षापेक्षा अधिक काळ या मेण्याकडे कोणी पाहिलेदेखिल नव्हते. अण्णू पूजारींनी मेणा उतरविला, तेव्हा त्या पादुका त्यांना मिळाल्या.

या तीन पादुकाशिवाय चोळप्पा घराण्याकडे श्रीमहाराजांच्या आणि काही वस्तू आहेत. थोरल्या वेशीजवळ श्रीमहाराजांची चेष्टा करणाऱ्या अहमदअली रियासदार याला श्रींच्या स्वरूपाची जाण होताच त्याला आपल्या कृतीचा पश्चाताप झाला. “मेरा अल्ला इलालाही” अशी अक्षरे विणलेला अंगरखा त्याने चोळप्पांच्या घरी येऊन श्रीमहाराजांना अर्पण केला. मोठ्या आनंदाने एवाद्या लहान बालकाप्रमाणे श्रींनी तो लागलीच अंगात चढविला. हा अंगरखादेखील आज अण्णू पुजाऱ्यांकडे आहे.

श्रीच्या उत्सवाप्रसंगी श्रीमहाराजांच्या मेण्यापुढे दंड घेऊन एक सेवेकरी उबा राहात असे. हा भला मोठा चांदीचा दंड आणि सोलापुरच्या चंदबसण्या वारदाने श्रीसेवेत अर्पण केलेला भला मोठा तांब्याचा हंडा चोळप्पा वंशज श्री पांडुरंगराव पुजारी यांच्याकडे आहे. श्री महाराजांच्या खेळण्यातील काही मूर्त्या हातातील गोष्टी इ. काही वस्तू या घराण्याकडे आहेत. श्रीस्वामी महाराजांच्या अत्यंत मर्जीतील भक्त चाळप्पांच्या वंशजाचा योगक्षेम श्रीमहाराजच चालवतात. अशी त्यांची धारणा आहे.

चोळप्पांच्या घरात विहीर नव्हती. त्यांबाबत ते विहीर खणण्याकरीता श्रीमहाराजांची आज्ञा मागत असत परंतु विहीरीचा विषय काढला की, श्रीमहाराज काहीतरी वेगळेच बोलत. एके दिवशी श्रीमहाराजाची मर्जी पाहून चोळप्पाने विहीर खोदण्यास श्रीचरणी हट्ट धरला. श्रींची आज्ञा मिळताच त्यांना आनंद झाला. खोदकामाचे काम चालू असता एका सेवेकऱ्याचे त्यात भागीरथी यावी अशी बालिश इच्छा श्रींकडे हात जोडून प्रकट केली. श्रीमहाराजांनी तेव्हा जवळ उब्या असलेल्या गणपतरावांना भवानी सहस्त्रनामाचे पारायण करण्यास बसविले. गणपतरावांचे हे पारायणचालले असता अचानक विहीरीस पाणी लागले. आनंदाने रंगप्पा सेवेकऱ्याने श्रींना तसे सांगताच श्रीमहाराजांनी त्यांच्याच (रंगप्पाच्या) शेंडीतील एकमुखी रुद्राक्ष व स्वचरणावरील बेलपत्र घेऊन भुजंगास दिले आणि त्या दोघांना विहिरीत उतरुन स्नान करण्यास सांगितले. विहिरीत उतरताच भुजंगाच्या हातून अचानक रुद्राक्ष आणि बेलपत्र नाहीसे झाले. बाहेर येऊन श्रींना तसे सांगताच स्वारी हसू लागली. “अरे! तो बेल आणि रुद्राक्ष त्र्यंबकेशास गेला आहे पुण्यवंतास तो कुशावर्तात मिळेल. हे पाणी कुशावर्तीचे तीर्थ आहे. जो कोणी येथे स्नान करील त्याचे गोहत्येचे पातक नष्ट होईल.” असे बोलून श्रीमहाराज इतर भक्तांकडे वळले. श्रीसमर्थाच्या कृपेने निर्माण झालेल्या या कुशावर्तास श्रीमहाराज मात्र “राजेंद्र बावडी” म्हणत.

चोळप्पा वंशजाच्या घराबाहेर समाधी मठालगत श्री स्वामी महाराजांनी खेळता खेळता लावलेल्या औदुबराच्या रोपट्याचा आज भलामोठा वृक्ष झाला आहे. त्याखाली श्रीमहाराजांनी काळ्या पाषाणात कोरलेल्या पादुका स्थापन केल्या आहेत. या औदुंबराजवळ श्रीमहाराज खेळण्यात मग्न असत एके दिवशी श्रीमहाराज येथे खंडोबाच्या मुखवट्याबरोबर खेळत बसले होते. हरभरे इ. धान्य घेऊन त्या मुखवट्यातून काढण्या-घालण्याचा त्यांचा खेळ चालला होता. इतक्यात पोटदुखीच्या विकाराने त्रस्त झालेला ब्राह्मण तेथे आला. त्याचे हे दुखणे कधी इतके असह्य होई की, तो गडाबडा जमिनीवर लोळत असे औषधोपचार, गंडेदोरे आणि धार्मिक अनुष्ठाने करुनदेखील त्याला काहीच गुण आला नव्हता शेवटचा उपाय म्हणून तो नरसिहवाडीला येऊन श्रीगुरु चरित्राची पारायणे करु लागला. तेव्हा स्वप्न दृष्टांतात महाप्रभू श्रीदत्तगुरुंनी त्यास अक्कलकोटी येण्याची आज्ञा केली. या दृष्टांताबाबत त्याने एका साधूला सांगताच त्या साधूनेदेखील त्याला त्वरीत श्रीस्वामी महाराजांकडे येण्यास सुचविले. त्याच्या वेदना इतक्या असह्य होत्या की, वाडीलाच त्यांनी नवस केला, “महाराज! मी तुमच्या दर्शनास येत आहे. वेदनांमुळे प्रवास कठीण आहे, तरी या पोटदुखीतून मी मुक्त झालो तर सव्वा रुपयाचे पेढे वाटेन” असे बोलून एक घोडा घेऊन त्याने अक्कलकोटचा रस्ता धरला. श्रींच्या कृपेने त्यास प्रवासात जरादेखील त्रास झाला नाही. अक्कलकोट गाठताच त्याला बाळकृष्णबुवा भेटले. श्रीमहाराजांना विचारताच बाळकृष्णबुवांनी त्यास चोळप्पाचे घर दाखविले. चोळप्पचे घर तेंव्हा जीर्णावस्थेत होते. मुख्य द्वार तसे मोठेच होते. म्हणून तो घोड्यावरुन न उतरताच त्याने प्रवेश केला. तेव्हा या औदुंबराजवळ खेळत बसलेल्या श्रींच्या स्वारीने या बाह्मणाकडे पाहिले. तोच त्याचा घोडा दरवाजात अडकला. बहुत परिश्रम करुन देखील घोडा सुटत नव्हता. श्रीमहाराज मात्र हे पाहून जोरात हसत होते. हसतहसतचे ते म्हणाले “अरे! नवस केला होतास ना? विसरलास काय? पेढे आणल्याशिवाय तुझा हा घोडा आता सुटणार नाही बरे!” हे ऐकताच तो ब्राह्मण घोड्यावरुन खाली उतरला दरवाजातच श्रींना दंडवत घालून तो तडक बाजारात गेला पेढे घेऊन त्याने श्रींचरणी अर्पण केले. त्यातील एक पेढा श्रीसमर्थांनी स्वमुखी घेतला आणि त्या घोड्याकडे पाहताच तो मागच्यामागे सरकला. नंतर श्रीस्वामी महाराजांनी या ब्राह्मणास जवळ बोलावले आणि मुखवट्यातील हरभरे त्याच्या पोटावर घातले या ब्राह्मणाला परत कधीही पोटदुखीचा त्रास झाला नाही. काही दिवस श्रींची सेवा करुन तो स्वगावी परतला.

या देवस्थानालगत उजव्या बाजूस पूर्वीचा भंडारखाना आहे. त्याबाहेर दोन समाध्या आहेत. त्यातील डाव्या दोन समाध्या आहेत. त्यातील डाव्या बाजूची समाधी श्रीमहाराजांचे कृपांकित महारुद्र देशपांडे केचकर यांची तर उजव्या बाजूस श्रीस्वामी महाराजांची लाकडी गाय भागीरथीगंगेची होय.

महारुद्रराव देशपांडे हे श्री स्वामी महाराजांचे निस्सिम भक्त होते. धार्मिक स्वभावाच्या या नानासाहेबास हैद्राबादच्या निजामाने काही गावे इनाम म्हणून दिली होती. घरात वैभवलक्ष्मी नांदत होती. अशावेळी अचानक निजामाने काही कारणावरुन त्यांची सर्व मालमत्ता उप्तन्नासह जप्त केली. सर्व वैभव जाऊन नानासाहेबांची झोप उडाली होती. पुष्कळ व्रतवैकल्ये करुनदेखिल त्यांच्या विवंचनेत काहीही फरक पडला नाही. अखेर कोण्या संताच्या सांगण्यावरुन ते श्रीस्वामी समर्थांकडे आले होते. श्रीच्या कृपेने त्यांचे सर्व वैभव त्यांना परत मिळाले. श्रीस्वामी महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांनी केज येथे आपल्या राहत्या घरालगत श्रींकडून प्राप्त झालेल्या पादुका व इतर गोष्टी ठेऊन मठ स्थापन केला. श्रीमहाराजांनी देह ठेवल्यावरसुद्धा काहीवेळा ते अक्कलकोटी येत श्रीच्या समाधीपूजेत इतके मग्न होत की त्यांना श्रीमहाराजांचे दर्शन घडत असे. एकदा दत्तजयंतीच्या उत्सवास नानासाहेब अक्कलकोटी आले असता अचानक त्यांची प्रकृती ढासळली. आपला अंतःकाळ जवळ आल्याची जाणीव होताच त्याने सर्व गावकरी मंडळींना बोलावले. “मी श्री स्वामी सहाराजांचा अनंत जन्मीचा दास आहे. तेव्हा माझी समाधी श्रींच्या चरणाजवळ असावी.” अशी इच्छा व्यक्त करुन अक्कलकोटातील बाळकृष्ण ग्रामजोशी यांच्या घरी त्यांचे निर्वाण झाले.

श्रींच्या समाधीजवळ कोणा इतर व्यक्तीची समाधी होणे स्थायिकांना मान्य नव्हते. त्यामूळे नानासाहेबांच्या समाधीला गावकऱ्यांचा विरोध झाला. हे पाहता दयाधन श्री स्वामी महाराजांनी अक्कलकोटाच्या श्रीमंत राजसाहंबांना स्वप्नदृष्टांत देऊन नानामहाराज देशपांड्यांची समाधी बांधण्यास आज्ञा केली. श्रींच्या आदेशानुसार राजेसाहेबांनी स्वत: दिवसभर हजर राहून महारुद्र करुन घेतले.

नानामहाराजांच्या समाधीला लागूनच श्रींच्या लाडक्या गायींची समाधी आहे. ही गाय श्रीस्वामी महाराजांना दत्तात्रेयबाबा साधले ऊर्फ बावडेकर पुराणिकांकडून मिळाली होती. श्रीमहाराजांचे दर्शन घडण्याआधी बावडेकरबुवा काशीक्षेत्री होते. त्याकाळी तेथे महामारीचा जबरदस्त उपद्रव होऊन मरणाच्या पथावर बेशुद्धावस्थेत पडले असता एक तेज:पुंज योगी प्रकट होऊन त्यांनी त्यास औषध पाजले. ते औषध पोटात जाताच त्यांचा पुनर्जन्म झाला. बुवा जाणार म्हणून पुढच्या तयारीला लागलेले लोक ते सावध झाल्याचे पाहून चकित झाली. “आपल्याला औषध पाजलेले यति कोण? ” हा प्रश्न मात्र त्यांना भेडसावत होता. अखेर ऐके दिवशी अक्कलकोट येथे आले असता श्रीस्वामी महाराजांचे त्यांस दर्शन घडले. श्रींची मुद्रा पाहून त्यांना आनंद झाला. कारण काशीक्षेत्री याच परब्रह्मने यति स्वरुपात येऊन त्यांना जीवनदान दिले होते. सुरुवातीस श्रीस्वामी महाराजांनी त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिले नाही परंतु दीड-दोन वर्षे अक्कलकोटच्या सदोदित वाऱ्या झाल्यावर एके दिवशी श्रीमहाराजांनी त्यास जवळ बोलाविले, “काय रे ! तू गाई बाळगतोस काय?” असे श्रीमहाराजांनी त्यांस विचारले, तेव्हा त्यांना श्रीगायत्री मातेचे स्मरण झाले पुढे ते गायत्री मंत्राचा नित्यनेमाने जप करीत असे चालले असता एके दिवशी त्यांना एका ब्राह्मणाने पाढरीशुभ्र गोंडस गाय दान दिली या गाईचे शिंग कमानीप्रमाणे वळलेले असून त्यावर एकही डाग नव्हता. गाय येताच बुवांना श्रीस्वामींच्या ब्राह्मवाणीचे स्मरण झाले. काही दिवसातच बुवा सहपरिवार गाईसहीत उदरनिर्वाहार्थ अक्कलकोटी आले. येथे आल्यावर बुवांनी ही कामधेनू गाय श्रीमहाराजांना मनोमनी अर्पण केली. तसा संकल्प करुन त्यावर त्यांनी पाणी सोडले या गाईच्या दुधाचा एकही थेंब घरी न ठेवता ते सर्व दूध रोजच्यारोज चोळप्पाच्या घरी ते श्रीसेवेत अर्पण करीत. ऐके दिवशी श्रीमहाराज येथे निवांत बसले होते. सुंदराबाई व इतर सेवेकरी आजूबाजूस वावरत होते. इतक्यात जवळ बसलेल्या बावडेकरबुवांना श्रीमहाराजांनी मोघम विचारले, ‘काय रे! आमची गाय स्वतःकडेच का बरे ठेवली? ” त्यावर, “महाराज ! गाय आपलीच आहे मी फक्त तिचे रक्षण करतो,” असे बुवा म्हणाले. त्यानंतर श्रीमहाराजांनी कधीच या गाईबद्दल विचारले नाही. परंतु सुंदराबाईनी ही गाय आणून देण्याबद्दल बुवांकडे चऱ्हाट लावले. बाईचे म्हणणे फारसे मनावर न घेता बुवा तिला फक्त हो म्हणत. शेवटी एके दिवशी रागाने बाईने बुवाच्या परसात बांधलेली ही गाय सोडवून चोळप्पाच्या घरी आणली. जिकडची गाय तिकडे गेली. असे समजून बुवांनी समाधान मानले.

या गायीवर श्रीस्वामी महाराज अतोनात प्रेम करीत. “माझी भागीरथी गंगा.” म्हणत ते कधीकधी या गाईचे मुके घेत. दर्शनाथ भाविकांची कधी गर्दी झाली की ते “माई, गंगे माई” असे त्याए गाईला हाक मारुन. “आपल्याकडे खूप पाहुणे आले आहेत. आम्हाला कासडभर दुध दे हो” असे सांगत श्रीस्वामी महाराजांची ही लाडकी गंगाभागरीथी खरंच कामधेनू होती. तिने दिलेले दूध कधीच कमी पडले नाही. त्यामुळे लोक तिचे फार कौतुक करीत त्यांना ही कामधेनूदेखील पुजनीय वाटत असे.

या भाग्यवंत कामधेनूस अंबोणाचा तुटवडा कधीच पडला नाही. श्रींकडे आलेले पेढे, बर्फी, सुकामेवा, पुरणपोळ्या यावर तिचे पोट भरत असे. चारा खाण्याची तिची सवय ती पार विसरुन गेली होती. तरी गुणधर्माप्रमाणे तिने एकदा चारा खाल्ला आणि तो घशात अडकल्याने ती तडफडू लागली, श्रीस्वामीमहाराजांचे तिकडे लक्ष जाताच श्रीस्वामींनी एक मोठा पाण्याने भरलेला हंडा स्वत:च्या तोंडाला लावून एकदमाने गटागटा पिऊन टाकला व मोठमोठ्याने शिव्या देऊ लागले. दयाधन श्रीस्वामीचे पाणी पिऊन होताच गंगेच्या घशातील अडकलेला चारा खाली उतरला. तरी श्रीमहाराजांच्या मात्र शिव्या संपल्या नव्हत्या.

या भागीरथी गंगेच्या श्रीकृपेने जणू स्वतंत्र परिवारच होता. तिला एक कालवड झाली तिचे महाराजांनी “गोदावरी” असे नाव ठेवले. त्यानंतर गंगेस दोन खोड झाले. त्यापैकी थोरल्यास “लठ्ठहत्ती” तर धाकल्यास “कल्याण” अवे हाक मारीत. श्रीमहाराजांनी देह ठेवतेवेळी या गंगेस आपल्यापुढे आणण्यास सेवेकऱ्यांना सांगितले होते. त्यादिवशी जवळ आलेले सर्व पेढे-बर्फी इ. पदार्थ श्रीमहाराजांनी तिला स्वहस्ते भरविले. आपली सर्व वस्त्रे तिच्या अंगावर घातली आणि डोक्यावरुन हात फिरवत तिचे मुके घेतले. त्यावेळी श्रींच्या या लाडक्या गंगेच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. या भागीरथी गंगेस चोळप्पांच्या अगणात बांधलेले असे पुढे वयोवृद्ध होऊन ही गोमाता परब्रह्म श्रीस्वामी महाराजांच्या चरणी विलीन झाली. तिलादेखील श्रीमहाराजांनी आपल्या चरणापाशी स्थान दिले. तीचीच ही समाधी.

श्रीस्वामी समर्थ महाराजांनी स्वत:स्थापिलेल्या या श्री नृसिंहभान देवस्थानातच भकतश्रेष्ठ चोळप्पांच्या इच्छेनुसार त्यांची समाधी झाली. आज हे स्थान समाधी मठ म्हणून ओळखल जाते. “आमचे नाव सुद्धा नरसिंहभान आहे बरे!” असे श्रीमहाराज एकास म्हणाले होते त्यामुळे पूर्वी नरसिंहभान देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या स्थानाला आज जर श्रीस्वामी समर्थ समाधी मठ म्हटले जाते, यात काही नवल नाही. धन्य ते चोळप्पा ज्यांच्या घरालगतच पूर्णसनातन परब्रह्म सगुणी विसावला.

गुरुतत्त्व कार्य गौरव पुरस्कार प्राप्त
श्री. मिलिंद पिळगांकर
मो.: ९८६९१५४८२०

साभार: गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक १ ला, (अंक २५)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..