नवीन लेखन...

तुझको न भूल पायेंगे..

मुंबई शहराची ओळख एकेकाळी गेटवे आॅफ इंडिया, व्हीटी, चर्चगेट, राणीचा बाग, फ्लोरा फाऊंटन, चौपाटी एवढीच नव्हती तर काळी पिवळी टॅक्सीने देखील होती…. १९६४ पासून मुंबईत सर्वत्र धावणारी प्रीमियर पद्मिनी टॅक्सी, ३० आॅक्टोबर २३ पासून बंद झाली.. या टॅक्सीचा नंबर होता MH-01-JA-2556.

या टॅक्सीने सर्वसामान्यांपासून श्रीमंतांनाही आपलसं केलेलं होतं. सर्वसामान्य माणसं आत्यंतिक गरजेला किंवा आपत्कालीन प्रसंगासाठीच टॅक्सीचा वापर करायचे. श्रीमंतांना मात्र ही टॅक्सी मौजमजेसाठी हवी असायची. गेली पन्नास वर्षांतील मुंबईतील चांगल्या वाईट घटनांची ही टॅक्सी साक्षीदार आहे! तिने मुंबईतील अतिवृष्टीमुळे जनजीवनाची झालेली वाताहत, बाॅम्बस्फोटांचे आघात, दंगलीही सहन केलेल्या आहेत..

हीच टॅक्सी हिंदी चित्रपटसृष्टीत चाळीस वर्षांहून अधिक काळ दिमाखाने वावरलेली आहे. १९५४ साली देव आनंदचा ‘टॅक्सी ड्रायव्हर’ रुपेरी पडद्यावर झळकला होता. त्याच वर्षीच्या ‘आरपार’ चित्रपटाचा नायक, गुरुदत्त टॅक्सी चालकच होता. १९६७ सालातील ‘साधू और शैतान’ चित्रपटात मेहमूदने टॅक्सी ड्रायव्हर होऊन, हसवून बेजार केले होते. ७३ साली चेतन आनंद यांच्या ‘हस्ते जख्म’ चित्रपटात ‘तुम जो मिल गये हो…’ हे नवीन निश्चलच्या तोंडी प्रिया राजवंश सोबत टॅक्सी चालवताना कैफि आझमींनी लिहिलेलं गाणं अप्रतिम आहे. १९७४ साली ‘रजनीगंधा’ या अमोल पालेकर व विद्या सिन्हाच्या चित्रपटात टॅक्सीमध्ये चित्रीत केलेलं ‘कहीं बार युहीं देखा है…’ हे गाणं अविस्मरणीय आहे. ७६ साली देव आनंदचा ‘टॅक्सी ड्रायव्हर’चा रिमेक ‘जानेमन’ होऊन देव आनंद व हेमा मालिनीसह पडद्यावर झळकला होता. १९७७ मध्ये अमोल पालेकर व रिना रॉयचा ‘टॅक्सी टॅक्सी ‘ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच्या पुढच्याच वर्षी ‘गमन’ नावाच्या चित्रपटात फारुक शेखने टॅक्सी चालवत ‘सीने में जलन..’ या गाण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईचं दर्शन घडवलेलं आहे. पावसाळ्यात हमखास आठवणारं ‘रिमझिम गिरे सावन..’ हे ओलंचिंब गाणं ‘मंझिल’ या १९७९ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील आहे. या गाण्यात अमिताभ व मौसमी, या दोघांनी भर पावसात भिजून मुंबईची सफर घडवलेली आहे. या गाण्याचं संपूर्ण चित्रीकरण हे टॅक्सीमधूनच केलेलं आहे… १९८० साली मिथुन चक्रवर्तीचा ‘टॅक्सी चोर’ हा चित्रपट आला होता. १९८२ सालातील ‘खुद्दार’ चित्रपटात अमिताभ, टॅक्सी ड्रायव्हर झालेला आहे. बासू चटर्जींच्या ‘छोटी सी बात’, ‘बातो बातों में’, ‘प्रियतमा’ या चित्रपटातूनही टॅक्सी प्रामुख्याने दिसलेली आहे. २००६ साली नाना पाटेकरचा ‘टॅक्सी नं. ९ २ ११’ हा काॅमेंट थ्रिलर चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतरच्या चित्रपटांमधून टॅक्सीचं दिसणं, हळूहळू कमी होत गेलं..

मी जेव्हा पहिल्यांदा मुंबई पाहिली ते साल होतं, १९७७. त्यावेळी टॅक्सीने प्रवास केला. ‘टॅक्सी’ पुकारल्यावर ती थांबवून एखादा सरदारजी विचारत असे, ‘कहाॅं जाना है?’ ठिकाण सांगितले की, तो शेजारच्या सीटवर सरकून पहिल्यांदा मीटर डाऊन करीत असे. माझं लक्ष त्या मीटरवर असायचं. ते आकडे उभ्याने फिरायचे. त्यावेळी बसलं की, कमीत कमी २० रुपये लागायचे. नंतर नाटकांच्या जाहिराती टॅक्सीने मुंबईला पाठवू लागलो. पुणे स्टेशनला ते पाकीट आणि पैसे दिल्यावर दादरला पोहोचविले जात असे. ‘तू तिथं मी’ चित्रपटाच्या समारंभाला आम्ही दोघेही पुण्याहून मुंबईला टॅक्सीने चार तासांत गेलो होतो. ‘अवनी’ दिवाळी अंकाचे संपादक, श्रीकृष्ण करमरकर यांचे समवेत एकाच दिवसात मुंबईतील अनेक जाहिरात संस्थांना टॅक्सीने भेटी दिल्या.. अलीकडे बऱ्याच वर्षांत मुंबईला गेलोच नाही..

आता तर मुंबई पूर्ण बदलून गेलेली आहे.. आणि तिथं गेलं तरी आठवणीतील पिवळी काळी टॅक्सी आता दिसणार नाही.. त्यापेक्षा आपले आवडते जुने हिंदी मराठी चित्रपट युट्यूबवर पहावेत व टॅक्सीतून ‘जीवाची मुंबई’ करावी….

– सुरेश नावडकर १/१२/२३
मो.९७३००३४२८४

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..