नवीन लेखन...

निवद

आमच्या गावात चेरोबा म्हसोबा आणि पारदेव असे गावदेव आहेत. जवळपास बहुतेक गावात असे देव बघायला मिळतात.

चेरोबा आणि पारदेवाच्या चौथऱ्यासारखे बांधकाम केलेले आहे. पण आमच्या शेतांच्या जवळ असलेला म्हसोबा देव बांधावरच आहे. मूर्ती नसलेले आणि शेंदूर फासलेले दगड हेच आमचे गावदेव आहेत. गावात सगळ्यात जास्त चेरोबा देवाला मानतात. म्हसोबा देवाला तिथं आसपास ज्यांची शेती आहे ते लोकं जास्त मानतात. ह्या गावदेवांना गावातली लोकं वर्षातून एकदा तरी कोंबड्याचा निवद म्हणजे नैवेद्य देत असतात.

शेंदूर फासलेल्या दगडाच्या देवाला कोंबड्याचा बळी देणे म्हणजे कोणी अंधश्रद्धा किंवा गावंढळपणा म्हणाले तरी आमच्या गावात याच प्रथेला आणि परंपरेला एक श्रद्धा म्हणूनच स्थान आहे.

चेरोबा देवाला दिवसा उजेडी कधीही जाऊन कोंबड्याच्या नाहीतर बकऱ्याचा निवद केला जातो. पण म्हसोबा देवाला दिवस मावळल्यावर अंधारात निवद करायची प्रथा आहे.

आमच्या शेतावर असलेल्या म्हसोबा देवाला शेतात पिकलेल्या भात घरात खाण्यापूर्वी त्याच भाताचे पायलीभर तांदूळ करून आणि जात्यावर दळले जाते. त्या पिठामध्ये गूळ टाकून त्याला वाट्यांच्या आकार दिला जातो आणि वाफेवर शिजवले जाते ज्याला मुटके असे म्हणतात. पेढे, हार, नारळ, अबीर, बुक्का, गुलाल आणि शेंदूर यांच्यासह गावठी कोंबडा आणि तांदळाच्या पिठाचे मुटके दिवस मावळल्यावर गावातल्या घरातून शेतावर म्हसोबा देवाकडे नेले जातात. मी लहान असल्यापासून दरवर्षी माझ्या मोठ्या काकासोबत जातो. काकाचे वय जास्त झाल्यानंतर मी आणि माझा चुलत भाऊ आम्ही दोघे दरवर्षी जायला लागलो.

निवद घेऊन जाताना कोणीही एकमेकांशी एका शब्दाने बोलायचे नसते. दिवस मावळल्यावर निवद न्यायची प्रथा असल्याचे ते पण एक कारण असावं, हा निवद फक्त कुटुंबातील लोकांसाठी मर्यादित असतो त्यामुळे गावात इतर कोणाला दिसू न येता किंवा कोणी काही विचारू नये म्हणून अंधार पडल्यावर घरातून निघायचं असतं.

लहान असताना बॅटरी घेऊन काकाच्या मागे मागे गुपचूप चालत जायचं, त्यावेळी पायात चप्पल न घालताच जायचो रात्रीच्या अंधारात चालताना शेतातल्या पायवाटांवर काही वाटायचे नाही. एखाद्या शेतात भाजीपाला लावला असेल तर त्याच्या बांधावरून जावे लागायचे. एखाद्याच्या शेतात मेथी, कोथिंबीर,वाल किंवा तूर असली की त्या शेताजवळून जाताना मेथी, कोथिंबीर,वालाचा नाहीतर तुरीचा ओला ओला सुगंध दरवळतो. अंधार पडल्यानंतर गवतावर दव जमा झालेले असते. दिवसभर जमीन उन्हात तापल्यावर चालताना पायाच्या तळव्याना पायवाट ऊबदार लागते तर रात्रीच्या दवा मुळे हवेत गारवा जाणवायला लागतो.

शेतातून रात्रीच्या अंधारात चालत जाताना रातकिड्याची किर किर ऐकता ऐकता म्हसोबा देवा जवळ कधी पोचायचो ते कळत सुद्धा नव्हते. तिथं गेल्यावर चंद्र प्रकाशातच पिशवीत आणलेल्या वस्तू बाहेर काढून ठेवतात शेणाच्या गोवऱ्यांना आमच्याकडे शेणी बोलतात, घरून येतानाच त्याच्यावर रॉकेल टाकलेले असायचे. गेल्या गेल्या शेणी पेटवून द्यायच्या. काही वेळ पेटलेल्या ज्वालातून उजेड पडायचा त्या उजेडात मग इतर वस्तू बाहेर काढून मांडून ठेवल्या जायच्या. सगळी तयारी झाली की मग कोंबड्याला पाणी पाजून एका झाडाच्या हिरव्या पानावर थोडेसे तांदूळ टाकून त्या कोंबड्याची मान कापून रक्ताचे थेंब तांदळावर सोडले जातात. मग कोंबड्याचे काळजी आणि पेटा साफ करून आगीने धूमसणाऱ्या शेणी वर ठेवून भाजले जाते. काळजी पेटा भाजून होत असताना, शेंदूर आणि तेल मिक्स करून सगळ्या दगडाच्या देवांना लावला जातो, हार घालून फुले वाहिली जातात. मग भाजलेला काळजी पेटा चे तुकडे करून पाच हिरव्या पानांवर मांडले जातात त्याच्यावर पेढयाचे तुकडे ठेवून मग नारळ फोडला जातो. नारळ फोडून त्याचे पाणी सगळ्या दगडाच्या देवा भोवती आणि पानांवर मांडलेल्या नैवेद्या भोवती फिरवले जाते. नारळाचे तुकडे करून पाच पानांवर ठेवून आणखी चार तुकडे चारही दिशाना उडवले जातात. शेतात नवीनच पिकलेल्या भाताच्या पीठा पासून गूळ टाकून बनवलेल्या मुटक्यां भोवती सुद्धा पाणी फिरवले जाते. घरातून निघाल्या पासून तोंडातून एकही अक्षर न बोललेला काका म्हसोबा देवाला, देवा म्हसेसरा काही चुकला फुकला असल तर माफ कर आमच्या पोरा बाळांवर आणि शेती जमिनींवर ध्यान ठेव असं बोलून डोकं टेकायचा. त्याचे पाया पडून झाल्यावर मग मी पण म्हसेश्वरा चुकलं फाकल माफ करून सगळ्यांना सुखी ठेव बोलून पाया पडून घेणार.

आमच्या घरात निवद असेल तेव्हा सगळे चुलत भाऊ आणि त्यांची पोरं यांना जेवायला बोलावलं जातं. म्हसोबा देवाला जसा निवद रात्री केला जातो तशाच प्रकारे पण दिवसा उजेडी आणि फक्त कोंबडा कापून निवद केला जातो. दोन्हीही कोंबडे मग एकत्रच चुलीवर शिजवून, सगळे चुलते एकत्र बसून जेवायला घेऊन संपवतात.

देवाला फक्त काळजी आणि पेट्याचे छोटे छोटे तुकडे एखादा पेढा आणि नारळाचे लहान तुकडे, हार फुले वाहिले जातात. कोंबड्या सह बाकी सगळं घरी आणून प्रसाद करून घरातच वाटून संपवलं जातं.

आमच्या गावातील म्हसोबा देवाची एक प्राचीन कथा अशी आहे की गावाबाहेरील कोणताही व्यक्ती म्हसोबा देवाच्या परिसरात चोरी करू शकत नाही. गावातील कोणा व्यक्तीने काही नेले तरी त्याला काही होत नाही, परंतु गावाबाहेरील एखाद्या व्यक्तीने शेतात असलेली एखादी वस्तू न विचारता नेण्याचा प्रयत्न केला तर तो व्यक्ती ती वस्तू हातातून पुन्हा त्याच जागी जोपर्यंत ठेवत नाही तोपर्यंत त्याला रस्ता सापडत नाही आणि तो तिथल्या तिथेच फिरत राहतो.

बळी देणे किंवा या अशा प्रथाना कोणी अंधश्रद्धा म्हणत असेल तर मान्य आहे पण याच अंधश्रद्धा आमच्याकडे पूर्वापार श्रद्धेसारख्या चालत आल्या आहेत. कुठल्याही अडचणीत आणि संकटात सापडल्यावर देवा चेरोबा, देवा म्हसोबा मला यातून सोडव असा धावा केल्यावर त्या संकटातून आणि अडचणीतून मार्ग निघाल्याशिवाय राहत नाही एवढं मात्र नक्की खरं आहे.

शेतातील धान्य घरात आल्यावर त्या धान्याचा वापर करण्यापूर्वी, ते धान्य पीकविणाऱ्या दगडाच्या का होईना पण देवाला नैवेद्य म्हणून दाखवून त्याचे उपकार मानले तर काय बिघडलं. आमच्या आगरातील शेतकऱ्यांना पाऊस पाण्याच्या आवणी आणि नंतर लाणी म्हणजेच मळणी नंतर घरात गोडधोड आणि चांगल खायला करून देवाचे आभार मानून सुगीचे दिवस साजरे करायला सुरुवात होते.

© प्रथम रामदास म्हात्रे.

मरीन इंजिनियर,

B. E. (Mech), DIM.

कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 184 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

1 Comment on निवद

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..