नवीन लेखन...

निसर्ग सखा

निसर्गाकडून माणूस खूप काही घेत असतो. हवा, पाणी, प्रकाश याबरोबरच अन्नधान्य, फळं, फुलं, औषधं, वस्त्र, दागिने अशा साऱ्या गोष्टी निसर्गाची देणगी आहेत. मानवी जीवन सुखमय व्हावं, म्हणून भारतीय संस्कृतीतील ऋषि-मुनींनी निसर्गाचा खूप उपयोग केला. हे ऋषी म्हणजे नुसते ‘देव-देव’ करणारे आणि यजमानापुढे वाकणारे भिक्षुक नव्हते. प्रत्येक ऋषीचं एक एक स्वतंत्र गुरुकुल असायचं. त्यामध्ये असंख्य विद्यांचा अभ्यास व्हायचा तसंच संशोधनही. हे ऋषी म्हणजे नवीन ज्ञानामध्ये रंगून गेलेले शास्त्रज्ञच होते. प्रसंग पडलाच तर राजपुत्रांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रं पुरवीत होते.

या ऋषींनीच आयुर्वेद निर्माण केला. अनेक असाध्य रोगांवर गुणकारी ठरतील अशी औषधं तयार केली. त्यासाठी वनस्पतीशास्त्राचा केवढा अभ्यास त्यांनी केला असेल! मानवी शरीर हा निसर्गाचा अविभाज्य घटक आहे हे त्यांनी जाणलं होतं. म्हणूनच काही अशा उपचारपद्धती त्यांनी शोधल्या की ज्यात निसर्गाशी संतुलन साधून आजार बरा होऊ शकतो. भारतीय संस्कृतीनं निसर्गाला आपला सखा मानलं.

स्वत:ला निसर्गाचे पुत्र मानलं. त्यामुळे ऋषींनी जे संशोधन केलं, ते निसर्गाच्या सान्निध्यात राहून. त्याच्याशी हितगुज करून, त्याची पूजा करून. निसर्गावर विजय मिळवणं, त्याच्यावर मात करणं अशी भूमिका त्यांची कधीच नव्हती. त्याचप्रमाणं निसर्गाची पिळवणूक करून आपल्याला उपयुक्त गोष्टी त्याच्याकडून ओरबाडून घेण्याची वृत्ती नव्हती. माणसात अशी वृत्ती येऊ नये म्हणून त्यांची निसर्गातल्या अनेक गोष्टींना देवत्व बहाल केलं. तुळस, आवळा, वड, दूर्वा या कित्येक औषधी वनस्पतींना आपल्या धर्मात महत्त्वाचं स्थान दिलं गेलं, ते याचमुळं. एरवी यांच्या उपयोगासाठी माणसांनी ही झाडं अहमहमिकेनं तोडली असती. कारखान्यातल्या कच्च्या मालाचं महत्त्व त्यांना आलं असतं. पण त्यांना देवत्व देऊन ऋषींनी त्यांचं रक्षण तर केलंच पण माणसांनाही त्यांच्या सान्निध्यात जायला लावलं. निसर्गाशी संवाद त्यांनीच आपल्याला शिकवला.

वडिलांनी मुलाला आपल्याजवळच्या वस्तू प्रेमानं याव्यात आणि मुलानं त्याबद्दल कृतज्ञ राहावं असं निसर्गाचं आणि भारतीयांचं नातं. कदाचित म्हणूनच प्रदूषण ही समस्या या मातीतली नाही. पाश्चात्त्यांच्या बरोबर आम्ही ती स्वतःवर ओढवून घेतली. त्यांच्याकडे निसर्गच मुळात दुष्ट असह्य थंडी, चर्फ अशा वातावरणात त्यांचे महिनेन महिने जातात. कदाचित् म्हणूनच त्यांचा निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रतिस्पर्ध्याचा होता. त्याच्याशी झुंजून त्याच्यावर विजय मिळवण्याची, मात करण्याची भूमिका होती. निसर्गाला वेठीला धरून व्यापारी तत्त्वावर त्याचा उपयोग करून घेतला गेला. त्यामुळं आर्थिक प्रगती झाली. पण जीवनातलं संगीत गेलं, काव्य हरवलं.

जीवनात आलेली कृत्रिमता त्यांनाही बोचू लागली. मनःशांती हरवली. प्रदूषणानं असंख्य समस्या निर्माण केल्या आणि मग पर्यावरणाचं महत्त्व त्यांना कळायला लागलं. गंमत म्हणजे जेव्हा ते त्यांना कळलं, तेव्हा त्याचं महत्त्व आपल्या लक्षात आलं. एव्हाना आपण आपली जीवनपद्धती हरवून बसलो आहोत. निसर्गाशी आपलं नातं आपण झपाट्यानं तोडत आहोत. आपणही त्यांच्यासारखीच निसर्गाची पिळवणूक करून मोठे होण्याची स्वप्नं पाहात आहोत. वेलीवर पहिली कळी आली की कौतुकानं तिचं डोहाळजेवण करणारी शाकुंतलमधली शकुंतलाही आमची उरली नाही आणि शास्त्रीय प्रयोगातून वनस्पतींना भावना असतात हे सिद्ध करणारे सर जगदीशचंद्र बोसही आमच्या स्मरणात नाहीत. निसर्गाला ओरबाडण्याची वृत्ती आमच्यात आली.

पाश्चात्त्यांनी व्यापारी दृष्टीनं का होईना पण निसर्गाचा चांगला उपयोग केला. श्रीमंत व्हायचं, तर कच्चा माल भरपूर हवा आणि तो दर्जेदार हवा हे त्यांनी ओळखलं. त्यासाठी का होईना, त्यांनी मळे फुलवले, पशुधन पुष्ट केलं, हवा, पाणी, सूर्यप्रकाश अशी एकही गोष्ट नाही की जिचा त्यांनी आपल्या प्रगतीकरता उपयोग करून घेतला नाही. आपल्याला मात्र धड तेही जमलं नाही. भावनिक सलोख्यानं तर नव्हेच, पण व्यापारी तत्त्वावरही आपण निसर्गाची काळजी घेतली नाही. आम्ही जंगलं तोडली, नद्यांमध्ये ड्रेनेजचं पाणी आणि कारखान्यांची मळी मिसळली. असंख्य वायूंनी हवा प्रदूषित केली. पाश्चात्त्यांच्या कर्कश संगीतानं आणि असंख्य वाहनांच्या यंत्रांच्या आवाजानं ध्वनि प्रदूषण निर्माण केलं आणि आता या साऱ्यांतून मार्ग काढण्याकरिता त्यांनीच एखादा उपाय सुचवण्याची वाट पाहात आहोत.
बघूया, निसर्गाशी पुन्हा मैत्री साधण्याकरता त्यांचाच एखादा शास्त्रज्ञ मध्यस्थी करतोय का !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..