नवीन लेखन...

निपटारा – भाग  2

काही खास चर्चा असली म्हणजे आम्ही ‘परिंदा’ मध्ये भेटायचो. सिद्धार्थ गार्डनच्या जवळ, नाल्यावरच्या सिद्धी विनायक मंदिरासमोर, परिंदा म्हणजे एक धाबा वजा छोटंसं हॉटेल होतं. भरपूर मोकळी जागा, उघड्यावर टेबल खुर्त्या प्लॅस्टीकच्या, चार चार टेबलांच्या ग्रुपला एक मेंदीचं बुटकं कुंपण, आजूबाजूला भरगच्च झाडी. फारशी गर्दी नाही, भरवस्तीत असूनही शांत आणि आमच्या सारख्या मुलींना सुरक्षित. तिथं फारशी वर्दळही नसायची. आमच्या सारखीच कॉलेजची काही मुलं-मुली. गार्डनमध्ये येणारी माणसं किंवा समोरच्या मंदिरात येणारी काही माणसं एवढंच गिहाईक. चार घटका बसून गप्पा मारायला मस्त जागा. एक छोटसं टपरीवजा किचन, काही खाण्याचे पदार्थ, चहा, कॉफी, कोल्ड्रींक असा माफक मेनू. धाब्याचा मालक शब्बीरभाई दिसायला परिंदा पिक्चरमधल्या नाना पाटेकर सारखा. आम्ही पण त्याला गमतीने नानाजीम्हणायचो. तो खूष व्हायचा. आमच्या ग्रुपची वास्तपुस्त करायचा. मला तो ‘डॉक्टर मॅडम’ म्हणायचा. का कोण जाणे माझा पांढराशुभ्र पोषाख आणि छाप पाडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून असेल … पण तो आमचा चांगला दोस्तच झाला होता.

ठरल्याप्रमाणे आम्ही परिंदामधे जमलो. आल्या आल्या नानाजीम्हणाला, ‘डॉक्टर मॅडम, अरूंधती पांडेची बातमी वाचली. फार शॉक बसला. तुमच्या ग्रुपची ती शान होती. माझी बेटी झरीना पण तिच्याच सारखी आहे. सारखी बडबड, गडबड करीत असते. बहोत बुरा हुआ। ज्याने कोणी हे केले असेल तो जर का सापडला तर त्याला दाखवतो या नानाजीचा हिसका. नाही त्याची मुंडी कोंबडीसारखी मुरगाळली तर नावाचा शब्बीरभाई नाही!”

त्याला आम्ही कशासाठी आलो आहोत ते कळल्यावर तो खूष झाला. म्हणाला, “डॉक्टरमॅडम, आप बहोत अच्छा काम कर रही हैं। माझी काही मदत लागली तर सांगा. त्या बदमाशाला सोडू नका.” त्याच्या डोळ्यातून जणू अंगार फुटत होता. मी म्हणाले, “नानाजी, तुमची मदत आम्हाला लागेलच. पण कधी, कशी ते मी नंतर सांगेन. पण ही गोष्ट फक्त आपल्यात. बाहेर फुटता कामा नये. ‘अच्छी बात है। समझ गया।” असं म्हणून तो आपल्या कामाला लागला.

आम्ही सगळ्या जणींनी ठरल्याप्रमाणे आपापला अहवाल आणला होता. सगळे अहवाल वाचून त्यावर चर्चा करण्यात आमचे दोन तीन दिवस गेले. त्यातून निष्पन्न मात्र फारसे काही झाले नाही. दोन तीन मुलांचा थोडाफार संशय येईल अशी शक्यता वाटली. पण अगदी ठोसपणे हाच तो असावा असे म्हणावे असे त्यात काही नव्हते. आता फक्त एकच अहवाल राहिला होता. ‘विभा’चा. विभा म्हणजे विभावरी. ती चर्चेला आली नव्हती. आजारी होती. विभाचा एकंदर घुमा स्वभाव आणि थंड प्रकृती लक्षात घेता तिच्या अहवालातून फारसे काही ती लागेल असे आम्हाला वाटत नव्हते. तिच्या शांत घुम्या स्वभावामुळे आमच्या ग्रुपने तिला ‘बुद्धदेव’ हे टोपण नाव दिले होते. तर आम्ही बुद्धदेवाची वाट पाहत होतो.

बुद्धदेव चौथ्या दिवशी आला. विभाने आजारपणातही आपला अहवालअगदी चोख लिहिला होता आणि तो वाचताच आमची खात्रीच पटली की आमचा शोध संपला! सावज घावले!!

तिने लिहिले होते की, चार पाच महिन्यांपूर्वी अरू तिच्याकडे आली असता ती नाट्यशास्त्र विभागात नव्याने आलेल्या मनोज सरांविषयी खूप भरभरून बोलत होती. त्यांची म्हणे आमच्याच नाट्यशास्त्र विभागातून शिकून गेलेल्या आणि मुंबईच्या दूरदर्शन मालिकेत झळकणाऱ्या मनीषा चोळकरशी चांगली मैत्री होती. अरूला फोटोजिनिक चेहरा आहे आणि उत्तम पर्सनॅलिटी आहे, अभिनयाचे अंगही छान आहे असंही ते म्हणाले होते. तिला त्यांनी दूरदर्शनवर संधी मिळवून देतो म्हणूनही आश्वासन दिलं होतं म्हणे! एवढेच नाही तर ती त्यांच्या बरोबर एक दोनदा मुंबईलाही जाऊन आली होती.

हे वाचताच आम्ही सगळ्याजणी एकदमच ओरडलो, “अरे बुद्धदेवा इतके दिवस तू कसा गप्प बसलास? आम्हाला एका शब्दानेही बोलली नाहीस? मूर्ख! काय म्हणावे तुला?”

विभा म्हणाली, “अग तिनं मला शपथ घातली होती की यातले कुणाला एक अक्षरही सांगायचं नाही. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की तिच्या तोंडात साधा तीळही भिजत नाही. मला वाटले ही काय तुम्हाला सांगितल्याशिवाय राहणार आहे का? शिवाय म्हणाली की मला आपल्या ग्रुपला सरप्राईज द्यायचं आहे म्हणून!’

“वा! छान सरप्राईज मिळालं आपल्याला!” सगळा ग्रुप हळहळला. महत्त्वाचा तपशील हाती आला. तो म्हणजे ‘अरू’ त्यांच्या बरोबर बिबीका मकबऱ्यावर फोटो सेशनसाठी गेली होती. तेव्हाची एक गंमत तिने विभाला सांगितली होती. अरुला बिबीका मकबरा फार आवडायचा. विशेष म्हणजे त्याच्या मनोऱ्यांवर जाऊन उंचावरून सगळं शहर पाहायची तिला भारी हौस. तिने मनोज सरांना खूप आग्रह केला की आपण मनोऱ्यावरच्या मेघडंबरीत जाऊन फोटो काढू. वाऱ्यानेउडणारे केस, फडफडणारा दुपट्टा अशा पार्श्वभूमीवर फोटो खूप मस्त येतील. त्यांनी म्हणे चक्क नकार दिला तिला. म्हणाले, मला उंचीची भीती वाटते. हे सांगत असताना विभाने लिहिले होते, अरू जाम हसत होती. त्या पुढचा अहवाल काही विशेष नव्हता. त्यात फारसा दमही नव्हता. पण जे हाती लागले होते ते मला पुरेसे होते. शिकारीचा वास लागला होता. आता फक्त सापळा कसा आणि कुठे लावायचा ते ठरवायचे होते.

आम्ही एकूण तीन मुलांच्या नावांची यादी केली. म्हणजे कागदावर नाही, मनातच. सगळ्यांचे अहवाल मी बरोबर घेतले आणि घरी गेल्यावर जाळून टाकले. तीन मुलांच्या नावांपैकी एक मनोजसर सोडता इतर नावे काही विशेष दखल घ्यावीत अशी नव्हती. तरी पण हा विषयच असा होता की एखादा खाली मुंडी पाताळ धुंडी पण असायचा.

“मधू, आपलं सावज तर बहुतेक सापडलं, आता पुढे काय?’ शैला.

“अग अशी घाई करून चालायचं नाही. फार विचारपूर्वक आपली योजना आपल्याला आखावी लागणार आहे. आणि आपण काय करणार आहोत याची खबर या कानाची त्या कानाला लागता कामा नये. जर का काही फुटलं तर जेलची हवा खावी लागेल.” मी. “काय? विचार काय आहे मधू तुझा? जेलची हवा म्हणजे? काय खून बीन करायची तर योजना नाही ना तुझी? तसं काही असेल तर आम्ही नाही हां या लफड्यात पडणार!’ शैला.

“शैला, अग सगळं ऐकून घ्यायच्या आधीच अशी घाबरलीस? हीच का तुझी अरू बद्दलची सहानुभूती? अग असा वेडावाकडा विचार मी करेन असे आलेच कसे तुझ्या मनात? हे बघ जे काही करायचे आहे ना ते अगदी दुरुन. प्रत्यक्षात सावज आपले आपणच जाळ्यात फसणार! आपण आता दोन दिवसांनी पुन्हा इथेच भेटायचं. मी माझी सगळी योजना तेव्हाच तुम्हाला सांगेन. त्याच दिवशी आपण समोरच्या सिद्धीविनायकाचे देवळात जाऊन गुप्ततेची शपथ घ्यायची! कळलं? चल.”

-विनायक रा. अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..