नवीन लेखन...

निखळ आनंदाचा झरा ‘बालनाट्य’

ठाणे रंगयात्रामधील राजू तुलालवार यांचा लेख.


माझी 1979पासून बालनाट्य लेखन-दिग्दर्शनाला सुरुवात झाली. ‘अश्शी कार्टी नक्को रे बाप्पा’ हे माझं पहिलं बालनाट्य. विनोदी असल्याने बालप्रेक्षकांना ते फार आवडलं. आंतरशालेय स्पर्धेत काही तरी वेगळं करावं, या ईर्षेने रिमांड होमची समस्या मांडणारं-‘कुंपणाबाहेरची फुले’, मंदबुद्धीच्या मुलांवर आधारित-‘गोष्ट एका पप्पीची’ या दोन बालनाटिका स्पर्धेत सादर केल्या. त्यांना बक्षिसं मिळाली. या यशामुळे व्यावसायिक बालरंगभूमीवर बालनाट्य आणली. प्रयोग केले. परंतु त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मग नेमके काय करायला हवे, याचा विचार करू लागलो. त्यात एका आजोबांशी गाठ पडली. ते म्हणाले, ‘तुमचं नाटक चांगलं आहे. पण मी माझ्या नातवाला हसवायला आणलं. रडवायला नाही. तुमचं बालनाट्य मोठ्यांसाठी आहे. मुलांसाठी नाही.’ त्या दिवशी माझे डोळे खाड्कन उघडले. त्यानंतर मुलांना भरपूर हसायला लावणारी नाटकं लिहिण्याचा निश्चय केला.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हणे म्हणाले, ‘राजू, लहान मुलांना औषध गोड करून देतात. कारण औषध घेतोय, हे त्यांना कळतच नाही. तसे तुझ्या नाटकाचे आहे. हे सूत्र कायम ठेव.’ त्यांचा हा सल्ला आजवर पाळत आलो आहे.
विनोद हा बालनाट्याचा मुख्य गाभा आहे. अशी बालनाट्ये मुले एन्जॉय करतातच, शिवाय त्यातली पात्रे, प्रसंग, संवाद यांची पुनरावृत्ती घरीसुद्धा करतात. मुलांची माऊथ पब्लिसिटी अचाट असते. त्यामुळे रिपिट ऑडिअन्स मिळतो.

नाटकाचे शीर्षक कॅची ठेवावे लागते. उदा. ‘भित्रे भूत’, ‘जोकर आणि जादूगार’, ‘रडका राक्षस’, ‘फटाक्यांना घाबरणारे डॉक्टर’, ‘दाढी-मिशी-शेंडी’, ‘हसवणारे इंजेक्शन’, ‘नापास घोडे उंदीरमामा’, ‘ठेंगू चेटकीण’, ‘हत्तीचे लग्न’, ‘ठामठूम राक्षस’, ‘शेपूटवाला चोर’, ‘आईबाबा हरले’, ‘फजिती फटाके फराळांची’, अशा आजवर मी सादर केलेल्या बालनाट्यांनी मुलांचे भरपूर मनोरंजन केले.

मुलांची उत्सुकता जाणून काही पात्रांची निर्मिती करावी लागते. ‘चुलबुल पांडा’, ‘गाढवाचा दवाखाना’, ‘जम्बो ससा’, ‘वाघोबाची दिवाळी’, ‘रोबो आणि राक्षस’ या बालनाट्यांनी मुलांना एक वेगळाच फिल दिला. उपहास, नक्कल, कोट्या, फार्स, प्रासंगिक, शाद्बिक विनोद, मेलोड्रामा, ब्लॅक कॉमेडी-हे सगळे काही त्यांना इन्स्टंट कळते आणि त्यांची दादही वेगवान असते. मुले नाटकात काम करताना स्वत खूप हसतात. स्लॅपस्टिक कॉमेडी त्यांना खूप आवडते. दुःख हसण्यावरी नेणे म्हणजे काय हे बालनाट्य करताना कळले.

मुले खुर्च्यांवर नाचतात म्हणून शिवाजी मंदिर व्यवस्थापनाने बालनाट्यांना नाट्यगृह बंद केले होते. हास्यविनोदात मुले स्वत:ला पूर्णपणे विसरतात. एकदा एक मुलगी ऑडिअन्समधून ओरडली, ‘ए राक्षसा, टाइमप्लीज… माझं पोट दुखायला लागलं रे.’ दुसऱ्या एका प्रयोगाला मुलगा आजोबांना सांगत होता, ‘आजोबा मला खूप मज्जा येतेय.’ नक्कल करणे, अनुकरण करणे हे सर्वच बालप्रेक्षकांना आवडते. त्यामुळे नाटकातील राक्षस, चेटकीण हसले की अर्धेअधिक बालदोस्त तस्सेच हसून कॅरेक्टरला दाद देतात. जोकर, कार्टून्ससारख्या विनोदी पात्रांचे हसून स्वागत होते. राक्षस-चेटकिणीचा पराभव झाल्यावर मुले उड्या मारून आनंद साजरा करतात. एका बालनाट्यात, ‘ही चाल तुरूतुरू’ या गाण्याचे विडंबन करून चेटकिणीच्या एण्ट्रीसाठी वापरले होते. ‘हिची चाल हळूहळू, पांढरे केस लागले गळू, डाव्या डोळ्याने चकणी…’ यावर मुले लोटपोट हसायचे.

‘आदा पादा, कोण पादा… दामाजीका घोडा पादा, ठाम ठुस्स…’ हे मुलांचे गंमत गीत बालनाट्यात वापरले होते. मुले हसून दाद द्यायचे. पण एका ज्येष्ठ समीक्षकाने या गाण्यावर आक्षेप घेतल्याने ते नाटकातून वगळले. त्यानंतर आलेल्या प्रयोगाला मुलासह आलेल्या पालकाने मला विचारले, ‘हे नाटक आम्ही परत बघतोय. गंमत गीत का घेतले नाही? माझ्या मुलाला ते फार आवडायचे.’ मी त्यांना समीक्षकाने आक्षेप घेतल्याचे सांगितले. त्यावर ते म्हणाले, ‘अहो, त्यांनी नाटक मोठ्यांच्या चष्म्यातून पाहिले. म्हणून त्यांना ते खटकले असेल. लहानांच्या नजरेतून पाहिले असते तर त्यांना यातली गंमत अनुभवता आली असती. आदा पादा… मीसुद्धा एन्जॉय केले होते. प्लीज पुन्हा ते गीत तुम्ही नाटकात ठेवा.’ तेव्हापासून ठरवले, लहान मुलांना काय आवडते ते महत्त्वाचे. ‘सू सू… शी शी..’ हे शब्द बालसुलभ विनोद म्हणून वापरताना कधीच मागेपुढे पाहिले नाही. कारण बालनाट्यात मुलांसाठी हसणे महत्त्वाचे आहे, असे मानतो.

मी ठाण्यात पहिली बालनाट्य शाळा सुरू केली. पाच वर्ष विविध आंतरशालेय स्पर्धांच्या आयोजनात पुढाकार घेतला. 1979 ते 1983 पर्यंत आंतरशालेय स्पर्धेत लेखन-दिग्दर्शनासाठी बक्षिसे मिळाली.1997 साली अ. भा. मराठी नाट्य परिषदेकडून विशेष सन्मान, 2008 साली संस्कार भारती, मुलुंडतर्फे ‘बालनाट्य गुरू’ हे संबोधन मिळाले. 2015 साली ‘ठाणे नवरत्न’ पुरस्कार मिळाला. 2015 साली दुबईला बालनाट्य सादर करण्याचा मान मिळवला. आकाशवाणी-टीव्हीवरही अनेक बालनाट्याचे प्रसारण झाले. ई-टीव्हीसाठी ‘गम्मत गड’ नावाची मालिकाही केली.

बालरंगभूमीशी इतक्या वर्षांचे असलेले माझे नाते मला खूप सुखावते. बालनाट्य ही कलाकृती मुलांच्या विश्वात डोकावताना मोठ्यांनाही अपार आनंदात सहभागी करून घेते, अशी माझी भावना आहे.

— राजू तुलालवार – 9869004557

(साभार – ठाणे रंगयात्रा २०१६)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..