नवीन लेखन...

‘LGBTQI’ जनांसाठी नवी आशा

NEW HOPE FOR THE ‘LGBTQI’ COMMUNITY

LGBTQI’ जनांसाठी नवी आशा

 बातमी :  ‘LGBTQI’ जनांसाठी सेक्शन ३७७ बद्दल सुप्रीम कोर्टाचा पुनर्विचार

संदर्भ : १. लोकसत्ता, मुंबई आवृत्ती, दि. ०९.०१.२०१८

२. The Times of India, Mumbai Edition, dtd. 09.01.2018.

 

सुप्रीम कोर्टानें आज एक स्वागतार्ह व आशादायक गोष्ट केली , आणि ती म्हणजे ‘LGBTQI’ जनांबद्दलच्या आपल्याच आधीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यांचें ठरवलें.  ( ‘LGBTQI’  म्हणजे, लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वीअर, इंटरसेक्स ).  हे लोक सेक्शुअली, ‘(so called) Normal ’ लोकांपेक्षा वेगळे असतात ज़रूर, पण तीही माणसेंच असतात. मात्र, (अयोग्य व असमर्थनीय अशी) सामाजिक परंपरा, अपसमज, taboos, इत्यादी गोष्टींमुळे अशा प्रकारच्या लोकांना फार-फार suffer करायला लागलेलें आहे, व / किंवा आपली  सेक्शुअल भिन्नता समाजापासून लपवून ठेवावी लागली आहे. सध्या तर, असे संबंध ठेवणें ही बाब IPC च्या अनुसार गुन्हा आहे , अणि ती गोष्ट सुप्रीम कोर्टाच्या कांहीं कालापूर्वीच्या निकालानें अधोरेखितच केलेली आहे !

नॉर्मलमाणसांचें जग  :

यापूर्वी, मी , ’जगातील ६८ टक्के’ माणसांबद्दल मराठी व इंग्रजीत लेख लिहिले होते. ते लेख   ‘(Mentally / Physically) Challenged Persons’ , या विषयाशी संबंधित होते . मात्र तो मूळ मुद्दा इथेंही तितकाच लागू पडतो. म्हणून त्या लेखातील कांहीं अंश इथें देणें अस्थानीं होणार नाहीं.

 

अवतरण  सुरूं =

…. सर्वप्रथम आपण ‘नॉर्मल’ म्हणजे काय हे समजून घेऊ या. नॉर्मल म्हणजे ‘सर्वसाधारण’. नॉर्मल अर्थात  सर्वसाधारण म्हणजे काय ? एखाद्या विशिष्ठ गटातील जास्तीत जास्तांचे जे गुणधर्म असतात, ते त्या गटासाठी ‘सर्वसाधारण’ आहेत, असे म्हणता येईल. उदाहरणार्थ, मनुष्यप्राणी. माणसाला दोन हात, दोन पाय, एक डोके, ताठ उभा राहू शकणारा देह, दहा-दहा बोटे, असे गुणधर्म नॉर्मल म्हणता येतील. पक्ष्यांचे म्हणाल तर, पंख, चोच, अणकुचीदार पंजे, हे त्यांच्यासाठी नॉर्मल गुणधर्म म्हणता येतील. त्या विशिष्ठ गटातील एखाद्याचे गुणधर्म जर काही नॉर्मलपेक्षा वेगळे असले, (उदा. दहाऐवजी अकरा बोटे असणे), तर तो ‘नॉर्मलपेक्षा-भिन्न’ (different from Normal) आहे, असे म्हणता येईल.

 

संख्याशास्त्रात (statistics) ‘नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन’ नावाचा एक फिनॉमेनॉन् (phenomernon) आहे. हा फिनॉमेनॉन् ‘बेल्-कर्व्ह’ नामक आलेखाने (घंटीच्या आकाराचा आलेख) दाखवता येतो. ‘सरासरीचा बिंदू’ (mean) हा या आलेखाचा मध्यबिंदू आहे. या मध्यबिंदूपासून दोन्ही बाजूला जर ‘एक सिग्मा’

(one sigma) इतके ‘स्टँडर्ड-डिव्हिएशन’ (deviation,तफावत) बघितले, तर त्या ‘रेंज’ (range) च्या अंतर्गत त्या गटातल्या ६८% वस्तू सामावतात ; ‘दोन सिग्मा’ डिव्हिएशनच्या अंतर्गत ९३% , व ‘तीन सिग्मा’ डिव्हिएशनच्या अंतर्गत ९९.७% इतक्या वस्तू सामावतात. सरासरीपासून एक सिग्मापर्यंतच्या सर्व वस्तूंचे गुणधर्म सरासरीपासून फारसे वेगळे नसतात, म्हणजेच जवळजवळ सरासरीसारखेच असतात. एक सिग्मा ते दोन सिग्मा अंतर पाहिले, तर त्या गटातील गुणधर्म हे सरासरीपासून बर्‍यापैकी वेगळे असतात, ओळखू येण्याइतके वेगळे असतात. दोन ते तीन सिग्मा या अंतरातील गटाचे गुणधर्म सरासरीपेक्षा बरेच दूर असतात, बरेच वेगळे असतात.

 

… भारतीय पुरुषांचे उदाहरण ‘उंची’ हा घटक घेऊन पाहूं या, म्हणजे हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. उदाहरणार्थ असें समजूं की भारतीय पुरुषांची सरासरी उंची ५ फूट ६ इंच आहे. त्याप्रमाणे, साधारणपणे    ५ फूट ४ इंच ते ५ फूट ८ इंच उंच भारतीय पुरुष उंचीच्या संदर्भात ‘नॉर्मल’ समजले जातील. (गणितानुसार कॅल्क्युलेट् केलें तर कदाचित थोडीशी भिन्न-संख्या दिसेल ; पण आपल्यासाठी तूर्तास, मुद्दा समजायला, इथें दिलेल्या संख्या ठीक आहेत).  समजा, एखादा पुरुष ५’-२” उंच आहे. तो पुरुष ‘थोडा-बुटका’ समजला  जाईल. ५’-१०” उंच असलेला दुसरा एक पुरुष ‘थोडा-उंच’ म्हटला जाईल. पण, एखादा ४’-६” असलेला माणूस ‘खूपच-बुटका’ (अर्थात, नॉर्मलेक्षा खूपच वेगळा) व दुसरा एक ६’-६” उंच असलेला माणूस ‘खूपच-उंच’ या सदरात गणला जाईल (अर्थातच, हाही माणूस उंचीच्या बाबतीत नॉर्मलपेक्षा खूपच भिन्न समजला जाईल). पण असें असलें तरी, त्यांचेही इतर गुणधर्म (जसे, दोन हात, दोन पाय इ.), दाखवतात की तीसुद्धा माणसेच आहेत, कारण की त्या दुसर्‍या गुणधर्मांच्या बाबतीत ती माणसेही इतरांसारखीच असतात. भारतीय बायकांच्या बाबतीत उंचीचे नॉर्मज् (norms) पुरुषांपेक्षा वेगळे असतील. तसेच पाश्चिमात्यांचे उंचीचे नॉर्मज् किंवा चिनी लोकांचे उंचीचे नॉर्मज् हे भारतीयांच्यापेक्षा वेगळे असतील.

 

महत्वाची गोष्ट ही आहे की , जगातील अधिकांश गोष्टी ( things ) ,  या ‘६८%’ म्हणजेच नॉर्मल लोकांसाठीच असतात. उदाहरणार्थ, हॉकी स्टिक . साधारणपणें माणसें उजव्या हाताने काम करणारी (right-handed) असतात. त्यामुळे हॉकी-स्टिक त्यांच्यासाठी डिझाइन केलेल्या असतात. म्हणून, डावखोर्‍यांना (left-handed) त्या वापरतांना त्रास हा होतोच ! जगातील पद्धती (systems), सुविधा (facilities), या ‘६८‘ टक्केवाल्यांसाठीच बनवलेल्या असतात ; आणि उरलेल्या ३२ टक्क्यांना त्याबरोबर जावे लागते. या ३२ टक्क्यांमधेसुद्धा, जो सरासरीच्या जास्त जवळ, त्याला तडजोड/समायोजन (ऍडजस्टमेंट) त्यातल्या त्यात जास्त सोपे जाते. जो जास्त दूर, (जसें की, ‘दोन सिग्मा’ पेक्षा जास्त स्टँडर्ड-डिव्हिएशन असलेली व्यक्ती),  त्याला ही ऍडजस्टमेंट बरीच कठीण जाते. तरीही त्या व्यक्तीला त्या पद्धतीबरोबर (सिस्टमबरोबर) फरपटत जावे लागते. …..

= अवतरण समाप्त

 

तुम्ही कदाचित म्हणाल की, या ‘नॉर्मल’ चा  ‘LGBTQI’  शी काय संबंध ? याचे उत्तर असें आहे की, समाजाची बांधणी, समाजाचा आराखडा  ‘नॉर्मल’ लोकांसाठीच बनवलेला असतो. समाजात अधिकांश लोक heterosexual असतात, म्हणून, तसें असणें हें ‘नॉर्मल’ मानलें गेलें आहे , आणि त्यापेक्षा-भिन्न- असलेल्यांना आपल्यात सामावून घ्यायला समाज तयार नसतो.   ‘LGBTQI’  जन हे ‘बेल्-कर्व्ह् च्या मधल्या ( म्हणजे सरासरीच्या ) बिंदूपासून फार दूर असतात; ( ‘दोन-सिग्मा’च्या सीमेबाहेर तर नक्कीच ;   व कदाचित ‘तीन-सिग्मा’ च्या ही सीमेबाहेर ) . यावरून ती माणसें समाजापासून किती वेगळी पडतात हें आपण समजून घ्यावें. ‘ट्रॅफिक सिग्नल’जवळ  पैसे मागणारे ‘हिजडे’ पाहून आपल्या मनात काय भावना येते ; याचा ज्यानें त्यानें विचार करावा. त्यांना असें कां वागावें लागतें, हा विचार कितिकांनी केलेला आहे ?

 

आपण सामाजिक प्रथांची कांहीं उदाहरणें  बघून हा मुद्दा अधिक समजून घेऊं या.

 

  • द्रौपदीचे पांच पती – द्रौपदीच्या ‘( so called) स्वयंवरा’त अर्जुनानें ‘पण’ जिंकला आणि त्याला द्रौपदी प्राप्त झाली. ( द्रौपदीच्या भावनांचा विचार सद्य लेखाच्या कक्षेबाहेर आहे). खरें तर, न्याय्य हें होतें की द्रौपदीनें केवळ अर्जुनाची पत्नी व्हावें. पण कुंतीनें तिला पाची-पांडवांची पत्नी बनवलें. (‘आणलेली भिक्षा पांचांनी वाटून घ्या, असें कुंती म्हणाली, तेव्हां तिला, भिक्षा म्हणजे द्रौपदी हें ठाऊक नव्हतें’ , हे स्पष्टीकरन तद्दन भुक्कड आणि अविश्वसनीत आहे. तें नंतरच्या काळातील पुराणिकांनी घुसडलेलें आहे ; तें नक्कीच प्रक्षिप्त आहे. असो ) . द्रौपदीनें पांचांशी विवाहबद्ध व्हावें,  हें सांगतांना, कुंतीला आपण कांहीं चुकीचें सांगतो आहोत असें वाटलेलें दिसत नाहीं. कां बरें ?

कुंतीच्या पित्याचें नांव होतें ‘कुंतीभोज’. म्हणजे, तो ‘भोज’ या ‘राष्ट्रा’चा (जन-समूहाचा ) नृप होता. किंवा, भोजांचें जर गणराज्य असेल, तर तो त्याच्या ‘मुखिया’ होता. भोजांच्या राज्यात बहुपतित्वाची प्रथा ( polyandry) अस्तित्वात असणार, म्हणून तसें सांगणें कुंतीला गैर वाटलें नाहीं.

त्यातून, पंडू हा कुंती व माद्रीबरोबर वनात रहायला गेलेला होता.  तो उत्तरेकडे , हिमालयीन दिशेला गेला होता. त्या भूभागात, बहुपतित्वाची चाल होती. तिथें राहून आल्यामुळेंही, कुंतीला बहुपतित्वात कांहीं अयोग्य वाटलें नाहीं.

मात्र कुरु-पांचालांच्या भूभागात ही प्रथा नव्हती, ती गैर मानली जात असे. त्यामुळेच तर, द्यूताच्या वेळी भर सभागृहात द्रौपदीला  वेश्या म्हटलें गेलें. (हा प्रक्षेप असला तरी कांहीं बिघडत नाहीं. त्यातून तत्कालीन समाजमन कळतें).

पहा, एखादया ‘समाजा’तील ‘नॉर्मल’ मानल्या गेलेल्या  प्रथेपेक्षा कुणी भिन्न वागलेलें असलें, तर तसें वागणें गैर मानत, त्या व्यक्तीची ( इथें, द्रौपदीची) छी:थू होऊं शकते.

  • नियोग : नियोगात ( नाइलाजानें ) सामील झालेल्या स्त्रियांच्या मनाची काय स्थिती असेल हा विचार  खूप महत्वाचा आहे, पण तो सध्याच्या लेखाच्या कक्षेबाहेर आहे. आपण इथें मुख्यत: या प्रथेबद्दल चर्चा करणार आहोत.

विचित्रवीर्याचा मृत्यू पुत्रहीन असतांनाच झाला. त्यामुळे, कुरुवंश चालू ठेवण्यांसाठी सत्यवतीनें अंबिका व अंबालिका यांना नियोगाचा आग्रह केला. त्य दोघी व त्यांची दासी यांनी व्यास ऋषींशी समागम केला आणि त्यातून धृतराष्ट्र, पंडू आणि विदुराचा जन्म झाला. हे नियोगाचें एक उदाहरण.

नियोगाचें हें दुसरें उदाहरण हें पहा –   पंडूमध्ये कांहींतरी न्यून असावें, ज्यामुळे त्याला संतती-उत्पादन शक्य नव्हतें. त्यामुळे, वनात रहात असतांना, त्यानेंच कुंतीला नियोगाचा आग्रह केला. कुंतीनें तो मान्य केला. तिनें स्वत:ला प्राप्त झालेला एक वर माद्रीला दिला ; व दोघींनीही नियोगाचा अवलंब केला, आणि पांच पांडवांचा जन्म झाला. ( प्रत्यक्ष-नियोग-समागम हा वैदिक देवतांशी केलेला होता की कुणा नरांशी, हा मुद्द तूर्तास चर्चिण्याची आवश्यकता नाहीं , कारण, कसेंही असलें तरी, ते ‘नियोग’च होते) .

हें ध्यानात घेऊं या, की तत्कालीन जनतेला नियोग-पद्धती मान्य होती. म्हणून, नियोगामुळे अंबिका, अंबालिका, कुंती , माद्री यांचा अधिक्षेप झाला नाहीं.

आतां आपण नंतरच्या कालाकडे येऊं. आपल्याला महाभारतकालानंतर नियोगाचा उल्लेख दिसत नाहीं. समजा, जर मध्ययुगात कुणी नियोग-प्रथेचा अवलंब करायचें म्हटलें, तर समाजाला तें मान्य नसतेंच झालें, आणि त्या व्यक्तीनें जर समाजविरुद्ध जाऊन तसें केलेंच, तर त्याला ‘वाळीतच’ टाकलें गेलें असतें.

आधुनिक कालात तर, नियोगाच्या ऐवजी, ‘In-vitro-fertilization’ ( IVF ) ची सोय झाल्यामुळे, आतां  प्रत्यक्ष नियोग-समागमाचा प्रश्नच निकालात निघालेला आहे. म्हणजेंच, प्रत्यक्ष-समागम-न-करतां-केलेला-‘नियोग’ आतां समाजाला मान्य आहे.

  • सन्याशाचें लग्न :

ज्ञानदेवांचे पिता विठ्ठलपंत यांनी सन्यास घेतला होता. पण गुरूच्या आदेशानुसार ते पुन्हां गृहस्थाश्रमी बनले, व नंतर निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान व मुक्ताबाई यांचा जन्म झाला. सन्याशानें पुन्हां गृहस्थाश्रम स्वीकारणें तत्कालीन मध्ययुगीन समाजाला मान्य नव्हतें. म्हणून या कुटुंबाला ‘वाळीत’ टाकलें गेलें. शेवटी, ‘(तथाकथित) पापा’चें  प्रायश्चित्त म्हणून विठ्ठलपंत व त्यांची पत्नी  रुक्मिणी यांना ‘जलसमाधी’ घेऊन मरणाला सामोरें जावें लागलें.

आजच्या युगात असा कुणी सन्यासानें पुनश्च गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला, तर कोणी त्याला विरोध करेल असें अजिबात संभवत नाही.

 

समारोप  :

  • थोडक्यात काय, तर, समाजमान्यत्व-प्राप्त-असलेल्या-प्रथा, या, भूगोल, संस्कृती आणि काळ या सर्वांशी संबंधित आहेत. एका भूभागात मान्य असलेल्या प्रथा ( उदा. जेवणानंतर ढेकर देणें) या दुसर्‍या भूभागात मान्यताप्राप्त असतील असें नाहीं ; एक संस्कृतीला, एका कम्युनिटीला, मान्य असललेल्या प्रथा दुसर्‍या संस्कृतीला, दुसर्‍या कम्युनिटीला, मान्य असतील असें नाहीं ( उदा. केरळमध्ये अजूनही कांहीं कम्यूनिटीज् मध्ये मातृसत्ताक पद्धत आहे ; पण भारतात इतरत्र पितृसत्ताक पद्धत चालते. तसेंच, कांहीं आदिवासी जमातींमध्ये स्त्रिया आपली वक्ष:स्थळें उघडीच ठेवतात ; पण तें सुशिक्षित शहरी समाजात मान्य नसतें) ; आणि सर्वात महत्वाचें म्हणजे, सामाजिक प्रथा या कालसापेक्ष असतात ; काल जें योग्य वाटत असे, तें आज तसें वाटेलच असें नाहीं ( उदा. सतीची प्रथा, विधवांचें केशवपन, विधवा-विवाह). काळाबरोबर समाजही बदलत जातो, आणि त्यानुसार, प्रथांची मान्यताही बदलूं शकते.
  • चित्रा पालेकर त्यांच्या ‘लोकसत्ता-चतुरंग’मधील सदरातील ८.०७.२०१७ च्या लेखांकात   म्हणतात, ‘बहुसंख्य माणसांना सर्वसामान्यपणे माहीत असलेल्या रंगापेक्षा वेगळ्या रंगाचं असणं’ ही ज्यांची एकमेव चूक, त्या अल्पसंख्य ‘एलजीबीटीक्यू’ व्यक्तींबद्दल किती चुकीच्या कल्पना, गैरसमजुती, अफवा, अवतीभवती पसरल्या आहेत ’ .

पण, ध्यानात घ्या, समाजातील majority पेक्षा, ( ज्या जनसमूहाला ‘नॉर्मल’ अशी संज्ञा आहे) , भिन्न असणें ही ‘चूक’ नाहीं , तो शिक्षापात्र ‘गुन्हा’ तर नाहींच नाहीं ; तर, ती त्या त्या व्यक्तीची Natural प्रवृत्ती आहे.  अशा व्यक्तींना जो त्रास भोगावा लागतो, त्याचा दोष त्यांच्याकडे नाहीं, तर, समाजाकडेच जातो.

  • आतां सुप्रीम कोर्टानें या विषयावर, खोलवर मंथन करून पुनर्विचार करण्यांची announcement केलेली आहे. त्यातून, या ‘LGBTQI’ कम्युनिटीला योग्य तो न्याय मिळेल अशी आशा करायला हरकत नाहीं.

— सुभाष स. नाईक
Subhash S. Naik

M- 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in

 

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..