नवीन लेखन...

अमेरिकेचा नॅशनल आइसक्रीम दिवस

जुलै महीन्यातील तिसरा रवीवार हा अमेरीकेत नॅशनल आइसक्रीम दिवस साजरा केला जातो. त्या निमीत्ताने आइसक्रीमचा इतिहास.

आइसक्रीम.. नुसतं नाव उच्चारलं तरी आपण गारेगार होऊन जातो. आइसक्रीम पार्लर असो, हॉटेल असो, घरच्याघरी तयार आइसक्रीम असो किंवा रस्त्यावरून घंटावाली गाडी घेऊन फिरणारा आइसफ्रुटवाला असो, आइसक्रीम या नावातच आपल्याला पार विरघळवून टाकायची ताकद आहे. खाऊचा इतिहास माणसांच्या संस्कृतीइतकाच जुना आहे. या इतिहासाच्या पानापानावर आपल्याला अशी वळणं आढळतात जिथे जन्माला आलेला नवा पदार्थ म्हणजे त्या प्रदेशाची ओळख ठरावा. पण जिथे ही इतिहासाची पानं धुसर होतात तिथे एखाद्या लोकप्रिय ठरलेल्या पदार्थाच्या निर्मितीवर नाव कोरायला अनेक जण पुढे सरसावतात. आइसक्रीमच्या बाबतीत नेमकं हेच झालं आहे. हा आमचा शोध आहे असं म्हणणारे अनेक आहेत. त्यामुळे आइसक्रीमचा जन्म नेमक्या कोणत्या प्रांताच्या कुशीत झाला याचे स्पष्ट दाखले नाहीत. तरीही असं म्हटलं जातं की, चीनमध्ये फार पूर्वी भात व दूध यांच्या मिश्रणातून आइसक्रीमसदृश पदार्थ तयार केला जात असे. सुप्रसिद्ध खलाशी मार्कोपोलो अतिपूर्वेच्या देशांचा प्रवास करून इटलीत परतला तेव्हा सोबत काही खास पदार्थाच्या पाककृतीचा खजिना त्याच्या गाठीशी होता. त्यातच आइसक्रीमच्या पाककृतीचाही समावेश होता. पण आज ज्या पदार्थाला आपण आइसक्रीम म्हणतो ते त्या काळात मात्र ‘क्रीम आइस’ होतं. उन्हाळ्याच्या काळात स्वीटक्रीम किंवा कस्टर्ड थंड करण्यासाठी बर्फाचा वापर केला जायचा. तेच हे क्रीम आइस.

आइसक्रीमच्या नावाशी खूप साऱ्या थोरा-मोठय़ांची नावं जुळलेली आहेत. चीनमधून मार्कोपोलोच्या माध्यमातून आइसक्रीम इटलीत पोहोचलं. इटालियन राजपुत्री कॅथरिन मेडीसीचा विवाह फ्रान्सचा राजपुत्र हेन्री दुसरा याच्याशी झाला. ती लग्नानंतर काही इटालियन शेफ आपल्या सोबत घेऊन गेली होती. इटलीकडून फ्रान्सकडे आणि मग पुढे जगभर आइसक्रीमची लोकप्रियता पसरतच गेली. मात्र त्या काळी बर्फ तयार करण्याची प्रक्रिया फारशी सोपी नव्हती. असं म्हणतात की, रोमन सम्राट ‘नीरो’ने पर्वतातून बर्फ आणून आइसक्रीम तयार करण्यासाठी खास माणसं ठेवली होती. इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिला याच्या जेवणानंतरच्या डेझर्ट डिशमध्ये आइसक्रीमचा समावेश हमखास असायचा. पण तो या पदार्थाबाबतीत इतका दक्ष होता की या ‘फ्रोजन स्नो’ची माहिती कुणालाही कळू नये यासाठी त्याने आपल्या शेफला ही पाककृती लपवून ठेवण्याकरता आयुष्यभर पेन्शनची सोय केली होती असं म्हणतात.

एकूण काय, सुरुवातीच्या काळात आइसक्रीम ही श्रीमंतांची चैन होती. आइसक्रीमकरता लागणारा बर्फ तयार करणं वा त्यासाठी बर्फाळ पर्वतरांगांत माणसं नेमणं सर्वसामान्य माणसाला परवडण्याच्या पलीकडचं होतं. पण रेफ्रिजरेटर, मोटर्स, पॅकिंग मशीन यांच्या शोधाबरोबर व प्रसाराबरोबर आइसक्रीमचं उत्पादन सर्वसामान्यांपर्यंत आलं आणि आइसक्रीम ही थोरामोठय़ांची मक्तेदारी उरली नाही. गंमत बघा, एखादा पदार्थ विशिष्ट कारणाशी अचानक जोडला जातो आणि मग त्याचा मागचा इतिहास बाजूला राहून एखाद्या नव्याच संदर्भात त्याचं समीकरण जुळतं. आइसक्रीमचंही नेमकं असंच झालं. आइसक्रीम ही एकेकाळची रॉयल डिश. मात्र दुसऱ्या महायुद्धात मनाने हताश, निराश झालेल्या सैनिकांचे मनोबल वाढवणारा पदार्थ म्हणून अचानकच आइसक्रीमचं एक नवं नातं जुळलं. दुसऱ्या महायुद्धातल्या अनेक लढणाऱ्या देशांनी त्यांच्या सैनिकांना आइसक्रीम खाऊ घालण्याचा प्रयत्न केला होता असा संदर्भ आढळतो. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर अमेरिकेत आनंद साजरा करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर आइसक्रीम खाल्ले गेले आणि त्यातून सेलिब्रेशन आणि आइसक्रीम असं छान समीकरण तयार झालं. ब्रिटिशांच्या मार्फत भारतात रुजलेल्या आइसक्रीमशिवाय भारतीय लग्नपंगतीची कल्पना होऊ शकत नाही. लग्न, वाढदिवस, बढती असो की निवृत्तीसमारंभ असो, मित्रमैत्रिणींचा सहज भेटण्याचा प्लान असो.. या सगळ्या क्षणांची गोडी वाढवण्यासाठी आइसक्रीम हजर असतं. बऱ्याच दिवसांत खाल्लं नाही, हे चुटुकपुटुक कारणही आइसक्रीम पार्टी करायला सहज पुरतं.भारतासारख्या सतत उन्हाळलेल्या देशाला गारेगार आइसक्रीमने प्रेमात पाडलं नसतं तर नवलच होतं.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..