सन आयलाय गो आयलाय गो, नारली पुनवेचा @ वरली कोलीवाडा..

काल इतक्या वर्षात पहिल्यांदाच कोळी बांधवांचा ‘नारली पुनवे’चा सण साजरा होताना प्रत्यक्ष पाहिला. आता पर्यंत नारळी पौर्णिमेचा सण कसा साजरा करातात, ते टिव्हीवर पाहिलं होतं. नारळी पौर्णिमा म्हणजे समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करून दुसऱ्या दिवसापासून मासेमारी करण्यासाठी कोळी बांधव आपली होडी दर्यात ढकलतो, येवढंच शाळेच्या पुस्तकांतून नाॅलेज मिळालं होतं. या निमित्ताने ‘कोळी डान्स’ होतो, हे ज्ञान नंतर टिव्ही किंवा मराठी गाण्यांचे काही कार्यक्रम पाहून प्राप्त झालं होतं. पण तेवढंच. प्रत्यक्षात कोळी समाजाचा हा सण, मी समजत होतो त्यापेक्षा कितीतरी पटीने आशयसमृद्ध आहे, हे मला काल समजलं..!

वरळीचा कोळीवाडा हा मुंबई बेटांच्या स्वरुपात होती तेंव्हापासूनचा आहे. मुंबईतील पहिले रहिवासी म्हणजे समुद्र किनाऱ्यांच्या आधाराने राहाणारे कोळी. सहाजिकच त्यांच्या देवता या मुंबईतील अत्यंत प्राचीन देवता समजल्या जातात. यापैकी एक म्हणजे वरळी कोळीवाड्याची देवता ‘श्री गोलफा देवी’..! मुंबईतील प्राचीन देवतांच्या अभ्यासाच्या निमित्ताने वरळी कोळीवाड्याच्या श्री गोलफा देवीची माहिती घेण्यासाठी माझं जाणं झालं होतं. त्यातून माझी ओळख वरळी कोळीवाड्यातील श्री. अधिश काटकर, श्री. सागर कोळी, श्री. अमेय वरळीकर या हुरहुन्नरी आणि उत्साही तरुणांशी झाली होती आणि तोच दुवा पकडून मी काल मुंबईतील हा सर्वात प्राचीन सण वरळी कोळीवाड्यात पारंपारीक थाटात कसा साजरा होतो, हे पाहाण्यासाठी गेलो होतो.

आजवर टिव्हीवर पाहिलं होतं, त्यापेक्षा कितीतरी पटीने उत्साहात हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रातील इतर ठिकाणच्या देवतांच्या सणाप्रमाणेच, वरळी कोळीवाड्यातही दरवर्षी या दिवशी पालख्या निघतात. या पालख्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे या पालख्यांमधे समुद्र देवतेचं अधिष्ठान असतं. बोट, बोटीतील नाखवा, फेर धरून नाचणाऱ्या स्त्रिया आणि मधोमध कऱ्यामधे सोनेरी कागद लपेटलेला नारळ असतो. ज्यांचं अवघं जीवन समुद्रावरच अवलंबून असतं, तो समुद्र या पालख्यांमधे देवाच्या जागी असतो. समुद्र नांगरणाऱ्या कोळ्यांचं जीवन समिंदराच्या लहरीपणाशी घट्ट निगडीत. मासेमारीला खोल समुद्रात गेलेला नाखवा सुखरुप परत येईल, याची खातरी देता येत नाही. त्यासाठी समुद्र देवता सदा प्रसन्न असावी आणि त्यांने नाखवाची काळजी घ्यावी, यासाठी त्याची पुजा दरवर्षी या दिवशी केली जाते. अर्थात आता आधुनिक बोटी आणि संपर्काच्या अत्याधुनिक साधनांमुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या कोळ्यांचा जीव धोक्यात आला असता, तो वाचण्याची शक्यता पूर्वीपेक्षा कैक पटीने वाढलेली असली तरी, कोळी बांधवांनी त्यांची प्रचीन परंपरा प्राणपणाने जपलेली आहे. आधुनिक काळातही समुद्राची त्याचसाठी पुजा केली जाते..

कोणत्याही समाजातील कोणत्याही सणां-समारंभात (यात लग्न समारंभही आले) त्या त्या समाजातील स्त्रियाच पुढे असतात. किंबहूना आपले सण-समारंभ-उत्सव स्त्रियांसाठीच साजरे होत असावेत, असं माझं मत आहे. सणा-सुदीला स्त्रियांचा उत्साह, त्यांच्या नटण्या-मुरडण्याला आणि नाच-गाण्याला उधाण आलेलं असतं. नारळी पौर्णिमा तर साक्षात समुद्र देवतेशी संबंधीत सण आणि समुद्राचा आणि उधाणाचा तर सख्खा संबंध. तेच उधाण या समुद्राच्या लेकींमधे उतरलं नसतं तरच नवल. काल मी हे प्रत्यक्ष पाहिलं. नटून थटून, पारंपारीक पेहेरावात, टना-मणाचं सोनं ल्यालेल्या कोळी स्त्रिया, बेभानपणे त्यांच्या पारंपारीक नाचात (ह्याला डान्स म्हणणं म्हणजे त्यावर अन्याय आहे) हरवून गेल्या होत्या. त्यांचा तो देखणा साजशृंगार पाहून मला कुठेतरी वाचलेलं शाहीर होनाजी बाळा यांचं,

“गळ्यामधे हार, पायि पोल्हार,
हातात झळकते जडावाची आंगठी ग..
डोईस मूद शखडी, हाले हलकडी,
गळ्यामधि मोहनमाळ..!
मनगट्या गोठपाटल्या हाति दाटल्या,
बाजुबंद दंडावरी, जरतारी चोळी अंजिरी..!
जवाहर पुतळ्यांची माळ गळाभर
लसण्या, ठुशा कंठी गळा भरपूर..!
कानी कुंडले की, भोकरे नक्षीदार
कानात घातले काप, वरती मोर..!
दोन द्राक्षांचे बेल बुगडीवर
सात सर्ज्यांची नथ ठपकेदार…!
राखडी केतक केवड्या जडित लालड्या
मंजूळ वाजती पदी जोडवी तोरड्या..!!”

हे पद आठवलं..ह्या गाण्यातले शब्द काल वरळीच्या कोळीवाड्यात माझ्यासमोर साक्षात जिवंत होऊन ठेक्यात नाचताना मी पाहिले..

कोळी पुरुष, तरुण, लहान मुलंही कमरेला पारंपारीक त्रिकोणी रुमाल, सुरका बांधून, वर शर्ट किंवा टि-शर्ट घालून आणि डोक्यावर सुप्रसिद्ध दोन गोंड्यांची लाल टोपी घालून पालख्यांच्या मिरवणुकीत सामिल झालेले दिसले. कानाला गोड वाटणाऱ्या कोळी गाण्यांच्या ठेक्यावर त्यांचे पारंपारीक नाच सुरू होते..एकच उणीव जाणवली, गोड उच्चाराची, नकळत ठेका धरायला लावणारी कोळी गीतं लाऊड स्पिकरवर लागलेली होती, कुणाच्या तोंडातून ऐकायला मिळाली नाहीत..!!

आपल्या देशातील जाती आणि जमाती हे आपल्या भारतीय समाजाचं एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक समाजाच्या चालीरीती, खाण्याचे पदार्थ, सण-समारंभ, पेहेरावांच्या इतक्या विविध तऱ्हा आहेत, की ते पाहाताना, अनुभवताना ही विविधता कोणी आणि कशी आणली असावी याचा विचार मनात येतो. कालही वरळी कोळीवाड्यातील पारंपारीक वेष परिधान केलेले स्त्री-पुरूष पाहिले, आणि तोच विचार मनात आला. नंतर लक्षात आलं की, खाणं-पिणं, सण-समारंभ, पारंपारीक वेष इत्यादी, तो तो समाज किंवा जमात करत असलेल्या कामामुळेच अस्तित्वात आला आसावा. आपण जे काम करतो, त्या कामाला अनुरुप, काम करताना अडथळा येणार नाही अशा पद्धतीने पेहेराव विकसित झाला, असं वाचलेलं प्रत्यक्षात समोर दिसत होतं..!

कोळी पुरुष कमरेला गुंडाळत असलेला सुरका पुढून त्रिकोणी,तर मागून पाय उघडे टाकून ढुंगणाकडे वर खोचलेला असतो. पाण्यात उकिडवं बसून काम करावं लागत असल्यामुळे, मागून पाण्यात वस्त्र भिजू नये यासाठी ह्या सुरक्याचं प्रयोजन असावं. तसंच पुरुषांची गोंडेदार टोपी, दर्यावर वाहाणारं वारं कोणत्या दिशेला वाहातंय, हे समजण्यासाठी असावी, हे मला काल वरळीच्या किनाऱ्यावरच्या भणाणत्या वाऱ्यामुळे समजलं.. दिसतील इथपर्यंत वर नेसलेला असतो. कोळी स्त्रियांचा वेशहा तसाच, व्यवसायाला अनुरूप. घट्ट लपेटलेली, कंबरेभावती पदराचे दोन-चार लपेटे मारलेली नऊवारी वाटेल अशी, परंतू नऊवारीपेक्षा काहीशी वेगळी साडी. ही साडी, तिला नऊवारी म्हणत असले तरी, प्रत्यक्षात ‘बारा वारी’ असते. घरधन्याने दर्यातून लुटून आणलेल्या म्हावऱ्याने भरलेल्या टोपल्या उचलताना कंबरेला जोर मिळावा म्हणून हे तीन वार लांबीच्या पदराचं लपेटणं. मागून, पुरुषांप्रमाणेच उकिडवं बसून काम करताना भिजू नये, अशा पद्धतीनेच साडीचा काष्टा घट्ट नेसला जातो..

जसा वेश, तसाच देवाला नैवैद्यही. शेतकरी जमिन नांगरतो व त्यातून पिकलेलं धान्य देवाला नैवेद्य म्हणून दाखवतो. कोळी समुद्र नांगरतो आणि सहाजिकच देवाला समुद्रातून घेतलेलं पीक, म्हणजे म्हावऱ्याचा नैवेद्य दाखवतो. काल वरली कोलीवाड्यात नारली पौर्णिमेला देवाला मी अंगापिंडाने भरलेली पापलेटा आणि कुर्ल्यांचा निवेद दाखवलेला पाहिला तेंव्हा मला ते बघायला मजा वाटली होती, परंतु आश्चर्य मात्र बिलकूल वाटलं नव्हतं. ‘त्याने’ दिलेलं ‘त्याला’च काही अंशाने परत द्यायचं आणि हे ‘माझं नसून तुझी कृपा आहे’ ही जाणीव सतत बाळगायची, हे हिंन्दू संस्कृतीचं एक वैशिष्ट्य पुन्हा एकदा माझ्यासमोर वरली कोलीवाड्यात उभं ठाकलं होतं..

‘कोळी समुद्र नांगरतो’ हे वाक्य सत्याच्या जास्त समिप जाणारं आहे, असं मला वाटतं. कारण ‘कोळी’ हा शब्द कन्नड भाषेतल्या ‘कोळ्ळ’ किंवा ‘कोळ्ळू’ ह्या शब्दावरून आला असावा, असं मला वाटतं. कन्नड भाषेत ‘कोळ्ळ’ किंवा ‘कोळ्ळू’चा अर्थ ‘नांगर’ असा आहे. यावरुनच मराठीत नांगरासाठी ‘कोलू’ असा शब्द आला. उदा. ‘गाढवाचा कोलू फिरवला’ हा शब्द प्रयोग माझ्या वयाच्या लोकांनी, शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात वाचलेला त्यांना आठवत असणार. पेशवाईत एखाद्या गावाला शिक्षा म्हणून बेचिराख करायचं असेल, तर त्या गांवावत ‘गाढवाचा कोलू’, म्हणजे गाढवाचा नांगर फिरवायचे ही गोष्ट आपण शाळेत असताना, बाल शिवाजींचं जिजाऊंसोबत पुण्यात आगमन होतं त्या धड्यात वाचलेली होती..!

पालख्यांतून “अरे बेगीन बेगीन किनारी जाऊ देवाचे पुंजेला, हात जोरूंशी नारल सोन्याचा देऊया दर्याला..” म्हणत नेण्यात आलेला सोन्याचा नारळ शेवटी विधिवत समुद्राला अर्पण केला जातो, ते दृष्यही हेलावून टाकणारं होतं. अवघं वातावरणंच पवित्र झालेलं जाणवत. कालच्या पावसाळी सायंकाळी वरळीच्या किनाऱ्यावर कोळी सुवासिनी समुद्राला मनोभावे ओवाळत होत्या. त्यांच्या हातातल्या तबकातील दिव्यांचा मंद, सात्विक उजेड त्यांच्या भावव्याकूळ चेहेऱ्यावर पडला होता. समुद्राची त्या जणू पूजा करून येत्या मोसमात आम्हाला भरभरून दे, असं आर्जव करत होत्या असंच मला वाटत होतं. समुद्राला भाऊ मानून आपल्या घरधन्याची रक्षा कर, असं त्याला बहिणीच्या मायेनं ‘रक्षाबंधन’ही घालत होत्या. त्यांची पुजा झाल्यावर प्रत्येकीच्या घरधन्याने पालखीतून भक्कीभावाने मिरवत आणलेला सोन्याचा नारल मनोभावे समुद्राला अर्पण करून सागराला नमस्कार केला आणि नारली पुनवेच्या सणाची सांगता झाली.

पंचमहाभूतांना देव मानून त्यांचं देवस्वरूप आजच्या विज्ञान युगातही जपणारी आपली संस्कृती किती महान आहे, हे अशावेळी कळतं. हे जपलं पाहिजे. नविन पिढ्यांमधे यासारख्या सणांच्या ठेव्याची जपणूक व्हावी म्हणून शाळेतल्या मुलांना आवर्जून हे असे सण, पारंपारीक पद्धतीने साजऱ्या केल्या जाणाऱ्या ठिकाणी नेऊन पालकांनी प्रत्यक्ष दाखवायला हवेत. ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे..

— ©️नितीन साळुंखे
9321811091

फोटो- हेमंत पवार व चंदन विचारे
आभार- अधिश काटकर, सागर कोळी, स्वकीत काटकर, अमेय वरळीकर.

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड

अंबड शहरात मत्स्योदरी देवीचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर इ.स.१८ ...

विदर्भाचे प्रवेशद्वार : मलकापूर

मलकापूर  हे बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक, शैक्षणिक केंद्र आहे. मलकापूर ...

जलग्राम : जळगाव

मेहरुणच्या नैसर्गिक तलावामुळे जलग्राम म्हणूनही जळगाव शहराची ओळख आहे. उत्तर ...

Loading…